– डॉ. शीतल आमटे
.एक महिन्यांपूर्वी ‘शर्विलचे स्क्रीन ऍडिक्शन तोडताना…’ जेव्हा लिहिले तेव्हा ती एक साधी फेसबुक पोस्ट होती. अविनाश दुधेंनी ती mediawatch.info च्या वेब पोर्टलवर आर्टिकल म्हणून घेऊ का विचारले. मी हो म्हटले आणि त्यांनी प्रकाशित केले. आज त्याचे एक लाखावर views झालेत.
खरे म्हणजे त्यानंतर दिवसभराच्या कामात मी विसरूनही गेले होते की असा लेख लिहिलाय आणि तो इतका viral होईल! दुसऱ्या दिवशी त्यांचा मेसेज की तुमचा लेख वणव्यासारखा पसरतोय! दोनच दिवसात तो १० हजारांवर गेला आणि मग कित्येक देशांमध्येही वाचला गेला. अचानक मला फोन आणि emails येऊ लागले की, हे आम्हाला फार अचंबित करणारे आहे. आम्हाला खूप फायदा होतोय, आम्हीही हे उपाय केले व लगेच फरक दिसला वगैरे. काही जणांनी त्यांच्या समस्या मांडल्या. काहींना पॉर्न बघायला आवडते त्याबद्दल मन मोकळे केले.
पुढे पुढे हा लेख अनेक whatsapp ग्रुप्स आणि इतर समाजमाध्यमांवर झळकू लागला. जेथे जाईन तेथे तुमचा लेख वाचला, या प्रतिक्रिया येऊ लागल्या. या लेखाने डिजिटल मीडिया विश्वातील अनेक रेकॉर्ड्स मोडले. अजूनही तो वेड्यासारखा फिरतोच आहे. अनेकांनी तो तसाच उचलून छापला. पुढे काही माध्यमांनी त्यावरचे उपाय मागितले. काही माध्यमांनी डिजिटल स्वरूपात या विषयाची मांडणी करायचे ठरविले. त्यामुळे त्याचे मी व्हिडिओ ब्लॉग्ज केले. अनेक लोकांनी conferences आणि भाषणांना बोलविले. अचानक माझी नवी ओळख महाराष्ट्रात निर्माण झाली.
पण मला हे सर्व त्रासदायक होते. लेखाला मिळणाऱ्या प्रत्येक क्लिकसोबत माझे अंतःकरण ढवळून निघत होते. आपण जे गेले काही महिने बोलत होतो की पुढच्या पिढीच्या प्रश्नांवर आजच काम करण्याची गरज आहे ते किती खरे आहे आणि या प्रश्नावर काम किती कमी होते आहे याची प्रचिती मला रोज मिळत आहे.
कोणत्याही स्क्रीनचा अतिवापर वाईटच. प्रत्येक स्क्रीन electromagnetic radiation बाहेर उत्सर्जित करीत असतो. स्क्रीन addiction मधून आपल्या शरीरावर सतत परिणाम करणारे electromagnetic radiation हे आजच्या शतकातील सर्वात छुपे आणि सर्वात insensible असे प्रदूषण आहे, असे शास्त्रज्ञ Andrew Weil सांगतात . सन २०११ मध्ये WHO ने या electromagnetic radiation ला कॅन्सरजन्य पदार्थ विभाग 2B मध्ये टाकले जे की जस्त, asbestos आणि विषारी वायूंच्या प्रदूषणाइतके घातक आहे. डॉ.ओम गांधींनी त्यांच्या प्रयोगाद्वारे दाखवून दिले आहे की, मुलांची हाडे पातळ असतात त्यामुळे मुलांचा मेंदू, डोळे आणि बोन मॅरो यांच्यात ही electromagnetic radiations दहा टक्के अधिक खोलवर जाऊन तिथल्या पेशींना नष्ट करतात. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाने २९,००० मुलांवर प्रयोग करून दाखवून दिले आहे की ज्या मुलांना गर्भात आणि गर्भाबाहेर मोबाईलचे सतत exposure असते ती मुले इतर मुलांपेक्षा ५० टक्के अधिक चंचल, बेचैन आणि न मिसळणारी असतात.
