गांधी- आंबेडकर आणि पुणे करार

साभार -साप्ताहिक साधना
डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोन थोर नेत्यांच्या आपसातील संबंधाबाबत खूप गैरसमज आहेत.
पुणे करार आणि स्वतंत्र मतदारसंघ या विषयात महात्मा गांधींच्या भूमिकेबाबत  आंबेडकरी समाज व कार्यकर्ते यांच्यात  खूप संताप,रोष असतो.
नामवंत विचारवंत व लेखक रावसाहेब कसबे यांनी या विषयात नुकतीच एक अतिशय महत्वाची आणि नवीन माहिती दिली आहे .
साप्ताहिक ‘साधना’ दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत रावसाहेबांनी पुणे कराराबद्दल जे काही सांगितलंय ते सर्व पक्षीय नेते, सामाजिक संघटना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अतिशय काळजीपूर्वक समजून घेतलं पाहिजे.
रावसाहेबांच्या मुलाखतीतील पुणे करार आणि गांधी आंबेडकर संबंधांबाबतची प्रश्नोत्तरे वेळ काढून नक्की वाचा.
डॉ. कोत्तापल्ले : गांधी-आंबेडकरांच्या संबंधापासून सुरुवात करू. आपण बाबासाहेब आंबेडकरांचे एक अभ्यासक आहात, ‘पुणे करारा’कडे आपण कसं पाहता? कारण ही महत्त्वाची घटना आहे. पुणे करार आणि त्यासंबंधी नेहमीच होणारी उलटसुलट चर्चा, अनेकांनी या संदर्भात घेतलेली अभिनिवेशी भूमिका यामुळे गांधी आणि आंबेडकर एकमेकांचे शत्रू होते, असाच प्रचार झालेला आहे. तुम्ही त्याकडे कसे पाहता?
डॉ. कसबे : खरं म्हणजे गांधीजी आणि बाबासाहेब यांचं नातं नेमकं कसं होतं यांचा अंदाज त्यांच्या चरित्रकारांना आलेला नाहीये. यात पाश्चिमात्य चरित्रकार पण थोडेसे फसलेले आहेत. त्यांच्यातील नात्याच्या थोडासा जवळ गेलेला पाश्चिमात्य चरित्रकार म्हणजे लुई फिशर. कारण तो एकाच वेळी गांधींशी आणि बाबासाहेबांशीही बोलत होता. त्यामुळे तो थोडासा अधिक जवळ गेला, पण पूर्ण जवळ मात्र गेला नाही. आता याच्यासंबंधी मी खूप विस्ताराने लिहिणार आहे. त्यामुळे सगळ्याच गोष्टी काही तुम्हाला इथे सांगणं शक्य नाही.
डॉ. कोत्तापल्ले : पण काही महत्त्वाच्या –
डॉ. कसबे : होय, काही महत्त्वाच्या गोष्टी मात्र सांगतो. येरवड्याला गांधीजींनी आंबेडकरांना मिळालेल्या स्वतंत्र मतदारसंघाविरुद्ध उपोषण धरलं आणि नंतर कस्तुरबाला येरवडा तुरुंगात आणण्यात आलं. जी गोष्ट आहे पुणे कराराची, ती इतर सगळ्या गोष्टींपेक्षा वेगळी होती. त्या गोष्टीचे स्क्रिप्ट आणि संवाद इंग्लंडमध्येच लिहिले गेले होते. सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या काळात तिथेच ठरलेलं होतं. पण पुढे काय काय होणार आहे हे ना कधी बाबासाहेबांनी सांगितलं, ना गांधींनी सांगितलं. त्यामुळे सगळी जी चरित्रकार मंडळी आहेत ती फसली. याचं कारण असं की, बाबासाहेब आंबेडकरांचं त्या वेळचं जे मुखपत्र होतं- ‘जनता’ किंवा ‘दि पीपल’ अशा नावाचं- त्यांच्यामध्ये दुसऱ्या गोलमेज परिषदेचे वृत्तांत डे-टु-डे येत होते. बाबासाहेबांनी इंग्लंडमधून खास ‘जनतेसाठी’ काही पत्रं लिहिली होती. ती तिथेच छापली गेली. हे सगळं मटेरियल मराठीतून असल्यामुळे आणि गांधींच्या भारतीय चरित्रकारांना मराठी येत नसल्यामुळे (ब्रिटिश पत्रकारांचा तर प्रश्नच नव्हता) काही अंतर्गत गोष्टी आहेत, कळाल्या नाहीत.
आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्याचे सगळे संदर्भ वगैरे काही सांगत नाही. सेकंट राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या वेळी गांधीजी आणि बाबासाहेब यांच्यात तीन बैठका स्वतंत्रपणे झाल्या. म्हैसूरचे जे दिवाण होते त्यांनी एक घडवून आणलेली होती आणि दुसरी त्यांचे चिरंजीव देवदास यांनी घडवून आणली होती. ती बैठक झाली होती, आपल्या कवयित्रीकडे –
डॉ. कोत्तापल्ले : सरोजिनी नायडू-
