बाज बहादूर आणि राणी रूपमतीची शोकांतिका

-डॉ. मुकुंद कुळे

…………………………….

माळव्याचा सुलतान बाज बहादूर आणि त्याची राणी रूपमती… अगदी अभिन्न जीव. जखम एकाला झाली, तर इलाज दुसऱ्यावर करावा लागावा, इतकं एकरूपत्व. इतकं एकमेकांत मिसळून जाणं. म्हणायला दोन शरीरं, पण त्यांतलं प्राणतत्त्व एकच जणू!

… म्हणून तर माळव्याच्या संपन्न भूमीवर पाऊल ठेवल्यापासूनच त्या दोघांच्या प्रेमाच्या अलवार कथा कुठून कुठून कानांभोवती आंदोलत राहतात. जणू त्यांची प्रेमकथा म्हणजे माळव्याच्या भूमीत उमललेलं एक प्रणयफूल! मध्ययुगात सोळाव्या शतकात आकाराला आलेली ही कथा. बाज बहादूर हा माळव्याचा शेवटचा स्वतंत्र सुलतान, तर रूपमती एका सामान्य घरातील युवती. एकदा जंगलात शिकारीला गेलेला असताना बाज बहादूरच्या कानावर गाण्याचे काही सुकोमल स्वर पडले आणि शिकार सोडून तो त्या स्वरांच्या दिशेने वाहावत गेला… नि जिथे पोचला, तिथलं दृश्य पाहून वेडावूनच गेला. त्याच्यासमोर गाणं आणि लावण्याचा दस्तुरखुद्द मिलाफ बसलेला होता. रूपमती लाजवाब गायिका तर होतीच, वर लावण्याखणीही होती.

बाज बहादुराला रूपमतीच्या गाण्याने वेडं केलं की सौंदर्याने ठाऊक नाही, पण तो स्वतःही गाण्यातला दर्दी होता. त्याला गाण्याचा गळा आणि कान दोन्हीही होतं म्हणे… त्यामुळे त्याने तिथेच रूपमतीला लग्नाची मागणी घातली. शेवटी सुलतानच तो, त्याला नाही म्हणायची प्राज्ञा ना रूपमतीची होती ना तिच्या पालकांची. तरीही रूपमतीने त्याला ठणकावून सांगितलं म्हणतात- मी तुझ्याबरोबर येईन, पण माझा धर्म बदलणार नाही आणि मला आचार-विचारांचं स्वातंत्र्यही तुला द्यावं लागेल…!’ बाज बहादुराने कसलेच आढेवेढे घेतले नाहीत. त्याला तिला बंधनात ठेवायचं नव्हतंच मुळी. त्याला तिला मनमुक्त गाऊ द्यायचं होतं आणि तिचं गाणं मनसोक्त ऐकायचं होतं. त्याने तिची अट विनातक्रार मान्य केली. मग तीही आली त्याच्याबरोबर विनासायास. एवढंच कशाला, रूपमती वाढली होती नर्मदेच्या काठावर. नर्मदेच्या दर्शनाशिवाय ती कधीच अन्न-पाणी ग्रहण करत नसे. तेव्हा तिच्यासाठी त्याने आपल्या मांडवगडावर (मांडू) अगदी उंच ठिकाणी खास वास्तूही उभारली, जी आज रूपमती मंडप नावानेच ओळखली जाते. त्या मंडपातील एका उंच मनोऱ्यावरून रूपमतीला आपल्या माता नर्मदेचं दर्शन घडायचं… एवढं सगळं बाज बहादुराने केल्यावर रूपमतीही फार काळ आपल्याला रोखू शकली नाही. तिने स्वतःला केलंच त्याला समर्पित. तिनेच कशाला त्यानेही केलं स्वतःला तिला समर्पित.

एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दोन वेडे जीवच तर होते ते दोघं… पण त्यांचं हे प्रेम चिरकाल टिकलं नाही. त्यांच्या प्रेमाचा कळसाध्याय सुरू होण्याआधीच तत्कालीन मुघल बादशहा अकबराने माळवा प्रांत काबीज करण्यासाठी सैन्य पाठवलं. तेव्हा मुघल सरदाराशी झालेल्या युद्धात बाज बहादुराचा टिकाव लागला नाही. त्याला पळ काढावा लागला. मांडू किल्ला मुघलांच्या हातात गेला. तेव्हा राणी रूपमतीच्या सौंदर्याची ख्याती ऐकून असलेला तो मुघल सरदार तिला वश करण्यासाठी लगेच तिच्या महालाकडे धावला. पण तिथे जाऊन पाहतो तर काय, तिचं प्राणपाखरू केव्हाच उडून गेलेलं. आपल्यावरचा बाका प्रसंग ओळखून रूपमतीने आपल्या अंगठीतला हिरा गिळला म्हणे. कारण तिला मंजुरच नव्हतं, बाज बहादूर सोडून दुसऱ्या कुणा पुरुषाची स्त्री होणं… रूपमतीच्या मृत्यू पश्चात तिच्या गावी सारंगपूरजवळ तिची समाधी बांधण्यात आली आणि तिच्या मृत्यूची खबर कळताच त्या बाज बहादुरानेदेखील म्हणे त्या समाधीवरच डोकं आपटून आपल्या आयुष्याची समाप्ती केली.

