‘मटका किंग’ म्हणून ओळखले जाणारे रतन खत्री यांचे काल निधन झाले. त्यानिमित्ताने एकेकाळी सर्वव्यापी झालेल्या मटक्याच्या , त्यासंदर्भातील व्यवहाराच्या, रतन खत्री यांच्याबद्दलच्या दंतकथा अशा अनेक आठवणी समाज माध्यमांत येत आहेत . त्यापैकी काही निवडक आठवणी …
-सतीश तांबे, लेखक, नवी मुंबई
रतन खत्री गेल्याचं वाचलं
आणि साठ सत्तरच्या दशकातला
तो काळ मनात पुन्हा जिवंत झाला…
त्या काळात निदान मुंबईसारख्या शहरात तरी
अंडरवर्ल्ड हा खूपच चर्चेचा विषय असायचा
त्यातील बहुतेक जण हे तस्करी , खूनखराबा वगैरे करायचे
त्यामुळे गॅंग वॉर , पोलीस एन्काउंटर वगैरे गोष्टी
गल्लीबोळात तिखटमीठ लावून चवीने चघळल्या जात
आज चर्चेत असणाऱ्या मोदी-शहांना
काही जण जे ‘ रंगा बिल्ला ‘संबोधतात
ती देखील ह्याच काळातील नामचीन जोडी !
तर ह्या वलयांकितांमध्ये एक नाव वेगळं होतं
त्याचा संबंध थेट गुन्हेगारीशी नव्हता
तर जुगाराशी होता
तो होता अर्थातच मटका किंग रतन खत्री
वरळीची कीर्ती सर्वतोमुखी करणारी २ नावे तेव्हा होती
ती म्हणजे आचार्य अत्रे आणि रतन खत्री
शिवाय वरळी म्हटलं की
वरळी डेअरी, बीडीडी चाळी देखील आठवायच्याच
ते अलाहिदा !
विनामेहेनत / विनाश्रम पैसे वाढवण्याची इच्छा
ही तशी सयुक्तिकच आहे
जुगाराचा उगम ह्या इच्छेतच आहे …
आणि थेट महाभारतातील द्युतापासून
जुगाराला पूर्वपीठिका आहे !
जुगारी माणसे हि कशावरही जुगार खेळू शकतात
हे सर्वानाच ठाऊक आहे
पत्त्यातील रमी , फ्लश / तीन पत्ते हे जुगार
सर्रास खेळले जातात
पण ह्या जुगारांमध्ये पैशांची उलाढाल
ही मोजक्या लोकांमध्ये आणि आपापसात होते
रतन खत्रीचं वैशिष्ट्य हे की त्याने ह्या जुगाराला
सर्वसमावेशक / व्यापक स्वरूप दिल
त्यासाठी प्रचंड मोठी यंत्रणा उभारली
आणि communication ची आजच्यासारखी
सोय नसतानाही आकडा फुटायच्या आधी थोडा वेळ
सगळीकडचे फोन वापरून त्याने जे व्यवस्थापनाचे
दर्शन घडवले ते केवळ अद्भुत होते
जिच्याविषयी अनेक संबंधित
रोचक अनुभव लिहू शकतील
रतन खत्री ह्यामुळेच तेव्हा आख्यायिकांचा विषय बनला होता
मी देखील स्वानुभवातून ह्याविषयी काही किस्से सांगू शकतो
पण माझ्यासाठी ‘ रतन खत्री ‘ हे नाव ज्या वेगळ्या
कारणांसाठी महत्वाचं आहे ते त्याला श्रद्धांजली वाहताना सांगणे
हे अधिक सयुक्तिक दिसेल , असं मला वाटतं ,
आणि ते म्हणजे त्याने माझ्या मनावर
कायद्याच्या मर्यादा ठसवल्या
आणि ह्यामध्ये त्याच्याच जोडीने आणखी एक नाव
महत्वाचे आहे ते म्हणजे राम जेठमलानी !
जुगाराला कायद्याने बंदी असल्यामुळे
रतन खत्रीला अध्येमध्ये अटक होत असे
आणि अशा वेळेला रतन खत्रीच्या जोडीला
राम जेठमलानी धावून येत …
त्यांचा युक्तिवाद साधारणपणे हा असे की
‘ पत्त्यांच्या पॅकमधून पत्ते खेचून उताणे टाकणे
हा काही गुन्हा नाही … बरोबर ?
