पानगावचे प्राचीन मंदिर- मध्य भारताला जोडणारा सांस्कृतिक दुवा

-युवराज पाटील

लातूर अर्थात लत्तलूर हे मध्ययुगीन राजेशाहीच्या काळातले ” राजकीय चुंबकीय क्षेत्र होते” असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. बदामी चालुक्य दुसरा कीर्ती वर्मन कडून इस 753 मध्ये लत्तलूर ( राष्ट्रकूट ) निवासी राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग यांनी सत्ता हस्तगत केली. या लातूरच्या राष्ट्रकुटांनी आपली सत्ता दक्षिण भारत, पश्चिम भारत ( कोकणासह ) आणि मध्य भारत इथं पर्यंत विस्तारली. पुढे इस 973 ला चालुक्य दुसरा तैलप याने राष्ट्रकुटांचा पराभव करून चालुक्याची सत्ता स्थापन केली. या सत्ता स्थापन करणाऱ्या दुसऱ्या चालुक्य तैलप जो उत्तर चालुक्य राजघराण्याचा संस्थापक होता, त्याची सासुरवाडी लत्तलूर म्हणजेच लातूर होती. लत्तलूरच्या “महारट्ट मम्मह ” याच्या मुलीशी राणी जाकव्वा तथा लक्ष्मी बरोबर राजा तैलप याचा विवाह झाला होता. ज्या लातूरच्या रट्टाची मुलगी कल्याणी चालुक्याच्या संस्थापकाला दिली. त्या रट्ट यांच्या ताब्यात आंध्र प्रदेशातील कुल्पक आणि ओरिसातील संभलपूर या संस्थानावर राज्य होतं… या सर्व घटनावरून लातूरचे महत्व अधोरेखित होते. पुढे कल्याणीचा ( अर्थात बस्वकल्याण जि. बिदर ) चालुक्य सोमेश्वर पहिला हा अत्यंत पराक्रमी निघाला आणि त्यांनी राष्ट्रकुट काळापेक्षाही अधिक भूभागावर आपले राज्य निर्माण केले.लातूर जिल्ह्याची आजची सीमा बस्वकल्याण पासून फक्त 25 किलो मीटर आहे. निजामकाळात लातूर भागाचा जिल्हा बिदर असल्यामुळे हे एकच प्रादेशिक भाग होता. कल्याणी चालुक्य सोमेश्वर यांनी मराठवाड्यासह आजचा पश्चिम महाराष्ट्र कोकण, विदर्भ, गुजरात, मध्यप्रदेश ( मावळा प्रांत ) काही राजस्थानचा भाग… दक्षिणेत आंध्रप्रदेश, कर्नाटक, तंजावर पर्यंत राज्य विस्तारले… चाळीस वर्षे राज्य केले.

बदामी चालुक्याच्या काळात दक्षिणेत मोठ्या प्रमाणात मिश्र मंदिर बांधले गेली पण कल्याणी चालुक्याच्या काळात बहुतांश मंदिर बांधली गेली ते विष्णूच्या विविध नावानी… राजा सोमेश्वरचा सेनापती मधुसूदन यांनी इस 1062 मध्ये नागदा ( मध्य प्रदेश ) उज्जैन पासून जवळच असलेली आजची औद्योगिक नगरी येथे विष्णू मंदिर बांधल्याचा उल्लेख शीलालेखात आहे ( संदर्भ :- मुजुमदार आर सी, द क्लासीकल एज, यजदानी जी. द अर्ली हिस्ट्री ऑफ द डेक्कन 2, भाग -1 ) आणि याच शिला लेखात त्यांचे राज्य असलेल्या अनेक ठिकाणी या पूर्वी विष्णू मंदिरे बांधल्याचा उल्लेख आहे.