राणी रूपमती आणि बाज बहादुराच्या विफल प्रेमाच्या अशा अनेक दास्ताँ माळव्याच्या भूमीत रुजलेल्या आहेत. लोकस्मृतींत दडलेल्या आहेत. आजही त्यांच्या प्रेमाची कथा रंगवून रंगवून सांगितली जाते. परिसर बदलला की क्वचित कथेच्या आशयात थोडाबहुत फरक पडतो, पण रूपमती आणि बाज बहादुराच्या प्रेमावर मात्र कुणीच संशय घेत नाही. किंबहुना त्यांच्या प्रेमावर संशय घेणं, म्हणजे प्रेम या संकल्पनेवरच संशय घेण्यासारखं. इतकं त्या दोघांचं प्रेम पाक म्हणजे पवित्र मानलं जातं. नव्हे, त्यांचं प्रेम ही आता माळव्याच्या भूमीतील सर्वाधिक लोकप्रिय दंतकथाच बनली आहे. ते एक मिथक बनून गेलंय. मिथक संपूर्ण खरंही नसतं आणि पूर्णपणे खोटंही नसतं. ते कायम खऱ्या-खोट्याच्या सीमारेषेवर आंदोलत राहतं. मिथक ज्या भूमीत जन्माला येतं, त्या भूमीवरील लोकांच्या भावभूमीत ते जेवढं जपलं जातं, तेवढं ते अधिक घट्ट, अधिक पक्क होत जातं. एकप्रकारे समाजाचं हे भावभिजलेपणच मिथकांना जन्माला घालत असतं. राणी रूपमती आणि माळव्याचा सुलतान असलेल्या बाज बहादुराच्या प्रेमाचं मिथक असंच जन्माला आलंय. हे दोघं इतिहासात होऊन गेले हे खरंच आणि त्यांची प्रेमकथाही खरीच. पण त्यांच्या प्रेमकथेला साज चढवला तो लोकमानसाने आणि हा साज चढवताना, रूपमती हिंदू होती आणि बाज बहादूर मुस्लीम होता, हे माळव्याच्या लोकमानसाच्या कधी ध्यानीमनीही आलं नाही. कारण प्रेमाला जाती-धर्माची बंधनं नसतातच ठाऊक. उलट माळव्याच्या भूमीत एक उत्कट प्रेमकथा आकाराला आल्याचं समाधानच आजवर माळव्याच्या लोकमानसाने अभिमानाने मिरवलं आहे…

… अन् तरीही परवा मांडूला फिरताना बाज बहादुराचा महाल पाहायला गेलो आणि मनावर चरचरीत ओरखडा उमटला. बाज बहादुराच्या महालाबाहेर पुरातत्त्वविभागाच्या वतीने महालाची माहिती देणारी संगमरवरी पाटी बसवलेली आहे. हिंदी आणि इंग्रजीत असलेल्या त्या पाटीवर बाज बहादुराच्या महालाची माहिती देण्यात आली आहे. साहजिकच ही माहिती देताना बाजबहादूर आणि राणी रूपमती दोघांची नावंही तिथे ओघाने आलेली आहेत. मात्र हिंदी पाटीवरील बाज बहादूर की रानी रूपमती या ओळीतील रानी हा शब्द खरवडून खरवडून खोडून टाकण्यात आला आहे. त्याचप्रमाणे इंग्रजी पाटीवर असलेल्या HIS QUEEN या उल्लेखातून HIS हा शब्द खरवडून काढून टाकण्यात आला आहे. जणू काही बाज बहादूर आणि रूपमतीचा काही संबंधच नव्हता… आणि हे का तर बाज बहादूर मुस्लीम होता आणि रूपमती हिंदू होती म्हणून! परंतु केवळ हिंदू व मुस्लीम एवढाच इथला कळीचा मुद्दा नाहीय, तर त्यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे- बाज बहादूर हा मुस्लीम होता आणि त्यातही तो पुरुष होता, तर रूपमती आधीच हिंदू नि त्यात स्त्री. मात्र इथे मामला, इतिहासात ते कोण होते आणि काय होते हा नाही, तर इथे संबंध आहे तो आताच्या आधुनिक काळातील लव जिहादचा. आताच्या लव जिहादच्या नजरेतून बघितलं तर, बाज बहादूर आणि रूपमतीची प्रेमकहाणी म्हणजे जणू काही एका मुस्लीम पुरुषाने एका हिंदू स्त्रीला पद्धतशीरपणे प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचं केलेलं धर्मांतरच… प्रत्यक्षात बघायला गेलं तर राणी रूपमतीच्या धर्मांतराचे दाखले सापडत नाहीत. पण लव जिहादची रट लावून बसलेल्या सध्याच्या तथाकथित धर्ममार्तंडांना हे कोण सांगणार? त्यांच्या नजरेतून मुस्लीम पुरुष आणि हिंदू स्त्रीचा प्रत्येक विवाह म्हणजे- लव जिहादच…

मग यातून पाचशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या बाज बहादूर आणि राणी रूपमतीसारख्या इतिहासकालीन व्यक्तीही सुटत नाहीत!

(लेखक नामवंत पत्रकार व लोककला-लोकसंस्कृतीचे अभ्यासक आहेत)

9769982424

मुकुंद कुळे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –मुकुंद कुळे– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous article‘सूर्य गिळणारी मी’ या आत्मकथनाच्याच्या निमित्ताने…
Next articleमेळघाटातील होळीचा अनोखा उत्सव!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.