– अविनाश दुधे
भारतीय भाषांना अभिजात भाषांचा दर्जा देण्यास सुरुवात झाल्यापासून २० वर्षानंतर मराठीला अभिजात दर्जा मिळाला आहे. मागील काही वर्ष रंगनाथ पठारे, दिवंगत हरी नरके, सदानंद मोरे, श्रीपाद भालचंद जोशी, संजय सोनवणी, संजय नहार आदी अनेक लेखक व अभ्यासकांनी सातत्यपूर्ण संशोधन, परिश्रम व प्रयत्नांनी मराठी भाषेची दोन हजार वर्षांपूर्वीची भाषेची प्राचीनता, श्रेष्ठता व अस्सलपणा सिद्ध करुन अभिजात भाषेच्या दर्जासाठी जोरकस प्रयत्न केले होते. पण महाराष्ट्र व मराठी माणसांबद्दल कायम आकस असलेल्या दिल्लीश्वरांनी ही केस थंड बस्त्यात टाकली होती. मात्र महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जवळ येताच एका रात्रीत निर्णय झाला. आपल्याकडे गुणवत्ता वा गरजेऐवजी राजकारणाचा विचार करुन निर्णय होतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. अर्थात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे महाराष्ट्रातील साडेबारा कोटी मराठी भाषक आनंदित होतील आणि परतफेड म्हणून भरभरून आपल्या पदरात मते टाकतील, असे सरकारला वाटत असेल तर मराठी माणूस स्वतःच्या भाषेबाबत किती निरुत्साही आणि थंड आहे हे त्यांच्या लक्षातच आले नाही, असे म्हणावे लागेल.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठीचे मोजके अभ्यासक, संशोधक सोडलेत तर कोणालाही उचंबळून आले नाही. मराठी अभिजात झाल्याने नेमका काय फरक पडणार आहे हे बहुतांश मराठी भाषकांना माहीतच नाही. त्याला ते माहीत करुन घेण्याची गरजही वाटत नाही. या निर्णयामुळे मराठी भाषेच्या विकासासाठी, मराठी विषयात भरीव काम करणाऱ्या संस्था, संघटनांसाठी, मराठीतील बोली भाषांच्या विकासासाठी दरवर्षी केंद्र सरकारकडून ५०० कोटी रुपये मिळतील तेवढाच पैसा राज्य सरकारला द्यावा लागेल. देशातील अनेक विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवली जाईल. त्यामुळे मराठीत अभ्यास करणाऱ्यांना, संशोधन करणाऱ्यांना रोजगारांच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहे. मात्र महाराष्ट्राच्या स्थापनेपासून महाराष्ट्राचे राज्यकर्ते व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मराठी विषयातील धोरण आणि कृती तपासली तर अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरही मराठीला चांगले दिवस येतील का, याबाबत शंकाच वाटते.
मात्र या विषयात केवळ राज्यकर्ते व अधिकाऱ्यांना दोष देणे उपयोगाचे नाही . मराठी माणसाला मराठीबद्दल किती आस्था आणि आपुलकी आहे , हा संशोधनाचा विषय आहे. देशातील इतर भाषकांचा त्यांच्या भाषेबाबतचा कडवेपणा, अभिमान आणि आपली भाषा जपण्यासाठी ते करत असलेले प्रयत्न पाहिलेत तर मराठी माणसांची आपल्या भाषेबाबतची अनास्था चटकन लक्षात येते. मराठी माणसांबद्दल बोलताना त्याची अस्मिता, स्वाभिमान आणि मोडेन पण वाकणार नाही असा त्याचा बाणा असतो, असे सांगितले जाते . पण भाषेच्या विषयात मराठी माणसाने आपली तथाकथित अस्मिता, स्वाभिमान पार गुंडाळून ठेवला आहे . ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी , जाहलो खरेच धान्य ऐकतो मराठी … ‘ हे कविवर्य सुरेश भटांचे गीत मराठी भाषा दिन, महाराष्ट्र दिन आदी प्रसंगात अभिमानाने गायिले जात असले तरी मराठी माणसाला मराठी बोलण्यात , मराठी ऐकण्यात , वाचण्यात, मराठीत शिक्षण घेण्यात, मराठी पुस्तकं विकत घेण्यात , मराठी नाटक , चित्रपटांना प्रतिसाद देण्यात अभिमान वाटतो , असे चित्र प्रत्यक्षात कुठेच दिसत नाही . महाराष्ट्राची राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूरसारख्या कॉस्मोपॉलिटिन शहरातील मराठीची स्थिती अभ्यासली तर अतिशय धक्कादायक निष्कर्ष समोर येतील . या शहरांमध्ये मराठी भाषक माणसं आज सार्वजनिक ठिकाणी मराठी बोलत नाही. मराठी विषयात कुठलाही आग्रह त्यांच्या वागण्या – बोलण्यात दिसत नाही . राज्यातील इतर मोठ्या शहरांमध्येही कमी जास्त फरकाने हेच चित्र आहे.
