(साभार : दैनिक ‘महाराष्ट्र दिनमान’)
-मिथिला सुभाष
पडदा उजळतो.. खूप वर्षापूर्वीचं बंगालचं वातावरण. एक छोटंसं गाव. त्या गावातल्या नदीवरचा घाट. पाणी, पाऊस आणि निसर्ग..!! घाटावरच्या एका भिंतीवर काळेभोर, दाट केस मोकळे सोडून, पोटरीपर्यंत पोचणारी धुवट बंगाली साडी नेसलेली, मोठ्ठ्या डोळ्यांची एक गुटगुटीत, गव्हाळ, सुंदर किशोरी पाय हलवत बसलीये. तिच्या अवतीभवती चारपाच लहान पोरांचा घोळका. टवाळ कंपनी. एवढ्यात घाटावर एक नौका येऊन थांबते. त्यातून एक सुदर्शन तरुण (स्वरूप दत्त) उतरतो. कडक कलप केलेलं करवतकाठी धोतर, तसाच कडक केलेला तलम कुर्ता.. एकूण शहरी अवतार. ही गँग डोळे विस्फारून त्याचा शहरी थाट बघतेय.. एवढ्यात त्याचा पाय घसरतो.. धोतरावर चिखल उडतो..तो ओशाळतो.. आणि… आसमंतात दुमदुमतं त्या किशोरीचं मुक्त, खळाळतं, दिलखुलास हसू! प्रेक्षगाराच्या अंधारालाही हास्याचे कोवळे मनोहारी कोंब फुटतात. त्या सावळ्या, निष्पाप चेहऱ्यावरून ओघळणारं हसू, विस्कटून चेहऱ्यावर आलेले केस.. ‘साफ छुपते भी नहीं, सामने आते भी नहीं’ असं तिचं रूप वातावरणात चैतन्य फुलवतं! त्या तरुणाच्या मनाची तार छेडली जाते!!
१९७१ साली प्रदर्शित झालेला ‘उपहार’ कविवर्य रवींद्रनाथ टागोरांच्या ‘समाप्ती’ या लघुकथेवर बेतलेला होता. निसर्गनियमाप्रमाणे वयात आलेल्या पण तरीही स्वभावातलं बालपण न हरवलेल्या चौदा वर्षांच्या मृण्मयीची – मिनूची ही कहाणी. आईवडलांचं एकुलतं एक अपत्य असलेली मिनू दिवसभर गाव उंडारत असते. सोबतीला तिच्याचसारखी चारपाच टवाळ पोरं घेऊन. बापाने लाडावून ठेवलेली मिनू गावातल्या लोकांच्या खोड्या काढून त्यांच्या नाकी नऊ आणत असते. मुलीची जात असल्यामुळे शिक्षणाचा वगैरे जाच नसतो तिला. तिच्या अनंत उत्पातांना गावातले लोक कंटाळलेले असतात. कधी एकदा ही ब्याद लग्न करून निघून जाते याची लोक वाट पाहत असतात. पण हे मिनुच्या गावीही नसतं. अशातच पहिल्या दृष्यातला ‘तो’ शहरी तरुण आपल्या आईच्या मार्फत मिनुला लग्नाची घालतो. मिनुच्या बापाला आकाश ठेंगणं होतं. एवढ्या मोठ्या जमीनदाराच्या घरून आलेली मागणी आणि आपण साधे पोस्टमास्तर. जिच्यासाठी लग्न म्हणजे फक्त नवीन कपडे आणि खूपसे दागिने, एवढाच असतो, त्या मुलीचं लग्न लावलं जातं.
