ॲरिस्टॉटलची तत्वमीमांसा (मेटाफिजिक्स)

-सुनील तांबे

जगामध्ये अनेक वस्तु आहेत. त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या श्रेणी आहेत. वस्तुप्रकार परस्परांशी श्रेष्ठ-कनिष्ठत्वाचे संबंध असतात. त्यातून वेगवेगळ्या श्रेणी निर्माण होतात. उदाहरणार्थ निर्जीव वस्तुंपेक्षा वनस्पती श्रेष्ठ आहेत, वनस्पतींपेक्षा प्राणी श्रेष्ठ आहेत. प्रत्येक वस्तूला एक प्रकृती असते आणि रुपही असते. उन्नत स्थितीला जाण्याचा वस्तू प्रयत्न करत असते. उदाहरणार्थ माणूस हे रुप असेल तर लहान मूल ही त्याची प्रकृती आहे. लहान मूल हे रुप असेल तर भ्रण अवस्था ही त्याची प्रकृती आहे. भ्रूण हे रुप असतं तेव्हा गर्भाशय ही प्रकृती असते.

प्रकृतीचं रुपामध्ये परिवर्तन होणं कल्याणकारक असतं. प्रत्येक वस्तूची प्रकृती पूर्वनिश्चित असते. कोंबडीच्या अंड्यातून बदकाचं पिलू बाहेर येणार नाही. कोंबडीच्या पिलाची पुढे कोंबडी वा कोंबडा होईल. झाडाच्या बी मध्येच पूर्ण झाडाचं रुप दडलेलं आहे. झाड बनण्याची क्षमता बी मध्ये आहे तेच रुप प्रत्यक्ष साकारण्यातच वस्तूचं कल्याण म्हणजेच पूर्णता आहे.

मात्र प्रत्येक बीचं झाडात रुपांतर होईलच असं नाही. प्रत्येक अंड्यातून पिलू निपजेलच असं नाही. समजा निपजलं तर ते कोंबडी वा कोंबड्याचं पूर्ण रुप गाठेलच ह्याची शाश्वती नाही. त्याचं स्पष्टीकरण देताना ॲरिस्टॉटल म्हणतो, प्रत्येक प्रकृतीमध्ये बदलाला विरोध करण्याचाही गुण—जडत्व असतं. प्रकृतीचा रुपामध्ये होणारा विकास रोखण्याला नैसर्गिक कारणंही असतात.  प्रकृतीचा उगम रुपामध्ये आहे आणि रुपाचा उगम प्रकृतीमध्ये आहे असं असेल तर प्रकृतीची सुरुवात केव्हा व कशी झाली? प्रकृती अनादी असते कारण तिचा संबंध भविष्यातील विविध रुपं घडवण्याशी आहे, असं स्पष्टीकरण अरिस्टॉटल देईल.

एका स्थानाकडून दुसर्‍या स्थानाकडे जाणे म्हणजे गती. प्रत्येक वस्तूचा गुणधर्म असतो. त्यानुसार तिचं जगातलं स्थान निश्चित होतं. उदाहरणार्थ पृथ्वी वा जमीन. खालच्या स्थळी असणे हा पृथ्वीचा धर्म आहे. त्यामुळे पृथ्वीवरील कोणतीही वस्तू उंच फेकलीत तर ती खाली येते. अग्नीचा धर्म आहे वरती जाणे. अग्नी वरती जाऊ पाहतो म्हणजे ग्रह आणि तार्‍यांकडे जाऊ पाहातो. पण वस्तुंना गती प्राप्त कशी होते ?

ॲरिस्टॉटलच्या मते ईश्वरामुळे. ईश्वरामुळेच हे जग गतिमान आहे. ॲरिस्टॉटलचा ईश्वर निर्गुण, निराकार आहे असं स्वसंवेद्य असं चैतन्य आहे. त्याला कोणत्याही इच्छा नाहीत, वासना नाहीत त्यामुळे तो काहीही करत नाही. ॲरिस्टॉटलचा ईश्वर जग निर्माण करणारा नाही तर निर्माण झालेल्या जगाला केवळ गती देणारा आहे. त्याच्या चैतन्यामुळे विश्वातील वस्तूंना गती प्राप्त होते. गती देण्यासाठीही त्याला काहीही करावं लागत नाही. हा ईश्वर केवळ आणि केवळ चिंतन करतो. बाकी काहीही करत नाही. ॲरिस्टॉटलचा ईश्वर इंग्लडच्या राजासारखा आहे. पृथ्वीचा सम्राट असला तरी रिकामटेकडा आहे. केवळ चिंतन करतो.

ॲरिस्टॉटलची ही तत्वमीमांसा ख्रिश्चन धर्माने आपलीशी केली आणि ख्रिश्चन धर्माचं तत्वज्ञान रचलं. ज्या तत्वज्ञानाने युरोपातील काळा कालखंड वा डार्क एज व्यापून टाकलं होतं. पुनरुज्जीवन वा रेनेसांन्स या सांस्कृतिक आंदोलनाने आव्हान दिलं ते ॲरिस्टॉटलच्या परिभाषेतील ख्रिश्चन धर्माच्या तत्वज्ञानाला. गॅलिलिओ, कोपर्निकस, लिओनार्दो दा व्हिंचि, मायकेल एंजेलो इत्यादी शास्त्रज्ञ, चित्रकार, शिल्पकार आणि स्थापत्यविशारदांनी. रोमन साम्राज्याच्या सुवर्णयुगाचा पुनर्जन्म करायचा असेल तर अरिस्टॉटल, प्लेटो ह्यांचं पुनर्जीवन करायला हवं अशी कलावंतांची धारणा होती. विस्मृतीत गेलेला ॲरिस्टॉटल, प्लेटो आणि अन्य ग्रीक विचारवंतांचं उत्खनन त्यांनी सुरू केलं. रेनेसांन्स ह्या शब्दाचा अर्थच मुळी पुनर्जन्म.

भारतीय इतिहासात असा काळा कालखंड नव्हता. परंतु युरोपियन इतिहासकारांची रोमन साम्राज्याच्या सुवर्णयुगाची कल्पना हिंदुंचं सुवर्णकाळ या रुपात भारतामध्ये मांडण्यात आली. इतिहासाच्या पुस्तकांतून आणि पिढ्यां-पिढ्यांच्या सामूहिक स्मृतीने ती भारतीय, विशेषतः हिंदूंच्या मनात दृढ झाली आहे.

(लेखक नामांकित पत्रकार व अभ्यासक आहेत)

9987063670 

हे सुद्धा नक्की वाचा-

फिलीप, ॲरिस्टॉटल आणि सिकंदरhttp://bit.ly/2TnNuxf

सॉक्रेटीस, प्लेटो,ॲरिस्टॉटल http://bit.ly/2TezcyN

ॲरिस्टॉटलचे विज्ञान http://bit.ly/2PUyxjY


 

Previous articleअश्लील उद्योग मित्र मंडळ
Next articleशहीद सावित्रीबाईंची शौर्यगाथा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here