आता एखाद्या माणसाने उलट्या टाकलेल्या पत्त्यावर
काही लोक पैसे लावतात
ह्यात त्या माणसाचा काय गुन्हा ? ‘
ह्या असल्या युक्तिवादावर रतन सुटायचा
ह्या मटक्याच्या लोकप्रियतेचा महिमा / प्रभाव असा की
ह्यामध्ये मिळणाऱ्या महसुलाच्या आशेने हळूहळू
सरकारनेच राज्य लॉटरी सुरू केल्या
रतन खत्रीच्या व्यवसायाचा प्रेरणास्रोत जसा
न्यूयॉर्क कॉटनचा भाव होता
तसा महाराष्ट्र राज्य लॉटरीचा प्रेरणास्रोत
रतन खत्रीचा वरळी मटका हा होता
रतन खत्रीविषयी अनेक आख्यायिका तेव्हा प्रचलित होत्या
की तो म्हणे हातामध्ये अनेक सोन्याची कडी घालतो
आणि पोलीस जर त्याला हातकड्या घालायच्या उद्देशाने आले
तर तो त्यांना सोन्याचं एक कडे देऊन बेड्या पडणे टाळतो वगैरे
महाराष्ट्र राज्य लॉटरी सुरु झाल्यानंतर तर
रतनने आणखीनच धमाल सुरु केली
तो लॉटरीचं लागलेलं तिकीट थोडे जास्त पैसे देऊन विकत घ्यायचा
आणि आपल्याकडचा ब्लॅक मनी व्हाईट करून घ्यायचा
त्यासाठी तो इतक्या लॉटर्यांचा विजेता ठरला की
जास्तीत जास्त राज्य लॉटरीचा विजेता म्हणून त्याचे नाव
लिम्का किंवा गिनीस बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये जायला हरकत नव्हती
लॉटरीचा प्रसार करण्यासाठी तेव्हा लॉटरीतिकिटांच्या विक्रीस्थानी
विजेत्यांचे फोटो झळकवलेले असत
त्यात हा डोईला पांढरा फडका बांधलेला
रतन खत्री खट्याळपणे हसताना दिसायचा
कायद्याला फाटयावर मारल्याचा / च्युत्यात काढण्याचा
आनंद असायचा तो !
राज्य लॉटरीचे मुख्य लाभार्थी अर्थातच सरकार
दुसरे लाभार्थी बहुदा ह्या तिकिटांची एजन्सी मिळवलेले
कोठावळ्यांचे मॅजेस्टिक
आणि तिसरा बहुदा हा रतन खत्री असावा
रतन खत्रीच्या मटक्यामुळे माझा कडकीचा काळ
मी मस्त ऐश करत घालवू शकलो
हे रतनचे माझ्यासारख्या अनेकांवर उपकार आहेत
मला ‘ बाबा ‘ हे टोपण नाव मिळाले
ती देखील रतनकिमया आहे हे देखील
मी इथे बऱ्याचदा लिहिले आहे …
पण रतनचा माझ्या जडणघडणीत मोठा वाटा हाच आहे
की त्याने मला कायद्याचा म्हणजेच पर्यायाने व्यवस्थेचा
फोलपणा दाखवून दिला
त्यामुळे पुराव्याअभावी कुणी निर्दोष वगैरे सुटला
आणि उद्या अगदी देवपदाला पोचला
तरी मला ती व्यक्ती निष्कलंक वाटतेच असं नाही !
…………………………………
-अरविंद पाटकर, संचालक, मनोविकास प्रकाशन, पुणे
या मटक्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य
म्हणजे व्यवहार एकदम चोख असे.
तुमचे जे पैसे देणे असतील ते तिथेच एकाही रूपयाची काटछाट
न करता मिळत असत.
हा आकडा संध्याकाळी सातच्या
दरम्यान फुटत असे.हा आकडा सर्व
ठिकाणी पोहोचविण्यासाठी अनेकांचे टेलिफोन या काळात आपोआप बंद पडत आणि एक
तासाने आपोआप सुरू होत.
अनेक सामान्य कामगार चार नंबरवर प्रत्येकी चार आणे लावत.
नेहेमीच्या सरावाने त्यातील एक
आकडा लागत असे. चार आण्याचे
सव्वादोन रूपये मिळत. एक रूपया
जावून हातात सव्वा रूपया रहात
असे.तो वर खर्चासाठी उपयोगी पडे.एखादी मोठी महनीय व्यक्ति
शहरात येवून गेली की त्यावर
आधारीत आकडा लावला जाई.
या आकडा लावण्यात पुढे पुढे
लोक फार पटाईत झाले.अश्यावेळी आकडा फोडण्याच्या वेळी आज लोकांनी
कोणत्या आकड्यांवर जास्त पैसे
लावले आहेत याचा अंदाज घेवून
आकडा बदलत अस्त.
या मटक्याची दखल शासनाने
घेतली आणि त्याला पर्याय म्हणून
शासनाने लाॅटरी सुरू केली.
या लाॅटरीचा फायदा सर्वात जास्त
मॅजेस्टीक प्रकाशनाच्या कोठावळे
बंधूंनी घेतला.
मुंबई शहरात ही लाॅटरी सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याच मोठ श्रेय मॅजेस्टीकला आहे.
यातही तुकारामशेठ कोठावळे
यांची कल्पकता खूपच उपयोगी
पडली.
तुकारामशेठ कोठावळे यांनी
लाॅटरीवर रग्गड पैसा कमवून दिला.
ती कहाणी पुढे कधीतरी
…………………………………………….
