औरंग्याची कबर खोदणाऱ्यांची खबर

-ज्ञानेश महाराव

(संपादक, साप्ताहिक ‘चित्रलेखा’)

———————————————-

इतिहासातली मढी उकरून काढण्याची खोड पूर्णपणे वाईटच! परंतु, गेली ३५-४० वर्ष हिंदू- मुस्लीम धर्मांधता पेटती ठेवण्यासाठी जुनी- पुराणी मढी उकरून त्याभोवती देशाचं राजकारण सत्ता लाभाचा पिंगा घालण्यात दंग आहे. त्यात आता औरंगजेबाच्या कबरीची भर पडलीय. ती कबर असलेल्या खुलताबाद आणि औरंगाबाद शहरात २५ किलोमीटरचे अंतर आहे. औरंगजेब (जन्म : १६१८; मृत्यू : ३ नोव्हें. १७०७ ) हा दिल्लीचा बादशाह. परंतु, छत्रपती शिवाजीराजांच्या स्वराज्य निर्माणाच्या मोहिमांनी तो कमालीचा अस्वस्थ झाला होता. त्याने नानाप्रकारे शिवरायांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येकदा तो अपयशी ठरला. १६३६ ते १६४४ ह्या काळात औरंगजेबला त्याच्या वडिलांनी- बादशाह शाहजहान याने सुभेदारीसाठी दौलताबादला पाठवलं होतं. त्यावेळी ‘खडकी’ ह्या नावाने ओळखला जाणारा हा परिसर औरंगजेबचा आवडता प्रांत होता. तो दख्खनच्या परिसरात फिरायचा. त्याने दौलताबाद ते वेरुळ हा रस्ता बांधला होता. औरंगजेबाला १६५२ मध्ये दुसऱ्यांदा ‘खडकी’ची सुभेदारी मिळाली. त्यानंतर तो तिथे १६५९ पर्यंत राहिला. या ७ वर्षांत त्याने तिथे अनेक वास्तू बांधल्या. यात ‘किले अर्क’ आणि ‘हिमायत बाग’ यासारख्या अनेक बागांचा समावेश होतो. त्यामुळेच ‘खडकी’चे ‘औरंगाबाद’ असे नामांतर झाले.

छत्रपती शिवरायांचं (३ एप्रिल १६८० रोजी) निधन झालं. शिवरायांच्या पश्चात संभाजी राजे ‘छत्रपती’ झाले. १६८१-८२ मध्ये मराठा साम्राज्याचे आक्रमण वाढू लागलं; म्हणून औरंगजेब पुन्हा दक्षिणेत आला आणि त्याने औरंगाबादेत आपला तळ ठोकला. त्याने कटात फसून पकडलेल्या संभाजीराजांची अत्यंत क्रूरपणे हत्या (११ मार्च १६८९ रोजी) केली. संभाजीपुत्र शाहूला आपल्या नजरकैदेत तब्बल २० वर्षे ठेवले. त्याच्यावर इस्लामी संस्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी औरंगजेब मोठा फौजफाटा घेऊन स्वराज्याचे लचके तोडण्याचा प्रयत्न करीत होता. तो मावळे निकराची झुंज देत हाणून पाडत होते. संभाजीराजांच्या हत्येनंतर मावळे जवळपास निर्नायक होते. परंतु त्यांना औरंगजेबाला रोखण्यासाठी रायगडावरचा भगवा आणि शिवरायांनी दिलेला ’स्वराज्य’ हा मंत्र पुरेसा होता. दरम्यान, ताराराणी यांचा उदय झाला. त्या शिवरायांचे स्वराज्याचे ‘सरसेनापती’ हंबीरराव मोहिते यांच्या कन्या. त्यांचा जन्म १६७५ मध्ये झाला. वडील- हंबीररावांनी त्यांना लहानपणापासून युद्धकलेचे शिक्षण दिले होते. १६८३-८४ च्या सुमारास ताराबाईंचे लग्न शिवरायांचे द्वितीय पुत्र राजाराम महाराज यांच्याशी झाले. तत्पूर्वी, शिवरायांच्या मृत्यूनंतर ‘छत्रपती’ पदासाठी वादाची शक्यता निर्माण होण्याची लक्षणं दिसताच; हबीररावांनी आपले सख्खे भाचे व ‘भावी जावई’ असलेल्या राजाराम महाराजांऐवजी संभाजीराजांची ‘छत्रपती’पदी निवड करून आपल्या न्यायवृतीचे दर्शन घडविले.

