सूर्य गिळणारी मी: प्रामाणिक आणि पारदर्शी आत्मकथन

-दीपा देशमुख, पुणे

‘सूर्य गिळणारी मी’ हे अरुणा सबाने या स्त्रीचं आत्मकथन वाचलं आणि सुन्न झाले. अरुणाचा प्रवास जणू काही मीच करून आले असा थकवा मला आला. कितीतरी वेळ त्यातले अनेक प्रसंग माझ्याभोवती फेर धरून नाचत राहिले. तिच्या कितीतरी आठवणींनी माझ्याच डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले. अरुणाचं आयुष्य मीच जशी जगले…..

आर्थिकदृष्ट्या संपन्न अशा एकत्र कुटुंबातली हुशार चुणचुणीत अशी अरुणा नावाची मुलगी, तिला वैद्यकीय शाखा घेऊन डॉक्टर व्‍हायचंय…तिच्या स्वप्नांबरोबर तिचा प्रवास सुरू होतो आणि त्या प्रवासात तिचं कुटुंब तिला ऊबदार वातावरण देत तिला सोबत करत राहतं. अरुणाचे वडील पुरोगामी विचारसरणीचे आणि कृतिशील असणारे, अरुणाच्या स्वभावातून आणि तिच्या जगण्यातून त्यांचं अस्तित्व सतत जाणवत राहतं. जणू काही त्यांचाच वारसा ती पुढे चालवत असावी.

सिमॉन द बोव्‍हा, बेट्टी फ्राईडन यांनी स्त्रीचं दुय्यमत्व जगाला दाखवलं, तिच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली, तिच्यावर होणाऱ्या अन्यायावर भाष्य केलं आणि मग असं वाटत राहिलं की परिस्थिती बदलते आहे. स्त्रीला मोकळा श्वास आता घेता येतोय, तिच्याबरोबर आता समता जपणारा पुरूष तिला साथ देतोय. पण हे अनुभव काहीच ठिकाणचे. अजूनही खूप लांबचा पल्ला आपल्याला गाठायचाय याची जाणीव मला या आत्मकथनाने करून दिली.

सर्वसामान्य स्त्रीची स्वप्नं असावीत अशीच स्वप्नं अरुणाने बघितली. आयुष्याचा जोडीदार, परस्परांवरचं प्रेम, एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करत संसार करत समाजोपयोगी कामं करता आली तर ती करावीत, इतकंच तिला हवं होतं. कॉलेजच्या गुलाबी दिवसांत तीही एका कार्यकर्त्याच्या प्रेमात पडली आणि प्रियकराचा नवरा होताच त्याच्यातल्या पुरुषी वर्चस्वाचे खरे रंग तिला दिसत गेले. आपण जसे आहोत तसंच वैयक्तिक आयुष्यात आणि सार्वजनिक आयुष्यात वागता का येऊ नये? अशी दोन व्‍यक्तिमत्व घेऊन का जगायचं? स्त्रीचं दुय्यमत्व, पुरुषी अहंकार आणि वर्चस्व हेच पुरुष म्हणून का हवं असतं? वनस्पतींना, पशुंना जपणारा कुणी पुरूष आपल्याच बायकोच्या बाबतीत इतका निर्दयी कसा होऊ शकतो असे अनेक प्रश्न ‘सूर्य गिळणारी मी’ हे आत्मकथन वाचताना पडत राहतात.

एक साधी सरळ, कुठलाही अभिनिवेश न घेता जगणारी अरुणा तब्बल १७ वर्षं नवऱ्याची मारहाण, छळ सहन करते हे वाचताना, का, का आणि का असे प्रश्न माझ्या मनात येत होते आणि त्याच वेळी ती या चक्रव्‍युहातून सुटू न शकण्याची कारणंही मला दिसत होती. पदरात पडलेली तीन लहान मुलं आणि प्रेमात पडून केलेलं लग्न निभावण्याची धडपड ही अरुणाला सहनशील बनवत राहिली. अवघ्या १४ महिन्यांच्या भुकेल्या बाळाला, ते रडतंय म्हणून थंडगार पाण्याच्या टाकीत बुडवणारा क्रूर बाप इथे भेटतो, बायकोकडून आपल्याला हवी तशी डायरी जबरदस्तीने लिहून घेणारा विकृत  नवरा इथे भेटतो, तिला गलिच्छ शिव्‍या देत, मारहाण करत तिची बदनामी करणारा नालायक पुरुष इथे भेटतो. अर्धा एक तास घरी यायला उशीर झाल्यावर त्याचा हिशोब मागणारा आणि आपल्याच बायकोला फरफटत त्या त्या ठिकाणी नेऊन वेळेचं गणित मांडून तिच्यावर यथेच्छ तोंडसुख घेणारा गलिच्छ नवराही इथे भेटतो.

आयुष्यात एक निर्णायक क्षण येताच अरुणाने कुठलीही तमा न बाळगता पाऊल उचललं. ती बाहेर पडली आणि तो प्रसंग वाचताना मी ढसढसा रडले, तिच्या नवऱ्याचा गळा घोटून खून करावा वाटला. मनुष्य इतका क्रूर, राक्षसी कसा होऊ शकतो या विचारानं मन अस्वस्थ झालं.