डॉ. कसबे : होय. त्या तिथे राहत होत्या. त्याही वेळेस गांधीजींसोबत लंडनला होत्या. त्यांच्याकडे ही बैठक झाली होती. गांधींनी इंग्लंडमध्ये आंबेडकरांशी जी चर्चा सरोजिनी नायडू यांच्या निवासस्थानी केली, ती सर्वांत महत्त्वाची होती. बाबासाहेबांनी गांधींना सांगितलं की, सायमन कमिशन भारतामध्ये आले तेव्हापासूनची माझी स्पष्ट भूमिका आहे. मी सायमनला स्वतंत्र रिपोर्ट दिला. त्याच्यात स्पष्टपणे म्हटलंय की, ‘या देशातल्या कोणत्याही मायनॉरिटीला स्वतंत्र मतदारसंघ देऊ नये. का देऊ नये याची मी सहा कारणं सांगितलेली आहेत. हे लोकशाहीला आणि मायनॉरिटीलाही कसं घातक आहे याची विस्ताराने चर्चा केली आहे. स्वतंत्र मतदारसंघात मायनॉरिटीने त्यांच्या विशिष्ट संख्येने प्रतिनिधी निवडून दिले तर बहुसंख्याकांची त्यांच्यासंबंधीची जबाबदारी संपली. मग ते कशाला त्यांच्याकडे लक्ष देतायत! कारण बहुसंख्यांना त्यांच्या मतांची गरज नसते.
असे सहा पॉइंट बाबासाहेबांनी काढलेले होते. बाबासाहेब म्हणाले की, ‘काँग्रेसने लखनौ करार करून- जो टिळक आणि जीना यांच्यामध्ये झाला त्याला मान्यता देऊन- जी चूक केलेली आहे, ती तुम्हाला निस्तरणं फार अवघड आहे. माझी सरळ मागणी आहे. ‘पहिली मागणी म्हणजे सर्व भारतीयांना प्रौढ मतदानाचा हक्क.’ म्हणूनच गांधी-आयर्विन यांच्यात जो करार झाला, त्यावर सडकून टीका झाली होती. बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की, ‘गांधी-आयर्विन करारामध्ये गांधींनी प्रौढ मतदानाचे आणखी एक कलम घालायला पाहिजे होते. माझी स्पष्ट भूमिका अशी आहे की- प्रौढ मतदान, प्रादेशिक मतदारसंघ आणि अस्पृश्यांना राखीव जागा या वीस वर्षांसाठी.
वीस वर्षांनंतर अस्पृश्यांचं सार्वमत घ्यायचं आणि त्या राखीव जागा ठेवायच्या की नाहीत, हे परिस्थितीचे मूल्यमापन करून ठरवायचे. परंतु ते तुम्ही मान्य केले नाही. सायमनने हाच प्रश्न मला विचारला होता की- काँग्रेसने राखीव जागा, प्रादेशिक मतदारसंघ आणि प्रौढ मतदान याला जर मान्यता दिली नाही, तर तुम्ही काय कराल? यावर मी म्हणालो, मला पण नाइलाजाने मुसलमानांसारखा, शिखांसारखा स्वतंत्र मतदारसंघ मागावा लागेल. म्हणूनच मी तो मागितला.’ या भेटीत चर्चेच्या वेळी गांधीजी सूत कातत होते. सूत कातता-कातता गांधीजी गदगदलेल्या आवाजात काही तरी म्हणाले आणि ते काही आंबेडकरांना नीट ऐकू गेलं नाही.
डॉ. कोत्तापल्ले : बरं-
डॉ. कसबे : तर आंबेडकर पुन्हा म्हणाले की, काय म्हणालात ते सांगा. त्यावर सरोजिनी नायडूंनी त्यांना गप्प केलं. बापू असं म्हणाले की, ‘सगळं तुमच्या मनासारखं होईल.’ त्यानंतर ते सर्व जण भारतात आले. पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. ‘अस्पृश्यांना जर स्वतंत्र मतदारसंघ दिला तर मी आमरण उपोषण करेन’ हे त्यांनी इंग्लंडमध्येच जाहीर केलं होतं. गांधींना हे माहीत होतं की, स्वतंत्र मतदारसंघाऐवजी आंबेडकर संयुक्त मतदारसंघ आणि राखीव जागा ही त्यांची मूळ भूमिका मान्य करतील. हा सर्व तपशील त्या वेळी ‘जनता’ पाक्षिकात प्रसिद्ध झाला होता. या पाक्षिकाचे संस्थापकच बाबासाहेब आंबेडकर होते.
बाबासाहेबांची काही वाक्यं सांगतो, सगळं काही सांगत नाही. गांधींनी उपोषण सुरू केल्यानंतर बाबासाहेब म्हणाले की, ‘जेव्हा गांधी उपोषणाला बसले त्या वेळेस संपूर्ण देश माझ्या विरोधात गेला आणि जंगली श्वापदांच्या तावडीत एखादी हरणी सापडावी आणि तिथून पळून एखाद्या गुहेत जाऊन ती थरथरत बसलेली असावी; तशी माझी अवस्था झाली होती. मला यातून गांधीजींनी बाहेर काढलं. ज्या वेळी मी गांधीजींच्या जवळ गेलो त्या वेळी मला असं वाटलं की, गांधींमध्ये आणि माझ्यामध्ये समान अशा खूप गोष्टी आहेत.’ तेव्हा जातीय निवाड्याप्रमाणे स्वतंत्र मतदारसंघात ७८ जागा मिळाल्या होत्या. पुणे कराराप्रमाणे त्या १४८ झाल्या अधिक तीन त्यांना जास्तीच्या मिळाल्या- अशा १५१ जागा अस्पृश्यांसाठी गांधीजींनी पुणे करारात मान्य केल्या होत्या.
