मेळघाटातील होळीचा अनोखा उत्सव!

टीम ‘मीडिया वॉच’

सातपुडा पर्वत रांगाच्या कुशीत वसलेल्या मेळघाटातील होळीचा उत्सव विशेष असतो. सलग पाच  आदिवासी बांधव होळीच्या रंगात न्हाऊन निघतात. मेळघाटातील होळीला होळीच्या पूर्वसंध्येपासून सुरूवात होते. रोजगारासाठी भटकंती करणारा आदिवासी बांधव होळीसाठी मात्र आपल्या गावी परत येत असतो. पहिल्या दिवशी शेतातील पीक व होलिकाचे पूजन केले जाते. एकाच दिवशी सर्व गावात होल‌िका दहन होत नाही. वेगवेगळ्या दिवशी होळी पेटविल्या जाते. पहिल्या रात्री गावाबाहेरील मोकळ्या जागेवर आदिवासी नृत्य करत असतात. गावाबाहेर मेघनाथाचा स्तंभ उभारल्या जातो. मेघनाथ आदिवासींचे दैवत आहे. त्याची पूजा केली जाते. मोहफुलांपासून काढण्यात आलेले मद्य सर्वांना सेवन करण्यासाठी दिले जाते. किनकी, ढोलकी व बासरीच्या तालावर आदिवासी रात्रभर तल्लीन होऊन नृत्य करीत असतात.

होळी हा सण साजरा करीत असताना जी गाणी म्हटली जातात, त्यात त्यांचा इतिहास सांगितला जातो. अनेकदा ही गाणी अर्थपूर्ण विनोदाने भरली असतात. विविध गावांतील नृत्य पथके होळी पेटवण्याच्या दिवशी गात असतात. होळीचा जो उंच दांडा व बांबू असतो, तो खाली पडायला आल्यास पोलीस पाटील त्याला दुसऱ्या लाकडाच्या साहाय्याने वरचेवर झेलतो. कारण तो बांबू व दांडा खाली पडल्यास आदिवासी समाजात अपशकुन मानला जातो. पोलीस पाटील झेललेल्या बांबूचा व दांड्याचा अग्रभाग तोडतो. त्या अग्रभागाची पूजा केली जाते. अग्रभागाचा तुकडा याच स्थानिक भागातील नृत्य पथकास दिला जातो. स्त्री-पुरुष, मुले आनंदाने होळीभोवती नाचतात व रात्र जागून काढतात.

कोरकू होळीमध्ये गावपाटलाच्या भेटीवरून परत आल्यानंतर भोजन करून रात्रभर ‘मुठवा’ देवासमोर नृत्य केले जाते. नंतर दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी करतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, होळी नैसर्गिक रंगत खेळण्यात येते.पळसाच्या फुलापासून रंगपंचमीसाठी रंग तयार केला जातो. रंग तयार केलेल्या भांड्यात जोपर्यंत फगवा टाकत नाही, तोपर्यंत रंग खेळला जात नाही. होळीमध्ये आदिवासी गंमतीने एकमेकांवर ताशेरे ओढत असतात. यात वह‌िनी व दीर, मामा व भाचा यांचा समावेश असततो. नातेसंबंधातून परस्परावर सहज व गंमतीने मात देण्यासाठी गाणेदेखील रचले जाते. महिला व पुरुष नृत्याच्या तालावर ताल धरत असतात. या काळात आदिवासी बांधव विविध ठिकाणाहून मेळघाटात परत येत असतात. सातपुडा पर्वत रांगातून तापी नदी वाहत आहे. या नदीला आदिवासी बांधव दैवत मानतात. तिची पूजा करतात. घाटांचा मेळ असणाऱ्या मेळघाटात आदिवासींमध्ये कोरकू, गोंड, राठीया (भिलाला) या प्रमुख जाती अधिक प्रमाणात आहेत. गडचिरोली व नंदूरबार येथे या जातीचे प्रमाण कमी आहेत. आदिवासींच्या सर्वच जाती पारंपरिकपद्धतीने होळी साजरी करण्यासाठी उत्सुक असतात.

गावनियोजनाची परंपरा

मेळघाटातील होळीला गावनियोजनाची परंपरा आहे. गावकऱ्यांच्या सोयीनुसार गावप्रमुखाच्या निर्णयावर वेगवेगळ्या दिवसाला, वेगवेगळ्या गावांत होळी पेटविली जाते. गावपातळीवर होळीचा दिवस निश्चित करताना वार, दिवस, बाजार आणि लगतच्या परिसरातील मेघनाथ यात्रेचा विचार केला जातो. बाजाराच्या आणि मेघनाथ यात्रेच्या आदल्या दिवशी होळी पेटविली जाते.

