-तर काँग्रेसचं अस्तित्व सूक्ष्मदर्शक यंत्रातून शोधावं लागेल… 

-प्रवीण बर्दापूरकर

पाच राज्याच्या निवडणुकांत अपेक्षेप्रमाणे भाजपनं उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सत्ता प्राप्त केली . गोव्यामध्ये बहुमताच्या काठावर असल्यानं याही राज्यात आता भाजपची सत्ता येणं ही केवळ औपचारिकता होती ; मणिपूरबाबतही तेच म्हणजे चार राज्यात भाजपनं यश संपादन केलं . पंजाबमध्ये अपेक्षेप्रमाणे आम आदमी पार्टीनं ( आप  ) अनपेक्षितपणे बंपर यश मिळवलं आहे . हे निकाल लक्षात घेता येत्या विधानसभा व लोकसभा  निवडणुका , राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील भाजपचा विजयाचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि यापुढील सर्व निवडणुकांत नरेंद्र मोदी हेच भाजपचा चेहेरा असतील यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे . हे निकाल जनतेनं दिलेले असल्यामुळे ‘ते आम्हाला मान्य नाहीत’ किंवा या निकालानंतर स्थापन होणाऱ्या ‘सरकारचं नेतृत्व आम्ही स्वीकारणार नाही’ ही भाषा अलोकशाहीवादी आहे .

भाजप विरोधकांना जेव्हा निवडणुकात यश मिळत होतं तो जनतेचा कौल होता आणि भाजपला मिळालेला कौलही जनतेचाच आहे ; शिवाय  तेव्हा ‘हा निकाल आम्हाला अमान्य आहे’ अशी अलोकशाहीवादी भाषा भाजपनं कधी केलेली नव्हती , हे लक्षात घ्यावंच लागेल . भाजपच्या विजयाबाबत बोललं/लिहिलं जात आहे , यापुढेही लिहिलं/बोललं जाईल .  पण , या पांच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा जनतेकडून मिळालेला कौल म्हणजे , काँग्रेस पक्ष आता मोडून पडण्याच्या अवस्थेत आलेला आहे हा धोक्याचा ( आणि तोही बहुदा शेवटचा ) इशारा आहे , हे लक्षात न घेण्याची महाग पडणारी चूक काँग्रेसनं कधीही करु नये .केवळ , पक्ष जुना आहे , सर्वसमावेशक आहे , हिंस्र धर्मवादी नाही  किंवा एखाद्या नेतृत्वाचा करिष्मा आहे म्हणून निवडणुकीत यश मिळत नाही हा , धडा काँग्रेसला या निकालांनी दिलेला आहे . उत्तरप्रदेश , उत्तराखंड आणि पंजाब  विधानसभा निवडणुकांत काँग्रेसची जी दाणादाण उडालेली आहे त्या पार्श्वभूमीवर तर हा काँग्रेससाठी शेवटचा इशारा समजायला हवा . आता तरी खडबडून जागं व्हावं , अन्यथा काँग्रेस पक्षाच्या हातून संपूर्ण देशच गेलेला असेल .

पंजाब आणि उत्तराखंड या राज्यांचे निकाल म्हणजे काँग्रेस पक्षात निर्णय घेणाऱ्या नेत्यात जाणते लोक कसे राहिलेले नाहीत , याचं उत्तम उदाहरण आहे . निवडणुकीच्या तोंडावरच अमरिंदर सिंग यांना नाराज करुन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेणं , चरणजीत चेन्नी यांना मुख्यमंत्री करणं आणि नवज्योतसिंग सिद्धू सारख्या गावगन्ना सोंगाड्याला अकारण महत्त्व देणं , असे अनेक चुकीचे निर्णय पंजाबात घेतले गेले . सिद्धू हा कधी मैदानावरही फार मोठा खेळाडू नव्हता आणि त्याची राजकीय समजही बेतास बात आहे . मनोरंजन वाहिन्यांवरच्या बाष्कळ रियालिटी शोमध्ये तो बऱ्यापैकी लोकप्रिय आहे . ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यानं काँग्रेसचं पंजाबातील राजकारण बाष्कळ करुन टाकलं . मनोरंजनाच्या कार्यक्रमातील असे सोंगाडे राजकारणाच्या पटावर नेहमीच यशस्वी ठरत नसतात  . काँग्रेसच्या नेत्यांना मात्र सिद्धू म्हणजे जणू रामचंद्रन , जयललिता किंवा एन . टी . रामाराव असल्याचा ( बालीश ) साक्षात्कार झाला .  काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनीही सिद्धूच्या तालावर नाचायला सुरुवात केली तेव्हाच काँग्रेसचा पंजाबातील पराभव अटळ झालेला होता .