संभाजीराजांची हत्या झाली. ’संभाजी’पुत्र शाहू औरंगजेबच्या कैदेत अडकल्याने राजाराम महाराज ‘छत्रपती’ झाले. त्यानंतर काही दिवसांत- म्हणजे १६८९ मध्येच मुघलांनी रायगडास वेढा घातला. त्यातून राजाराम महाराजांसह ताराराणी शिताफीने निसटल्या. तिथून राजाराम महाराज जिंजी (तामीळनाडू) येथे पोहोचले; तर ताराराणी विशाळगड (कोल्हापूर) येथे पोहोचल्या. तिथे ताराराणींनी लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती शिकून घेतली. १६९१ मध्ये त्या जिंजीला राजाराम महाराज यांच्याकडे पोहोचल्या. त्यांना ९ जून १६९६ रोजी पुत्र झाला. त्याचे ‘शिवाजी’ असे नामकरण झाले. परंतु त्यांचा पुत्रप्राप्तीचा आनंद फार काळ टिकला नाही. ३ मार्च १७०० रोजी राजाराम महाराजांचा सिंहगडावर मृत्यू झाला. औरंगजेबला वाटलं, आता मराठा साम्राज्याचा अंतिम निकाल लागला! त्याचा हा अंदाज पंचविशीतल्या ताराराणींनी खोटा ठरवला.

स्वराज्याचे युवराज ‘संभाजीपुत्र’ शाहू औरंगजेबच्या कैदेत होते आणि औरंगजेबच्या आक्रमणामुळे दक्षिणेतील स्वराज्याची घडी विस्कटली होती. मुघल सैन्याने हल्ल्यांचा धुमाकूळ घालून शिवरायांनी मोठ्या शौर्याने कब्जात आणलेले सर्व किल्ले एकेक करीत जिंकले होते. मराठ्यांची गादी वारसाविना मोकळी होती. अशात ताराराणी यांनी आपल्या चार वर्षांच्या मुलाचा – म्हणजे ’शिवाजी- दुसरा’चा विशाळगडावर राज्याभिषेक करवून घेतला आणि त्याच्या नावाने त्या कारभार पाहू लागल्या. धनाजी जाधव हे त्यांचे ’सेनापती’ होते. त्यांच्या सोबतीला उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे, बाळाजी विश्वनाथ (पुढे ते सातारा गादीचे ’छत्रपती’ शाहू यांच्याकडून प्रधानकीची वस्त्रे – अधिकार घेऊन ‘पहिला पेशवा’ झाले.) हे शूर सेनानी एकत्र आले होते. यांच्या बळावर ताराराणी स्वत: घोडदौड करून, कधी तलवारीच्या बळावर तर कधी मुत्सदी बोलणी करून एक-एक करीत किल्ले जिंकू लागल्या.

एक स्त्री युद्धात आपल्याला भारी पडते, हा विचार नव्वद वयाच्या जवळ आलेल्या औरंगजेबला असह्य होऊ लागला. त्यातून त्याच्याकडून अधिक चुका होऊ लागल्या. त्यात २५ वर्षे आपले घर-दार सोडून आलेले मुघल सैन्यही वैतागले होते. त्यातच माणमध्ये आलेल्या महापुरात घोडे, खजिना आणि मुघल सैनिक मोठ्या संख्येने वाहून गेले. बादशहा औरंगजेबही लंगडा झाला होता. हा मोका साधून ताराराणी आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी गालितगात्र झालेल्या औरंगजेबला मराठी मातीत ‘अल्ला प्यारे’ करून टाकले. त्याच्या मृत्यूनंतर ’संभाजीपुत्र’ शाहू महाराजांची सुटका झाली. त्यांनी परतताच ‘छत्रपती’पद मागितले. परंतु, तब्बल ७ वर्षे मिळेल त्या मावळ्यांना घेऊन औरंगजेबशी लढणार्या ताराराणींनी शाहूंची मागणी धुडकावली. या वादात मराठेशाहीच्या कारभाऱ्यांनी तेल टाकण्याचा उद्योग केल्याने ह्या वादाची परिणती युद्धात झाली. त्याची अखेर शाहू महाराजांची ’सातारा गादी’ आणि पलीकडे, ताराराणीसाहेबांची ‘करवीर गादी’ अशी ‘छत्रपती’पदाची वाटणी झाली. ताराराणी १७६१ पर्यंत म्हणजे वयाच्या ८६ वर्षांपर्यंत जागल्या. औरंगजेबचा खातमा अहमदनगरमध्ये झाला. परंतु, त्याच्या इच्छेनुसार, त्याच्या मृतदेहाचे दफन खुलताबादला करण्यात आलं.