वास्तविक पाहता, जातीय निवाडा हा गांधींप्रमाणेच बाबासाहेबांनाही मान्य नव्हता. हे त्यांनी नंतर भाषणात सांगितलं. कारण त्यांच्यामध्ये फक्त प्रादेशिक असेंब्लींमध्ये किती जागा असाव्यात एवढं ठरलं, पण पार्लमेंटमध्ये किती जागा असाव्यात ते ठरलेलं नव्हतं आणि पंजाब प्रांतामध्ये किती जागा असाव्यात तेही ठरलं नव्हतं. ‘पुणे करारा’ने पंजाबला काही जागा देण्यात आल्या होत्या आणि पार्लमेंटमध्ये एकूण लोकसंख्येच्या वीस टक्के जागा राखीव ठेवता येतील, असं ठरलं. त्यानंतर बाबासाहेबांनी सभा घेतली वरळीला. बाबासाहेब हे असे नेते होते की, जे आपण घेतलेले निर्णय लगेच जनतेला जाऊन सांगत. त्यांनी असं सांगितलं की, ‘‘आता हा ‘पुणे करार’ झालेला आहे आणि हा आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. याच्यात आपल्याला भरपूर सवलती आहेत. तेव्हा या सगळ्याचा फायदा घेऊन तुम्ही पुढे चला.’’ दुसरी गोष्ट अशी आहे की, ज्या दिवशी पुणे करार झाला, त्या दिवसाची स्मृती साजरी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. १९३३ आणि ३४ या दोन वर्षांमध्ये एकीकडे आंबेडकरांचा फोटो तर, दुसरीकडे गांधींचा फोटो अशी मिरवणूक काढली गेली. ‘गांधी की जय’ आणि ‘आंबेडकर की जय’ अशा घोषणा त्या दिवशी देण्यात आल्या. नाशिकमध्ये या सत्याग्रहाचं किंवा या दिनाचं नेतृत्व दादासाहेब गायकवाडांनी केलं होतं.
डॉ. कोत्तापल्ले : या नव्या गोष्टी आहेत!
डॉ. कसबे : आता प्रश्न येतो तो असा, जो बाबासाहेबांनी सगळ्या नेत्यांसमोर विचारला होता की हे जे गांधींनी आता केलं आहे, ते त्यांनी लंडनमध्येच मान्य केलं असतं, तर हा इतिहास घडला नसता.
डॉ. कोत्तापल्ले : राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये मान्य केला असता तर?
डॉ. कसबे : होय… राऊंड टेबल कॉन्फरन्समध्येच हे गांधींनी मान्य करायचं होतं ना! तर गांधींनी हे असं का केलं? आता, ह्या प्रश्नाचा एक अभ्यासक या नात्याने मी अंतर्मुख होऊन विचार करायला लागतो, तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की, गांधीजी हे एक अतिशय उत्तम ‘इव्हेंट मॅनेजर’ होते. तुम्ही अगदी त्यांच्या मिठाच्या सत्याग्रहापासून बघा! तर गांधीजींनी उपोषण धरलं होतं ते मुळी आंबेडकरांच्या किंवा स्वतंत्र मतदारसंघांच्या विरोधात नव्हतं. हे एक निमित्त मिळालं गांधीना. त्यांनी उपोषण धरलं ते सवर्ण हिंदूंच्या विरोधात. गांधींना अस्पृश्यतेचा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर नेऊन सवर्ण हिंदूंच्या मनामध्ये एक सायकॉलॉजिकल क्रांती करायची होती. त्यांची पत्रकं जर तुम्ही बघितली- येरवडा जेलमधली- तर हे लक्षात येईल. त्यातील एक पत्रक असं आहे की, जोपर्यंत या देशामध्ये अस्पृश्यता आहे तोपर्यंत भारतीय लोक स्वराज्याला लायक नाहीत.
डॉ. कोत्तापल्ले : पात्र नाहीत?
डॉ. कसबे : बरोबर आहे. तुम्ही त्या पत्रकाच्या दुसऱ्या दिवशीची वर्तमानपत्रं बघा. गांधींच्या उपोषणाचा व त्या पत्रकाचा परिणाम असा झाला की, भारतातील सगळीच्या सगळी मंदिरं पुरोहितांनी उघडली आणि रस्त्यावर जाऊन अस्पृश्यांना पकडून मंदिरात नेलं. नंतर ती पुन्हा बंद झाली असतील तो भाग वेगळा.
डॉ. कोत्तापल्ले : पण त्या क्षणी –
डॉ. कसबे : पण एक… एक मानसिक क्रांती झाली. जवाहरलाल नेहरूंची आई अतिशय कर्मठ होती. जेव्हा तिला असं वाटलं की, आता बापू मरणार. कारण तशा बातम्या सारख्या यायला लागल्या… ब्लडप्रेशर कमी झालं, अमकं झालं, तमकं झालं वगैरे. तर ती कर्मठ बाई. तिने चांभार स्त्रियांना बोलावलं, स्वयंपाक करायला लावला आणि त्यांच्याबरोबर ती जेवली. हा गांधीजींच्या उपोषणाचा परिणाम. गांधी ही एक शक्ती आहे आणि ती अशी जबरदस्त आहे की, ती एखाद्या माणसात घुसली तर ती त्याला वेडंपिसं करीत असते. तर तशा पद्धतीने गांधींनी एका दगडात दोन पक्षी मारले. एक तर अस्पृश्यांना जे स्वतंत्र मतदारसंघामार्फत मिळालं होतं त्याच्यापेक्षा दुप्पट दिलं, पुणे करारामध्ये. दुसऱ्या बाजूला त्यांनी सर्वच स्पृश्य हिंदूंना हे सांगितलं की, तुम्ही जर अस्पृश्यता पाळणार असाल तर स्वातंत्र्याला लायक नाही. तिथून विहिरी खुल्या झाल्या, पाणवठे खुले झाले. दक्षिणेकडे ज्या रस्त्यांवरून अस्पृश्यांना जायची परवानगी नव्हती ते रस्ते खुले झाले. म्हणजे उपोषणाचा एक मानसिक परिणामही झाला. खरं म्हणजे गांधी-आंबेडकरांच्या संबंधांमध्ये अनेक मजेशीर गोष्टी आहेत. त्या काही सगळ्या इथे सांगणार नाही, त्या मी लिहिणार आहे. पण पुस्तकात –
