‘सूर्य गिळणारी मी’ या आत्मकथनाच्याच्या निमित्ताने…

महाराष्ट्रातील नामवंत सामाजिक कार्यकर्त्या , ‘आकांक्षा’ मासिकाच्या संपादक, ‘मुन्नी’ , ‘विमुक्ता’ , ‘त्ते आठ दिवस’ आदी गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका अरुणा सबाने यांचे आत्मकथन ‘सूर्य गिळणारी मी’ चे आज अमरावतीत नामवंत कवयित्री प्रभा गणोरकर यांच्या हस्ते प्रकाशन होत आहे . त्यानिमित्ताने पुस्तकाचा परिचय करून देणारा लेख -संपादक

………………………

-डॉ.आशा भागवत, पुणे

मी गेली दहा वर्षं माझा वैद्यकीय व्यवसाय सांभाळून फ्रीलान्स एडिटिंग, प्रूफरिडिंग करतेय. वाचनाचे व्यसन, आणि बाजारात येणारी नवनवीन पुस्तकं वाचायला मिळावीत, तीही फर्स्ट डे, फर्स्ट शो असाही स्वार्थ त्यामागे असतोच. दररोज वीस, पंचवीस पानं वाचल्याशिवाय झोपायचं नाही, या शिस्तीने वाचत गेले, समृध्द होत गेले. वाचताना आशयाची नेमकी मांडणी, बारकावे समजत गेले, व्याकरणातील, शब्द लिहिताना झालेल्या चुका(किरकोळसुध्दा) खुपू लागल्या. मग वाचनाबरोबर हेही काम सुरू केलं. आवडलेल्या पुस्तकांवर मासिकांमधून मतही नोंदवत गेले. या दहा वर्षात खूप आशयघन, विचारप्रवृत्त करणारी पुस्तकं वाचायला मिळाली. स्री-साहित्य, चळवळीतल्या स्रियांचे आत्मचरित्र हा तर माझा जिव्हाळ्याचाच विषय! गेल्या काही वर्षांत प्रकाशित झालेल्या स्वत्व सांभाळून जगणं शिकवणार्‍या, मार्ग दाखवणार्‍या स्रीवादी दोन  पुस्तकांचा उल्लेख मला करावासा वाटतो, ती म्हणजे, ऐश्वर्य पाटकर यांचे ‘जू’ आणि अरुणा सबाने यांचे प्रकाशित होत असलेले’ सूर्य गाळणारी मी’ हे आत्मचरित्र!

सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका अरुणा सबाने यांची याआधी प्रकाशित झालेली पुस्तके ही स्रियांचा फक्त संघर्ष चितारून थांबत नाहीत, तर अत्याचाराला सक्रिय विरोध करत, नवर्‍याला सोडून एकटीनं जगताना शून्यातून विश्व उभं करताना दिसतात. त्यांच्या  ‘विमुक्ता’ मधील या नव्या जोमाच्या तडफदार नायिका(वैदेही, वसुधा) खूप भावल्या होत्या, स्री – व्यक्तिवादाची नवी वाट दाखवू पाहत होत्या. तो तडफदारपणा, तो आत्मविश्वास त्या नायिकांना लेखिकेने स्वतः जगलेल्या संघर्षपूर्ण वैवाहिक आयुष्यामुळे मिळाला आहे, हे आज अरुणाताईंच्या आत्मकथनातून जसं समजतंय, तसंच या वाटेवर स्वत्व सांभाळून चालण्यासाठीचे आत्मबळ, ऊर्जाही मिळतेय, तशी ती मलाही मिळालीच आहे.