मी घराघरांमध्ये पाहिले आहे की आपला मुलगा मागे पडू नये म्हणून पालक मुलांना हातात वेगवेगळे Screens देतात. त्यात मुले काय बघतात ह्यावर फारसे कोणाचे लक्ष नसते. मुलाने जेवण करावे म्हणून मोबाईलवर गाणी किंवा सिरियल्स लावल्या जातात ही गोष्ट आता नॉर्मल झाली आहे. त्यात कोणालाही काही वावडे वाटत नाही, कारण मुले काय उपाशी ठेवून मारायची का, हा प्रतिप्रश्न येतो. खूपदा घराघरांमध्ये पालक आपल्या मोबाईलमध्ये आणि मुले त्यांच्या स्क्रीनमध्ये मग्न असतात. आजी आणि आजोबा नातवंडे आपल्याकडे येत नाहीत म्हणून त्यांना मांडीवर बसून स्क्रीनवर काहीतरी दाखवतात. पाहुणेही हेच करतात.
आजकाल स्क्रीन बघणे हा जणूकाही माझा हक्क आहे या आविर्भावात बरीच मुले वावरतात. माझ्या एका मित्राने सांगितले की माझ्या ८ वर्षांच्या मुलीने तिच्या आयुष्यात मला स्क्रीनसोबत replace केले आहे. मी ऑफिसमधून आलो की ती माझी नाही तर माझ्या मोबाईलची वाट बघत असते. हातातून मोबाईल हिसकते, तेव्हढ्यासाठी दोन मिनिटे मांडीवर येते आणि मोबाईल घेऊन पळते. पुढे मी काहीही बोललो की तो त्याच्याकडे लक्षच देत नाही. मला रोज मी तिच्या आयुष्यात ‘उरलोय मोबाईलपुरता’ ही जाणीव काळीज कातरून जाते. बायकोही सतत मोबाईलमध्ये असते. मग मीच वेडा TV बघत बसतो. कारण माझ्याशी कुणीच बोलत नाही. मी डिप्रेशनमध्ये चाललोय का, ही भीती वाटते.
प्रश्न इतकाच नाहीये. अमेरिकेतील माझ्या बालरोगतज्ञ मैत्रिणीने सांगितले की १५ च्या वर्गातील 3 मुले स्क्रीन addiction मुळे आज .brain stimulants वर आहेत. म्हणजे तीनच मुलांना औषधे सुरू असली तरी प्रॉब्लेम इतरही मुलांमध्ये आहेत. पण त्यांच्या आईवडिलांनी त्यावर उपचार घेण्यास नकार दिला. यात भयानक गोष्ट म्हणजे त्यांना मुलाची चंचलता, आत्ममग्नता आणि बेचैनी हा प्रश्न आहे, हेच कळलेलं नाहीये. आपल्याकडेही श्रीमंत शाळांमध्ये हेच प्रश्न पुढे आले. मुलांचे शाळेमधले लक्ष अक्षरशः उडाले आहे. मुले सतत बेचैन असतात. आठवी नववीतील मुले वर्गात शिक्षक शिकवत असताना बाहेर कधी जाऊन Wifi सोबत connect होतो याची वाट बघत असतो. त्याहून लहान मुलांचा वेगळा प्रश्न आहे. ‘पेपा पिग’ सारख्या सिरियल्स पाच मिनिटात संपतात. त्या इतक्या फास्ट असतात की एक संपून पुढचे कधी सुरू होते, हे मुलाला कळतच नाही. त्यामानाने वर्गात शिक्षक हळूहळू शिकवतात. कारण त्यांना सर्वांच्या गतीने जायचे असते. ही मुले वर्गात सतत बेचैन होतात कारण एकदा ऐकलेले जेव्हा पुन्हा शिक्षक घोटवतात तेव्हा ही मुलं अस्वस्थ होतात.
जगभरातील वीसहून अधिक देशात एक लाखांपेक्षा अधिक लोकांनी वाचलेला लेख – शर्विलचे स्क्रीन ऍडिक्शन तोडताना…http://bit.ly/2YN2CFo
मूल आजारी असले की हमखास मोबाईल मागते आणि त्याला दुखवू नये म्हणून आपण सहज तो त्याला देऊन टाकतो. लांबच्या प्रवासात मुलांनी गोंधळ करू नये म्हणून आईवडील मुलांना स्पेशल व्हिडीओ डाउनलोड करून बघायला देतात.
