अरण्यऋषींचे ‘ स्थलांतर’..!

रघुनाथ पांडे

काल शनिवारचा दिवस संपूच नये, असं वाटत होतं. सूर्य मावळतीला येऊ नये असंही मनोमन वाटत होतं. मी पश्चिमेला असलेल्या खिडकीतून त्यांच्या मागे प्रभावळ निर्माण करणाऱ्या सूर्याला सारखा सांगत होतो. ऑक्टोबरच्या या वातावरणात भयंकर उष्मा आणि घामेजून टाकणारी आर्द्रता होती. सायंकाळी शिडकावा नक्की येईल असं आशुतोष म्हणालाही.. माझं लक्ष पिंगटतांबूस होणाऱ्या खिडकीबाहेरील कलत्या सूर्याकडे होते. जमिनीवर पसरलेल्या गालिच्यावरील सूर्यछाया पसरट होत होती..हे क्षण घुसमट आणखी आणखी वाढवत होते.


शेवटी सूर्य कलला…पश्चिमेचा गारवाराही नव्हता. सोफ्यावर बसलेल्या अरण्यऋषींनी चेहरा पुसला. चेहऱ्यावर पारदर्शी शिल्ड चढवले.. म्हणाले, ” निघू या…!”

.. या शब्दांसरशी दिवसभर हसऱ्याबुजऱ्या, गप्पाष्टक चाललेल्या, अरण्यातील अनेक रहस्य उलगडलेल्या, खेळीमेळीच्या वातावरणाचा साक्षीदार असलेल्या त्या दिमाखदार दिवाणखान्यात शांतता पसरली.

सगळे या रे, आजोबांना नमस्कार करा..! आशुतोषच्या या सुचनेने घरातील खोल्यांमधून एकापाठोपाठ तीन लहानगे.. लगोलग विजयाकाकू, मनीषावहिनी दिवाणखान्यात आले. सोफ्याच्या एका बाजूला हाताच्या तळव्याचा दाब देत अरण्यऋषी उठले. हातात काठी घेतली…समोरचा टीपॉय हळुवार ओलांडून दाराकडे निघाले. त्यांचे पाय तसे जड झाल्याचे सगळ्यांनीच पाहिले. तेसुद्धा स्वतः ला धीर देत होते. अर्धा गालिचा मागे टाकून ते पुढे येताच तिथे असलेले सगळेच एकेक करत पाया पडायला लागले. आशुतोषने अरण्यऋषींचे पाय घट्ट हाती धरले.. आणि लगोलग पायावर माथा टेकवला..आशुतोष खूप भावूक झाला होता..तसेच सारेच. सगळ्यांनीच मग त्याच पद्धतीने नमस्कार केला.. विजयाकाकूंनी तोच कित्ता गिरवला. तेव्हा, अरण्यऋषींही गहिवरले. शक्य झाले तेवढे वाकत त्यांनी चेहऱ्यासमोरचे शिल्ड बाजूला करून पाणावलेले डोळे हलकेच पुसून म्हणाले, ” हे घर सरस्वतीचे आहे. माझा तुम्हाला नमस्कार..”

माझ्याकडे बघून विजयाकाकू म्हणाल्या,” पायाला मस्तक टेकवून नमस्कार करण्याची ही रीत आमच्या ह्यांची. त्यांचे वडील, कीर्तनकेसरीही असाच नमस्कार करायचे..मग परंपरा झाली..पोरगा,नात,नातू आम्ही सगळेच तेच करतो..”

अरण्यऋषी दरवाज्याकडे निघाले. पाठोपाठ सारेच. काही पुस्तके, शाल, गुच्छ, भेटवस्तू आशुतोषने धरल्या. अरण्यऋषींचा डावा दंड हाती धरून अनिल गडेकर यांनी त्यांना कारपर्यंत नेले. काठीच्या संकेतांनी अरण्यऋषी एक एक पाऊल टाकत होते. आशुतोषने कारचा दरवाजा उघडला… ते आत बसले. साऱ्यांना पुन्हा हसरे अभिवादन करून अरण्यऋषींनी काँक्रिटच्या रस्त्याकडे कूच केले. याच मार्गवर पुढे अंबाझरी उद्यान आहे. त्यालाही याच अरण्यऋषींचे नाव आहे.

नागपूरच्या अंबाझरी मार्गावरील हे स्थळ होते, प्रसिद्ध साहित्यिक स्व. राम शेवाळकर यांचे निवासस्थान. आशुतोष शेवाळकर खूप वेळ त्यांना अभिवादनाचा प्रतिसाद देत होता…

अरण्यऋषींनी नागपूर सोडले..रविवारी विदर्भही सोडतील. त्यांचे सोलापूरला ‘ स्थलांतर’ झाले.

नव्वदीचे अरण्यऋषी आता अरण्यात जाणार नाहीत. त्यांच्या ४५ वर्षांच्या दैनंदिनी पुन्हा तपासून जमेल तेवढे लेखन करतील..

मारुती चितमपल्ली..वय ९०.