-शाहू पाटोळे, उपसंचालक, आकाशवाणी, कोहिमा (नागालँड)
अगदी लहानपणापासून रतन खत्री हे नाव ऐकून होतो. नंतर वडील निधन होईपर्यंत ‘लिमिटेड मटका’ लावीत असत लॉटरीची तिकिटे घेत असत; ते अचानकपणे गेल्यावरसुद्धा त्यांच्या खिशात मटक्याच्या चिठ्ठया होत्या. उस्मानाबादला आल्यावर RDC च्या बंगल्यावर ड्युटी होती, तर त्यांनी सरकारी कॉलनीतील बहुतेक सर्व सायबीनींना मटक्याचे आकडे लावण्याची सवय लावली होती. धाकड, संगम, पाना, पत्ती ,ओपन, क्लोज , लंगडा, मेंढी हे शब्द सतत कानावर पडत. काका वालवडला होते तेंव्हा त्यांच्या लहाण्या भावाने तिथे बुकी सुरू केली होती आणि सगळं वालवड मटकामय झालं होतं. उस्मानाबादला एकच मुख्य बुकी होते आणि त्यांच्याकडे काकांचे भाऊ आणि त्यानंतर माझा मावसभाऊ काम करायचे. क्लोज रात्री बारा वाजता यायचा तेंव्हा साडेअकरापासून माझा मावसभाऊ दत्ता BSNL च्या ऑपरेटरपाशी जाऊन बसायचा. एकदा क्लोज चा आकडा उशिरा सांगितला म्हणून थोरल्या रात्रीच्या ऑपरेटर च्या आई-बहिणींची जाहीर ‘वास्तपुस्त’ केली होती. माझ्याकडे महाराष्ट्र टाईम्स यायचा, वडील RK च्या पॉकेटकार्टून मधून मटक्याचा आकडा शोधायचे.
मटक्याचे खूप विनोदी संदर्भ ‘वासुनाका’ मध्ये येतात. तर मटक्याच्याबद्दल (आता नाव आठवत नाही) श्रीकांत सिनकर यांनी एका पुस्तकात खूप सविस्तरपणे लिहिल्याचे आठवते. त्यात कॉटन बाजारातील बंद आणि सुरू होणाऱ्या आर्थिक व्यवहाराचे संदर्भ होते. त्याचकाळात ऋषी कपूर , परवीन बाबी यांचा ‘रंगीला रतन’ हा सिनेमा आला होता, तो रतन खत्रीच्या आयुष्यावर बेतलेला होता ,असं म्हटलं जायचं. नंतर कल्याण आणि वरळी असे दोन मटके सुरू झाले असावेत. माझा मावसभाऊ दत्ताला १९८४ साली ९८,००० रूपयांचा संगमपाना की पत्ती लागली होती.
गुजरातमध्ये असताना कच्छमधील मांडवी येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने बऱ्याचदा जाण्याचा योग आला होता. तिथले मित्रवर्य मुकेश गोहील यांच्यामुळे मला मांडवीच्या अज्ञात इतिहासाची ओळख झाली. मांडवीचा राजवाडा अगदी अंतःपुरात जाऊन बघता आला. तिथल्या राजघराण्याचा खाजगी समुद्रकिनारा, मांडवी गाव जिथून स्थापन झाले, ते पहिले घर आणि त्यात ठोकलेली मेढ त्यांनी दाखवली. आणि शेवटी ‘रतन खत्री’ याच्या पूर्वजांचे घर. मांडवीचे ‘ग्रामस्थ’ रतन खत्रीचे नाव मोठ्या अभिमानाने घेताना ऐकलंय!
*कच्छी दाबेली हा पदार्थ तिकडेच सुरू झाला. गुजराती लोक पर्यटनाच्या निमित्ताने तिकडे गेले तर तिकडून दाबेलीचा मसाला आवर्जून आणतात आणि खजुराच्या मिठाया. कच्छमध्ये खजुराचे खूप उत्पन्न होते. भुजमध्ये अप्रतिम मांसाहारी जेवण मिळते.
……………………………………
–प्रवीण बर्दापूरकर, जेष्ठय संपादक, राजकीय विश्लेषक, औरंगाबाद
सगळे लिहिताहेत , आपण का मागे राहावं ?-
वर्ष १९६७-६८ असावं .
जालन्याला होतो तेव्हा .
हिंदी महाविद्यालयात शिकत होतो आणि रेल्वे स्टेशनवर रेल्वे आली की ओरडून पेपर विकत होतो .
स्टेशन समोरच्या एका चाळीत पेपर स्टॉलच्या मालकासोबत राहायचो .
त्यांना मटका खेळायचा नाद होता .
एकदा अक्षर बघून रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या अड्ड्याच्या मालकाला सांगून दररोज संध्याकाळी तीन-चार तास चिठ्ठ्या लिहिण्याचं काम मला मिळवून दिलं .
त्याकामासाठी महिन्याचे २० रुपये मिळत .
हे काम मिळाल्यापासून राहण्या आणि एकदा खाण्याचे महिन्याला हे मालक माझ्याकडून १० रुपये घेत असत .
मी परत आल्याशिवाय मालक जेवत नसत , माझी वाट पाहत ‘धर्मयुग’ किंवा ‘माधुरी’ वाचत थांबलेले असत .
( पुढे हे मी मी ‘माधुरी’चे डेप्युटी एडिटर , ज्येष्ठ मित्र लच्छीराम चौधरी यांना एकदा सांगितलं . तेव्हा ‘माधुरी’चा हा अफलातून वाचक ऐकून रमचा प्याला
एका दमात रिता करुन पालथा ठेऊन ते कितीतरी वेळ खोssssखो हंसत बसले . )
मटक्याचं ते जग माहिती झालं ते असं ; रतन खत्री या नावाशी ओळख तिथलीच आणि त्याच्याविषयी अनेक ( दंत)कथा तिथेच ऐकल्या .
सहा-सात महिने काम केलं आणि सोडून दिलं पण , मला कांही मटका खेळायची संवय लागली नाही मटका लावावा असं एकदाही वाटलं नाही !
( पूर्वी कोणत्या तरी मजकुरात हा उल्लेख आलेला आहे ! )
# मित्रवर्य शाहू पाटोळेच्या भाषेत सांगायचं तर #आठवणींचा_खकाना
……………………………………..