—— 2——-

कोल्हापूरच्या ताराराणींचा ऐतिहासिक पराक्रम

औरंगजेबने आपल्या इच्छापत्रात ‘मृत्यूनंतर माझी कबर माझे गुरू सैय्यद झैनुद्दीन सिराजी यांच्या शेजारी असावी. ती मी स्वतः कमावलेल्या पैशातच बांधावी. त्यावर एक मोगऱ्याचं छोटं रोपटं लावावं,’ अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार खुलताबादला ‘गुरू’ सैय्यद झैनुद्दीन सिराजी यांच्या कबरीशेजारी औरंगजेबची कबर बांधण्यात आली. औरंगजेब फावल्या वेळात टोप्या विणायचा आणि ‘कुराण शरीफ’ नकलून काढायचा. त्यातून जी कमाई झाली, तेवढ्याच पैशात; म्हणजे १४ रुपये १२ आणे खर्चात त्यावेळी कबर बांधण्यात आलीय. ही कबर औरंगजेबचा मुलगा आझमशाह ह्याने बांधलीय. त्याने पुढे आपल्या आईच्या स्मरणार्थ औरंगाबादेत ‘ताजमहाल’सारखा दिसणारा ‘बीबी का मकबरा’ही बांधला. त्यात औरंगजेबच्या पत्नीची कबर आहे. १९०४-०५ च्या दरम्यान लॉर्ड कर्झनला ह्या कबरीची माहिती समजली. ‘१६५९ ते १७०७ इतका काळ दिल्लीचा बादशहा असलेल्याची कबर इतकी साधी कशी काय असू शकते?’ असं वाटल्याने त्याने कबरीभोवती मार्बल ग्रिल बसवून थोडी सजावट केली. (ही कबर पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे.)

दक्षिण भारतातील ‘इस्लामगड’ आणि सुफी पंथाचे केंद्र असलेल्या खुलताबादेत ‘भद्रा मारुती’ ह्या धार्मिक स्थळाबरोबर सुफी संत आणि इस्लामी राजघराण्यातील व्यक्तींच्या कबरी आहेत. त्यात एक कबर औरंगजेबची आहे. ह्यापेक्षा त्या कबरीला आजवर फारसे काही महत्त्व नव्हते. तथापि, गेल्या आठवड्यात तिथे AIMIM पक्षाचे नेते आणि तेलंगणाचे आमदार अकबरूद्दीन ओवेसी गेल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटले. ओवेसींचे तिथे जाणे, हे सहज नव्हते. त्यात योजकता होतीच. महाराष्ट्रात १९ महानगरपालिका निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात औरंगाबाद व मराठवाड्यातील आणखी काही महानगरपालिका व जिल्हा परिषदा यांचाही समावेश आहे. AIMIM चे इम्तियाज जलील हे सध्या औरंगाबादचे खासदार आहेत. औरंगाबाद शहरात मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. ती मतं अजूनही बऱ्यापैकी ‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस’ बरोबर आहेत. ती ‘भाजप’कडे येणार नाही, हे स्पष्ट आहे. ती AIMIM कडे एकगठ्ठा येण्यासाठी ओवेसी बंधूप्रमाणे ’भाजप’ही प्रयत्नशील आहे. म्हणूनच अकबरूद्दीन ओवेसींच्या ‘औरंगजेब कबरी दर्शना’नंतर ‘शिवसेना’ला ‘औरंगाबादचा नामबदल संभाजीनगर’ करण्याच्या घोषणांची आठवण देत उचकवण्यात आलं. तसाच, ‘औरंगजेबची कबर महाराष्ट्रात कशाला हवी ? ती उखडून दाखवा!’ असा आवाजही ’शिवसेना’ला देण्यात आलाय. ह्यात ‘शिवसेना’ची हिंदू मतं आणि ‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस’ची मुस्लीम मतं तोडण्याचा ‘डबल गेम’ आहे.