मेळघाटातील अतिदुर्गम आदिवासी भागातील काही गावांमध्ये नर-नारी होळीची अनोखी प्रथा बघायला मिळते. रायपूर, हतरू, चुनखडीसह अन्य गावांतही नर-नारी होळी रचल्या जातात. यात हिरव्या बांबूला मान दिला जातो. यातील एका होळीची उंची अधिक, तर दुसरीची उंची थोडी कमी राहते. या दोन होळींमध्ये दोरीच्या सहाय्याने एक पाळणा बांधला जातो. पाळण्यात पाच दगड ठेवतात आणि एकाच वेळी या दोन्ही होळी पेटविल्या जातात. यालाच आदिवासी बांधव नर-नारी होळी म्हणतात.

दोरीच्या सहाय्याने एक पाळणा बांधला जातो. पाळण्यात पाच दगड ठेवतात आणि एकाच वेळी या दोन्ही होळी पेटविल्या जातात. यालाच आदिवासी बांधव नर-नारी होळी म्हणतात.सर्वसाधारणपणे मेळघाटातील प्रत्येक आदिवासी गावात छोटी व मोठी अशा दोन होळी पेटविल्या जातात. होळी परंपरेला परंपरेनुसार आदिवासी बांधव छोटी होळी घरोघरी साजरी करतात. घराच्या अंगणात पश्चिम दिशेला ही होळी पेटविली जाते. या होळीपुढे सुख-समृद्धीकरिता प्रार्थना केली जाते. पश्चिम दिशेला ही होळी पेटविली जात असल्यामुळे या होळीला जीत (जिवंत) होळी म्हटली जाते, तर काही तिला उलटी होळीही म्हणतात. गाव नियोजन व प्रमुखाच्या निर्णयावर निर्धारित दिवसाला, गावाच्या पूर्वेला गावहोळी पेटविली जाते. मृतात्म्यांच्या शांतीकरिता, पूर्वजांच्या स्मरणार्थ ही होळी पेटविली जाते. पूर्व दिशेला पेटविल्या जाणा’या या मोठ्या होळीला काही मंडळी सरळ होळी, गोज होळीसुद्धा म्हणतात. होळी पेटल्यापासून पाच दिवस आदिवासी बांधव होळी खेळतात. फाग खेळतात. होळीची गाणी म्हणतात. टिमकी, ढोल, झांज, पावा, बासरी, डमरू, काठी, चिपडी, घुंगरूसह अन्य परंपरागत वाद्यांच्या संगतीने फागशी संबंधित ‘झामटा’ व ‘होरियार’ गीत गातात. या गीतांवर परंपरागत नृत्य करतात. गावाच्या मध्यभागी असलेली मंगलकारी ग्रामदेवता ‘मुठादेव’ आणि गावाच्या सीमेवरील ‘खेडादेव’ यासह राजा-राणीला आपल्या लोकगीतांतून ते होळी खेळायला आमंत्रित करतात. त्यांच्याबद्दल आदरही व्यक्त करतात.

होळी हा सण सतत पाच दिवस साजरा केल्यानंतर पाचव्या दिवशी मात्र एकत्र बसून वर्गणी (फगवा) मोजली जाते. पैशांची व धान्याची मोजणी केल्यानंतर फगवा मागण्यासाठी जी मंडळी होती, त्या मंडळींना एकत्र करून बोकड, कोंबड्या बोलावून त्याचा वाटा करून प्रत्येकाच्या घरात देतात किंवा एकत्र स्वयंपाक करून एकत्रित जेवतात. जेवणामध्ये गोड पुरी, मासळी व गोड भात या पदार्थांचा समावेश असतो. होळीनिमित्त मेळघाटातील काटकुंभ, चुर्णी आदी गावामध्ये मोठ्या यात्रादेखील भरत असतात.

मेळघाटातील होळीचा उत्सव नक्की पहा-क्लिक करा (आभार : जयंत वडतकर)

 

Previous articleबाज बहादूर आणि राणी रूपमतीची शोकांतिका
Next articleसूर्य गिळणारी मी: प्रामाणिक आणि पारदर्शी आत्मकथन
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here