डॉ. कोत्तापल्ले : आपण जो मुद्दा मांडला, तो मला फार महत्त्वाचा वाटतो. महात्मा गांधींचं पुण्याचं उपोषण हे सवर्णांमध्ये परिवर्तन घडवून आणावं यासाठी होतं, हा नवा अन्वयार्थ आहे. पण ज्यांना आंबेडकराईट म्हणतो किंवा आंबेडकरांच्या विचाराने चालणारे म्हणतो, त्यांच्या मनामध्ये आजतागायत ‘गांधी हे आपले नव्हेतच’ अशा प्रकारची एक भावना आहे; याची काय कारणं असतील?
डॉ. कसबे : असं आहे की, जे लोक स्वतःला आंबेडकरवादी म्हणवतात त्यांच्यामध्येच डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल सगळ्यात जास्त अज्ञान आहे.
डॉ. कोत्तापल्ले : महात्मा गांधी जी भाषा वापरत असत, तिचा काही परिणाम?
डॉ. कसबे : नाही. त्याला ते कारण नाहीय. ती भाषा त्यांना समजू शकते. त्याला दुसरे कारण आहे- ते म्हणजे, कुठल्याही जातीचं स्वतंत्र संघटन उभं करताना त्यांना एक शत्रू दाखवावा लागतो. जसं हिंदू महासभेचं संघटन करताना सावरकरांनी मुसलमानाला शत्रू मानलं एकीकडून, दुसरीकडून गांधींनाही शत्रू मानलं. तर जातीय राजकीय पक्षाला एक शत्रू उभा करावा लागतो. तीच गोष्ट अस्पृश्यांनी केली नंतरच्या काळामध्ये आणि तिला कांशीरामसारखेही बळी पडले.
डॉ. कोत्तापल्ले : तर रावसाहेब, पुणे कराराच्या वेळी महात्मा गांधींनी केलेलं उपोषण याचा एक अन्वयार्थ तुम्ही लावलात. हिंदूंमध्ये परिवर्तन व्हावं म्हणून त्या उपोषणाचा एक अर्थ आहे, हा तुमचा मुद्दा. परंतु महात्मा गांधी आयुष्यभर जी भाषा बोलत होते किंवा निदान आयुष्यातला खूप मोठा कालखंड ज्या भाषेत बोलत होते, ती मात्र आपल्याला बुचकळ्यात पाडणारी आहे. उदाहरणार्थ- ‘मी सनातन हिंदू आहे’ असं ते म्हणत किंवा त्यांना गीता नावाचा ग्रंथ महत्त्वाचा वाटत असे. ज्या गीतेमध्ये चातुर्वर्ण्य आणि जातिव्यवस्था हा नंतरचा महत्त्वाचा भाग आहे, अशा गीतेचा ते स्वीकार करत किंवा तिच्याबद्दल बोलत किंवा रामराज्याची भाषा वापरत किंवा जातिव्यवस्थेमध्ये ज्याच्या वाट्याला जे काम येईल ते त्याने केलं पाहिजे अशा प्रकारची भाषा वापरत. मग ते जी भाषा वापरत होते, तिचा अन्वयार्थ कसा लावायचाअसा प्रश्न आहे माझ्यापुढे!
डॉ. कसबे : काय आहे की, या प्रश्नाकडे खूप लोक अतिशय भावुक होऊन बघतात की, गांधींनी अशी भाषा वापरलेली आहे. हिंद स्वराज्यमध्येसुद्धा ती भाषा आहे.
डॉ. कोत्तापल्ले : हो… आहे.
डॉ. कसबे : त्यांच्या आत्मचरित्रात पण ती भाषा आहे. या संदर्भात दोन गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल. पहिली गोष्ट अशी की- ज्या जनतेत त्यांना जायचं होतं आणि ज्या जनतेची जागृती करायची होती, त्या जनतेच्या मानसिकतेचा विचार केला पाहिजे. संपूर्ण उत्तर भारत हा अतिशय धर्मपरायण आहे. म्हणजे त्यांच्या शरीराचा आणि मनाचा जो विकास झाला तोच मुळी तुलसीरामायणातून. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये रामाबद्दल-रामायणाबद्दल ज्या श्रद्धा आहेत त्या इतक्या बळकट आहेत की, अगदी एकविसाव्या शतकाचे पाव शतक होत आलं आणि इतक्या परिवर्तनानंतरही अजूनही आपण बघतो की त्या भावना अद्याप बऱ्यापैकी जागृत आहेत.
अशा लोकांमध्ये काम करायचं असेल तर लोकांच्या भाषेतच तुम्हाला बोलावं लागतं. लोकांच्या विरुद्ध भाषेत बोललं तर तुम्ही त्यांच्यापासून तुटता. म्हणजे लोकानुनय न करता, लोकांच्या भाषेत बोलून तुमचं इप्सित साध्य करणं ही एक अतिशय अवघड कला आहे. ती गांधींनी प्राप्त केली होती. तुम्ही लोकांच्या विरोधी बोलत गेलात तर तुम्ही फार तर हुतात्मा होऊ शकता, महात्मा नाही होऊ शकत. हुतात्मा म्हणजे जसे आपल्याकडे अनेक लोक व्यवस्थेच्या विरोधी बोलता- बोलता हुतात्मा होऊन गेले. मग ते मुसलमानातले असोत, हिंदूंतले असोत किंवा…..
……………………………………………………………………………………………….