तथापि, त्यासाठी केलेली अपेक्षा साफ चुकीची आहे. ताराराणी आणि त्यांच्या मावळ्यांनी औरंगजेबला संपवलाय. पण त्यांनी त्याच्या इच्छेनुसार खुलताबादला त्याची ’कबर’ होऊ दिली. यातून त्यांनी शिवाजीराजांचा स्वराज्यधर्म जागवलाय! मारण्यासाठी आलेल्या अफझलखानाला ठार मारल्यावर शिवरायांनी त्याची कबर प्रतापगडावर बांधू दिली. त्यामुळे ‘औरंगजेबची कबर’ उखडण्याची अतिरेकी भाषा करणं, हेच मुळी स्वराज्य धर्माला नाकारण्यासारखं आहे.

तसेच संभाजीराजांची हत्या तुळापूर येथे झाली. ते पुणे जिल्ह्यात येतं. म्हणून संभाजीराजांचं स्मरण जागवण्यासाठी पुणे जिल्ह्याचा नामबदल ’संभाजीनगर’ असा केला पाहिजे. ते ‘पेशव्यांचं पुणे’ म्हणणाऱ्यांना मान्य आहे का, ते आधी तपासून घ्यावं! औरंगजेबला ’कबरी’त घालण्याचं ऐतिहासिक कार्य ताराराणीसाहेब आणि त्यांच्या फौजेने केलंय. हा इतिहास लक्षात ठेवून औरंगजेबला कबरीपुरतंच मर्यादित ठेवण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्याचा नामबदल ‘ताराराणी नगर’ असा केला पाहिजे. असे काही ओवेसी बंधूना सुचणार नाही आणि त्यांना ‘टीम बी’ म्हणून वापरणारे असा आग्रह धरणार नाहीत!

——–3————

बोल बदमाशा, देवाचा बाप कोण ?

‘ब्रह्मदेवाच्या नाभी (बेंबी) तून नाही, तर भट-ब्राह्मणांच्या पोटातून देव-देवतांची निर्मिती झालीय,’ हे कठोर सत्य ‘प्रबोधन’कार ठाकरे यांनी ‘देवळांचा धर्म, धर्माची देवळे’ ह्या पुस्तिकेत सविस्तरपणे सांगितलंय. हेच ‘स्फूर्ती’ ह्या कवितेत ‘केशवसुत’ (कृष्णाजी केशव दामले ) सांगताना लिहितात-

अडवतील जर देव, तरी

झगडू त्याच्याशी निकरी

हार न जाऊ रतीभरी

देव – दानवा नरे निर्मिले,

हे मत लोका कवळू द्या!

हेच मत गेले शेकडो वर्षे संत-सुधारक सांगत आहेत. पण ते जनमत होऊ नये, यासाठी ‘भूदेव’ म्हणून मिरवणारे भट-ब्राह्मण आणि त्यांच्या थोतांडाचा बाजार वाढवणारे त्यांचे चालक-मालक नाना युक्त्या – क्लृप्त्या वापरून लोकांना भ्रमिष्ट करीत असतात. कधी अरिष्टांची भीती घालून; तर कुणाला स्वर्ग- मोक्षाची लालूच दाखवून लोकांच्या मतीची माती करीत; आपल्या पोटाची भूक भागवत असतात. त्यामुळे ही लूटमार दाखवण्यासाठी कुणी ‘देवाचा बाप’ दाखवला की ‘स्वयंभू भूदेव’ आणि त्यांना वापरणारे धर्मवीर झपाटल्यागत थैमान घालतात. अशा नाच्यांसाठी ‘सोशल मीडिया’चा प्लॅटफॉर्म ‘सब भूमी गोपाल की’ सारखा झालाय. तिथे त्यांनी सध्या नास्तिकतेच्या धारेवर ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे प्रमुख शरद पवार यांना धरले आहे.