 विवाहसंस्थेने, एकूणच समाजाने आजही स्रीला सामाजिक उतरंडीत पुरुषाच्या तुलनेत दुय्यमच स्थान दिलं आहे, हा प्रत्येक स्रीचा अनुभव आहे. काही वर्षांपूर्वी नात्यातल्या माझ्या एका दिराचं, निलेशचं लग्न त्यानेच ठरवून, पसंत करून पार पडलं. प्रांजली एक उच्चशिक्षित, आयटी कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला होती. पगारही निलेशपेक्षा जास्तच होता. असं असूनही घरच्या चांगल्या संस्कारांमुळे (??) ती आज्ञाधारक, गृहकृत्यदक्ष, धार्मिक व्रतवैकल्ये करणारी अशी होती. कुठे नावं ठेवायला जागाच नाही..  लग्नापूर्वीचं त्यांचं मैत्रीपूर्ण नातं मनाला सुखावत होतं… एक चांगलं सहजीवन फुलणार याचा आनंद होता. तीन, चार  महिन्यानं भेटायला गेले असता जाणवलं, पूर्वी आत्मविश्वासाने वावरणारी प्रांजली चक्क गोंधळलेली, बावरलेली होती. लग्नाआधी नवर्‍याला मैत्रीपूर्वक एकेरी नावाने हाक मारणारी आता अवघडून आदरार्थी ‘अहो’ संबोधत होती. मलाच खटकलं, मी निलेशला याबद्दल विचारलं,” अरे, किती छान नातं होतं तुमच्या दोघांत! आता असं हे अवघडलेपण का? नवरा बनण्यापेक्षा तिचा छान मित्रच बनून रहा न! चांगलं सहजीवन जगता येईल!”  यावर क्षणाचाही विलंब न लावता त्याने उत्तर दिलं,” नको, नवरा-बायकोचंच नातं ठीक आहे माझ्यासाठी!” दोघांतलं नातं कसं असावं, हे एकटा पुरुषच कसा काय ठरवू शकतो? ज्या मैत्रीपूर्ण नात्याच्या भरवशावर स्रिया आपलं उबदार घरटं सोडून, लग्नं करून येतात, ही त्यांची झालेली फसवणूक, विश्वासघातच नाही का? 

लग्न झाल्यावर आता ही कुठे जाईल? तक्रार करण्याची काय हिंमत करेल? कारण त्यात बदनामी तिच्या माहेरच्या संस्कारांचीच होईल, हे पूरेपूर ओळखून असलेले पुरुष लग्नानंतर सोयिस्कररित्या ‘नवरा’ या पदाला असलेली समाजमान्य प्रतिष्ठा (जी काहीही न करताच सहज मिळते) मिळवण्यासाठी सगळं विसरून फक्त ‘नवरा-बायको’ हेच नातं रूढ करू पाहतात.

 अरुणाताईंच्या वाट्यालाही हा विश्वासघात आला, पण नशिबाला दोष देत ‘पदरात पडलं… ‘ असं न मानता त्यांनी याला जमेल तसा विरोध सुरू ठेवला. गुंतलेल्या भावनांचे धागे इतक्या सहजासहजी त्यांना तोडता आले नाहीत, नवर्‍यासारखे!त्यांच्या प्रत्येक विरोधामुळे आणखी तीव्र होत गेलेले अत्याचार भोगून त्यांनी केलेल्या प्रेमाची सव्याज किंमत त्यांनी मोजली. आज सुधारेल, उद्या उपरती होईल या आशेवर त्या घर, मुलं आणि नवराही सांभाळत राहिल्या. आणि जेव्हा जिवावरच बेतेल अशी परिस्थिती आली तेव्हा मात्र खंबीर पाऊल उचलत, नवर्‍याचा त्याग करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला.

 बाई ही जन्मजात सोशिक असते की पिढ्यानपिढ्या दुय्यमत्वाच्या अंगी भिनलेल्या विचारांमधून हे सोशिकपण येतंय, याचा शोध मानसशास्राने खरंच लावायला हवा! आणि सोशिकतेची हद्द कोणती म्हणायची? ती कुणी ठरवायची? मारहाण झाली तरच अन्याय अत्याचार झाला असं म्हणायचं का? आणि मग उठता बसता सतत अपमान, लायकी काढून शिव्याशाप, माहेरच्यांचा उध्दार किंवा वागणूकीतूनही दुय्यमत्वाची भावना स्रीला जाणवून दिली जात असेल तर…  तो अत्याचार का नाही समजायचा?

 काही बायकाच सांगतील याचं उत्तर की, ‘बाईनं त्याकडे दुर्लक्ष करायचं, संसार टिकवण्यासाठी, मुलांच्या भल्यासाठी एका कानाने ऐकायचं नि दुसर्‍याने सोडून द्यायचं!’ ही त्यांच्यामते सोशिकता आहे. 

 अरुणाताई समाजाच्या या दुटप्पी विचारांना अनेक प्रसंगातून आपल्या समोर आणतात, विचार करायला भाग पाडतात. मी कोणत्या गोष्टीसाठी किती आणि कुठवर अन्याय सहन करू शकते, हे ठरवण्याचा हक्क फक्त त्या अन्याय सहन करणार्‍या स्रीला आहे. वाद वाढेल या भीतीने संसार वाचवण्यासाठी  गप्प राहून  सहन करत राहण्याचा मार्ग धोकादायक ठरू शकतो, हे वेळीच ओळखायला हवं ही जाणीव अरुणाताई करून देतात. अन्याय करणार्‍यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी ठरतो, हे त्रिकालाबाधित सत्य स्री अत्याचारालाही लागू पडतं, हे लक्षात ठेवलंच पाहिजे.