डॉ. कोत्तापल्ले : बरं. आता आपण अलीकडे येऊ. म्हणजे घटना समितीवर डॉ.आंबेडकरांना घ्यावं, असं महात्मा गांधी यांनीच सुचवलेलं होतं नेहरूंना आणि विशेषतः कायदामंत्री म्हणूनसुद्धा. त्याबद्दल तुमचं मत काय आहे? यासाठी मी विचारतोय की, शोषितांमध्येच किंवा ज्याला आपण लोअर स्ट्राटा असं म्हणतो- हाच वर्ग मुळी या मुद्द्यावर विभागला गेलेला आहे. प्रत्यक्षामध्ये मात्र गांधींनीच आंबेडकरांना घटना समितीवर घ्यावं, कायदामंत्री करावं, असं म्हटलेलं होतं. ह्यावर नव्याने प्रकाश पडण्याची गरज आहे.

डॉ. कसबे : त्या सगळ्यावर माझ्या ग्रंथामध्ये दीडशे ते दोनशे पानांचं एक प्रकरणच आहे. गांधी आणि आंबेडकर या नावाचं ते प्रकरण आहे. त्याच्यात दोघांचेही सामाजिक-राजकीय विचार वगैरेसंबंधी खूप विस्ताराने विवेचन केलेलं आहे. गांधी आणि आंबेडकर यांच्या संबंधामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, गांधींच्या मनामध्ये सतत एक भीती होती. ती अशी की, आंबेडकर आणि जीना एकत्रित येतील काय? दुसरी भीती अशी होती की, आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा १९३५ मध्ये केल्यानंतर ते कोणता धर्म स्वीकारतील. कळत नकळत किंवा जाणीवपूर्वक वा अजाणतेपणे काही म्हणा गांधींना हिंदूंची संख्या कमी होऊ द्यायची नव्हती. गांधी हे हिंदुहिताचा जास्त विचार करीत होते त्या वेळेस. आता हे प्रॅक्टिकल राजकारण होतं. ते असं की, आंबेडकरांना काहीही करून याच्यापासून तोडावं लागेल –