स्वातंत्र्योत्तर काळात उत्तरप्रदेश हा काँग्रेसचा गड राहिलेला आहे . राम  जन्मभूमी आंदोलनापासून या पक्षाची या राज्यावरची पकड ढिली होण्यास प्रारंभ झाला .  या राज्यानं पहिल्या महिला मुख्यमंत्री ( सुचेता कृपलानी ) आणि महिला पंतप्रधान ( इंदिरा गांधी ) देशाला दिल्या  . काँग्रेसचे पंडित जवाहरलाल नेहरु , इंदिरा गांधी , राजीव गांधी हे तीन पंतप्रधान देशाला देणारं हेच एकमेव  राज्य आहे पण , हे राज्यही इंदिरा गांधी यांचा उदयास्त झाल्यापासून  काँग्रेसला नीट सांभाळता आलेलं नाही . या निवडणुकीत तर काँग्रेसचा पारच सुपडा साफ झालेला आहे . त्यासाठी जेवढे काँग्रेसचे विरोधक जबाबदार असतील त्यापेक्षा जास्त जबाबदारी काँग्रेसची आहे .देशात काँग्रेस आणि भाजप हेच दोन राजकीय पक्ष देशव्यापी आहेत . मात्र आपलं देशव्यापीपण गमावण्याचा धोका काँग्रेससमोर उभा राहिलेला आहे .

या संदर्भात दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत . आजवर भाजपनं यश संपादन केलं की ‘काँग्रेसच्या अपयशात भाजपचं यश आहे’ अशी आत्मानंदी मांडणी करण्याची सवय बहुसंख्य राजकीय विश्लेषक आणि खुद्द काँग्रेसलाही लागलेली आहे . भाजप कायम इलेक्शन मोडमध्ये असतो , अशीही टीका केली जाते पण , निवडणुका लढण्याच्या संदर्भातला भाजपचा गंभीरपणा मात्र दुर्लक्षित केला जातो . प्रत्यक्षात भाजपनं निवडणुका लढण्यासाठी काय अफाट श्रम घेतलेले आहेत त्याकडे विशेषत: काँग्रेसच्या नेत्यांनी विशेषत: १९९० नंतर  कधीच गंभीरपणे लक्ष दिलेलं नाही . संघटनात्मक बांधणी बळकट करणारं भाजपचं  ते मॉडेल जाणून घ्यावं आणि आपलंही एक मॉडेल निर्माण करुन पक्ष वाढवावा असं काँग्रेस नेत्यांना अजूनही वाटत नाही . तिकडे भाजप वाढतो आहे आणि काँग्रेस ‘सुशेगात मोड’मध्ये आहे असं चित्र आहे .

आताही उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या जितक्या जागा कमी झाल्या पण , ती मतं आणि त्या जागा काँग्रेसकडे वळलेल्या नाहीत .  त्या जागा आणि ती मतं उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि पंजाबात आपकडे वळलेली आहेत . भाजपच्या जागा कमी झाल्या असल्या तरी आपल्या जागा का वाढल्या नाहीत याचा विचार काँग्रेसचे नेते करायला तयारच नाहीत . उत्तर प्रदेशात तर गेल्या निवडणुकीत मिळालेल्या तेवढ्याही जागा काँग्रेसला राखता आल्या नाहीत ; उलट कमीच  झाल्या . याचा अर्थ किमान दोन आकडी जागाही  जिंकता येण्याइतकी  काँग्रेसची शक्तीच आता उत्तर प्रदेशात उरलेली नाही हाच आहे . १९९० नंतरच्या बहुसंख्य अनेक निवडणुकात देशभरात हे असंच घडत आलेलं आहे , तरी काँग्रेस नेते ‘काँग्रेसच्या अपयशात भाजपचं यश आहे’ , याच मांडणीत आकंठ बुडालेले आहेत . आपल्या अपयशाबाबत आत्मपरीक्षण हे सर्व नेते करणार आहेत की नाही ? त्याबाबत आत्मचिंतन सोडून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते समाधान मानतील , अशी स्थिती  आहे .