–धर्मेंद्र जोरे, राजकीय संपादक, मिड-डे, मुंबई
ओपन अँड क्लोज
****************
पोस्ट ऑफिस तर दिवसभर काम करतंय तरीही रात्रीच्या समयी या विशिष्ट वेळी काही लोक तेथे कशाला गर्दी करतात, हा मला पडलेला बालसुलभ प्रश्न अधिक माहिती घेतल्यावर सुटला.
त्यानंतर अनेक वर्षांनी संघटित गुन्हेगारी अप्रतिम काम कसे करते याचा खुद्द अनुभव घेतला तेव्हा डोक्यात आणखी प्रकाश पडला. त्यावेळी (35-40 वर्षे आधी) अनेक व्यक्तींना ‘रतन खत्री’ का म्हणायचे याचाही उलगडा झाला (तसं त्यावेळी विचारल्या वर सांगितलं गेलं होतच म्हणा. ही माझी त्यावेळची शोध पत्रकारिता म्हणा).
हाच डॉन रतन खत्री काल नेहमीसाठी ‘क्लोज’ झाला आणि सगळे आठवले. त्याची ‘लेगसी’ मात्र अजूनही ‘ओपन’ आहे. मटका किंग खत्री आणि त्याने निर्माण केलेला जुगार खेळ अनेक जीवनाचा खेळ करून गेला तर काही लोकांना ‘गब्बर’ सुद्धा करून गेला.
जीवाचा आटापिटा करणारी ‘ही’ मंडळीच आमच्या पोस्ट ऑफिसला गर्दी करून असायची रात्री. ते दोन टप्प्यात यायचे. ओपन आणि क्लोज साठी. आता हे काय? पोस्ट ऑफिसला टेलिफोन नी माहिती यायची … आजचा आकडा हा… आमच्या मंगरुळात त्यावेळी फार कमी घरी फोन होते. ते ‘खुपसा खुपसी’ एक्सचेंज डब्बा 12 फोन साठीच होते. नंतर इलेक्ट्रॉनिक झाले आणि बरेच जास्त फोन आले. आता तेही गेले… मोबाईल आले.
हवसे, नवसे, गवसे आणि नेहमीची पांढरपेशी व्यक्ती सुद्धा दिसायची त्या गर्दीत. आकडा फुटला की गर्दी ही फुटायची. काही खुश काही नाखूश… त्यात ‘देसाडपंथी’ असले तर मस्त रंगीन, मनोरंजक सिन व्हायचे… जिंकला किंवा हरला काय…
या गर्दी बाहेर माझा एक स्कुल सिनिअर पण असायचा. तो सांगायचा की नंबर लावावा लागतो. पण कसा? त्याने मला गावातले सगळे अड्डे दाखविले.
पुढे ‘चिठ्ठी’ लिहिणारा एक माणूस सगळ्या गोष्टी समजवून देण्याइतका दोस्त झाला. हा चिठ्ठीवाला प्रकार मी चवथीला धामणगाव ला असतात पाहिला होता. पण काय ते पूर्ण कळले नव्हते. दारूच्या दुकानाच्या आडोशाला बसून एक व्यक्ती पैसे घेऊन चिठ्ठी वर काहीतरी लिहून द्यायची.
दोस्ताच्या माहितीप्रमाणे ही चिठ्ठी आकडा लावणाऱ्यासाठी जिंकला तर पैसे मिळविण्याची ग्यारंटी असे. प्रमाण ठरले असे किती लावले तर किती मिळतील. मेंढी, एक्का, दुरी वगैरे वगैरे.
खत्री साहेब रात्री नंबर काढायचे (धर्मात्मा सिनेमातला प्रेमनाथ चा सिन आठवा. गॉडफादर चा भारतीय प्रकार. प्रेमनाथ पत्ता काढतो आणि दाखवतो. दुसऱ्या बिल्डिंगला दुर्बीण लावून तो बघितल्या जातो आणि ताबडतोड फोन द्वारे संपूर्ण देशात पसरवला जातो).
ट्रँक काल च्या जमान्यात ही खत्रीचा ओपन आणि क्लोज काही मिनिटात देशभर पसरे. जेथे पहिला फोन येणार तेथे गर्दी होई.
ह्या मटक्याच्या प्रकारासोबत इतर ही प्रकार त्यावेळी चालत. कुणी क्लब चालवे ज्यात जुगार खेळला जाई. पोलिस धाडी टाकत आणि पुन्हा नव्या जोमाने जुगार सुरू होई. जागा न बदलता.
ओपन आणि क्लोज मात्र अति सुरक्षित मानला जाई. आकडा लिहिण्यासाठी निश्चित जागा असे (मान्यता प्राप्त… मान्यता कुणाची हे सांगणे नको). मित्रांच्या सांगण्यानुसार जिंकलेले पैसे ही इमानदारीने दिले जात. फसवाफसवी नसे.
आणि हो, आकडा लावण्याचे अंकगणित, समीकरणं असत. काही लोक डेटा क्रांचिंग (आता कळले ते त्यावेळी सुद्धा करत), काही स्वयंप्रेरणेने चालत. काही तर सिंगमन फ्राईड चे बाप असत. रात्री (पहाटेच उत्तम) पडलेलं स्वप्न (स्वतःला, मुलाला, बायकोला वा मित्राला) आकड्यात रूपांतर करीत. ज्यांची स्वप्न ‘खत्री ला खात्रीलायक हरवू शकतात’ अश्या लोकांची फार डिमांड असे. पुढे सायकॉलॉजी शिकतांना आणि फ्राईड चे इंटरप्रेतेशन ऑफ ड्रीम्स शिकतांना या ‘एक्सपर्ट’ ची नेमकी आठवण यायची.
