आपणाला जे कुठंही परिणाम साधायचे असतात त्याचे लिखित विश्लेषण करीत बसण्यापेक्षा लोकांवर प्रभाव टाकेल असा मौखिक उपदेश करणे हे अधिक महत्त्वाचे आहे असे संघाला वाटते. कारण आपल्या देशातला वारसा हा मौखिक परंपरेचा आहे. या अर्थाने संघसुद्धा ही एक आपली समकालीन दंतकथा आहे असेच मला वाटते. दंतकथा असणे हे महात्मा गांधी आणि संघ यांच्यात असणारे एक महत्त्वाचे साम्य आहे.
महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात परत आले आणि आपल्या स्वातंत्र्य चळवळीत हळूहळू स्थिरावले. या घटनेला आता या वर्षी १00 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय राजकारणात महात्मा गांधी यांचे आगमन झाले याचे हे जसे शंभरावे वर्ष आहे तसेच भारताची केंद्रीय सत्ता संघप्रणीत भाजप पक्षाच्या हाती आली या अर्थाने राजकीयदृष्ट्या गांधीवाद संपला याची सुरुवात झाली याचेही हे पहिले वर्ष आहे असे म्हणता येते. पण मा. पंतप्रधान मोदी यांनी या देशातील सर्वच जनतेला मान्य होईल असा एक उपक्रम गांधीवादाच्या नावाने चालू ठेवून ‘गांधीवाद’ शिल्लक ठेवला असे म्हणता येते. तो उपक्रम म्हणजे देशाच्या पातळीवर चालू केलेली स्वच्छता मोहीम.
काँग्रेसमधील अन्य नेत्यांची नावे ज्या कर्तृत्वामुळे कदाचित शिल्लक राहतील अशा उपक्रमांची नावे बदलून त्यांच्या कर्तृत्वाला इतिहासजमा करण्याचे धोरण सध्याच्या सरकारचे आहे. दोनच शब्दात सांगायचे आणि पंतप्रधान यांच्याच भाषेत सांगायचे तर ‘काँग्रेसमुक्त भारत’ असे भाजपचे जाहीर धोरण आहे. पण स्वच्छतेच्या मोहिमेतून का होईना गांधीस्मरण शिल्लक राहावे याची भाजपला आवश्यकता का वाटावी? या प्रश्नाचेही उत्तर आपणाला शोधायला हवे. याचा एक अर्थ ‘काँग्रेसमुक्त भारत’ या धोरणाप्रमाणे पंडित नेहरू अथवा इंदिरा गांधी यांच्या स्मृती पुसायला हरकत नाही. पण महात्मा गांधी यांचे अस्तित्व काँग्रेसपक्षापेक्षा पलीकडे आहे. याची भाजपला खात्री आहे, असे संघाचेही मत असावे म्हणून स्वच्छतेच्या देशपातळीवरील उपक्रमातून का होईना मा. मोदी यांनी गांधीस्मृती शिल्लक राहावी असा एक उपक्रम शिल्लक ठेवला त्याबद्दल संघाचे अथवा मा. पंतप्रधान मोदी यांचे आभारच मानायला हवेत.
संघाचे एक दैनंदिन वेळापत्रक असते. या वेळापत्रकानुसार सकाळी सकाळी संघ स्वयंसेवक एकत्रित येऊन परस्परांशी संवाद(?) साधतात. मी संवाद या शब्दानंतर प्रश्नचिन्ह यासाठी दिले की ज्यांनी ज्यांनी संघशाखेवर प्रवेश घेऊन संघ कायमचा सोडला त्यांच्या आठवणी वाचल्या तर संघशाखेवर संवाद नसतो अशाच अर्थाचे स्मरण त्यांनी लिहून ठेवले आहे. म्हणून तिथे फक्त संघ शाखानायक संघभूमिकेचे निवेदन करतात आणि स्वयंसेवक त्या निवेदनाचे मनन करतात असे मानले जाते. यात मला काही विसंगत दिसलं नाही. एखाद्या बालकाने आईला समजा प्रश्न विचारला की मी त्या खाटीक मुलाशी मैत्री का करू शकत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर समजण्याचे त्याचे वय नसल्यामुळे आई फक्त एवढेच सांगेल, ती क्रूर असतात, गायीला कापतात आणि एवढय़ाने समाधान होऊन ते मूल आईच्या प्रेमळ शिकवणुकीला आत्मसात करते तसे संघनायकाला कुणी प्रश्न विचारलाच तर संघनायक देखील असेच प्रेमळ उत्तर देतो आणि शाखेवरील मुलांचे समाधान होते असे म्हटले जाते. मग सावरकर गायीला पशू का मानतात? असा प्रतिप्रश्न मुलाने केलाच तर पुढच्या काळात त्याला संघ सोडून जावे लागते. तर अशा या सकाळी सकाळी भरणार्या शाखेला प्रभात शाखा म्हटले जाते. काही खेळ आणि गायी यामुळे प्रसन्नचित्त झालेल्या मुलांना महापुरुषांची चरित्रात्मक माहिती दिली जाते. अशा महापुरुषांच्या यादीला प्रात:स्मरणीय राष्ट्रपुरुष असे मानले जाते. आणीबाणीनंतर सत्तांतर होईपर्यंत या प्रात:स्मरणीय पुरुषांच्या यादीत महात्मा गांधींचे नाव नव्हते. पण त्यानंतर तेही नाव या यादीत समाविष्ट झाले असे म्हटले जाते. याचा अर्थ संघाच्या स्थापनेनंतर पुढची पन्नास वर्षे तरी महात्मा गांधी हे प्रात:स्मरणीय आहेत असे संघ मानत नव्हता असे आपणाला म्हणता येते. पहिल्या सत्तांतरानंतर संघ हादेखील माणसांचाच एक समूह आहे. माणसे विचाराने बदलतात यावर तुमचा विश्वास आहे की नाही? असा त्यावेळी समाजाला प्रश्न विचारला जायचा. प्रात:स्मरणीय शाखेत महात्मा गांधी यांचा समावेश करण्यात आला हे उदाहरण पुरावा म्हणून सांगितले जायचे. याचा अर्थ पन्नास वर्षांनंतर का होईना प्रात:स्मरणीय यादीत संघाला महात्मा गांधी यांच्या नावाचा समावेश करण्याची आवश्यकता वाटली असावी.