लग्न झाल्यावर तिचं मन वळवण्यासाठी, तिच्या भावनांना तारुण्याची पालवी फुटावी म्हणून तिचा नवरा सगळे सभ्य प्रयत्न करून पाहतो. पण मिनुचं मन साड्या आणि दागिन्यांच्या पलीकडे जायला तयारच नसतं. ती पती-पत्नी संबंधांसाठी तयारच नसते, कारण तिला ते माहितच नसतात. घरात अनुभवी सासू असते, पण तिची मात्रा या पोरीसमोर चालत नाही. नवरा सुशिक्षित, प्रेमळ, समजूतदार. तो मिनुच्या कलाने वागायचं ठरवतो. या अशा सगळ्या वातावरणात मिनूला एकच दु:ख असतं.. ती तिच्या टोळक्याला पूर्वीसारखी भेटू शकत नसल्याचं! नवरा बिचारा तिच्यासाठी या मिटिंगा पण घडवून आणतो. आपला नवरा ‘चांगला माणूस’ आहे, याची मिनुला खात्री पटते, पण तरी ती नवरा-बायको संबंधांसाठी तयार नसतेच. या धामधुमीत नवऱ्याने लग्नासाठी घेतलेली रजा संपते. तो जायला निघतो. मधल्या काळात मिनूने त्याला ‘यथेच्छ छळलेलं’ असतं. जातांना ती त्याला सांगते की तू चांगला आहेस. नवरा तिच्याकडे चांगुलपणाचं बक्षीस – ‘उपहार’ म्हणून एक चुंबन मागतो. मागणी माफक असते, न्याय्य असते. पण तिला ते समजत नाही. ती हसत सुटते. तो अपमानित होतो आणि निघून जातो. ‘जोपर्यंत तू पत्र पाठवून मला बोलावणार नाहीस, तोपर्यंत मी परत येणार नाही,’ असं तिला सांगून जातो.
तो गेल्यावर मिनूचं भावविश्व बदलतं. त्याच्या आठवणी, त्याच्या गप्पा, त्याचा चांगुलपणा तिला आठवत राहतो. ती त्याला पत्र लिहायला बसते आणि तिला आठवतं, आपल्याला तर लिहीताच येत नाही.. ती कोसळते, “मुझको क्यों नहीं ले गये” म्हणत छपरी पलंगावर कोसळलेल्या मिनूला पाहून वाटतं, हे फूल असंच अल्लद उचलावं आणि नेऊन त्याच्या कोटाच्या खिशावर लावावं!
‘उपहार’च्या यशात जया भादुरीचा सिंहाचा वाटा होता. तिची सुरुवातीची अवखळ, ग्रामीण मुलगी, नंतरची हट्टी सून आणि त्यानंतरची विरहिणी, ही रूपं जयाने समर्थपणे उभी केली. तिचं लग्न होण्याआधी तिची सासू तिला भेटायला घरी बोलावते, ते दृश्य अविस्मरणीय आहे. कोठीची खोली आहे. सासू रुबाबात एका चौरंगावर. बालिश, गोंधळलेली पण चेहऱ्यावर एक अस्सल गावरान माज असलेली मिनू भिंतीला टेकून उभी. सासू कामिनी कौशल तिची उलटतपासणी घेत असते.. हिचं लक्ष शेजारी ठेवलेल्या लोणच्याच्या डेरेदार बरणीवर.. शेवटी ती न राहवून त्या बरणीत हात घालते आणि एक फोड उचलून सासुसमोरच तोंडात घालते. मिटक्या मारते. सासू प्रचंड चिडते. तिचा राग बघून हिला आणि आपल्यालाही आसुरी आनंद होतो. सासूने नवीन सुनेचे केस विंचरणे, तिला घरातली कामं शिकवणे वगैरे सीन बहारदार झालेत.
या सिनेमात खरं तर गाण्यांची गरजच नव्हती. पण तरी, ‘मैं एक राजा हूं’ आणि ‘मांझी नैया ढ़ूँढ़े किनारा’ ही अनुक्रमे रफी आणि मुकेशने गायलेली गाणी बरी होती. ‘सुनी रे नगरिया’ हे लताच्या आवाजातलं एक रडगाणं पण त्या काळात बरंच वाजायचं. लता अरोरा नावाच्या, त्या काळातल्या उभरत्या अभिनेत्रीवर चित्रित झालेलं, ‘बोल री मेरी गुड्डी तुझे गुड्डा क़बूल?’ हेही एक गाणं आहे.