 अरुणाताईंना सतरा वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात जे सहन करावं लागलं, त्यातून ‘समाजसेविका अरुणा सबाने’ ने जन्म घेतला. त्या म्हणतात, ‘त्याने जर मला एवढं खरवडून काढलं नसतं, सतत माझ्या अस्मितेच्या चिंध्या केल्या नसत्या तर मी कदाचित घर सोडण्याची हिंमतच केली नसती, माझ्या आयुष्याला मी एवढा न्याय देऊ शकले नसते…”

बरोबरच असेल कदाचित! पण राहूनराहून मला मात्र वाटत होतं, अरुणा सबाने हे व्यक्तिमत्त्वच मुळात बालपणापासूनच इतकं तडफदार, स्वाभिमानी समाजाभिमुख आहे की हे या वैयक्तिक अत्याचारांना तोंड देण्यात सतरा वर्षांचा जो काळ सुप्तावस्थेत वाया गेला, त्यात त्यांच्या हातून अजूनही किती समाजाला उपयुक्त कामं पार पडली असती!!! आणखी कितींचे जीवन सुधारले असते? हा समाजाचाच तोटा झालाय. अरुणाताईंनी जे समाजकार्य केलंय त्याचं सगळं श्रेय फक्त त्यांच्या अंतःप्रेरणेला द्यावं लागेल.

 या आत्मकथेतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ज्याचा उल्लेख अरुणाताई स्वतः करतातच, ती म्हणजे, ‘कोणत्याही परिस्थितीत हार न मानता आयुष्य समरसून जगण्याचा त्यांचा प्रयत्न,’ ज्यामुळे कठीण परिस्थितीतही त्यांना स्वतःचा मार्ग शोधता आला. जगायचं कसं, याचा वस्तुपाठच आहे हे आत्मचरित्र! स्री संघर्षाला, अन्यायाला वाचा फोडणं, समाजाच्या दुटप्पी, ढोंगी मानसिकतेला उघडं पाडणं, या उद्देशानं लिहिलेले बरंच स्रीवादी साहित्य सापडतं. पण या उद्देशांच्या पलीकडे जाऊन हे आत्मचरित्र आणखीही मौल्यवान असं काही शिकवून जातं, जे व्यक्ती म्हणून मला आतून सक्षम करतं. फक्त स्री म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून मी स्वतःसाठी ठरवलेलं चांगलं आयुष्य जगायचा मला हक्क आहे याची जाणीव करून देत तसं जगण्यासाठी प्रोत्साहित करतं.

 फक्त अन्याय होत असल्याची जाणीव असण्याला ‘आत्मभान’ म्हणता येईल का? तसं म्हणावं का? छळ निमूटपणे सहन करत, आसवं गाळत कुटुंबासाठी स्वतःच्या आयुष्याचाच बळी चढवणं, यात कुठलीच प्रतिष्ठा नाही. ही फक्त जगण्याची लाचारी म्हणता येईल. त्या स्वत्वाच्या जाणिवेचं पुढे काही सकारात्मक कृतीत रूपांतर होणं हे खरं आत्मभान!!स्वतःच्या खपली चढलेल्या जखमा आत्मकथेसाठी पुन्हा भळभळत्या करून अरुणाताईंनी त्या पोटतिडकीनं, खुलेपणानं  वाचकांसमोर मांडल्या आहेत. असं करणं त्यांच्यासाठी निश्चितच अवघड झालं असणार! पण आपल्या संघर्षातून इतर स्रियांसाठी माणूस म्हणून स्वाभिमानाने जगण्याचा, स्वतःच्या अस्मितेला आधी प्राधान्य देत त्याला जपण्याचा, त्यासाठी निर्धाराने लढण्याचा आत्मविश्वास त्यांनी दिला आहे. फक्त चूल, मूल यांतच आणि यासाठीच तडजोड करण्यात धन्यता न मानता स्वतःच्या क्षमतांना ओळखून, त्यांचा सर्वोत्तम विकास घडवून आणण्याची एकही संधी स्रियांनी दडवता कामा नये, असा तळमळीचा संदेश त्या त्यांच्या कृतीतून देत राहतात. स्री सक्षमीकरणाचा मार्ग इतक्या स्षष्टतेने समोर मांडणार्‍या अशा साहित्याची आज खूप गरज आहे. अरुणा सबानेंच्या संघर्षाच्या मार्गाला तळागाळातल्या भगिनींपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. बचत गटांतून, महिला संस्थांमधून, आधार केंद्रांमधून या आत्मकथेचे वाचन व्हायला हवे. 

Previous article-तर काँग्रेसचं अस्तित्व सूक्ष्मदर्शक यंत्रातून शोधावं लागेल… 
Next articleबाज बहादूर आणि राणी रूपमतीची शोकांतिका
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here