‘पुरुष समजून घेताना….’ पुस्तकानिमित्त -डॉ. प्रज्ञा दया पवार

 

-डॉ. प्रज्ञा दया पवार

‘पुरुष समजून घेताना…’ या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्यासाठी मी ‘मीडिया वॉच’च्या अंकातील ‘मला समजलेला पुरुष’ हा विशेष विभाग दोन-तीनदा वाचला. साधारणपणे अशा विभागाला एखाद्या संपादकीय टिपणाने सुरुवात होते – जे टिपण त्यामागची भूमिका, प्रयोजन, आणि उद्दिष्टांबद्दल काही एक बीजसूत्र समोर ठेवत असते. या रुढ अर्थाने या विभागाला प्रस्तावना नसली तरी त्याची सुरुवात ज्या लेखाने झाली आहे तो लेख म्हणजे मलिका अमर शेख यांच्या लेखणीतून उतरलेली प्रस्तावनाच म्हणता येईल! मलिका यांच्या लेखातील एक उद्धृत जे त्यांच्या लेखासाठी इंट्रो म्हणून ठळक अक्षरात दिले आहे ते असे आहे –

शरीर’ या एकमेव सत्याभोवती फिरणारे पुरुष, त्याचबरोबर इतर अनेक गोष्टी करतात. राजकारण, संशोधन, विश्वाचा शोध घेणं… म्हणजे, एकदम मोकळं-ढाकळं जगतात. गुरूचा नववा-दहावा चंद्र, मंगळावरचं पाणी, अमुक प्रकाशवर्षापलीकडचा पृथ्वीसदृश्य तारा पण यांना दिसतो. पण, जवळ असणारी स्त्री, तिचं मन दिसतं का यांना? सेक्स झाल्यावर पाठ फिरवून झोपून जाणार्‍या पुरुषांना वाटते का निकड बाईचं मन समजून घेण्याची? मग आम्हाला का वाटावी?

त्या पुढे असेही लिहितात,

आणि मुळात म्हणजे, भारतीय पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेत पुरुषांना आपण एवढं लाडावून ठेवलेलं असताना पुन्हा पुन्हा त्याचा विचार करणं, एवढं त्याला महत्त्व का द्यावं?

मलिका अमर शेख यांची ही दोन्ही विधाने आणि त्या विधानांच्या अनुषंगाने त्यांनी विचारलेले हे प्रश्न महत्त्वाचे आणि मुख्य म्हणजे रास्त आहेत. त्या प्रश्नांचे माझे उत्तर असे आहे की, तसे करून आम्ही स्त्रिया थोडा बदला घेत आहोत! जगाच्या पाठीवर स्त्रियांविषयी प्रचंड लिहिले गेलेले आहे आणि किमान ज्ञात इतिहासात तरी ते बव्हंशी पुरुषांकडून लिहिले गेले आहे. स्त्रियांसाठीच्या पारंपारिक विषमतावादी चौकटी निहित करण्यापासून ते अलीकडच्या काळात स्त्री-सुधारणा, स्त्रीमुक्तीपर्यंतचे जे लिखाण झाले आहे त्यात पुरुषांचाच भरणा आहे.