काय काय होते या विष्णू मंदिरात

हे मंदिर त्या भागाचे प्रचंड मोठे सांस्कृतिक केंद्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही… मंदिर प्रतीकात्मक असले तरी त्याच्या आजूबाजूला नाट्यादि करिता नाट्यालय, मुनींच्या ध्यान धारणे करिता अनुष्ठानभवन, गुरुकुल पठन आणि पाठनाकरिता मठ इत्यादीचा अंतर्भाव या मंदिर परिसरात असायचा… एका अर्थाने हे मंदिर लोक शिक्षणाचे केंद्र होते. या बरोबर या मंदिरात अनेक तोरणे व प्रासाद ( राहण्यासाठीची जागा ) असून त्यांना सुंदर मूर्तिनी अलंकृत केले होते. त्या समोर गरुड स्तंभ आणि सभोवार तट होता.

पानगावचे मंदिर आणि नागद मंदिरातील साम्य स्थळ

पानगाव ( ता. रेणापूर जि. लातूर ) येथील आजचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर जे प्राचीन काळी विष्णू मंदिर होते पण कालोघात विष्णू आणि विठ्ठल एकच आहेत ही विचारधारा असल्यामुळे हे मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर झाले असेल….आम्ही भेट द्यायला गेलो त्यावेळी या मंदिराच्या भोवती झालेले अतिक्रमण काढण्याचे काम गावकरी करत होते. ज्यांची घर इथं आहेत त्यांना त्या जागेचा मोबदला देऊन काढली जात आहेत हे विशेष … या अतिक्रमण काढलेल्या जागेत प्राचीन काळातील अत्यंत सुबक ओवऱ्या दिसून येत आहेत… चारी बाजूनी अशा ओवऱ्या असण्याची शक्यता आहे पण उत्तर बाजुला फक्त दगडाचे अवशेष शिल्लक आहेत पण दक्षिण भागात अत्यंत रेखीव ओवऱ्या सापडल्या आहेत… या मंदिरापासून काही अंतरावर मठ आहे जो आज बालाजी मंदिर म्हणून ओळखला जातो… हे मंदिर आणि नागद मंदिरातील साम्य दुवे म्हणजे…

मंदिरावर कोरण्यात आलेले शिल्पामध्ये वराह अवतार, मत्स अवतार, कुर्म अवतार, नृसिंह अवतार, वामन अवतार, हत्ती, फुलांची नक्षी, सिंह, नागकन्या, मुंगूस धारण केलेली , विंचू धारण केलेली स्त्री, मर्कटी, गौरी, चामरा, पद्मगंधा, शुकसारिका, गुढशब्दा, कर्पुरमंजीरी, शुभगामिनी, नर्तकी, लिलावती, सुरसंदरी अशा अनेक शिल्पांचा समावेश आहे. मंदिराचे गर्भगृह चौकोनी आहे. द्वारशाखांवर वैष्णव द्वारपाल कोरण्यात आलेले आहेत तसेच गणेश प्रतिमा सुध्दा कोरण्यात आलेली आहे.

मंदिरावर मिथून शिल्प

मी वर उल्लेख केलेल्या नागद येथील मंदिरावर मिथून शिल्प कोरलेले आहेत तसेच मिथून चिल्प इथेही कोरलेले आहेत. नागद येथील मंदिरासाठी शिलालेख असल्यामुळे व तो कल्याणी चालुक्य सोमेश्वर पहिला याचा सेनापती मधुसूदन यांनी बनविल्याचा उल्लेख आहे. त्यात अशी अनेक विष्णू मंदिर बनविल्याचा उल्लेख आहेत. पानगाव येथे असलेल्या मंदिराचे साम्य असलेली मंदिरे मी पाहिलेली आहेत पण आता त्यांना वेगवेगळी नाव दिलेली असले तरी त्यात आणि पानगाव मंदिरात कमालीचे साम्य आहे. त्यात दैत्य सुदन मंदिर लोणार जि. बुलढाणा, कालिंका मंदिर, बार्शी टाकळी जि. अकोला , आनंदेश्वर मंदिर, लासूर ता. दर्यापूर जि. अमरावती, भैरवनाथ मंदिर, किकली ता. वाई जि. सातारा हे मी प्रत्यक्ष बघितलेली तर ऐकलेली धारासूर मंदिर ता. गंगाखेड जि. परभणी, कोपेश्वर मंदिर खिद्रापूर जि. कोल्हापूर आणि या सर्व मंदिरावर कोरीव शिल्प आणि मिथून शिल्प आहेत.

