२०० : हल्ला हो – पाहायलाच पाहिजे असा चित्रपट.

डावकिनाचा रिच्या

संपूर्ण वस्तीला वेठीस धरून अनेक वर्ष अत्याचार करणाऱ्या गुंडाला भर न्यायालयात २०० महिलांकडून ठार मारले गेल्याच्या नागपूर येथे घडलेल्या सत्य घटनेवर आधारीत हा सिनेमा. ७६ पेक्षा अधिक वार करून आरोपीचे दोन्ही कान, सर्व बोटे तसेच लिंगदेखील कापून टाकले गेले होते. जनतेने कायदा हातात घेणे चूक की बरोबर यावर भरपूर वेळा चर्चा होते. आणि कोणताही विचारी माणूस अश्या न्यायव्यवस्थेबाहेरील न्यायाचे समर्थन करत नाही.. मात्र न्यायव्यवस्थेचे अस्तित्वच नसेल तर?? व्यवस्थेच्या अभावामुळे सामान्य जनतेला न्यायासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे भेदक चित्रण या सिनेमात केलं आहे.

या सिनेमातील एक वाक्य.. “पुस्तकी व्यवस्था आणि समाजातील व्यवस्था ही वेगळी असते.” परवा एका केंद्रीय मंत्र्याने उच्चारलेले वाक्य आपल्या लक्षात असेल “मी काही सामान्य माणूस आहे का?” यातूनच या व्यवस्थेची मर्यादा स्पष्ट होते. श्रीमंतांसाठी पायघड्या घालणारी ही व्यवस्था व्यक्ती गरीब असेल तर तिच्यासाठी राबली जात नाही. त्यात ती व्यक्ती गरीब दलीत असेल तर… आणि त्यात गरीब दलीत स्त्री असेल तर..विचारायलाच नको.

डिसेंबर २०१९ मध्ये आपण एक बातमी वाचली असेल. बलात्कार करून हत्या करण्याचा आरोप असलेल्या चार गुन्हेगारांना तेलंगणा पोलिसांनी चकमकीत ठार केले. त्या पोलीस निरीक्षकाचा शूर, बहादूर म्हणून सत्कार देखील करण्यात आला. त्या वेळी एक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली होती. बलात्कारासारखा गुन्हा असेल तर जनतेच्या भावना संवेदनशील असतात. मात्र लोकांना आवडेल अशा प्रकारे कायदा हातात घेणे प्रचलित न्यायप्रक्रियेला पर्याय होऊ शकत नाही.

या सिनेमात देखील पहिला अर्धा तास आपल्याला असेच वाटते. या वेळी अमोल पालेकर यांच्या पात्राकडून वदवली गेलेली वाक्ये आपल्याला पटतात. मात्र सिनेमा पुढे सरकत जातो.. त्या पात्राची घुसमट, पुस्तकातील आदर्शव्यवस्था समाजाच्या सर्व घटकांना न्याय देण्यास असमर्थ असल्याने पुढे स्वतःची तटस्थ भूमिका सोडून आरोपींच्या बाजूने उभे राहणे अपरिहार्य होते. नेहमी तटस्थ राहणारा समाजातील मध्यमवर्ग हा चित्रपट पाहताना घायाळ झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर माजवणारा हा चित्रपट.

२० ऑगस्ट रोजी “झी ५ वर २०० : हल्ला हो” हा जबरदस्त चित्रपट प्रसिद्ध झाला आहे. बहुतेक कलाकार मराठी आहेत. अमोल पालेकर, उपेंद्र लिमये यांनी अपेक्षेप्रमाणे भूमिकेत जीव ओतला आहेच. पण रिंकू राजगुरू या चित्रपटात अभिनयाचा सुखद धक्का देते. दमदार कथानक आणि त्याचा योग्य वेग. अमोल पालेकर यांचे संवाद तर पुन्हा पुन्हा ऐकत राहावे असे लिहिले, सादर केले आहेत. संवेदनशिल विषय असून देखील दिग्दर्शकाने बटबटितपना बऱ्यापैकी टाळला आहे.

आपल्याकडे तालिबानी, आखाती देशातील न्यायव्यवस्था नाही. झुंडीने न्याय देणे घातक आहे हे म्हणणे खरे असले तरी न्यायव्यवस्था अपुरी, आजारी आहे हे मान्य तरी करायला हवे. आजार मान्य केला तर त्यावर इलाज होतो. या आजारी व्यवस्थेचे बुरखे फाडत आपला विषय पोचवण्यात आणि त्यातून विचार करायला भाग पाडण्यात हा चित्रपट खूपच प्रभाव कामगिरी करतो. या वर्षी राष्ट्रीय पुरस्कारात या सिनेमाचे आपल्या धनुषच्या कर्णनला नक्कीच आव्हान असेल. नक्की पहा.. २०० : हल्ला हो

[email protected]

(लेखक वेगवेगळे शास्त्रज्ञ आणि त्यांचे शोध याबाबत अतिशय वेगळ्या शैलीत लेखन करतात . ‘डावकिनाचा रिच्या ‘ या नावाने फेसबुकवरील त्यांच्या लेखनाचे हजारो चाहते आहेत .’ज्ञानाचा प्रवाहो चालिला…’हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

200 Halla Ho | Official Trailer | A ZEE5 Original Film | Watch Now on ZEE5

Previous articleसमाज आणि वादाची चौकट
Next article‘पुरुष समजून घेताना….’ पुस्तकानिमित्त -डॉ. प्रज्ञा दया पवार
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.