यावर उपाय काय? हा प्रश्न इतका जागतिक स्वरूपाचा आणि अनेक layers असलेला आहे की याला एक उत्तर नाही. यात अनेक आव्हाने आहेत. याला खेड्यातील आणि शहरांतील मुलांचे प्रश्न हीही एक बाजू आहे. खेड्यात मुलांना खेळायला जागा असते पण खेळणी नसतात आणि शहरात खेळण्यांचा भडिमार असतो पण मुक्त खेळायला जागा नसते. यात आईचे प्रश्न, वडिलांचे प्रश्न, आईवडील, सासूसासरे यांचे नातेसंबंध हीही एक बाजू आहे. हे सगळे समविचारी नसले तरीही प्रश्नच आहे.
जाऊ द्या, आपण उपायांवर बोलू. तुमचे आमचे लहानपण आठवून बघा. टायरच्या त्या फुटक्या चाकासोबत आपण तासनतास खेळायचो. लपाछपी, डब्बा एक्सप्रेस १२३ , लगोरी, आमलेट की चॉकलेट, गंडे चू, पत्ते अशी साधी माध्यमे वापरून आपण खेळत असू. आपणही मोठे झालो. आपले बायोडाटा छान आहेत. आपण कुठे स्क्रीन बघून मागे पडलो? मग आता असे का वाटते की आपली मुले स्क्रीन दिला नाही तर काळाच्या मागे पडतील?
माझेच उदाहरण सांगते. मी सुद्धा बहुतेक एक आत्ममग्न मुलगी होते कारण आई अजूनही मी तिला दिलेल्या त्रासाबद्दल जगाला सांगत असते. खरे म्हणजे याला परिस्थितीही कारणीभूत होती. मी आनंदवनात वाढले. आजूबाजूला खूप मोकळी जागा होती. पण मैत्रिणी माझ्या बौद्धिक पातळीच्या नव्हत्या. माझे पाय थोडे वाकडे असल्याने प्लास्टर घालून सरळ केले होते त्यामुळे धावणारे खेळ खेळण्याचा प्रश्नच नव्हता. माझी आई सतत आजारी आणि वडील सतत कामात असल्याने त्यांनी आम्हाला वेळ देण्याचाही प्रश्न नव्हता.मला सांभाळायला अनेक व्यक्ती येत होत्या. कारण कोण्या एकाचे मी ऐकत नसे. त्यामुळे दिवसभर मेसेजसारखी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे फॉरवर्ड होत जायचे. त्यामुळे मी आत्ममग्न होत गेले. अभ्यासात हुशार होते, त्यामुळे त्यातही आईचे सहकार्य नको होते. एकदा वाचले की पुन्हा वाचण्याची गरज पडत नसे. आईला ते कळत नसावे. त्यामुळे ती ओढून ताणून अभ्यास घ्यायचा प्रयत्न करी. एकदा मी चौथीत तिला स्पष्टच सांगितलेले आठवते की, मला तुझी मदत नकोय. तिला ते फार वाईट वाटले आणि तिने माझा नाद जो सोडला तो आजवर.
पण तिने एक केले.तिने मला कलाक्षेत्रात ढकलले. त्याकाळात आमच्याकडे पैसे खूप कमी असायचे. आईला ५०० रुपये पगार होता. तिला लक्षात आले की मोठी होताना मला कलेत रस यायला लागलाय. मग आई पगारातून पैसे साठवून मला कलेचे साहित्य आणून देई. माझे आजोबा बाबा आमटेंच्या बहिणी कलाकार होत्या. त्या मला क्रोशा, भरतकाम, विणकाम असे काहीबाही शिकवीत. मी फारच लहान होते पण तरी त्यात उत्तम प्रगती होत होती. मला आठवते मी चौथीत असताना क्रोशाचे एक सुंदर आसन पूर्ण केले होते. पुढे अभ्यास झाला की कला, कला झाल्या की अभ्यास, असा माझा दिवस मी काढे. यात बाहेर खेळणे कमीच असे.कलेच्या निर्मितीतून माझी आत्ममग्नता खूप कमी होत असे. मी इतकी कलासक्त झाले की सातवीत असताना मी शेजाऱ्यांकडे लपून शिवणकाम शिकले आणि त्याबद्दल आईच्या शिव्याही खाल्ल्या.