स्त्रीवादाने पुरुषांच्या या लिखाणाची अतिशय परखड अशी चिकित्सा सुरू केली ती प्रायः विसाव्या शतकात. पण एकोणिसाव्या शतकातही असे काही उल्लेखनीय प्रयत्न स्त्रियांकडून झाल्याचे दिसतात. महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाल्यास ताराबाई शिंदे या स्त्रीवादी समीक्षालेखनाच्या अग्रणी ठरतात. रामायण-महाभारतापासून ते त्यांना समकालीन असलेल्या कथा-कादंबरी-नाटकादी ललित वाङ्मयावर त्यांनी केलेले औपरोधिक भाष्य दखलपात्र आहे. अर्थात विसाव्या शतकात युद्धोत्तर काळात स्त्रियांच्या या चिकित्सक लेखनात मोठी प्रगती झाली शिवाय पुरुषांच्या स्त्रीविषयक लेखनाचे जू मानेवरून उतरवण्यासाठी स्त्रियांनी स्त्रियांविषयी लिहिणे सुरू केले. या संदर्भातले सिमॉन दि बूव्हाचे महत्त्वपूर्ण प्रवर्तक काम आपण सगळे जाणतोच. ही फक्त सुरुवात होती. सिमॉननंतर अनेक स्त्रियांनी अनेकविध विद्याशाखांची जोड त्याला दिल्याने ‘स्त्री अभ्यास’ नावाची विद्याशाखा विकसित झाली. अलीकडच्या काळात थोडीफार धोक्यात आलेली असली तरी भारतातही विद्यापीठांमध्ये स्त्री अभ्यास केंद्रे कार्यप्रवण दिसतात. स्त्री-प्रश्नापासून पुढे व्हाया स्त्रीमुक्ती ते स्त्री-अभ्यासापर्यंत प्रगती झालेली असली तरी या सार्‍याच्या केंद्रस्थानी स्वाभाविकच स्त्री राहिली. स्त्री म्हणजे स्त्रीपण, बाईपण. म्हणजे चर्चेचा परीघ फार विस्तारला नाही. स्त्रियांच्या लेखनाचाही आणि स्त्रीविषयक लेखनाचाही. एक परिचयाचे उदाहरण घेऊ. कोणतेही समकालीन नियतकालिक अथवा वर्तमानपत्र घ्या. त्यात लिहिणारे कोण हे पाहू गेलो तर बहुसंख्या पुरुषांची असते. शिवाय त्यांचे विषय जगभरचे असतात. उलटपक्षी स्त्रियांचे लेखन पाहिले तर त्यात स्त्रीविषयक लेखनच जास्त मात्रेने असते. अपवाद असतात. पण प्रारूप हेच असते. म्हणजे हा एक सापळाच असतो आणि गंमतीची गोष्ट म्हणजे या सापळ्यात पुरुष कधी अडकत नाहीत. स्त्री विचार करते बाईपणाचा नि त्या संदर्भात पुरुषपणाचा. तर पुरुष विचार करतो जगाचा, मानवजातीचा नि त्या संदर्भात बाईचा. यातून पुरुषत्व हा त्याच्यासाठी चर्चेचा विषय राहात नाही. पुरुष माणसांबद्दल लिहितो नि मग स्त्रियांबद्दल लिहितो. तेही बर्‍याचदा आढ्यतेने.

याच्याच परिणामी स्त्रीवादातून ‘पुरुष अभ्यास’ ही संकल्पना पुढे आल्याचे दिसते. यातून पुरुषाचे पुरुषत्व सूक्ष्मदर्शकाखाली आणले गेले. मग अल्पस्वल्प का होईना पण काही पुरुष पुरुषत्वाविषयी साधक-बाधक लिहू लागले. अमेरिकी स्त्रीवादी समाजशास्त्रज्ञ प्रा. मायकेल किम्मेल यांनी या विषयावर अत्यंत पायाभूत असे काम केलेले आहे. त्यांच्या वर्गात घडलेला एक प्रसंग अत्यंत बोलका आहे. ६४ वर्षांच्या प्राध्यापक किम्मेल यांनी वर्गातील विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारला. “तुमच्या मते चांगला पुरुष कोणता?” प्रश्न ऐकून मुले गोंधळली. किम्मेल म्हणाले, “अशी कल्पना करा, की तुम्ही मेलेले आहात आणि तुमच्यासाठी आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेत असे म्हटले जात असेल, की तो चांगला पुरुष होता, तर त्या चांगुलपणात काय काय असू शकते असे तुम्हाला वाटते?”

पहिल्या रांगेत बसलेला एक विद्यार्थी म्हणाला, “प्रेमळ, काळजी घेणारा”. दुसरा उत्तरला, “परोपकारी, स्वहित बाजूला सारणारा”. तिसरा म्हणाला, “प्रामाणिक”.

किम्मेल यांनी हे सगळे गुणविशेष फळ्यावर डाव्या बाजूला ‘चांगला पुरुष’ असे शीर्षक देत एकाखाली एक लिहिले. मग विद्यार्थ्यांकडे वळून त्यांनी पुढचा प्रश्न विचारला. “तुमच्या मते खरा पुरुष (अस्सल मर्द) कसा असतो?”

आता मात्र मुलांकडून पटापट उत्तरे येऊ लागली.

एक म्हणाला, ’‘परिस्थिती आपल्या बाजूने हवी तशी वळवू शकणारा, अधिकारी बाण्याचा”

दुसरी एक विद्यार्थिनी – “जोखीम घेणारा”.