वयाच्या पस्तीशीनंतर नव्‍याने आयुष्याला सुरूवात करणारी अरुणा, जी मी या आत्मकथेतून बघितली, ती मला खूप जास्त भावली. वर्तमानपत्रात कॉलम लिही, शाली विक, अनेक छोटेमोठे व्‍यवसाय कर, अशा गोष्टी करत राहिली आणि एका सधन पाटील कुटुंबातली ही मुलगी ४०० रुपये भाडं असलेल्या २०० स्क्वेअर फूटांच्या एका खोलीत आपल्या मुलींसह राहू लागली. हे खूप अचंबित करणारं …कारण आज मी अनेक स्त्रिया अशा बघते की त्या डॉक्टर आहेत, इंजिनिअर आहेत, पण घरात त्या वाट्टेल तो छळ सहन करताहेत, पण बंडखोरीचं एक पाऊल उचलायला तयार होत नाहीत. कारण घराच्या बाहेरचं आर्थिक कुचंबणा होत असलेलं जगणं त्यांना नकोय. आपला सोन्याचा पिंजरा सोडायची त्यांची तयारी नाही.

घराच्या बाहेर पडल्यावरचा अरुणाचा संघर्ष, तिचा प्रामाणिकपणा, तिचे कष्ट, तिचा स्वाभिमान, तिची धडपड आणि त्यातून तिने साकारलेलं जग मला खरोखरंच स्तिमित करून गेलं. ‘२०० रुपये कमवायची लायकी नाही’ असं म्हणून खिजवणारा नवरा मागे सोडून आल्यावर जवळ एक पै नसताना तीन मजली इमारत भाड्याने घेणं, मुलींसाठी वसतिगृह चालवणं, आकांक्षासारखी प्रकाशन संस्था चालवणं, त्रैमासिक चालवणं, दिग्गज साहित्यिकांची २०० च्या वर पुस्तकं प्रकाशित करणं, ‘मुन्नी’, ‘विमुक्ता’सारखं दर्जेदार लिखाण करणं, जलसंवर्धनात कार्यरत राहणं, अनेक चळवळींशी जोडून सक्रिय असणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्यायग्रस्त, पीडित, शोषित अशा स्त्रियांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं, ‘दक्षिणायन’ सारख्या डॉ. गणेश देवींबरोबरच्या चळवळीत सामील होणं, महाराष्ट्र फाउंडेशनसह अनेक पुरस्काराने सन्मानित असतानाही जमिनीवर पाऊल घट्ट रोवून उभं राहणं, वैयक्तिक जगण्यातले अडथळे दूर केल्यानंतर सुखात पुढलं आयुष्य व्‍यतीत करण्याऐवजी स्वत:मधल्या कार्यकर्त्याला जागं ठेवून कामात सक्रिय राहणं अशा अनेक गोष्टींमुळे अरुणा तुला मनापासून सलाम इतकंच मी म्हणेन.

‘सूर्य गिळणारी मी’ हे आत्मकथन खूपच प्रामाणिक आणि पारदर्शी आहे. कुठेही स्वत:चा बडेजाव किंवा टिमकी वाजवणारा सूर यातून ऐकू येत नाही. किंवा मी किती बिचारी, द्या मला सहानुभूती असंही रडगाणं नाही. जे घडलं ते जसंच्या तसं व्‍यक्त करणारी एक निर्भिड आणि धडाडीची स्त्री आपल्याला या आत्मकथनातून भेटते. लोकांना आवडलं पाहिजे, माझी प्रतिमा उजळती राहिली पाहिजे, त्यात नाट्यमयता आणली पाहिजे, माझं आजचं स्थान उच्चतम पातळीवर नेलं पाहिजे आणि माझा उदो उदोही मीच त्यातून पेरला पाहिजे असं काहीही या आत्मकथनातून औषधालाही सापडत नाही, हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य.

नागपूर येथील प्रकाशन समारंभ – नामवंत साहित्यिक सुरेश द्वादशीवार , लोकमत नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने , प्रख्यात कवी लोकनाथ यशवंत , नामवंत समीक्षक प्रा. प्रमोद मुनघाटे , अरुणा सबाने