पुढे पुढे मीच पुस्तके वाचत गेले आणि नवीन कला शिकत गेले. चित्रकलेच्या भल्यामोठ्या वह्या आईने करून दिल्या होत्या. त्यात आम्ही चित्रे काढीत असू. मग औरंगाबादला श्रमिक विद्यापीठात बाहुल्या बनविणे, Nib painting आणि केक बेकिंग शिकले. पुढे चित्रकलेच्या परीक्षांमध्ये A ग्रेड मिळाली.नंतर साधारण ८०० जुनी गाणी डायरीत लिहून काढून पाठ केली. हे मला कोणी सांगत नसे. आपोआपच सुचत असे. पुढे मोठी झाल्यावर मात्र कला न शिकता ती स्वतः करून बघायचे ठरविले. मग मेडिकलला असताना स्वतःच प्रयोग करून फोटोग्राफी शिकले. सध्या पेंटिंग शिकतेय. quilting हे अपूर्ण स्वप्न आहेच. आयुष्यभर नवनवीन कला शिकणारच आहे. काय ते माहीत नाही पण जेव्हा माझ्यातली कला मरेल तेव्हा मीही मरेन.
तर सांगायचा उद्देश असा की जेव्हा जेव्हा वेळ कसा घालवायचा हा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा मी स्वतःला कलेच्या कुशीत ढकलले. कलेमुळे हाताला काम मिळत राहिले. निर्मिती होत गेली आणि स्वर्गीय आनंद मिळत गेला.
माझ्या वडिलांनी विकास आमटेंनी, या सगळ्या प्रोसेसमध्ये मला कधीच थांबविले नाही. मी त्याला दादा म्हणते. मी त्याची मुलगी आहे, मैत्रीण आहे, कधी कधी त्याच्याशी भांडतेही आणि त्याच्या हाताखाली कामही करते. आमचे असे वेगळेच नाते आहे. माझ्या लहानपणी बाबा ( आमटे) ‘भारत जोडो’, ‘नर्मदा बचाव’ या मोठमोठ्या चळवळींमध्ये असल्याने त्याला आनंदवन चालविण्यासोबतच बाबांची सगळीच कामे बघावी लागत. बाबा जरी फ्रंटवर होते तरी बाबांची सगळी सोय, पत्रव्यवहार, लोकसंग्रह दादा बघायचा. त्याला रोज रात्री एक वाजता ऑफिसमध्ये भेटायचे. तेव्हा तो मला त्याची विविधरंगी पेन्स, पेन्सिली देऊन चित्र काढू द्यायचा. नंतर त्याच्याकडे electronic typewriter आला. तोही त्याने मला शिकवला. वयाचा विचार केला नाही. एखादे वेळी तो मला शेतात घेऊन जाई, कच्च्या चवळ्या, भेंड्या खाऊ घाले. त्याला माझे शाळेत जाणे अजिबात आवडत नसे. त्याने काही फायदा होत नाही, असे त्याचे स्पष्ट मत होते. शाळेत जाऊ नये म्हणून बाप प्रवृत्त करीत असताना मला भलतेच टेंशन येत असे. तो मला अश्मयुगीन माणसाची हत्यारे आणि डायनोसारचे अवशेष जमा करायला नेई. आम्ही कधीकधी अंड्याची भजी करीत असू. आजीचा प्रचंड विरोध असताना अनेक ठिकाणी त्याने चोरून मला अंडाकरी खाऊ घातली आहे.
माझ्या बापाने कधी मला सुट्टीवर नेले नाही ना कधी माझा रेग्युलर बापासारखा सांभाळ केला, कारण बाबांच्या कामामुळे त्याच्याकडे वेळ आणि पैसे दोन्ही नसत. पण त्याने मला खूप quality time देऊन माझ्यासाठी आठवणींचे भंडार तयार केले. आज मागे वळून बघताना त्या सर्व आठवणी दाटून येतात. या सगळ्या आठवणी ज्या त्याने निर्माण करून ठेवल्या आहेत त्या मला आज जगण्याची उभारी देतात. मला वाटते आपल्या मुलांनाही आपल्याकडून हेच हवे असेल का?