तिसरा – “सर्व उणीवा, अक्षमता दडवू शकणारा”.

तर चौथा तुर्की विद्यार्थी म्हणाला, “पुरुषासारखा बोलणारा, पुरुषासारखा चालणारा,… कधीही न रडणारा”.

यावर प्राध्यापक किम्मेल जोषात म्हणाले, “या बाबतीत तर तुम्ही सगळे माहीरच आहात की!”

मग त्यांनी फळ्यावर उजवीकडे ‘अस्सल पुरुष’ असे शीर्षक देऊन हे सगळे गुणविशेष लिहून काढले. ‘चांगला पुरुष’ आणि ‘अस्सल पुरुष’ या दोन्ही गुणवैशिष्ट्यांमधील फरक पाहता मी असे म्हणू शकतो की, अमेरिकी पुरुष हा पुरुषत्व म्हणजे काय असते याबाबत कमालीचा गोंधळलेला आहे, अशी मल्लिनाथी त्यांनी केली.

प्राध्यापक किम्मेल हे स्टोनी ब्रूक विद्यापीठातील ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ मेन अँड मॅस्क्युलिनिटीज’ या विभागाचे संस्थापक-संचालक आहेत. ‘मॅनहूड इन अमेरिका : ए कल्चरल हिस्ट्री’ (1996), ‘द जेंडर ऑफ डिझायर : एसेज ऑन मॅस्क्युलिनिटीज’ (2005), ‘गायलँड : द पेरिलस वर्ल्ड व्हेअर बॉईज बिकम मॅन’ (2008), ‘मिसफ्रेमिंग मेन : द पॉलिटिक्स ऑफ कंटेम्पररी मॅस्क्युलिनिटीज’ (2010), ‘अँग्री व्हाईट मेन : अमेरिकन मॅस्क्युलिनिटी अ‍ॅट द एंड ऑफ अ‍ॅन एरा’ (2013) ही त्यांच्या काही पुस्तकांची शीर्षकेच पुरुष अभ्यासातील त्यांच्या प्रचंड योगदानाची साक्ष देतात. शिवाय त्यांनी ‘मेन अँड मॅस्क्युलिनिटीज’ हे अकादमिक नियतकालिक सुरू केले. तसेच ‘नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मेन अगेन्स्ट सेक्सिझम’ या सत्तरीच्या दशकात सुरू झालेल्या संघटनेचेही ते प्रवक्ते होते. अमेरिकी स्त्रीवाद्यांनी किम्मेल यांचे काम सुरुवातीपासूनच उचलून धरलेले आहे.

आपल्याकडे याबाबत काय स्थिती आहे? आपल्याकडचा पुरुषही गोंधळलेला आहे, पण त्याचा गोंधळ अजूनच प्राथमिक आहे! प्राध्यापक किम्मेल यांच्यासारखीच एक आठवण माझ्याही मनात रुतून बसलेली आहे. प्राध्यापकांच्या उद्बोधन वर्गातली सहाध्यायी म्हणून माझा एक अनुभव. विविध विद्याशाखांमधील उच्च शिक्षित प्राध्यापकांचा हा उद्बोधन वर्ग. सगळेच तरुण. नव्यानेच नोकरीत रुजू झालेले. वर्गावर व्याख्यानासाठी मानसशास्त्राच्या ज्येष्ठ प्राध्यापिकेचे आगमन झालेले असते. खेळीमेळीत व्याख्यान सुरू होते. नियोजित विषयाच्या अवकाशात हळूहळू सगळे पोहचू लागतात. मध्येच एका पोरसवदा दिसणार्‍या प्राध्यापकाला उभे करुन त्या तज्ज्ञ महोदया प्रश्न विचारत्या होतात, “समजा तुम्ही स्त्री आहात. तर काय असू शकेल तुमचा विचार अथवा दृष्टिकोन?”