अवलिया, बाबा (भोंदू) यांचे मागे खत्री-प्रेमी आकड्या साठी काही ‘हिंट’ मिळते का बघत असत.
खत्री कधी बंद झाला माहीत नाही. पण जुगाराचे स्वरूप बदलले. लॉटरी तत्सम प्रकार आलेत आता. मटका सुरू आहेच.
सध्या कोरोना बंदिवासात माफिया/संघटित गुन्हेगारी वर सिनेमा आणि सिरिज बघतोय. रतन खत्रीच मटका नेटवर्क आणि संघटन कसं चालत असावं याची मांडणी कशी असेल याचा अंदाज येतो.
………………………….
अविनाश दुधे, संपादक, मीडिया वॉच पब्लिकेशन
२०१६ ला एका दैनिकाचा संपादक असताना एके दिवशी सकाळी ऑफिसला पोहचत नाही तोच औरंगाबादहून संचालकांचा फोन आला. ‘अहो, तुम्हाला कळत कसं नाही, कसल्या बातम्या छापता. अशाने कठीण जाईल आपल्याला.’
मला काहीच कळेना. कुठली बातमी? काय भानगड झाली नेमकी? मी म्हटलं ‘कशाबद्दल, कोणत्या बातमीबाबत बोलताय तुम्ही?’
ते म्हणाले, ‘अहो, ती मटक्याची बातमी…तुम्ही ती पाहिली नव्हती का?’
अमुक एका शहरात खुलेआम मटका सुरू आहे अशी बातमी तेथील वार्ताहराने पाठवली होती.
मी म्हटलं, ‘सर, ती बातमी खरी आहे. प्रॉब्लेम काय आहे?’
ते काहीसे चिडून मला म्हणाले, ‘ तुम्हाला कळत कसं नाही. मटक्याच्या बातम्या आपण छापत नाही. तुम्ही स्वतः जरा वैयक्तिक लक्ष देत चला. अशा बातम्या येणार नाही, याची काळजी घेत चला.’
मी त्यावर वाद घातला. ‘हे योग्य नाही, असे त्यांना सांगितले. वर्तमानपत्रांनी सामाजिक बांधिलकी वगैरे जपली पाहिजे,’ असे बोललो.
त्यानंतर त्यांनी टोन बदलला. पुढे जवळपास अर्धा तास त्यांनी ‘मटका’ आणि मटक्याचं वर्तमानपत्राच्या अर्थकारणातील महत्व या विषयावर माझा ‘क्लास’ घेतला. महाराष्ट्रातील काही सन्माननीय अपवाद वगळता ८० टक्के वर्तमानपत्रात हेच चालतं हे सांगायलाही ते विसरले नाही.
त्यांनी फोन ठेवला तेव्हा २० वर्षाच्या पत्रकारितेत मला जे ज्ञान प्राप्त झालं नव्हतं ते एका फोनवर मिळाल्याने मी धन्य झालो होतो.
पुढे काही महिन्यांनी अशाच एका अडचणीच्या विषयात हात घातल्याने त्यांनी माझा ‘सन्मानपूर्वक’ राजीनामा घेतला.
ती आठवण पुन्हा कधीतरी.
………………………
-वरली मटक्याच्या कथेतलं मिसिंग पात्र
#वरली_मटका #रतन_खत्री या निमित्ताने आज सोशल मीडियावर अनेक पोस्ट वाचायला मिळत आहेत. ज्यांचा ग्रामीण अथवा शहरी गरीब-मध्यमवर्गीय लोकजीवनाशी संबंध आला आहे, त्यांना ‘मटका’ माहीत नाही, असं होऊ शकत नाही.
अनेकांनी मटक्याबाबत नॉस्टॅलजिक होत लिहिलं आहे, वाचून मजा आली. एरवी, मटका जुगार याबाबत बोलणं हे भद्र समाजाला शोभणारे नाही, असाच समज असल्यामुळे कधी हा विषय वाचनात आला नाही. असो…
पण, मटक्यासंदर्भात एक महत्वाचं ‘टॉपिक’ मिसिंग आहे, असं वाटतं.
प्रत्येक खेड्यात एक म्हातारी किंवा म्हातारं असं असतं की त्यांना उद्या कोणता मटका येणार आहे, याचं स्वप्न पडत असतं. या अशा जुन्या खोडाला गावात जबरदस्त डिमांड असते. दिवसभर मारोतीचा पार आणि झाडाचे ओटे राखणाऱ्या अनेक पोराटोरांचे हे मसीहा असतात. बुढ्यांनं रात्री स्वप्न पाहावं आणि सकाळीच आपल्याला सांगावं म्हणून हे पोरं त्यांच्या मागावर असतात.
सकाळीच तांब्या भरून म्हातारं नाल्याकाठी डबापार्टीला निघालं की मटकाबहाद्दर गँगमधला कुणीतरी त्याला गाठतो.. ‘काय म्हणतं आबा.. काय येते आज?’ असं थेट विचारून विषयाला हात घालतो. इकडे म्हाताऱ्याचा विषय हातघाईवर आलेला आहे, यांचंही त्यांना काही देणंघेणं नसतं.
