– संजय आवटे
———————————————————–
‘साबरमती’ म्हटलं नि रिक्षावाल्यानं ‘रिव्हरफ्रंट का?’ विचारलं. मला मग एकदम “सी-प्लेन’मधल्या झंझावाती प्रचाराचं कॅम्पेन आठवलं! वर्तमानाचा एक कोपरा पुसत, ‘साबरमती के संत तूने कर दिया कमाल…’ असं गुणगुणत साबरमती काठावर पोहोचलो. सत्याचे प्रयोग करणारी प्रयोगशाळा साबरमतीकाठी उभी राहिली, त्याला १०० वर्षं पूर्ण होत असताना, असत्याची प्रयोगशाळा किती दमदारपणे तिथंच बिलगून उभी राहिलीय!
साबरमतीच्या पाण्याला तरी कसला रंग आणि कसलं काय! त्यात जे मिसळेल, तोच रंग साबरमतीचा.
***
पोहोचलो, तेव्हा किंचित अंधारुन यायला सुरूवात झाली होती. काही लहानगी मुलं तिथं परिसरात खेळत होती. त्यांच्याशी गप्पा सुरू केल्या. गांधी- पटेलच काय, जिनाही दिले ते गुजरातनंच. मुलांना मात्र बाकी फार काही माहीत नव्हतं. त्यांना गुजरातचे दोनच नेते ठाऊक. एक, इतिहासातले- गांधी. आणि, दुसरे नेते अर्थातच वर्तमानातले! गुजरातमधलं इतिहासाचं पुस्तकही नुकतंच मी पाहिलेलं. मी त्या पोरांशी काही बोलण्याचा क्षीण प्रयत्न केला. पण, ते त्यांच्या खेळण्यात रमलेले. त्यांनी मला सांगितलं, ‘बापू राहायचे, ती खोली बंद आहे. आत काही जाता यायचं नाही. तुम्हाला बाहेरनंच सेल्फी घ्यावी लागेल बरं का!’
मनात म्हटलं, ‘बापूंच्या पाहुण्यांची खोली तरी उघडी आहे ना! तिथं बसेन!’
***
पुढं जात राहिलो. संध्याकाळ झाली नि महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला गांधी आश्रमात जाताना गांधी-आंबेडकरांचं बोट पकडून या वर्तमानाकडं पाहातोय, असं वाटत होतं. आंबेडकर गांधीजींपेक्षा २२ वर्षांनी लहान. पण, आंबेडकरांचं बोट पकडून नव्यानं भारत समजून घेताना गांधींच्या चेह-यावर तेच कुतुहल असणार.
अर्थात, आंबेडकरांनी सांगितलेला अज्ञात भारत गांधींना समजला तोच मुळी त्या वाटेवर ते होते म्हणून. म्हणून तर दांडी यात्रेला निघताना बुद्धाच्या सर्वसंगपरित्यागाच्या वाटेनं चालल्याची भावना त्यांच्या मनात घर करुन होती. दांडी यात्रा मिठाच्या सत्याग्रहाची खरीच, पण गांधींची ती वाट बुद्धानंच तर प्रकाशमान केली होती.