सगळ्या वर्गाच्या नजरा त्या प्राध्यापकावर खिळलेल्या. उत्सुकतेने. प्रश्न ऐकून प्राध्यापक स्तब्ध, निश्चल. चेहर्‍यावर कसलेच भाव नाहीत. पाच-सात मिनिटे अशीच जातात. अखेर त्या व्याख्यात्या त्याला भानावर आणू पाहतात आणि तोच प्रश्न पुन्हा विचारतात. तो म्हणतो, “सॉरी, पण मी स्त्री आहे असा विचार मी कल्पनेतही करू शकत नाही. क्षणभरासाठीही नाही. मग मी काय सांगणार यावर? ”

अतिशय गंभीरपणे दिलेले त्याचे हे उत्तर ऐकून सगळा वर्ग हसतो. मला हसू येत नाही. अस्वस्थ वाटते. कल्पनेतही हा बाई असल्याचा विचार करू शकत नाही? स्वतःला स्त्रीच्या ठिकाणी ठेवून पाहू शकत नाही? का बरं? बाई असण्याची साधी कल्पनाही त्याला इतके व्हल्नरेबल करून सोडते! अशा समाजात स्त्री म्हणून जगणे सुखावह कसे बरं असू शकेल? प्रश्नांचा ओघ काही थांबेचना मनातला…

अवघडच आहे पुरुषांचे! आणि हा प्रसंग तेव्हा घडला होता जेव्हा मराठीच्या सांस्कृतिक विश्वात ‘पुरुष उवाच’ आणि ‘मावा’ (मेन अगेन्स्ट व्हायोलन्स अँड अ‍ॅब्युज – हिंसाचार आणि छळवणूक विरोधी पुरुष) या दोन संस्थांनी पुरुषत्वाची चिकित्सा सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडायला लागून मोठा काळ झालेला होता. त्यांनी चालवलेल्या ‘माणुसपणाच्या वाटेवरची पुरुषस्पंदनं’ आणि ‘पुरुष उवाच’ या वार्षिक अंकांनी अनेक पुरुषांना आपल्या पुरुषत्वाबद्दल लिहिते केले. ‘प्रश्न पुरुषभानाचे’ हे पुस्तक या अंकांमधील निवडक लेखांच्या आधारे सिद्ध झाले आहे. या सर्व घटितांना आता वीसहून अधिक वर्षांचा कालावधी लोटला आहे. दहाएक वर्षांपूर्वी ‘शब्दालय’चा एक दिवाळी अंक याच विषयावर असल्याचे स्मरते. त्यानंतर आला हा ‘मीडिया वॉच’चा अंक, ज्यात स्त्रियांनी पुरुषांविषयी लिहिले आहे. या विशेष विभागाचे पुस्तकही आता प्रसिद्ध होत आहे. यावर्षी म्हणजे २०२० साली दैनिक लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीत ‘पुरुष हृदय बाई’ हा पुरुषांना पुरुषपणाविषयी लिहिते करणारा स्तंभ सुरू आहे. हे केवळ महाराष्ट्रात घडत नसून जगभरात घडते आहे. ‘पुरुषत्वाचा अभ्यास’ (मॅस्क्युलिनिटी स्टडीज्) हा आता पश्चिमी जगातच नव्हे तर आशियाई देशांमध्येदेखील येऊन पोहचलेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हे पुस्तक पाहायला हवे.

या पुस्तकात एकूण नऊ लेख आहेत. ललित लेखन, कविता, सामाजिक कार्य, नाटक आणि पत्रकारिता अशी विविध सर्जनशील व समाजलक्ष्यी कार्यक्षेत्रे असणार्‍या या सार्‍याजणी आहेत. ज्येष्ठ कवयित्री मलिका अमर शेख, संपादक, सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका अरुणा सबाने, नाटककार आणि स्त्रीवादी कार्यकर्त्या वंदना खरे, कृषी क्षेत्रातील अभ्यासक कार्यकर्त्या प्रज्वला तट्टे, कवयित्री योजना यादव आणि शर्मिष्ठा भोसले, हर्षदा परब, मनश्री पाठक आणि हिना कौसर खान या छापील व दृकश्राव्य पत्रकारितेच्या क्षेत्रातील चार तरुणी या सार्‍याजणींमुळे अतिशय वेगवेगळ्या वयोगटातील आणि विभिन्न कार्यक्षेत्रातील पुरुषांचे मानस या लेखांतून उभे राहायला मदत होते. अनेक लेखांमधून विशेषतः युवा लेखिकांच्या लेखांमधून सकारात्मक दृष्टीने बदलू पाहणार्‍या पुरुषांचा अत्यंत प्रेमाने उल्लेख आलेला आहे.