अशीच एखादी म्हातारी सकाळी नळावर पाणी भरायला निघाली की तिला सकाळी जो मानसन्मान मिळतो, तो ‘ओपन’ची फिगर खोटी निघाल्यावर दिवसभर मग कधीच मिळत नाही. ‘बुढे, बरोबर पाहत जा न वं स्वप्न.. एक पाह्यते अन भलतंच सांगते’ तुह्या म्हणल्यानं ओपनले नैला (म्हणजे 9) लावला अन माही लागवड डुबली,” असा आरोपही या जुन्या खोडांना सहन करावा लागतो.
पण, या म्हाताऱ्याच्या स्वप्नांचा ‘सक्सेस रेट’ जबरदस्त असतो. हा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ मटकाबहाद्दर लोकांच्या तोंडपाठ असल्यामुळे त्यांच्यासोबत फार पंगा घेणं परवडणारे नसते. नाहीतर दुसऱ्या दिवशी म्हातारं काही केल्या सांगत नाही की रात्री स्वप्नात काय पाहिलं!
स्वप्नात दिसलेल्या गोष्टीना ‘डीकोड’ करणं हे गावातल्या काही खास लोकांची स्पेशालिटी असते. म्हाताऱ्यानं सांगितलेलं स्वप्न घेऊन त्यांच्याकडे गेलं की मग ते सांगतात… “स्वप्नात बुढ्याले साप दिसला म्हणते… म्हणजे सापाचे झाले 7… साप एकटाच होता, म्हणजे ‘सत्या’ची जुट नाही येत…म्हणजे ओपनले सत्ता लावला तर जमते भजन…”.
अशाच पध्दतीने बैलजोडी दिसली तर आज जुट फसते असा अंदाज लावून कोणत्या दोन आकड्यांची जुट लावायची, याचा निर्णय घेण्यासाठी पुन्हा कडूनिंबाच्या झाडाखाली शिखर परिषद भरते.
अशाच पद्धतीनं, स्वप्नात दिसलेल्या गोष्टींचा अर्थ लावला जातो. उदाहरणार्थ, साप दिसला तर 7, मुंगूस दिसलं तर चवरी (4), बाई दिसली तर दैला (10), जिवंत माणूस दिसला तर एक्का (1), मुर्दा म्हणजे प्रेत दिसलं तर 7 *5 ही जुट पक्की असते. हिजडा दिसला तर 6, आणि अविवाहित तरुण मुलगी दिसली तर नैला म्हणजे 9 पक्का असतो. कारण, मुलगी अविवाहित आहे.. म्हणजे तिला नवरा नाही.. म्हणजे तिला आता नवरदेव मिळेल..म्हणून नवरदेवाची 9..!!! अशी ही स्वप्नातली आकडेवारी असते.
भाषा जशी दर कोसावर बदलते म्हणतात, तसेच हे स्वप्नाचे अर्थ, Interpretation of Dreams दर कोसाने बदलत जातात. अर्थ जरी बदलले तरी असं स्वप्न पाहून आज कोणता वरली-कल्याण येणार आहे, याचं मार्गदर्शन करून अर्थार्जनाची सोय लावणारे पुण्यात्मे प्रत्येक गावात असतात.
स्वप्न पाहून आज कोणता आकडा फसणार आहे, हे सांगणारे जसे असतात… तसेच दर तालुक्याला किमान एक तरी महाराज असतो..जो आकडा देत असतो. त्याच्या दरवाजावर जबर गर्दी. काही काही महाराजांचे आज मोठमोठे संस्थान त्यांनी दिलेल्या मटक्याच्या भरवशावर गब्बर झालेल्या लोकांनी उभारले आहेत.
एखाद्या राजकीय नेत्याला जितके कट्टर भक्त लाभतात, तसेच किंवा त्याहून जास्त कट्टर भक्त या बाबांचे असतात. फरक फक्त इतकाच की या बाबांच्या भक्तांना स्वतःची अक्कल असते. बाबाने दिलेले आकडे जर सतत खोटे ठरले तर हे भक्त बाबा बदलतात. पुन्हा त्याचं तोंड नाही पाहत. राजकारणातला बाबा या बाबतीत नशीबवान असतो. त्याचा भक्त त्याला कधी सोडत नाही… असो !!
सामान्यपणे असा बाबा-महाराज हा एखादा मतिमंद मुलगा असतो. आपण काहीही विचारलं तरी तो डोळे-तोंड वाकडं करून हे हे करत हातवारे करतो. आपल्याला त्यात काही समजत नाही. पण पट्टीचा पट्टी लावणारा (म्हणजे मटका) असला की त्याला समजून जातं की बाबाने फिगर दिली आहे. बाबाने दोन वेळा आपल्याला शिव्या दिल्या आणि एक वेळ पाठीवर झोडपा दिला..म्हणजे ओपनला डुर्री आणि क्लोजला तीर्री पक्की समजली जाते.