मला स्वतःला खूप त्रास आहेत. पण रोज सकाळी उठल्यावर मी ते न बघता आनंदी राहण्याचा आणि माझ्या मुलाला आनंदी ठेवण्याचा निर्धार करते. आज मलाही वेळ नसतो. सतत प्रवास, कामाची क्लिष्टता आणि प्रचंड ताणातून मुलाला वेळ देणे हा माझ्यासाठी सुरुवातीला क्लेशदायक प्रकार होता, म्हणूनच आम्हीही त्याला स्क्रीन देऊन स्वतःची सुटका करून घेतली. परंतु जेव्हा सर्व दुष्परिणाम लक्षात आले तेव्हा त्याच्यासाठी ठरवून वेळ काढू लागले. त्याला वेळ मागू लागले. तोही वेळ ठेवू लागला, येऊन मांडीत बसू लागला. त्या वेळात त्याच्यासाठी नवीन आठवणी बनतील असे काहीतरी करू लागले. या सर्वात स्क्रीन नसल्याने वेळ कसा घालवायचा प्रश्न होताच; त्यामुळे त्याला जुन्याच खेळण्यांची नव्याने ओळख करून दिली. एकच खेळणे चार पद्धतीने खेळणे शिकवले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला रोज अर्धा एक तास तरी कुशीत घेऊन त्याच्याशी संवाद कायम ठेवला. त्या संवादात आमचे विविध विषय येतात. त्याच्या दिवसभरच्या आठवणींची उजळणी, त्याला बाबा आणि माझ्याबद्दल काय वाटते, त्याला नवे काय शिकायचे आहे, आमची दोन कुत्री, त्याच्या आवडत्या वस्तू, मानवी शरीर, मृत्यू म्हणजे काय असे बरेच विषय आम्ही बोलतो. खूपदा इतके चांगले संवाद होतात की रेकॉर्ड करावेसे वाटतात. तो रोज रात्री माझ्या कुशीतच घट्ट मिठी मारून झोपतो. स्क्रीन तुटल्यापासून त्याला येणारी nightmares पूर्ण बंद झाली आहेत.
डॉ.शीतल आमटे यांचा या विषयातील Abp Mazha या वृत्तवाहिणीवरील Video Blog-नक्की पहा-https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-majha-vlog-screen-addiction-shital-aamate-732745?fbclid=IwAR0QQ5CWeE62Uc_E_PDHI928tend0984y-OTvA-cK4gl5LhsLrY4bgv5TrI
त्याच्यासाठी मुद्दाम दोन कुत्री घेतली. कुत्र्यांशी खेळण्यात, बोलण्यात, मस्ती करण्यात, फिरवायला नेण्यात त्याचा प्रचंड वेळ जातो. हल्ली तर माझ्या कुत्र्यालाही मी मोबाईल हातात घेतलेला आवडत नाही. दुसरीकडे लगेच तोंड फिरवतो. कुत्रा घरात असल्याने ताण कमी करण्याचे हमखास साधन मला आणि त्याला मिळाले आहे. कुत्र्याला मिठी मारली किंवा त्याने तुम्हाला मिठी मारली कीOxytocin म्हणून हॉर्मोन बाहेर येते जे तणाव कमी करतात. आमचा कुत्रा enzo, मी आणि शर्विल तासनतास कोचावर एकमेकांच्या मिठीत सकाळी पडलेलो असतो.
त्याला स्क्रीनची आठवण येते की नाही हा प्रश्न बऱ्याचदा विचारला असता तो म्हणतो की मी इतका बिझी आहे ना की मला मोबाईलची आठवणच येत नाही. अजून सहा वर्षांचा असल्याने पूर्णतः त्याला स्वतःला express करता येत नाही. पण तरीही इतके सगळे त्याने honestly सांगणे हेच मला फार कौतुकास्पद वाटते.
या प्रयोगात घरात इतरांना कोणीलाही पूर्णपणे स्क्रीन सोडावे लागले नाहीत कारण आमचे बरेच काम मोबाईल आणि लॅपटॉपवर होते. पण आता त्याला ते खटकतही नाही आणि त्यांची आठवणही येत नाही. जे त्याचे आयुष्य व्यापून होते ते झटक्यात त्याने सोडले ते केवळ आमच्यावरील विश्वासासाठी. मला वाटते की he has made peace with screens आणि ह्यातच त्याच्या यशाचे रहस्य दडले आहे.
(लेखिका आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत)
[email protected]
हे सुध्दा नक्की वाचा. भारत होतोय नोमोफोबियाचा शिकार- http://bit.ly/2su677w
Khup changla lekh aahe ????????