डॉ. कोत्तापल्ले : जीनांपासून?

डॉ. कसबे : हो. कारण मुस्लिम लीग इतर नेत्यांशी आंबेडकरांचे खूप चांगले संबंध होते. सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सवरून जेव्हा आंबेडकर परत आले, त्या वेळी त्यांच्याबरोबर जो मुस्लिम लीगचा नेता होता त्यांची मिरवणूकच काढली गेली होती. त्या दोघांची भाषणं झाली होती मुंबईमध्ये. ही भीती होती गांधींना. तेव्हा आंबेडकरांना राष्ट्रीय राजकारणामध्ये गुंतवून ठेवावं आणि त्यांच्यावर अंकुश ठेवावा, ही गांधींची गरज होती. ही काँग्रेसची गरज होती. फाळणी त्या वेळी दृष्टिपथात आली होती. अशा वेळी आंबेडकरांचं काय करायचं? आंबेडकर घटना समितीत निवडून गेले बंगालमधून आणि फाळणीनंतर त्यांचा मतदारसंघ पाकिस्तानात गेला.

डॉ. कोत्तापल्ले : पाकिस्तानात गेला…? हो.

डॉ. कसबे : त्यामुळे आंबेडकर काही राज्यघटना परिषदेचे सदस्य राहिले नाहीत. आंबेडकरांनी कॉन्स्टिट्युएंट असेम्ब्लीमध्ये ते बंगालचे प्रतिनिधी असताना जवाहरलाल नेहरूंच्या उद्दिष्टांच्या- म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रिझोलेशनच्या- ठरावावर अतिशय महत्त्वाचं भाषण केलं. ते इतकं गाजलं की, राष्ट्रप्रेमानं ओथंबलेलं भाषण आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यात पहिलं आणि शेवटचं केलं. व्यापक दृष्टिकोन दिला. समाजवादी दृष्टिकोन दिला. या देशाची राज्यघटना कशी असावी यासंबंधीचं ते भाषण होतं, त्यामुळे गांधी अधिक प्रभावित झाले. गांधींपेक्षा नेहरू जास्त प्रभावित झाले, हा आपल्या विचारांचा माणूस आहे, म्हणून. कारण नेहरू आणि आंबेडकर हे दोघेही फेबियन सोशॅलिझमचे संस्कार घेऊन भारतात आलेले होते. त्यांनी सिडनी वेबमार्फत तो घेतलेला होता आणि नेहरू तर त्याचे सदस्यच होते. काही काळ जीना पण फेबियन सोसायटीचे सदस्य होते. इतकंच नव्हे तर सगळ्या आशियात, आफ्रोएशियन राष्ट्रांमध्ये जे जे नेते होते ते सगळे तिथलेच प्रॉडक्ट होते. तर आता करायचं काय, हा प्रश्न सगळ्यांसमोर होता. पाकिस्तान होऊ घातलेलं होतं आणि आंबेडकर काय भूमिका घेतात याच्याकडे लोकांचं लक्ष होतं. विशेषतः गांधींचं. आणि आंबेडकर तर घटना समितीचे सभासद राहिलेले नव्हते.