बस स्टँडवर दिवसभर दुसऱ्याच्या तंबाखाच्या भरवशावर आपली चिलम गरम ठेवणारा पिकल्या केसाचा चलाख बुडा, बाजार ओळीतल्या टिनपत्र्याच्या हॉटेलात दिवसभर विहिरीवरून पाणी भरणारा हड्डी पैलवान, गावाच्या बाहेर अंधारात पडक्या मंदिरात झाडपुस करणारा चपटी लावणारा माणूस यांना या बाबा-महाराजांच्या धंद्यात चांगलाच स्कोप असतो. जनरली, पुढं हेच लोक्स बाबा म्हणून प्रसिद्ध होतात. यातले बरेच बाबा हे विदेही-विक्षिप्त किंवा आठ आणे हरवलेले असतात.
मटक्याच्या क्षेत्रात फक्त नशीब चालतं, अस तुम्हाला वाटत असेल तर तुमची ही अंधश्रद्धा आहे. लोकशाहीच्या चतुर्थ स्तंभ यातील अपडेट पोहचवत असतो. शिवाय वरली, कल्याण, राजधानी अशा सर्व आकड्यांची पुस्तकं मिळतात. History repeat itself यावर विश्वास असणारे अनेक लोक ही पुस्तक घेऊन अभ्यास करतात, उद्या येणारी फिगर लावतात.
‘सरकारे आती है, जाती है… लेकीन मटका कायम रहता है’ या तत्वाने हा धंदा अजून तरी मंदीच्या फेऱ्यात सापडला नाही. एकदाच, युतीचं पहिल्यांदा सरकार आलं तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींनी मटका बंद केला होता… आता लॉकडाऊन मध्ये दारू बंद झाल्यावर जेवढे शिव्या-श्राप सरकारने घेतले नसतील, त्यापेक्षा जास्त तळतळाट मटकाबहाद्दरांचा झाला होता. मी माझ्या आयुष्यात ग्रामीण अर्थव्यवस्था इतकी हाललेली पहिल्यांदा अनुभवले होते.
गावखेड्यातल्या अनेकांची आठवडी बाजाराची आणि संध्याकाळी मोहाची सोय लावणाऱ्या या मटक्याने अनेक घरही उध्वस्त केले आहेत. ती याची वास्तविकता आहे. गाव सोडून वीस वर्षे झालीत, पण आज रतन खत्रीने या सर्वांची आठवण करून दिली. मोठा इंटरेस्टिंग विषय आहे.
तर आज जर एखादं स्वप्न दिसलं, तर उद्या सकाळी कुणाला तरी सांगत चला… कोरोनामुळे नोकरी गेलीच तर बाबा-महाराज म्हणून ओले नारळ, सवा रुपयाचा पेढा आणि एक बिडी बंडल इतकी तुमची कमाई पक्की आहे….!!!
……………………………………..
–गजानन घोंगडे, नामवंत व्यंगचित्रकार, कॉलिग्राफर, अकोला
व्यंगचित्रकार आणि मटका !
बरेच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी ज्या पेपरला व्यंगचित्रे देत होतो तो पेपर आणि मी दोघेही फार्मात होतो.
एकदा बायको सोबत खरेदीसाठी गेलो. बायको दुकानात साड्या बघत होती. मी दुकानदाराशी गप्पा मारत होतो. गप्पा मारता मारता त्याला कळलं की मी व्यंगचित्रकार आहे. हे माहीत झाल्यावर त्याने मला विचारलं की,
‘व्यंगचित्र काढायचं कुठलं गणित असतं का’ ?
मला त्याचा प्रश्न कळला नाही मी विचारलं, म्हणजे ?
‘जैसे…कुछ कॅलक्युलेशन रहता क्या… आपका कार्टून निकालने के पीछे ?’
मला तरीही समजलं नाही. मी त्याला विचारलं, ‘नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे ?’
तो म्हणाला, ‘तुम्ही नेमकं कसं काढता ? त्याच्यामागे काय विचार असतो ?’
मी त्याला, त्याच्या बुद्धीला झेपेल अशा पद्धतीने व्यंगचित्र आणि ते काढण्याची प्रोसेस वगैरे गोष्टी समजावून सांगितल्या. ते सगळं ऐकल्यावर तो म्हणे,
‘मै आपको इसलिये पूछ रहा था क्यो की सवेरे – सवेरे मेरे दुकान के सामने कुछ वर्ली बहाद्दर बैठते और वो लोग आपके कार्टून से आंकड़ा निकालते, उनका रोज का यह कार्यक्रम है । पेपर देखा की पहले आप का कार्टून देखना, उस पर आंकड़ा निकालना और वह आंकड़ा लगाना. आप कार्टून में जो लाइन्स ड्रॉ करते उन लाइन का कॅलक्युलेशन लगाकर उन लोग आंकड़ा निकालते है. इसलिए मैंने आपसे पूछा की कार्टून निकालने में कुछ गणित रहता क्या? ताकी आंकड़ा निकालने वालों को उसका गुणा भाग करके आंकड़ा मिल सके ।…’
मी त्याच्या तोंडाकडे बघतच राहिलो. माझा वासलेला आ बराच वेळ तसाच राहिला….
आपल्या व्यंगचित्रातून आकडा निघू शकतो आणि वरलीवाले आपल्याला मिळणाऱ्या मानधना ₹पेक्षा जास्त पैसे आपल्या व्यंगचित्रावरून आकडा काढून कमवतात या गोष्टीमुळे मला अपार खिन्नता आली.