लेखिकेनं तिच्या प्रवासाबरोबरच अनेक स्त्रियांचा प्रवासही आपल्याला घडवला आहे, त्या कहाण्या ऐकून अंत:करण भरून येतं. तिला सोबत करत राहिलेल्या तिच्या मैत्रिणी आणि स्नेही, मित्र, मार्गदर्शक यांच्याविषयीची अरुणाची कृतज्ञता तिच्या शब्दांमधून पाझरताना दिसते. कोणाविषयी तिरस्कार, द्वेषभावना, खापर फोडण्याची वृत्ती सापडत नाही. तिला कुठल्याही गोष्टीचा हव्‍यास नाही. तिला गरीब असणं किंवा श्रीमंत असणं याचंही अप्रुप नाही म्हणूनच तिला कुठलेही मोह अडकवू शकत नाहीत. त्यामुळेच लाडाकोडात वाढलेली असतानाही अरुणा नवऱ्याबरोबर झोपडपट्टीसारख्या भागातही विनातक्रार संसार करते, विहिरीवरून पाणी शेंदून आणते, पाट्यावरवंट्यावर मसाला वाटते, आपलं घर उभारण्यासाठी चोवीस तास कष्ट करते. ही अरुणा अनेकांसाठी प्रेरणा देणारी आहे. ती सावित्रीबाई फुलेंचा विशेषांक काढते, त्यामध्ये ती  ‘संपादक अरुणा सबाने’ असं लिहिते. अनेकजण तिला चुकून संपादक झालंय का, तिथे संपादिका हवंय असं सांगतात तेव्‍हा ती ठामपणे संपादकच लिहिते. तिच्यावर नवऱ्यानेच चिखलफेक केल्यावरही तिचं भलं चिंतणाऱ्या स्नेह्यांबरोबरचे संबंध ती जपते, त्यांना तोडत नाही. एकटं राहणाऱ्या स्त्रीच्या वाट्याला काय अनुभव येतात याविषयी देखील ती मोकळेपणाने लिहिते आणि समोरच्याला सडेतोड उत्तरही देते. स्वत:वर प्रेम करता आलं पाहिजे असं ती सांगते.  स्वत:च्या शरीरावर पहिला स्वत:चा  हक्क असला पाहिजे आणि स्त्रीनं नकार द्यायला शिकलं पाहिजे असं ती म्हणते, लोकांची पर्वा ती करत नाही, आपलं मन काय सांगतं त्याचाच कौल ती ऐकते. आई-वडील, भाऊ-बहीण, मार्गदर्शक, स्नेही यांचं प्रेम, काम करत असतानाचे अनुभव आणि पुस्तकांनी दिलेलं शहाणपण यांची शिदोरी बरोबर घेऊन ती चालतताना दिसते.

या पुस्तकातला अरुणा सबाने हिचा एक संवाद – तिला विचारलं जातं, एकटं राहून तुझ्या शारीरिक गरजा कशा भागवू शकतेस? तेव्‍हा ती म्हणते, एखाद्याला सेक्समधून जेवढा आनंद मिळत नसेल, तितका आनंद मी करत असलेल्या नवनिर्मितीच्या कामांमधून मला मिळतो. सेक्स म्हणजे शेवटी आहे काय? आपापल्या पद्‍धतीने आयुष्यात पराकोटीचा आनंद मिळवणं. जो आनंद मला पुस्तक निर्मितीतून मिळतो, एखाद्या संकटग्रस्त स्त्रीला न्याय मिळवून देताना मिळतो.

‘सूर्य गिळणारी मी’ हे शीर्षक मला विशेष वाटलं. एक तप्त सूर्य गिळणं हे किती दाहक असू शकतं याची कल्पनाही करवत नाही. अशी ही स्त्री मला सूर्यासारखी तेजस्वी आणि अर्थपूर्ण जगणं शिकवणारी वाटते. चंद्रमोहन कुलकर्णीं यांनी अतिशय सुरेख मुखपृष्ठ केलं असून यातली सुरुवातीची सूर्यासारखी तप्त पानं आतल्या प्रवासाची चाहूल करून देणारी – केशरी रंगाची आहेत. जवळजवळ ५०० पानी पुस्तकातला प्रवास कधी सूर्याची कोवळी किरणं घेऊन येतो, तर कधी प्रखर रूप लेवून अंगाची लाही लाही करतो, मात्र सूर्यास्ताकडे जाणारा हाच सूर्य शांत, समाधानी आणि तृप्त होऊन अरुणाच्या रुपात येऊन भेटतो. अरुणामधल्या झुंजार कार्यकर्तीला हॅट्स ऑफ!

प्रत्येक स्त्रीने वाचलंच पाहिजे आणि आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधला पाहिजे 

असं आत्मकथन म्हणजे ‘सूर्य गिळणारी स्त्री’!

प्रत्येक पुरुषाने वाचलंच पाहिजे आणि आपल्यातल्या पुरुषी अहंकाराला मूठमाती दिली पाहिजे 

हे सांगणारं आत्मकथन म्हणजे ‘सूर्य गिळणारी स्त्री’!

प्रत्येक मुलामुलीने हे पुस्तक वाचलं पाहिजे, कारण प्रवासात 

काटेकुटे, वादळ आणि संकट आलं तरी त्या प्रवासाला शांत, सौम्य पण अर्थपूर्ण

कसं करायचं हे सांगणारं 

मनोविकास प्रकाशित ‘सूर्य गिळणारी मी’ अरुणा सबाने लिखित आत्मकथन 

जरूर वाचा!

(पुस्तकासाठी संपर्क -मनोविकास प्रकाशनhttps://bit.ly/3torHrp

निखिल वाघमारे, BookKatta online store -8999989763

…………………………………….

(दीपा देशमुख या नामवंत लेखिका , ब्लॉगर व सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)

Previous articleमेळघाटातील होळीचा अनोखा उत्सव!
Next articleएका संजीवनी (गूढ )बेटावरचा एक दिवस!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.