‘उपहार’ खरं तर ‘गुड्डी’च्या तोडीचा सिनेमा होता. पण काही सिनेमे सर्वार्थाने चांगले असूनही फार लवकर विस्मरणात जातात. राजश्री प्रोडक्शनची निर्मिती, सुधेंदू रॉयचं दिग्दर्शन, लक्ष्मी-प्यारेचं संगीत आणि मुख्य म्हणजे गुरुदेव टागोरांच्या ‘समाप्ती’ या कथेवर आधारित हा सिनेमा ४५ व्या अकॅडमी अवॉर्डसाठी, Indian entry for the Best Foreign Language Film म्हणून निवडला गेला होता, पण तिथे तो नॉमिनेट नाही झाला. त्यानंतर ताराचंद बडजात्या यांनी ‘उपहार’चा इंग्रजी रिमेक बनवण्याचं ठरवलं. त्यासाठी रामेश्वरीला करारबद्ध केलं. पण हा प्रोजेक्ट यथावकाश थंड्या बस्त्यात गेला.
माझे अनेक मित्र-मैत्रिणी म्हणतात, तू जया भादुरीवर उगाच खार खातेस. ते खरंही आहे. त्याचं कारण खासगी आहे. याच खासगी कारणामुळे मला सायरा बानू पण आवडत नाही बिचारी! पण ज्याचं जे चांगलं ते चांगलंच, या धोरणामुळे ‘उपहार’बद्दल लिहिणं अपरिहार्य होतं. त्यातून ही गोष्टच ‘पावली कम’ मुलीची आहे. ती जोपर्यंत ‘पावली कम’ म्हणजे साहित्यिक भाषेत ‘निरागस’ आहे, तोपर्यंत सिनेमात धमाल आहे. ती मनाने मोठी झाल्यावर सिनेमातला रस संपण्याची दाट शक्यता असते. पण तिथे सिनेमा ‘कमरेखाली’ पोचलेला असतो. ‘आता कळसाचं पाणी कधी पडणार’ या प्रश्नाने आपण पण बेचैन होतो आणि सिनेमाशी बांधले राहतो. ही ट्रिक फार जुनी आहे आणि आपल्याकडे ती सर्रास कितीही वेळा, कुठल्याही माध्यमात वापरली जाते. एकमेकांवर प्रेम करणारी दोन माणसं (म्हणजे बहुतेकवेळा एक स्त्री आणि एक पुरुष) ‘जवळ’ कधी (आणि कसे) येतात हे बघण्याची सुप्त इच्छा बहुसंख्य प्रेक्षकांना असते. हा खरं तर लैंगिक भावनेचं दमन केल्याचा परिणाम आहे, पण ते असो.
तर.. ‘उपहार’चे नायक-नायिका कधी एकदाचे रांगेला लागतायत हे बघण्याची इच्छा आपल्याला खुर्चीला बांधून ठेवते. आपली ही इच्छा दिग्दर्शक पूर्ण करतो. मिनूची व्यथा बघून तिची नणंद तिला कलकत्त्याला (तेव्हा कलकत्ताच होतं!) घेऊन येते. नणंदेच्या घरातल्या एका खोलीत तिची नवऱ्याशी भेट होते. तिला गुपचूप एका सजवलेल्या खोलीत लपवून ठेवलं जातं. उदास झालेल्या नायकाला फसवून त्या खोलीत पाठवलं जातं. तो तिला तिथे बघून चकित होतो.. हे सगळे घासून गुळगुळीत झालेले प्रकार होतात.. पण तो आत येतो ते अखेरचं दृश्य अतिशय देखणं झालेलं आहे. त्याला बघून मिनू बाहू पसरून त्याच्याकडे झेपावते. तो समाधानाने तिला मिठीत घेतो. हे सुखद मीलन फिरता कॅमेरा टॉप शॉटने आपल्याला दाखवतो. आणि बालपणाची ‘समाप्ती’ होते, ‘उपहारां’ची देवाणघेवाण होणार असते आणि सिनेमा संपतो! त्या शेवटच्या फिरत्या टॉप शॉटने सिनेमाचा कळस गाठलेला आहे! यूट्यूबवर जाऊन एक बार तो ‘उपहार’ देखना बनता है साहेब! गोड आहे सिनेमा!!
(मिथिला सुभाष या नामवंत पटकथाकार व संवाद लेखिका आहेत)
[email protected]
मिथिला सुभाष यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात – मिथिला सुभाष– type करा आणि Search वर क्लिक करा.