त्याची सुरुवात ‘मनसे’प्रमुख राज ठाकरे यांनी केलीय आणि त्याचीच ‘री’ भक्त मंडळी ओढत आहेत. त्यातून ‘देव – धर्म हे भटी सापळे’ हे प्रबोधनकार ठाकरे यांचे म्हणणे अधिक ठळक होत असल्याने; त्यावर ‘प्रबोधन’कारांनीच सांगितल्यानुसार उपाय योजणे अगत्याचे आहे. तो असा आहे –

देव- धर्म हे, भटी सापळे।

घातक झाले, देशा॥१

मोडा तोडा, उलथुनी पाडा।

उखडा त्यांच्या, पाशा॥२

हिंदुत्वाच्या नावाने सनातनी – कर्मकांडी ब्राह्मण्याचा पाश आवळत लोकशाहीचा गळा घोट केला जातोय, हे देशाचं वर्तमान आहे. हे लक्षात घेऊनच सातारामधील एका कार्यक्रमात शरद पवार यांनी *जवाहर राठोड* यांची ‘पाथरवट’ ही कविता वाचून दाखवली असावी. त्यात कवी म्हणतात-

आम्ही पाथरवट! निर्माण करतो चक्कीचे पाट !

ज्या पाटाने पीठ आणि रोटी दिली तुम्हाला !!

आम्ही मात्र अन्नाच्या कणासाठी-

रोजच नुसती घरघर करतोय !

दुसरे काय?… आमचंच दुर्दैव !

आम्हीच निर्माण केलेल्या जात्यातून,

आम्हीच पिसले जातोय !!

आमच्या छिन्नी- हातोड्यांनी तर कमालच केली !

पाषाणातून वेरुळ- अजिंठा कोरली गेली !

उद्ध्वस्त झालेल्या आमच्या आयुष्याच्या आरशातून

शिल्पाचं सौंदर्य तुम्ही पाहता अन् म्हणता-

वा ! वाहवा ! बहोत खुबसुरत !’

तुमच्या ब्रह्मा – विष्णू महेशाला,

लक्ष्मी अन् सरस्वतीला आम्हीच रूपडे दिलंय !

आता तुम्ही खरं सांगा-

ब्रह्मदेव आमचा निर्माता, की आम्ही ब्रह्मदेवाचे पिता ?

कविता आणखी बरीच मोठी आहे. त्यात माणसाला जातीनिशी दारिद्र्यात लोटणाऱ्या अमानुषपणावर विचाराची नेमकी छिन्नी धरल्याने, वर्ण्यव्यवस्थेने माजवलेल्या जाती अहंकाराचे छिलके शब्दांच्या प्रत्येक घावाने निघतात. देव-धर्म-संस्कृतीच्या नावाने चाललेला खोटेपणा तुटून पडलेला उठून दिसतो. हा सुशिक्षितालाही गुलाम बनविणारा शतकानु शतकांचा खोटेपणा शरद पवार यांनी वाचून दाखवल्याने तो दाभिकांवर घणाघातासारखा कोसळला असावा. त्यामुळे ‘पवारांनी देवाचा बाप काढला,’ असे गळे काढण्यात आले. ते अज्ञानातून आणि अंधभक्तीने काढलेले गळे होते. कारण अशा कामासाठी ‘भूदेव’ स्वत: कधीच पुढे येत नाहीत. ते त्याकरिता स्वत:च्या शेंड्या सांभाळत बिनशेंडीचे नारळ वापरतात.

