-अविनाश दुधे
जगाच्या इतिहासात कोटय़वधी लोक केवळ एका दिवसात जात नाकारतात. अंधश्रद्धा झटकून टाकतात. जुन्या रूढी-समजुतींचा त्याग करतात. लाचारीचं जिणं जगायला नकार देतात. एवढंच काय देवसुद्धा नाकारतात, ही किमया केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर करू शकले.
…………………………………………………………………………
काही वर्षांपूर्वी सीएनएन-आयबीएन व हिस्ट्री 18 या नामांकित दूरचित्रवाहिन्यांनी महात्मा गांधीनंतर भारतातील कोटय़वधी जनतेच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणणारा सर्वात महान भारतीय कोण? या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी जवळपास दोन कोटी लोकांची मते जाणून घेतली होती. समाजजीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवणार्या १०० नामवंतांची यादी करून त्यातील सर्वात महान भारतीय कोण? असा सवाल भारतीय जनतेसमोर ठेवण्यात आला होता. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जेव्हा जाहीर झालेत तेव्हा दोन कोटींपैकी जवळपास ४० टक्के लोकांनी ‘ग्रेटेस्ट इंडियन’ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. सर्वेक्षणात एपीजे अब्दुल कलाम, वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, मदर टेरेसा, जेआरडी टाटा, इंदिरा गांधी, सचिन तेंडुलकर, अटलबिहारी वाजपेयी आणि लता मंगेशकर या महान भारतीयांना अनुक्रमे दुसरा ते दहावा क्रमांक मिळाला होता.
भारतीयांमधील अतिरेकी व्यक्तिप्रेम आणि व्यक्तिस्तोम माजविण्याची प्रवृत्ती लक्षात घेतली तर अशा प्रकारच्या सर्वेक्षणातील निष्कर्षाबाबत मतभेद असू शकतात. शिवाय महापुरुषांची महानता मोजायची कशी? त्याचे निकष ठरवायचे कसे, याबाबतही वेगवेगळी मते असू शकतात. भारतातील भौगोलिक विविधता, वेगवेगळे धर्म, संस्कृती, परंपरा, वेगवेगळा इतिहास, समजुती, विचारधारा, जातीव्यवस्थेचा प्रभाव या मुद्द्यांमुळे भारतीय माणूस कुठल्या एका नावावर एकमताने महानतेचा शिक्का मारतील, हे शक्य नाही. म्हणूनच वैयक्तिक कर्तृत्व,पराक्रम व प्रतिभेपेक्षा ज्या माणसामुळे कोटय़वधी जनतेच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल झाला , सामान्य माणसांचे आयुष्य ज्याच्यामुळे अंतर्बाह्य बदलून गेले, असा महापुरुष कोण? हा नेमका प्रश्न सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. स्वाभाविकच या निकालात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला बहुसंख्य भारतीयांनी पसंती दर्शविली. तारतम्य बुद्धी असलेला कोणताही भारतीय या प्रश्नाचे उत्तर देताना उस्फूर्तपणे बाबासाहेबांचेच नाव घेणार, यात दुमत असण्याचे कारण नाही.
जगाच्या इतिहासात आपल्या चांगल्या-वाईट कर्तृत्वाने अजरामर झालेले अनेक महापुरुष झालेत. अलेक्झांडर, नेपोलियन, हिटलर, चर्चील, लेनिन, स्टॅलिन, माओ, कार्ल मार्क्स, शिवाजी महाराज, महात्मा फुले असे कित्येक नाव घेता येतील. मात्र पशुतुल्य आयुष्य जगणार्या करोडो माणसांचं आयुष्य एका दिवसात बदलण्याचा पराक्रम फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे. त्यांच्या धर्मांतराच्या निर्णयाने हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून दलित समाज काही क्षणात मुक्त झाला . त्या एका निर्णयाने दलित समाज अंतर्बाह्य बदलला. जगाच्या इतिहासात कोटय़वधी लोक केवळ एका दिवसात जात नाकारतात, अंधश्रद्धा झटकून टाकतात, जुन्या रूढी-समजुतींचा त्याग करतात, लाचारीचं जिणं जगायला नकार देतात, एवढंच काय देवसुद्धा नाकारतात, ही किमया केवळ बाबासाहेब करू शकले.