डॉ. कोत्तापल्ले : होय… अशी परिस्थिती निर्माण झाली होती खरी!

डॉ. कसबे : पण बाबासाहेबांनी सेकंड राऊंड टेबलमध्ये १९३५ चा कायदा तयार करताना जे ड्राफ्टिंग वगैरे केलेलं होतं, ते गांधीजींनी बघितलेलं होतं. गांधीजींना वाटत होतं की, यांच्या विद्वत्तेचा फायदा स्वतंत्र भारताला मिळावा. आंबेडकर घटना समितीचे सभासद राहिलेले नव्हते तेव्हा, म्युरिअल लेस्टर नावाची जगातली अतिशय मोठी शांततावादी स्त्री (जिच्याकडे कॉन्फरन्सवेळी गांधी उतरलेले होते लंडनमध्ये) १९४६  च्या शेवटी भारतात आली आणि गांधीजींना भेटली. दोघांचं खूप जोरात भांडण झालं. कशावरून? ती असं म्हणाली की, स्वातंत्र्योत्तर भारत घडवण्यासाठी डॉ.आंबेडकरांच्या विद्वत्तेचा तुम्ही लोक फायदा का घेत नाही? हे त्यांच्या चरित्रकारांनी नोंदवून ठेवलेलं आहे.

गांधीजी म्हणाले, ‘माझी खूप इच्छा आहे की, त्यांच्या विद्वत्तेचा फायदा करून घ्यावा. परंतु अलीकडे काँग्रेसवाले माझं ऐकत नाहीत.’ ही गोष्ट खरी होती. त्या वेळी काँग्रेसवाले जे त्यांना पटेल, जे त्यांच्या संघटनेला पटेल तेवढंच ऐकत होते. पण तरीही गांधींनी म्युरिअल लेस्टरला असा सल्ला दिला की- ‘काँग्रेसचं मी बघतो. आंबेडकरांची काय इच्छा आहे ती मला अगोदर कळू दे. त्यांना भेट. त्यांची जर इच्छा असेल तर आपण प्रयत्न करू.’ मग ही बाई मुंबईला गेली. तिथे ड्रेसर नावाची अमेरिकन मिशनरी बाई होती, जिचा आंबेडकरांशी अतिशय स्नेह होता. मग लेस्टर आणि आंबेडकर एकत्रित बसले. त्यांनी डिनर केलं तिथे. लेस्टरनी प्रश्न विचारला की, ‘तुम्ही राजकीय सत्तेच्या बाहेर राहून तुमच्या समाजासाठी काय करू शकता? तुम्हाला तुमच्या समाजासाठी काही करायचं असेल तर याच्यामध्ये सहभागी होऊनच काही गोष्टी कराव्या लागतील. तुमची घटना परिषदेत आणि मंत्री म्हणून भारतीय कॅबिनेटमध्ये जाण्याची इच्छा आहे की नाही?’

त्यानंतर आंबेडकरांनी सगळा इतिहास सांगितला. गांधींनी आणि नंतर काँग्रेसने किती त्रास दिला, त्यांना कुठे कुठे आडकाठी केली वगैरे सगळं त्यांनी सांगितलं. जवळजवळ तीन-चार तास त्यांची चर्चा झाली. शेवटी आंबेडकर उठले. त्या वेळी लेस्टरनी पुन्हा विचारलं की, या प्रश्नाचं होकारात्मक किंवा नकारात्मक उत्तर द्यावं. आंबेडकर काहीच बोलले नाहीत. लेस्टर म्हणाल्या की, या मौनाचा अर्थ असा घेते की, तुमची इच्छा आहे. मी उद्या गांधींना दिल्लीत भंगी कॉलनीमध्ये भेटणार व आपली चर्चा व ‘तुमची इच्छा आहे’ असं सांगणार. त्याप्रमाणे ती दुसऱ्या दिवशी दिल्लीला गेली. गांधीजींना सांगितलं. नंतर गांधीजींनी राजेंद्रप्रसाद आणि वल्लभभाई पटेल यांना बोलावून सांगितलं की, ‘मला कुठल्याही परिस्थितीत घटना परिषदेच्या अधिवेशनात आंबेडकर पाहिजेत. तुम्ही काहीही करा.’