या वर उल्लेख केलेल्या गावाचे अंतर बस्वकल्याण पासून बरेच आहे पण पानगाव हे फक्त शंभर किलोमीटरच्या परिघात येते आणि चालुक्याचे आजोळ होतं… नागदा हे मध्यप्रदेशात सर्वात दूर आहे… त्या मंदिराच्या संदर्भात शिला लेख लिहला आहे. मी बघितलेल्या सर्व मंदिराच्या जागा प्रचंड विस्तीर्ण आहेत… बाकी ठिकाणी ओवऱ्या शिल्लक नाहीत पण त्याचे बेसमेंट अवशेष शिल्लक आहेत… पानगाव मध्ये मात्र दोन भव्य ओवऱ्या सभा मंडप, दर्शनी मंडप आणि मठ शिल्लक आहे.

मंदिराच्या जीर्णोद्धाराला गावकरी एकवटले

गावाकऱ्यांना जाणीव झाली की हे प्राचीन मंदिर आहे याचे जतन व्हायला हवे म्हणून त्यांनी एकत्र येऊन 1 कोटी रुपयाचा निधी गोळा केला. त्यातून पहिलं काम या मंदिर परिसरात शेकडो वर्षांपासून झालेले अतिक्रमण काढणे. ज्यांची घर आहेत त्यांना योग्य तो मोबदला देऊन ते काढले जात आहेत… त्यात दडलेल्या दोन ओवऱ्या आता स्पष्ट दिसत आहेत… हे आपलं सांस्कृतीक वैभव आहे. याची जाणीव गावकऱ्यांना झाली आहे. त्यामुळे त्यांनी अत्यंत धाडसी पाऊल टाकले आहे त्या बद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे…. मुळात प्राचीन काळी मंदिरा भोवती सगळ्या सांस्कृतिक वैभवाच्या खुणा होत्या त्यामुळे याचे महत्व अनन्य साधारण आहे. या मंदिरामुळे देशातील इतर ठिकाणी उल्लेख केलेल्या मंदिराचा इतिहासही पुढे येईल. बार्शी टाकळी जि. अकोला मंदिरातील विष्णू मूर्ती नागपूरच्या केंद्रीय संग्राहलयात ठेवण्यात आलेली आहे.पानगावचे मंदिरावरील नक्षी अजूनही अत्यंत चांगल्या स्थितीत आहे… इतर मंदिरावरील शिल्पावर वातावरणाचा मोठा परिणाम झाला आहे.पण पानगावकरांनी हे मंदिर तन मन आणि धन खर्चून संवर्धन केलं आहे. त्यासाठी त्यांचे

मंदिर हे समाजाच्या दैवीकरणाचा हिस्सा नव्हते तर त्या काळी ते त्या संस्कृतीचे अधिष्ठान होते पण म्हणून तत्कालीन विद्या या मंदिराभोवती शिकविल्या जात होत्या… त्यामुळे आपल्याला अधिक डोळस करणारे हे प्राचीन दाखले आहेत… त्या पासून आपण पण शिकू या… पानगावच्या मंदिराला आवश्य भेट द्या… आणि त्या काळाच्या सांस्कृतिक खुणा पाहुन या एक सुंदर शिल्पकला पहिल्याचा आनंद मिळेल हे नक्की…!!

( फोटो सहकार्य :- धनंजय गुट्टे.)

(लेखक हे लातूरचे जिल्हा माहिती अधिकारी आहेत)

Previous articleऔरंग्याची कबर खोदणाऱ्यांची खबर
Next articleकाँग्रेसच्या मानगुटीवरचं ‘नॅशनल हेरॉल्ड’चं भूत!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here