अशांना ‘अंधश्रद्धा मुक्ती’चा जमालगोटा देताना संत गाडगे महाराज म्हणत-

शेंदूर माखुनिया धोंडा ।

पाया पडती पोरे रांडा ॥१

देव दगडाचा केला ।

गवंडी त्याचा बाप झाला॥२

देव सोन्याचा घडविला ।

सोनार त्याचा बाप झाला॥३

सोडुनिया खऱ्या देवा ।

करी म्हसोबाची सेवा॥४

हीच विसंगती जवाहर राठोड यांनी आपल्या ‘पाथरवट’ या कवितेतून सांगितलीय. त्यांनी देव – देवतांचे बाप ब्रह्मदेव नसून ‘आम्ही’ शिल्पकार आहोत; तरीही आमचं जगणं दारिद्र्यात का, एवढ्यापुरताच त्यांचा प्रश्न मर्यादित नाही. त्यांनी ’देव’ नावाच्या थोताडांवर; ते थोतांड टिकून राहण्याच्या कर्मकांडावर आणि त्या कर्मकांडाचा बाजार शास्त्राधारे टिकून ठेवणाऱ्यांवर कवितेतून नेमका प्रहार केला आहे. त्यासाठी ’देवाचा पिता कोण’ हा विचारलेला प्रश्न ‘देव-देव’ करणाऱ्यांबरोबरच त्यांना कर्मकांडात फसवणाऱ्या भिक्षुकशाहीला निरुत्तर करणारा आहे. म्हणूनच ही मंडळी असह्यपणे प्रश्न विचारणाऱ्यांवर तुटून पडतात.

असेच थेट प्रश्न *चड्डा बंडा राजू* ह्या आंध्र प्रदेशातील ‘परिवर्तनवादी कवी’ने जातिव्यवस्थेच्या अमानवीपणाकडे दुर्लक्ष करीत, सनातन वर्णव्यवस्था टिकवून धरणाऱ्यांना विचारले आहेत. त्याचं मराठी रूपांतरही प्रभावी असल्याने ते परिवर्तनवादी चळवळीचं गाणं झालंय. ते असं आहे-

हाडाची काडं करून काढला,

खाणीतून कोळसा-

खोकून आमचा जीव गेला,

अन् भरला तुझा खिसा-

तवा बदमशा कळला नव्हता का,

धरम आमुचा?

हे दादा रं,

तवा तू कसं इचारलंस नाय की

आमची जात कंची हाय?

अन् आमचा धरम कंचा हाय॥धृ.

कागद आम्ही बनवला त्यावर,

धर्मग्रंथ तू लिवला-

विणली फुलांची परडी आम्ही,

अन् देव तूच पूजला-

अस्पृश्यांची परडी वापरून,

देव नाय बाटला ?

हो दादा रं,

तवा तू कसं इचारलंस नाय….॥१

बांधलं तुझं घर लावून,

इटेवर इट-

करून हमाली तुझ्यासाठी रं,

मोडली आमची पाठ-

तवा बदमशा कळली नव्हती का,

आमची जमात?

हो दादा रं,

तवा तू कसं इचारलंस नाय…॥२

चिखलातून आम्ही मडकं बनवलं,

पाणी तू प्यालास-

व्हावून ढोरा बांधल्या चपला,

*वहाणा तू घातल्यास-

तवा बदमशा कसा नाही रं,

तू बाटलास?

हो दादा रं,

तवा तू कसं इचारलंस नाय…॥३

ह्या गाण्यात भारतीयांना ‘देव-धर्म – संस्कृती’च्या नावाने वापरणार्या गुलामीच्या बेड्या कशा स्वार्थी आहेत, ते स्पष्टपणे दाखवलंय. त्यात विचारलेले प्रश्न जेव्हा सर्वांचे होतील, तेव्हा देशाला लागलेलं असह्यतेचं ग्रहण सुटेल! ह्या विचाराने शरद पवार यांनी ‘पाथरवट’ कविता सादर केली असेल, तर तसा विचार सर्वच राजकीय पक्ष-नेत्यांनी केला पाहिजे.

ढोंग संपवायचं तर आता सत्य सांगितलंच पाहिजे. त्यासाठीच तर *शाहीर अमर शेख* प्राण कंठात आणून विनवतात –

आता सत्यासत्या। लावुनिया आग-

विचाराला जाग। येऊ दे रे॥

———4——-

केतकीचे मन ‘भावे’ उद्योग

आजच्या काळात व्हॉट्स अॅप, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्मचे महत्त्व सर्वांनाच माहिती आहे. ह्याच प्लॅटफार्मने ‘कोरोना-लॉकडाऊन’ काळात सर्वांनाच संपर्कात ठेवलं. या प्लॅटफॉर्मचा वापर राजकारणी आणि राजकीय पक्षही करतात. निवडणूक प्रचारासाठी त्याचा खुबीने वापर केला जातो.