नेमका त्याच वेळी बॅ.जयकरांनी राजीनामा दिलेला होता घटना परिषदेचा. त्यांचे जास्त मतभेद झाले होते. जयकरांचं म्हणणं होतं की, ‘जोपर्यंत मुस्लिम लीग घटना परिषदेत येत नाही तोपर्यंत आपण राज्यघटना तयार करू नये.’ त्यांच्या राजीनाम्याने मुंबई प्रांतातून एक जागा रिकामी झाली. त्या जागेवर आंबेडकरांना निवडून पाठवावं, असं ठरलं. गांधी भेटीनंतर सरदार वल्लभभाई पटेल, त्या वेळच्या मुंबई राज्याचे पंतप्रधान बाळासाहेब खेर यांच्याशी फोनवर बोलले आणि सांगितलं की, मी तुम्हाला सविस्तर पत्र पाठवतोय डॉ.आंबेडकर यांना घटना परिषदेवर निवडून पाठवा. मग राजेंद्रबाबूंनी त्यांना पत्र पाठवलं- निवडणूक ताबडतोब घ्या.

ती दोन्ही पत्रं आज उपलब्ध आहेत. म्हणजे वल्लभभाईचं आणि राजेंद्रप्रसादांचं. ‘प्रसाद पेपर्स’ प्रसिद्ध झाले, त्या वेळेला आम्हाला ही माहिती झाली. तोपर्यंत ही गोष्ट माहिती नव्हती. ‘त्यांच्या विरोधात कोणी उमेदवार उभा करू नका आणि ताबडतोब निवडणूक घ्या’, हेसुद्धा त्या पत्रात नमूद करण्यात आले होते. तेव्हा काँग्रेस एक पाऊल पुढे आली. आंबेडकरांना विनंती करण्यामध्ये स. का. पाटलांचा पण थोडासा रोल होता. आणि निवडणुकीचा फॉर्म भरला त्या वेळी बाबासाहेब पण दोन पावलं पुढे गेले. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने फॉर्म भरला. म्हणजे जे बाबासाहेब म्हणत होते की ‘काँग्रेस हे जळतं घर आहे’ वगैरे ते सगळं देशकार्यासाठी विसरले. त्यांनी तडजोड केली आणि ते काँग्रेसकडून घटना परिषदेत बिनविरोध निवडून आले.

त्या दिवशीच्या सभेमध्ये कॉन्स्टिट्युएंट असेम्ब्लीच्या ड्राफ्ट कमिटीमध्ये त्यांचं नाव आलं. खूप लोकांनी त्यांचं अभिनंदन केलं. दुसऱ्या दिवशी ड्राफ्ट कमिटीची मीटिंग झाली. त्यात आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन झाले. तेव्हा खूप लोकांनी, पत्रकारांनी त्यांना विचारलं की, ‘डॉक्टर, हे काय आहे?’ बाबासाहेबांचं उत्तरं होतं ‘आय एम ऑल्सो एक्स्ट्रिमली सरप्राईज्ड.’ माझ्या दृष्टीने हे आश्चर्यच आहे. हे काय झालं? पण यामागे एक गुप्त हात गांधींचा होता. हा पत्रव्यवहार प्रसिद्ध झाला, त्या वेळेस या सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या. खरं म्हणजे राजेंद्रबाबूंची इच्छा होती की, आपण कायदामंत्री व्हावं. परंतु गांधींनी बाबासाहेब आंबेडकरांनाच कायदामंत्री म्हणून जाहीर केलं आणि भारताची राज्यघटना त्यांच्याच नेतृत्वाखाली तयार व्हावी असं जवळजवळ ठरलं. त्याप्रमाणे ती तयार झाली. ही गांधींची भूमिका होती, काँग्रेसला आवडलेली नव्हती; पण तरीही गांधींनी आग्रह धरल्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या.

-रावसाहेब कसबे यांची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी क्लिक करा – http://bit.ly/2Z9IlZe

Previous articleरेड लाईट डायरीज
Next articleभाजप : मंदी मे भी तेजी का एहसास
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here