साबरमती आश्रम उभा राहण्यापूर्वी शेजारीच एका चिमुकल्या घरात- कोचरब- काही दिवस चालला बापूंचा आश्रम. तिथं ददूभाई आणि त्याच्या कुटुंबाला बापूंनी आश्रमात राहायला जागा दिली. एका दलित कुटुंबाला आश्रमात घेणं हाच १९१५ मध्ये धर्मद्रोह होता. पुढं बाबासाहेब राष्ट्रीय राजकारणात आले, ‘मूकनायक’मधून आसूड ओढू लागले. त्यानंतर गांधी आणखी बदलले. ‘नित्य नवा दिवस जागृतीचा’ असणारा हा महात्मा रोज बदलत गेला. आपल्या पुत्रवत स्वीय सचिवानं, महादेवभाई देसाईंनी, आपल्या मुलाचा आंतरजातीय विवाह केला नाही, म्हणून त्याही लग्नाला न जाण्याइतपत हा महात्मा बदलला. म्हणून तर, माईसाहेबांसोबतच्या आपल्या लग्नाची पत्रिका घेऊन बाबासाहेब गांधीजींच्या दुस-या स्वीय सहायकाकडे, प्यारेलाल यांच्याकडे, गेले. आणि म्हणाले, ‘आज गांधी नाहीत. पण ते असते तर माझ्या लग्नाला नक्की आले असते. कारण, मी आंतरजातीय लग्न करतोय. आणि, गांधींच्या अपेक्षेनुसार दोहोंपैकी एक दलित आहे! गांधींची आठवण आली, म्हणून हे निमंत्रण घेऊन आलोय!’
***
बाबासाहेबांनी हिंदू धर्मावर थेट हल्ला केला, तर गांधींनी स्वतःचा ‘सनातन हिंदू’ असा उदघोष केला. कथित हिंदुत्ववाद्यांचा दोघांनाही विरोध. म्हणून तर, बाबासाहेबांवर धर्म सोडण्याची वेळ आली. आणि, गांधींचा तर त्यांनी खूनच केला. हे दोघेही सोबत आहेत, हे ‘त्यांना’ समजलं. आपल्याला कधी समजेल? महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं हा प्रश्न जास्तच अंगावर आला. या दोघांना विरोध करणा-यांनी हाच मुहूर्त निवडला होता, पुन्हा ‘हे राम!’ ऐकवण्यासाठी!
***
नौआखालीत हिंदू-मुस्लिम आगीचं तांडव सुरू असताना, हा तुमचा-माझा बाप अनवाणी पायांनी जमीन तुडवत होता. आकाश कवेत घेत होता. आणि, आगीचे लोळ आपल्या अश्रूंनी विझवत होता. माउंटबॅटनच्या हजारो-लाखोंच्या ‘फोर्स’ला जे पंजाबात जमलं नाही, ते काम ही ‘वन मॅन आर्मी’ नौआखालीत करत होती. अशी कोणती शस्त्रं होती या फाटक्या म्हाता-याच्या भात्यात की माणसं माणसासारखी वागत होती! शहरांची नावं बुलंद होत असताना, माणसं मात्र माणसांचंच रक्त पिऊ लागलेली असताना, आज हा म्हातारा एखाद्या कल्पनारम्य परीकथेसारखा वाटू लागतो.
साबरमतीच्या पाण्यात काय होतं असं की रक्ताचे पाट थांबले आणि लोक एकमेकांसाठी अश्रू ढाळू लागले…!
***
असो. रात्र झालीय. निघावं लागणार आता. पुण्याच्या कोणी काकू आता आकस्मिकपणे भेटल्या. गांधींच्या प्रार्थनासभेत मी डोळे मिटून बसलेला. काकू म्हणाल्या, ‘गांधी थोर असतील हो, पण फाळणी होऊ द्यायला नको होती बाई त्यांनी. आणि, त्या पाकिस्तानचे एवढे लाड कशाला हो करायचे! बघा, अजून डोक्यावर बसलाय आपल्या.’ मी डोळे उघडल्यावर म्हणाल्या, ‘इथं काही नाही बघण्यासारखं. रिव्हरफ्रंटवर जाऊन बोटिंग वगैरे केलं की नाही तुम्ही?’
***
साबरमतीचा रिव्हरफ्रंट आता जास्तीच चकाकतोय. हवेत गारठाही वाढू लागलाय. आणि, मला हुडहुडी भरलीय.
***
साबरमतीतच रक्ताचे पाट मिसळले कोणी?
(लेखक ज्येष्ठ संपादक आहेत)
अक्षरश: रडलो मी….