मला मात्र संघ आणि महात्मा गांधी यांचे एका दृष्टीने खूप साम्य आहे असेच वाटते. महात्मा गांधी हे केवळ राजकीय नेते आहेत असे गांधीवादी मंडळींना कधीच वाटत नाही. ते ‘संत’ आहेत अशी एक त्यांच्याबद्दलची भक्तिभावना त्यांच्या मनात असते. फरक एवढाच की सर्व भारतीय संतांनी व्यक्तीला मोक्षविचार सांगून सामान्यात त्या सामान्य माणसालाही मोक्ष मिळविण्याचा अधिकार आहे हे ठासून सांगितले आणि महात्मा गांधींनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा अधिकार आहे ही भावना सामान्य माणसाच्या मनात रुजवली. झेंडावंदनाच्या दिवशी, ‘दे दी हमे आझादी तुने खडग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल,’ ही रेकॉर्ड ऐकली नाही असा कुणीही भारतीय मुलगा नसावा असा माझा तर्क आहे. संतांची शिकवण हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. या अर्थाने महात्मा गांधीही आपल्या सांस्कृतिक इतिहासातली एक महान दंतकथा आहे असे भारतीय माणसाला वाटते.
संघही नेहमी हेच सांगत आला आहे की आपली संघटना ही राजकीय नाही. पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेताना राजकारणातील संघाचे स्थान विशद करताना एकच शब्द उच्चारला. ते म्हणाले, ‘संघ मेरी माँ है’ तेव्हा आई आणि मुलाच्या नात्यात राजकारण असते की मुळीच नाही. आपण आपल्या देशातील सांस्कृतिक वारसा जतन करणारे आहोत, हा वारसा ही जगाला एक महत्त्वाची देणगी आहे आणि तो समृद्ध करणे हीच आपली नैतिक जबाबदारी आहे असेच संघ सांगत आला आहे. पण अशी ही आई प्रेमाने आंधळी झालेली आई नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे शिवबाच्या चरित्रात जे स्थान आहे तेच स्थान संघाचेही भाजप पक्षात आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे आणि स्वातंत्र्यवळवळीत महात्मा गांधी यांनाही हेच स्थान आहे. याचा अर्थ संघ भाजपला मातृस्थानी वाटतो आणि महात्मा गांधी यांचेही स्वातंत्र्याच्या चळवळीत हेच स्थान आहे असे स्वातंत्र्य सैनिकांना वाटते.
आपणाला जे कुठंही परिणाम साधायचे असतात त्याचे लिखित विश्लेषण करीत बसण्यापेक्षा लोकांवर प्रभाव टाकेल, असा मौखिक उपदेश करणे हे अधिक महत्त्वाचे आहे असे संघाला वाटते. कारण आपल्या देशातला वारसा हा मौखिक परंपरेचा आहे. या अर्थाने संघसुद्धा ही एक आपली समकालीन दंतकथा आहे असेच मला वाटते. दंतकथा असणे हे महात्मा गांधी आणि संघ यांच्यात असणारे एक महत्त्वाचे साम्य आहे. दंतकथा या नेहमीच दुधारी शस्त्रासारख्या असतात. दंतकथांची एक धार बोथट असते. त्यामुळे त्या शस्त्राचा फक्त अभिमान जिवंत ठेवण्यापुरताच उपयोग असतो. महात्मा गांधी ही अशी या शस्त्राची बोथट धार आहे. तर या दंतकथा वर्तमानात हवी तेवढी उलथापालथ करू शकतात हेही दंतकथांचे दुसरे वैशिष्ट्य असते. बाबरी मशीद हे आपल्या समोरचे ताजे उदाहरण आहे. दंतकथा या शस्त्राची अतिशय सक्रिय अशी धार म्हणजे संघ आहे असे मला वाटते. माझा फक्त मतभेदाचा मुद्दा एकच आहे. अशा दंतकथा असलेल्या शस्त्राकडे या सांस्कृतिक भूमिका नसून वर्तमानातल्या राजकीय भूमिका आहेत हे आंबेडकरवादी मंडळी समजून घेण्याचा आतातरी प्रय▪करतील का?
प्रा. दत्ता भगत
(लेखक हे नामवंत आंबेडकरी विचारवंत व नाटककार आहेत.)
भ्रमणध्वनी – ९८८१२३00८४