माझा मुद्दा थोडा वेगळा आहे. पुरुष ज्या सर्वंकष विषमतावादी व्यवस्थेत घडत असतो ती व्यवस्था त्याला पुरुषत्वापासून मुक्तता मिळवून देईल अशी शक्यता असते का? एक इथलेच उदाहरण पाहू. ज्या ‘मीडिया वॉच दिवाळी अंकात ‘पुरुष…मला समजलेला’ हा परिसंवाद झडला त्या अंकातील जाहिराती पाहा. एकूण ३०-३५ रंगीत जाहिरातींमध्ये केवळ दोनचार स्त्रियांचे फोटो आहेत. याचाच अर्थ अनेक कथित यशस्वी पुरुषांच्या वित्तीय पाठिंब्यावर या अंकाची ‘व्यवस्था’ तयार झालेली आहे. बरं हे पुरुष काही स्त्रीवादी विचारांचे म्हणून ओळखले जातात का? तर असे अजिबातच नाही. परिस्थिती उलटच असायची शक्यता अधिक आहे. कारण ते सत्तेच्या विविधस्तरीय रचनेच्या अग्रस्थानी आहेत. भारतीय समाजव्यवस्था जात, वर्ग, धर्म, वंश, लिंगभावाच्या आधारावर तयार झालेली गुंतागुंतीची बहुपेडी सत्तासंरचना आहे. आणखी एक पूर्णपणे वेगळे उदाहरण पाहता येईल. आयुष्याचा जोडीदार निवडताना तो आपल्यापेक्षा हरएक बाबीत उजवा किंवा वरचढ असावा असा विचार करणारी युवती स्त्री-पुरुष विषमतेचीच पायाभरणी करत नसते काय? अन्य सर्व विषमता जागच्या जागी ठेवून फक्त स्त्री-पुरुष विषमता संपवू असे शक्य नसते.

पुरुषत्वाचा सुटा सुटा मुद्दा म्हणूनच चुकीच्या दिशेने नेणारा ठरू शकतो. विशिष्ट अशा पुरुषांशी असलेल्या नात्यांच्या संदर्भातच आपण पुरुषत्वाचा विचार करत असतो. म्हणजेच नात्यांची व्यवस्था आपल्या पुरुषाकडूनच्या आशा-अपेक्षा ठरवत असते. पण आपण व्यक्ती म्हणून कोण आहोत, कोणत्या विचारांचे आहोत आणि मुळात काय काय घेऊन उभे आहोत, असे प्रश्न आपल्याला कधी पडतात का? त्यांना आपण प्रश्नांकित करू शकतो का?  आपण त्यांना आपल्या चिकित्सेचा भाग बनवू पाहतो का? इथेच मला पुन्हा एकदा मलिका अमर शेख यांच्या लेखाकडे यायचे आहे. त्यांच्या म्हणण्याचा आशय थोडा व्यापक करून मांडायचा तर असा होईल की, का बरं आपण पुरुषांचा इतका विचार करतो आहोत? पुरुषांपेक्षा अन्य कितीतरी विषय महत्त्वाचे आहेत. विज्ञान आहे, समाजशास्त्र आहे, अर्थकारण आहे, निसर्ग आहे – निसर्गावर प्रेम करणार्‍या मलिका यांचे शब्द पाहायचे तर, “जावं की एखाद्या फुलपाखराचे रंग, पाऊस किंवा धबधबा पाहायला. जगात खूप आणखी सुंदर गोष्टी आहेत. चिक्कार आहेत. एका पुरुषापर्यंत थांबायला कुणी सांगितलंय?” मथितार्थ असा की, हे सगळे जग समजून घ्यायचे विषय पुरुषाला आंदण द्यायचे आणि आपल्या ठेवणीतला आदर्श पर्यायी पुरुष शोधत राहायचा… स्वप्न म्हणूनही हे अतिशय छोटेसे आहे. अर्थात्, जग बदलू पाहणार्‍या स्त्रीने पुरुषाला टाळावे असे मी अजिबातच म्हणत नाही. त्याच्या मदतीने का असेना पण तिने हे विषमतावादी जग बदलण्याचा ध्यास घेतला पाहिजे, ज्यात पुरुषसत्ताकता हा अंगभूत भाग आहे. नाही तर पुरुष बदलण्याची चर्चा आणि प्रयत्न हे कॉस्मेटिक राहण्याची शक्यता अधिक आहे अशी मला भीती वाटते.

