अमेरिका एक संपन्न देश…आपल्यासारख्यांना इथल्या प्रत्येक गोष्टींचं अप्रृप वाटतं.. हिरवी हिरवी झाडं, सुंदर रस्ते, कडेकोट शिस्त, निवांत शांतता, स्वच्छता, सभ्यता, मॅनर्स एटीकेट्स… सुरूवातीला हे सगळं बघताना सर्वांगाला डोळे फुटतात..काय बघू आणि किती बघू असं होतं. गोरी गोरी माणसं, बायका, मुले, सुसाटणा-या गाड्या, सुंदर सुंदर घरे…… पण नव्याची नवलाई उतरली की हे सगळं प्लॅस्टीकचं असल्यासारखं वाटायला लागतं.. बीन वासाचं, बीन आवाजाचं…
सगळं असूनही मन कशातच रमत नाही..आत खोल कुठेतरी उपरेपणाची जाणिव टोचत रहाते. सगळीकडे प्रचंड अलिप्तपणा..दुर्लक्षीतपणाची भावना बळावत नेणारा. आपल्याकडची आपुलकी ब-याचदा भोचकपणाकडे झुकणारी. पण ती सुद्धा बरी, असे येथे होऊन जातं..
असं होतं, हे इथे आलेल्या सगळ्यांनाच कळतं, मग त्याचं विश्लेषण ते, “आपल्याला नाही करमत तिकडे” एवढ्या चार शब्दांत करायला लागतात..
न करमायचं कारण म्हणजे इथे आलं की आपली स्वत:ची अशी काही ओळखच उरत नाही.. बाहेर गेलं की आपण फक्त आशाळभूत ‘बघे’ असतो, आपल्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही. तस्लिमा नसरीनचं एक वाक्य मला अशावेळी प्रकर्षानं आठवतं , पॅरिसला गेल्यावर त्यांच्या अनुभवाविषयी त्या लिहितात ”इथे आल्यापासून मला असं वाटतंय की मी अदृष्यच झाले आहे, कारण मी कोणाला दिसत असल्याचं कोणतंही चिन्ह समोरच्या नजरेत दिसत नाही”..
बाहेर गेलं की वेगवेगळी दृष्ये आपण बघतो, पण ती डोळ्यातच रहातात, पापण्यांतून आत..मनात काहीच झिरपत नाही. कारण इथल्या संस्कृतीचे सूरच आपल्या ओळखीचे नसतात. मनाच्या तारा त्यांच्याशी जोडलेल्या नसतात. आपल्याकडे जेव्हा आपण एखादं दृष्य बघतो तेव्हा नकळत एक बॅकग्राउंड म्युझिक आपल्या मनात वाजत असतं..आपल्या मातीचे, आपल्या संस्कृतीचे सूर असतात ते..आपल्या संस्कृतीशी असलेल्या आपल्या तादात्म्यामुळे आपोआपच ते संगीत वाजतं..
एखादं डोंबा-याचं पोर दोरीवर कसरत करताना पाहिलं की ढोलकी वाजवणा-या आईच्या आतड्याचा पीळ आणि त्या पोराचं हरवलेलं बालपण आपल्याला अस्वस्थ करतं कारण आपल्याला त्या दृष्यामागचं दृष्य ओळखीचं असतं..
बाजारपेठेतली दुकानं बैलांच्या सजावटीच्या सामानाने सजलेली दिसली की आपल्याला जवळ येऊन ठेपलेला पोळा अगदी डोळ्यापुढे दिसू लागतो….
पण इथे एखादी सुबक म्हातारी स्कर्ट घालून मॉलमधे आटापिटा करून वस्तू खरेदी असते तेव्हा आपल्याला,इथल्या वृद्धांचं एकाकी जीवन, त्यांची अगतिकता माहीत नसल्याने ते फक्त एक दृष्यच रहातं..सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यासारखं, बिनआवाजी….
तुकतुकीत पण कोरडी माणसं…फसव्या सुहास्याचे फसवे साबणी फुगे आपल्या अवती भोवती फिरत राहातात. जागोजागी कलात्मकतेने सुशोभित केलेले कोपरे , रंगिबेरंगी फुलांनी सजलेले ताटवे,बागा दिसतात, पण कुठलाच वास तिथे नसतो. आपला एक जुईचा वेल माणसाला गंधाच्या स्वर्ग़ाची सफर घडवून आणतो..
वास नाही, आवाज नाही, धूळ नाही, कचरा नाही, रस्त्यावर माणसं नाहीत, वळचणीच्या चिमण्या नाहीत, झाडांवर कावळे नाहीत, असले तर ते ओरडत नाहीत, ओरडले तरी साउंडप्रूफ घरांमधून त्यांचा आवाज ऐकू येत नाही….
आणि मग गुलजारची कधीतरी वाचलेली कविता मनात स्वैरपणे रुंजी घालू लागते..
तुम्हारे यहां चिटीयोंके घर नही देखे मैने….
“तुमच्याकडे इतकी संपन्नता आहे…
तुमची घरं पण किती सुंदर आहेत,
पण तुमच्याकडे मुंग्यांचं घर नाही दिसलं मला…
तुमच्या साखरेला कधी मुंग्या नाही लागत..
माझ्या गावाकडे मुंग्यांच्या लांब लांब रांगा लागतात,
त्यांना आम्ही फक्त चिमुटभर पीठ टाकतो.. !!
तुमच्या गावात खूप छान हिरवळ आहे,
झाडं आहेत,
जागोजागी रंगिबेरंगी फुलांचे ताटवे आहेत
पण एखादा भुंगा त्याच्यावर डोलताना नाही दिसला कधी. !!
तुमच्या भिंतींना साधी ‘दरार’ नाही पडत,
आमच्याकडे एखादं कवेलू फुटलं तर दहा दिवसात
त्याच्या खालच्या भिंतीतून
पिंपळाचं रोपटं लवलवायला लागतं… !!
माझ्या गरिबीची मला आदत पडलीये
किंवा मग मी तुमच्या शहराचा हेवा करत असेन,
तशी तर तुमच्या शहरांची नक्कल आता
आमच्याकडे पण व्हायला लागली आहे.. !!
लोकसंख्येचा शाप माझ्या देशाला जाळतो आहे,
आणि तुमच्याकडे किडे मकोड्यांची पण आबादी वाढत नाही. सडकांवर धूळ पण कधी उडत नाही..
तुमचे कावळे सुध्दा ओरडत नाहीत
माझं गाव त्यामानानं खूप मागासलेलं आहे..
माझ्या अंगणातल्या वडावर रोज कितीतरी पाखरं येतात,
वेगवेगळ्या नस्लची…वेगवेगळ्या रंगांची…
ती वडाची भिक्कार फळं खायला..
आणि ती पाखरं इतकी मुर्ख आहेत की,
जिथे खातात तिथेच शिटून पण ठेवतात..
दिवसभर चिवचिवत हैदोस घालतात..
तुम्हारे शहर मे रह लूँ तो, मेरा गाव मुझे बहुत याद आता है..
मेरा देश मुझे बहुत याद आता है.!”
( ‘दिवस अमेरिकेचे’ ह्या माझ्या पुस्तकातील काही भाग)
पुस्तकासाठी लेखिकेचा संपर्क:8149559091
(नीलिमा क्षत्रिय या ‘दिवस आलापल्लीचे’ व ‘दिवस अमेरिकेचे’ या गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत .)
फारच छान. प्रत्येकाच्या मनातलं विवेचन.