हत्यारांप्रमाणेच कुठल्याही माध्यमात दोष नसतो; तो वापर करणार्यांत असतो. सुरी डॉक्टरच्या हातीही असते. तिचा वापर तो शस्त्रक्रियेसाठी करतो. तीच सुरी चोराच्या हाती असेल, तर तो तिचा वापर धमकावण्यासाठी वा मारण्यासाठीही करील. ह्यातला दुसरा वापर ’सोशल मीडिया’तही होतोय. त्यातून शरद पवारांबाबत अत्यंत घृणास्पद मजकूर लिहिणाऱ्या केतकी चितळेचं प्रकरण पुढे आलंय.

ती टीव्ही मालिकेतील दुय्यम अभिनेत्री आहे. ‘एपिलेप्सी’ (फीट, अपस्मार ) बाबतचे गैरसमज दूर करण्याचे कामही ती करते. मात्र ती ‘सोशल मीडिया’वरून जातिनिष्ठ अजेंडाही राबवते. शरद पवार बदनामी प्रकरणात तिला पोलिसांनी अटक केलीय. यासाठी कारण ठरलेल्या ‘पोस्ट’वर अॅड. नितीन भावे असे नाव आहे. ती पोस्ट केतकीने ‘फॉरवर्ड’ केल्याचे प्रथमदर्शनी दिसते. ह्या नितीन भावेच्या तपासासाठी पोलिसांनी केतकीसाठी कोर्टाकडून सात दिवसांची कोठडी घेतलीय.

पोलीस कारवाईचा हा धडा केतकीसाठी आहे; तसा तो बदनामीकारक ‘पोस्ट’ लिहिणार्यांसाठी आणि ‘त्या’ पोस्ट फॉरवर्ड करणाऱ्यांसाठीही आहे. तथापि, या निमित्ताने पोलिसांनी खोलवर तपास करून बेताल ’सोशल मीडिया मास्टर्स’वर कारवाई करणे आवश्यक आहे. केतकी विशिष्ट पक्षाचा, जातीचा आणि विचाराचा ‘अजेंडा’ राबवत असल्याचे स्पष्टपणे दिसते. तशाप्रकारे अभिव्यक्त होण्याचा तिला कायदेशीर अधिकार आहे. पण त्याद्वारे कुणाची बदनामी करण्याचा अधिकार तिला वा अन्य कुणालाही नाही.

असे असताना केतकी आक्षेपार्ह व्हिडिओ-पोस्ट ’व्हायरल’ करीत होती. त्यावर तितक्याच गलिच्छपणे प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. त्याही चुकीच्या होत्या. अनेकदा ’जशास तसे’ उत्तर देऊन वाद संपवला जातो वा दुर्लक्ष केले जाते. खरं तर, अशा प्रकारावर वेळीच कारवाई होण्याची आवश्यकता आहे. म्हणजे पोलिसांवर केतकी सारख्यांचे ’बोलवते धनी’ शोधण्याची वेळ येणार नाही. केतकीला शिक्षाही होईल. पण पवारांवर घृणास्पद ‘पोस्ट’ टाकताना तिच्या मनात कोणता विचार होता, ते जनात येणार नाही. ते आले पाहिजे. तरच सत्तेसाठी द्वेषाचं विष कसं भिनवलं गेलंय; नीच वृत्ती कुठल्या थराला गेलीय, याची माहिती जनतेला मिळेल!

■ (लेखनकाळ : १७.५.२०२२)

—————————————-

हे ‘साप्ताहिक चित्रलेखा’च्या २० मे रोजी प्रकाशित झालेल्या (अंक दिनांक : ३० मे २०२२) ‘चित्रलेखा अंकातील ‘संपादकीय’ आहे.

माहिती-ज्ञानासाठी आपल्या ग्रुपमधील मित्र परिवारास फॉरवर्ड/शेअर करा.

*’चित्रलेखा’चा छापील अंक सर्वत्र उपलब्ध आहे.* तो आपल्या पेपरवाल्याला आणायला सांगा. सहकार्य द्या.

(नियमित अंक मिळण्यासाठी पुढील नंबरवर संपर्क करा :-

चित्रलेखा वितरण विभाग प्रमुख – 9819895800)

Comments are closed.