प्रस्तुत पुस्तक या कॉस्मेटिकपणापलीकडे जाण्याचा काहीएक गंभीर प्रयत्न करणारे आहे. वंदना खरे यांनी केलेली ‘मर्दानगी’ आणि ‘हिंसाचाराच्या संस्कृती’ची चर्चा असो किंवा योजना यादव यांनी ‘माणूस’ आणि ‘अपेक्षांचा रखवालदार’ यामध्ये केलेला फरक असो किंवा शर्मिष्ठा भोसले यांनी कोपर्डी बलात्कारित स्त्री मराठा असल्याने मराठा संघटनांनी आक्रमक होत जातसंघटन आणि पुरुषत्वाकडे केलेल्या प्रवासाची केलेली समीक्षा असो, अरुणा सबाने यांनी व्यापक परिवर्तनवादी चळवळीच्या संदर्भात स्त्री-पुरुष नात्यातील पोताचे केलेले पोस्टमॉर्टेम असो, हर्षदा परब यांनी माणूसपणाच्या भिंगातून पुरुष नि स्त्रियांचा काढलेला एक्स रे असो किंवा प्रज्वला तट्टे यांनी बदलत्या सरंजामी भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या संदर्भात पुरुषी वर्तनाचा लावलेला अन्वयार्थ असो हे सगळेच प्रयत्न पुरुषत्वाला अन्य विषमतामूलक संस्थांच्या संदर्भात कमीअधिक प्रमाणात भिडू पाहतात.

यातील अनेक लेखांमधून सिमॉन दि बूव्हाचा ‘स्त्री ही नैसर्गिकरित्या घडत नसते तर सामाजिक रचित असते’ हा तर्क पुरुषांसाठीही उपयोजिला गेला आहे. पुरुष हा नैसर्गिकपणे घडत नाही तर तोही सामाजिक रचित असतो. त्यामुळे कुटुंबव्यवस्थेत सुरुवातीपासून त्याला बदलण्याचा प्रयत्न केला गेला तर पुरुष बदलूही शकतो असा निष्कर्ष आपसुकच निघू पाहतो. पण योजना यादव यांनी त्यांच्या स्त्रीप्रधान घरात वाढलेल्या भावाची गोष्ट सांगितली आहे. त्यात त्यांनी आमच्यात असणारा भाऊ बाहेरच्या जगात गेल्यावर कसा बदलू लागला याची अतिशय नेमकी नोंद केली आहे. तरीही आम्हा सार्‍याजणींचा प्रभाव त्याच्यावर कायमच राहिला असेही त्यांनी आवर्जून सांगितले आहे.

पुरुषाची दया येते, कीव वाटते, पुरुष कळत नाही, पुरुषाचा राग येतो, पुरुषत्व अंगावर येते, पुरुष चांगला बनणे शक्य आहे, पुरुष बदलतोय ही सगळी विधाने अनेक लेखातून येतात. ती आनुभविक संदर्भांतून आलेली विधाने आहेत हेही खरे. पण स्त्री-पुरुषांमधील नैसर्गिकतेच्या छोट्याशा फरकावर जो विषमतेचा प्रचंड मोठा डोलारा उभा केला गेला आहे त्या सामाजिक रचितातूनच हे उद्भवत नाही काय? त्यामुळे अरुणा सबाने जेव्हा म्हणतात की, “दरवेळी कुणीच शंभर टक्के वाईट किंवा शंभर टक्के चांगलं नसतं. माझ्या वाट्याला चांगली आलेली (पुरुष)माणसं कदाचित इतरांसाठी वाईटच असतील. माणूस ‘वाचता’ आला पाहिजे, समजून घेता आला पाहिजे,” हे विधान मला मनापासून पटते. आणि पुरुषत्वाबद्दल वेगळे बोलायचेच तर विद्यमान जगाच्या संदर्भात ‘गोंधळलेला पुरुष’ आणि ‘शोषित पीडित स्त्री’ यांची तुलना अजिबातच होऊ शकत नाही हे मात्र खरेच. ठाम शोषक आणि गोंधळलेला शोषक यात बाईला निवड करावी लागणे ही बाब तशीही फारशी सुखावह असत नाही!

(लेखिका नामवंत कवयित्री असून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सदस्य आहेत)

9869480141

‘पुरुष समजून घेताना….किंमत – १५० रुपये – संपर्क -8888744796

पुस्तक Amazon.in वर उपलब्ध -समोरील लिंकवर क्लिक करा-https://amzn.to/3ypIzgq

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here