भाषेबाबत संशोदक असे सांगितात की जी भाषा ज्ञानभाषा होऊ शकते , जी भाषा रोजगार मिळवून देऊ शकते त्याच भाषांना भवितव्य आहे. मराठी माणसांना जणू हे आधीपासून माहीत असावं, असं त्यांचं वागणं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कुठल्याही लहान -मोठ्या गावातील कुटुंबांना आपल्या मुलांनी मराठीत शिक्षण घ्यावे असे वाटत नाही . त्यामुळे गल्लोगल्ली इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहेत . मराठी शाळा एकापाठोपाठ एक माना टाकत आहे .राज्यात मागील काही वर्षात एकूण ४६४० मराठी शाळा बंद पडल्या आहेत. या विषयात राज्य सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार असला तरी मराठी माणसांचा आपल्या मुलांनी इंग्रजी माध्यमातूनच शिकावे, हा आग्रह अधिक कारणीभूत आहे. मराठीत शिक्षण घेतल्यास मुलांना काही भवितव्य आहे , यावर मराठी माणसांचा अजिबात विश्वास नाही. ज्यांची नोकरी वा रोजगार मराठी शाळा , आस्थापनांमध्ये आहे ते सुद्धा स्वतःची मुले मराठी शाळॆत शिकवत नाही. गेल्या अनेक पिढ्या जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत शिकल्यात मात्र तिथे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचीही मुलेही मराठीत शिकत नाही, हे कटू वास्तव आहे. राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागात , राज्य सरकारकडून अनुदान मिळवणाऱ्या शेकडो संस्थांमध्ये काम करणारे शासकीय, निमशासकीय कर्मचारीही आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवत नाहीत. मध्यंतरी इंग्रजी माध्यमांच्या शाळांसह सर्व प्रकारच्या शाळांमध्ये मराठी हा विषय अनिवार्य करण्यात आला होता . मात्र इंग्रजी शाळा व्यवस्थापनाचा दबाब आणि अर्थकारणातून या विषयातील अनिवार्यता केव्हाच मागे पडली आहे. सरकारने मराठी हा विषय ठिकठिकाणी आग्रहाचा केल्यास बरेच काही होऊ शकते , मात्र सामान्य माणसालाच आपली भाषा जपण्यात रस नसल्याने सरकारकडून फार अपेक्षा करण्यात अर्थ नाही .
केवळ शिक्षणच नव्हे तर अनेक क्षेत्रांमध्ये मराठी माणसाच्या मातृभाषेबाबतच्या अनास्थेमुळे मराठी माघारते आहे . मराठी वर्तमानपत्रांचा खप सातत्याने घसरत आहे . ‘चित्रलेखा’ , ‘लोकप्रभा’ आदी आघाडीचे साप्ताहिकं, मासिक बंद पडले आहेत . मराठी पुस्तकांच्या विषयातही आनंदी आनंद आहे. म्हणायला दरवर्षी अनेक पुस्तकं प्रकाशित होतात. पण त्या पुस्तकांच्या किती प्रती निघतात आणि खपतात किती , याची माहिती घेतली तर धक्का बसेल. मराठी पुस्तक विक्रीच्या विषयात केविलवाणे चित्र आहे. दिल्लीत दरवर्षी राष्ट्रीय पुस्तक मेळा भरतो. या मेळ्यात देशातील सर्व भाषेतील पुस्तकांचे स्टॉल असतात. मराठी पुस्तकांचे स्टॉल नसतात. मराठी पुस्तकांना अजिबात मागणी नसते त्यामुळे मराठी प्रकाशक तिकडे फिरकत नाही , हे कारणं सांगितलं जातं. दिल्लीत अडीच तीन लाख मराठी भाषक राहतात, त्यांच्यापैकी अनेकजण पुस्तक मेळ्याला भेट देतात पुस्तकांची खरेदीही करतात मात्र त्यांना आपल्या भाषेतील पुस्तकं खरेदी करण्यात रस नसतो. महाराष्ट्रातही असेच उदासीन चित्र आहे . राज्याच्या वीसपेक्षा अधिक जिल्ह्यात अजूनही पुस्तक विक्रीची दुकानं नाहीत. दोन कोटी लोकसंख्येच्या राजधानी मुंबईत जेमतेम पाच -सहा दुकानं आहेत. पुणे सोडलं तर नागपूर, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, अमरावती, अकोला आदी मोठ्या शहरात एखादे दुसरे दुकान आहे. मध्यंतरी शाळा – महाविद्यालयांना पुस्तक विक्रीसाठी राज्य सरकारकडून अनुदान मिळायचे . मात्र इतर विषयावरील खैरात वाटपासाठी त्या अनुदानाला कात्री लावण्यात आली. . मराठी विषयातील अनास्थेची अशी शेकडो उदाहरणे आहेत. या विषयात शासन प्रशासन भरपूर काही करू शकते, ही गोष्ट खरी आहे . मात्र मराठी माणसाच्या मनात आपल्या भाषेबाबत काही अंगार आहे का , हा मूलभूत प्रश्न आहे. दुर्दैवाने याचे उत्तर नाही, असे आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा आनंद असला तरी आपल्या भाषेबाबत बेपर्वा, उदासीन असलेल्या मराठी माणसाच्या वृत्तीत जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत मराठीचे काही खरे नाही.
(लेखक ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक, पब्लिकेशन व वेब पोर्टलचे संपादक आहेत )
8888744796
………………………………………….