नागपूरला मैत्री नावाची एक संस्था आहे . शुभदा फडणवीस , डॉ. अविनाश रोडे , हेमंत काळीकर वगैरे उत्साही मंडळी काही प्रबोधनाचे तर काही गंभीर उपक्रम राबवणारी ही संस्था चालवितात . पुरोगामी डाव्या विचारांच्या लोकांचे त्यांना कायमच आकर्षण असायचं . एकदा गप्पा मारताना कोणत्यातरी निमित्तानं पुष्पाताई भावे , कुमार केतकर , भास्कर लक्ष्मण भोळे या तिघांना एकाच व्यासपीठावर आणण्याची कल्पना शुभदानं मांडली . या तिघांना एकत्र आणणं किमान माझ्यासाठी तरी मुळीच कठीण नव्हतं कारण या तिघांशीही असणारे समान विचारी संबंध . हवं होतं ते निमित्त . तेही लवकरच मिळालं . ‘लोकसत्ता’तील माझा स्तंभ ‘डायरी’ची प्रथम आवृत्ती ग्रंथाली या वाचक चळवळीतर्फे प्रकाशित झाली . ( आता पुढची सुधारित आवृत्ती पुण्याच्या देशमुख आणि कंपनीनं देखण्या रुपात प्रकाशित केली आहे . ) मुंबईत प्रकाशनाचा मोठा कार्यक्रम झाला . नागपुरातही प्रकाशन करु आणि या तिघांना एकत्र आणू असं मी सुचवलं . शुभदा – अविनाश – हेमंतनी ते मान्य केलं . त्याच म्हणजे सप्टेंबर महिन्यात एका संपादकीय बैठकीसाठी आमचे संपादक कुमार केतकर नागपूरला येणार होते . संपादकीय बैठकीच्या दुस-या दिवशी नेमका रविवार होता .