विशेष म्हणजे ही रक्तहीन क्रांती करताना देशाला एकसंघ ठेवण्याचं अतिशय महत्त्वपूर्ण काम बाबासाहेंबानी केलं. धर्माच्या आधारावर देशाचे दोन तुकडे झाल्याची जखम ताजी असताना या मातीतला, विवेकवादाशी नातं सांगणारा बौद्ध धर्म स्वीकारून त्यांनी एक नवीन इतिहास घडविला. हिंदूधर्मावर सूड घेण्यासाठी आंबेडकरांनी आणि त्यांच्या लक्षावधी अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारला, असा आरोप केला जातो . मात्र ती गोष्ट खोटी आहे. हिंदू धर्मावर त्यांना सूड घ्यावयाचा असता तर त्यांनी इस्लामचा किंवा ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला असता, पण ‘भारताच्या इतिहासात देशाचा किंवा धर्माचा विध्वंसक म्हणून माझे नाव राहावे अशी माझी इच्छा नाही!’ असे बाबासाहेब नेहमी म्हणत. सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास केल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माची निवड केली होती. ‘बुद्धाचा धर्म हा खरा मानवी धर्म आहे. मानवाच्या संपूर्ण विकासासाठी तो निर्माण केलेला आहे. तो प्रत्येक आधुनिक आणि बुद्धिवादी माणसाला पटण्यासारखा आहे. त्या धर्मामध्ये मनुष्याला पूर्ण वैचारिक स्वातंत्र्य दिलेले आहे. मानवतेला आणि सद्सदविवेकबुद्धीला ज्या गोष्टी पटतील त्याच त्या धर्माने ग्राह्य मानलेल्या आहेत.’’ , ही बौद्ध धर्म स्वीकारण्यामागील भूमिका त्यांनी लिहून ठेवली आहे.
बाबासाहेबांच्या आयुष्याचे अवलोकन केल्यास कायद्यापासून राज्यघटनेपर्यंत आणि अर्थशास्त्रापासून तत्वज्ञानापर्यंत शेकडो विषयात त्यांनी चौफेर मुसाफिरी केली. यापैकी कोणत्याही विषयात सर्वोच्च स्थान गाठण्याची क्षमता त्यांच्यात होती. मात्र वैयक्तिक पराक्रमाचा मोह त्यांनी बाजूला ठेवला. प्रस्थापित व्यवस्थेने ज्यांना हजारो वर्ष गावकुसाबाहेर ‘क्वारंटाइन’ केलं , प्रथा- परंपरात ‘लॉकडाऊन’ केलं. अशांना माणूस म्हणून त्यांचे मुलभूत हक्क मिळवून देण्याच काम बाबासाहेबांनी केलं. एखाद्या प्रसंगात किंवा एका ठराविक कालखंडात विजेसारखा चमकण्याचा पराक्रम अनेकांनी केला आहे. बाबासाहेबांनी मात्र आपले संपूर्ण आयुष्य उपेषित घटकांना ताठ मानेने जगण्याचं बळ देण्यात खर्ची घातलं. दलित, शोषित, आदिवासी, ओबीसी व विशेषतः हिंदू स्त्रियांना कायदा आणि संविधानाच्या माध्यमातून जे अधिकार बाबासाहेबांनी मिळवून दिले त्यातून आजच्या आधुनिक भारताची उभारणा झाली आहे . संविधान हा त्यांच्या कर्तृत्वाचा सर्वोच्च आविष्कार आहे . बाबासाहेबांचा हा पराक्रमच त्यांना नि:संशयपणे ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ ठरवितो.
(लेखक ‘मीडिया वॉच’ अनियतकालिक व वेब पोर्टलचे संपादक आहेत)
8888744796
अगदी सडेतोड आणि खणखणीत