त्याचवेळी एक विचार असा मनात चमकला, की सालं आपण आकडा लावणं शिकून घ्यायचं का ? म्हणजे आपल्या व्यंगचित्रातून आपणच आकडा काढायचा आणि मानधनाव्यतिरिक्त कमाई करायची…
थोड्यावेळाने तो दुकानदार मला म्हणे, ‘अभी अगर मैंने उनमें से दो चार लोगों को बुलाकर यह बताया कि वह कार्टून निकालने वाला आदमी यही है तो वह आपके पैर पड़ेंगे, आपके हाथ चुमेंगे !’
वृत्तपत्रांचा व व्यंगचित्रांचा अभिजात चोखंदळ ई. ई. वाचक वर्ग सोडला तर भलत्याच लोकांना अनुयायी म्हणून स्वीकारण्याची माझी तयारी नसल्यामुळे मी त्याला नम्रपणे नकार दिला.
ही गोष्ट काही दिवसांनी मी विसरलो. दोन-तीन वर्षांनी अचानक मला एक फोन आला,
‘गजानन घोंगडे आहेत का ?’ मी हो म्हटल्यावर त्याने त्याची ओळख करून दिली आणि आपण चंद्रपूरवरून बोलतो असे त्याने सांगितले. ‘तुम्ही हे जे व्यंगचित्र वृत्तपत्रात प्रकाशित करता त्याऐवजी ते थेट मला पाठवून देत जा, त्यासाठी तुम्हाला वृत्तपत्र जेवढे मानधन मिळते त्याच्यापेक्षा पाच-दहापट जास्त मानधन द्यायला पण तयार आहे’, हेही नमूद केले.
मी त्याला नम्रपणे नकार दिला म्हणालो, ‘अशा कामांसाठी मी व्यंगचित्र काढत नाही आणि असे करणे मला शक्य नाही.’
मग तो म्हणाला, ‘तुम्ही एक काम करा, ते आकड्यांचे गणित मला सांगून द्या.’
त्यावर मी त्याला म्हटलं, ‘अहो, असे काही गणितं नसतात, रोज जे जसं सुचतं तसं मी काढतो.’ त्यावर तो म्हणाला, ‘असं शक्यच नाही ! काहीतरी गणित नक्कीच असलं पाहिजे ! ज्या अर्थी मी रोज तुमच्या व्यंगचित्रावरून आकडा लावून पैसे कमावतो त्याअर्थी तुम्हाला त्याच्यातलं सखोल ज्ञान असले पाहिजे. तेव्हा दोनपैकी एक काहीतरी तुम्ही करा एक तर व्यंगचित्र मला पाठवा किंवा ते गणित तरी शिकवा.’
कसातरी तो फोन मी कापला आणि कामाला लागलो. त्यानंतर त्याने पाच-सहा वेळा मला फोन केला आणि दर वेळेस मागणी एकच. ‘आकडा पाठवा किंवा कला शिकवा !’ अखेर पोलिसांमध्ये तक्रार करेन या धमकीनंतर त्याचे फोन येणे बंद झाले.
आज रतन खत्रीच्या मृत्यूची बातमी वाचल्यानंतर अनेकांनी जे अनुभव लिहिले त्यामुळे मलाही ह्या गोष्टी आठवल्या आणि थोड्या वेळासाठी वाटून गेलं, गजाननराव, व्यंगचित्र काढण्याबरोबरच आकडा काढायलाही शिकून घेतले असते हे तर चार पैसे जास्त कमावले असते…!
–सुनील यावलीकर, नामवंत चित्रकार व कवी
वरलीचे झोडपे
१९७७साल.सातवीत होतो .घरी वर्तमानपत्राची एजंसी होती.त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वी एस टी स्टँडवर पेपरचे गठ्ठे उतरवणे,गावात पेपर वाटणे आदी कामे करायचो.
वर्गात जगदेव नावाचा मित्र होता.त्याने वरली लावण्याबद्दल सांगीतले..तो नेहमीच लावायचा.मला वडिलांची भिती वाटत होती.त्यांना कळले तर..
जगदेवने रात्री काही स्वप्न पडले का म्हणून विचारले..मी त्याला सांगीतलं, ‘स्वप्नात तीन माणसं आली आणि त्यांनी मला नऊ रुपये दिले असं दिसलं.’तो म्हणाला,’लाव मं तीनले नऊ.’२०पैसे लावले तीनले नऊवर..दुसर्यादिवशी तोच आकडा आला..साडेबारा रुपये मिळाले.त्यातून जगदेव सोबत दोन दोन मिसळी खाल्ल्या..
त्याने अजून नवीन स्वप्नाबद्दल विचारले.दिपक नावाच्या वर्गमित्राला पडलं होतं..स्वप्न..दोन माणसं एका मेलेल्या माणसाला घेऊन जात आहे असं..जगदेवचा चेहरा उजळला..दोन ले दहा..
हा ही आकडा आला..
माझी प्रसिद्धी वरली प्रेमी लोकात झाली.जो तो आकडा विचारू लागला.मी काही बाही सांगीतले.आश्चर्य म्हणजे तोही आकडा आला.हॅटट्रीक झाली.
लोकांचा गराडा वाढला काही सुचत नव्हते.
वडिलांना कसे कळले माहित नाही.त्यांनी सकाळी मला उठवून विचारलं.मला काही बोलताच येईना..आता जर वरली लावली..कोणाला काही सांगीतलं तर याद राख…असं म्हणून चांगलच झोडलं.
त्यानंतर डोक्यातून वरली गेली ती गेलीच…
#सुनील यावलीकर
मस्त!