गांधी घराण्यावर अवलंबून राहण्याच्या सवयीतूनही काँग्रेसला बाहेर यावं लागेल हाही उत्तरप्रदेशच्या निवडणूक निकालाचा आणखी एक अर्थ आहे . कुणीतरी ‘गांधी’ येईल आणि त्याच्या करिष्म्यातून पक्षाला मतं मिळतील ही काँग्रेस पक्षाची निवडणूक जिंकण्याची आजवरची एक रणनिती आणि मानसिकताही आहे . इंदिरा गांधी , संजय गांधी , राजीव गांधी , सोनिया गांधी यांच्या करिष्म्यानं  मतदार  कसे प्रभावित होतात हे अनुभवलेल्या पत्रकारांच्या पिढीतला मीही एक आहे . राहुल गांधी यांचा राजकारणात उदय झाला . पक्षात त्यांचं महत्त्व वाढलं तेव्हा त्यांचाही करिष्मा काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवून देईल असं अनेकांना वाटत होतं . मात्र २०१४ ते २०२२ या आठ वर्षांत लोकसभा निवडणुकीत तर काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद मिळण्याइतक्याही जागा संपादन करता आल्या नाहीत . काही राज्यात विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला यश मिळालं . राहुल गांधी यांनी  निवडणुका जिंकण्यासाठी अफाट धावाधाव केली यात शंकाच नाही , मात्र यश हवं तसं मिळालं नाही . ‘प्रियंका गांधी यांनी जर प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली तर चित्र बदलू शकतं ,  त्यांचा करिष्मा राहुल गांधी यांच्यापेक्षा जास्त आहे . त्यांच्या दिसण्यात आणि देहबोलीत इंदिरा गांधी यांचा भास होतो’ , असे मग दावे काँग्रेसजनांकडून केले जात होते . या निवडणुकीत रस्त्यावर उतरुन प्रियंका गांधी यांनी प्रचार केला . मात्र काँग्रेसच्या जागा वाढणं तर सोडाच उलट कमी झाल्या , ही कडू गोळी आहे पण , आता निवडणूक जिंकण्यासाठी केवळ करिष्मा प्रभावी ठरणार नाही हे कटू सत्य काँग्रेसजनांना पचवावंच लागणार आहे . म्हणजेच ‘गांधी’ नावाला पर्याय असणारं सक्षम राष्ट्रीय तसंच राज्य व स्थानिक पातळीवरही किमान एक तरी नेतृत्व पुढे आणण्याची नितांत गरज काँग्रेसला आहे , असाही संदेश उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालानं  दिला आहे .

( आणीबाणी उठवल्यावर झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसचा दारुण पराभव झाला तेव्हा म्हणजे , सुमारे ४२ वर्षांपूर्वी , प्रख्यात व्यंगचित्रकार आर . के . लक्ष्मण यांनी काढलेलं हे व्यंगचित्र… व्यंगचित्रकार किती भविष्यवेधी असतो नाही ? )

श्रीमती इंदिरा गांधी यांच्यापासून ते राहुल गांधी यांच्यापर्यंत ‘गांधी नेतृत्व आणि करिष्मा’ यावर अवलंबून राहण्याची वाईट सवय जडल्यानं काँग्रेसची संघटनात्मक वीण अतिशय विसविशीत झाली आहे . राहुल गांधी यांचं नेतृत्व पक्षात सर्वमान्य नसेल तर त्यांना पर्याय उभा करावा लागेल आणि त्यांच्याशिवाय पर्याय नाही असं खरंच वाटत असेल त्यांना पूर्ण अधिकार द्यावे लागतील ; कोणत्याही कुरबुरी न करता , आव्हान न देता , अडथळे न आणता   राहुल गांधी यांचे निर्णय निमूटपणे मान्य करावे लागतील . पक्षाची जिल्हा पातळीवरील कार्यालये ओस पडली आहेत ; अनेक ठिकाणी ते रिकामटेकड्यांचे अड्डे झाले आहेत . यापुढे जोपर्यंत संघटना बळकट नसेल तोपर्यंत निवडणुकांत  विजय मिळवणं अशक्य आहे , हे काँग्रेसच्या एकजात  सर्व नेत्यांनी लक्षात घेऊन संघटना बळकट करण्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागणार आहेत . कामराज योजना राबवून सत्तेच्या खुर्च्या आजवर उबवलेल्या बेरक्या नेत्यांना बाजूला सारावं लागेल .  नवे आणि दमदार चेहेरे पुढे आणावे लागतील . ही प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी असेल . तेवढा संयम आणि चिकाटी काँगेस पक्षातील सर्वांनाच दाखवावी लागले . पक्ष संघटन मजबूत करण्याच्या संदर्भात नुसत्याच फुकाच्या बाता चालणार नाहीत .

यांचा अर्थ  एकच आहे- पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालातून वाजलेले धोक्याच्या घंटीचे आवाज जर गंभीरपणे घेतले गेले नाही , तर यापुढे काँग्रेस पक्षाचं अस्तित्व सूक्ष्मदर्शक यंत्रातून शोधावं लागेल !

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर – type करा आणि Search वर क्लिक करा.

 

Previous articleप्लेगबाधित मुलांना पाठीवर नेणाऱ्या सावित्रीबाईंची शौर्यगाथा
Next article‘सूर्य गिळणारी मी’ या आत्मकथनाच्याच्या निमित्ताने…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.