छातीपर्यंत रुळणारी दाढी. उंच कपाळ. मागे सारलेले वळणदार केस. चेहरा विलक्षण तेजस्वी.. बघताक्षणीच तेज:पुंज ऋषी दिसावेत. आपुलकीने खळाळून हसणार…कधी मंदस्मित…कधीकधी गालातल्या गालात. आजही असेच होते सगळे. सूर्य तेवढा दगा देत होता. मध्यान्ही ते दिसले त्या क्षणापासून सूर्य आज मावळू नये,असे वाटत होते. तो मावळणार आणि अरण्यऋषी गावाच्या ओढीने स्थलांतर करणार.. हे ठरले होते. मागील ४५ वर्षे विदर्भाच्या नवेगाव बांध, नागझिरा, मेळघाटच्या किर्रर्र अरण्याला त्यांनी घर केले. म्हणूनच ते अरण्यऋषी झाले..! एका लेखात त्यांचे वर्णन करताना अतुल पेठकर या पत्रकारमित्राने त्यांना अरण्यऋषी लिहिले..आणि नव्या बिरुदासह मारुती चितमपल्लींचा प्रवास सुरु झाला. अतुल त्यांच्या भेटीला आज आला, तेव्हा अरण्यऋषींसमोरच त्यांच्या या नावाचाही खुलासा झाला..विदर्भाने मला ओळख दिली. समृद्ध, संपन्न, निरोगी आयुष्य दिले, हे त्याचवेळी अरण्यऋषी म्हणाले.

एक एक टप्पा पार होत होता. तसतशा विदर्भाच्या आठवणी अरण्यापेक्षाही अधिक गर्द होत होत्या. डोळ्यांना कमीअधिक ताणवत चितमपल्ली आयुष्याच्या पटावरील जगणे कसे समृद्ध आहे, ते उलगडत होते.

या क्षणी काय काय आठवू ? असा उलटा प्रश्न करुन मारुती चितमपल्ली एक एक आठव सांगू लागले. ते खूपसे हळवे, खुप सारे वैयक्तिक…कैक सामाजिक.

अरण्याशी नाते जुळले की माणूस किती पारदर्शी, नितळ आणि देखणा होतो, ते त्यांचा एकेक शब्द सांगत होता. गुंता नव्हताच कुठे…निसर्ग आणि उत्फुल्ल मन. मोकळे आकाश आणि फक्त गुंजन.

झरझर पाणी, धबधबे आणि अरण्य जगण्याचा अनुभव. आवाजात कंप नाही की, द्विरुक्तीची काही स्थिती.

अरण्य माणसाला माणूस होणं शिकवतं… या वाक्याने आमच्यातील संवादाची रुजुता सांधली. ” हा काय, अरण्यात फिरणारा याला कोणी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष करणार,अशी भाषा वापरली गेली. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होणे, हे कधी विचारात नव्हते माझ्या. पण झालो. विदर्भाचे पांग कसे फेडू? “

विदर्भाच्या जंगलात निव्वळ फिरलो नाही. अरण्याची,प्राण्यांची,आदिवासींची भाषा शिकलो. त्यांच्यासोबत राहिलो. संवाद साधला. अरण्याचे एक लाख शब्द मी मराठीला दिले. इंग्लिशमध्ये खूप शब्द आहेत, मराठीत नव्हते. ते विदर्भातील फिरस्तीने शिकलो. अरण्याने शिकवले.

पक्षी कोश प्रसिध्द झाला. वृक्षकोष तयार झाला. मत्स्य कोष सुरू आहे. नवेगाव बांधच्या भागातील तलावांनी पक्षी, नागझिऱ्याच्या जंगलाने प्राणी आणि मेळघाटच्या अरण्याने वाघ समजू शकलो.

४५ वर्षे रोज डायरी लिहीत होतो. डायरी लिहिली नाही, त्यादिवशी जेवण नाही,असा क्रम होता. व्यक्ती, प्राणी, निसर्ग त्याचे बारकावे डायरीमुळे सापडू शकले. ही सवय ग्रंथ लिहायला कामी आली.आत्मचरित्र यामुळेच सोपे गेले लिहायला. माझी सर्व पुस्तके अगदी पहाटवाऱ्याला लिहून झाली. पहाटे तीन ते सकाळी आठ या पाच तासांत लेखन केले. मग दिवसभर नोकरी. आई वडिलांचे आभारच मानतो, त्यांनी मला जे वाटते ते शिक, आम्ही सोबत आहोत,असे सांगून शिकवले. आज हे सगळे आठवते, कारण त्यांच्यामुळे घडू शकलो.

मागच्यावर्षी नोव्हेंबरात पुण्यात हॉस्पिटलमध्ये होतो. तेव्हा आजारपणात डोक्यात घुमू लागले,की घरी, नातेवाईकांमध्ये जावे. वृद्धापकाळात ते कामी पडतील. पैसे मोजूनही शुश्रुशा होतेच असे नाही. याच विवंचनेत आता सोलापूरला जावे असे वाटू लागले. पुतण्या आहे. काही नातेवाईक आहेत. म्हणून विदर्भ सोडायचा निर्णय घेतला..हे सांगताना त्यांचे शब्द कातर झाले होते.

नवी पिढी निसर्गाशी एकरूप होत नाही. आपला वारसदार कोणीच नाही. निसर्ग आणि पक्षीसंस्था हीच माझी वारसदारी…

चितमपल्ली बोलत होते. पक्षी हाच माझा वारसदार. मला वाटते, चितमपल्ली विदर्भातून जात नाही आहेत…त्यांचे पक्षी करतात तसे ‘ स्थलांतर’ आहे.

निरोपापूर्वी अरण्यऋषींचे हितगुज-नक्की पाहा

Posted by Anil Gadekar on Saturday, October 10, 2020

 
-लेखक दैनिक ‘पुण्यनगरी’च्या विदर्भ आवृत्तीचे संपादक आहेत.
९८१८२१३५१५

Previous articleपुष्पाताई नसणं म्हणजे…
Next articleTRP! TRP!! TRP!!!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here