अडलंय का?

नीलांबरी जोशी

एका महान झेन गुरुला एकदा स्वप्न पडलं. त्यात तो फुलपाखरासारखा विहरत होता. आपण मनुष्यजीव आहोत याचं त्याला स्वप्नात भान उरलं नव्हतं. तो फक्त एक मुक्तपणे बागडणारं फुलपाखरु होता. अचानक त्याला जाग आली. तर तो पलंगावर झोपलेला एक मनुष्य होता. झेन गुरुच्या मनात तेव्हा विचार आला, “फुलपाखराचं स्वप्न ज्याला पडलं तो मी एक मनुष्य होतो, का आत्ता मी फुलपाखरु आहे आणि मला मी एक मनुष्य असल्याचं स्वप्न पडतंय?”

“अडलंय का?” हे अतुल पेठे, पर्ण पेठे यांचं नाटक पाहिल्यानंतर ही झेन कथा आठवली. चार्ल्स लेविन्स्की हा या नाटकाचा मूळ स्विस लेखक. “मला imposters वर लिहायला आवडतं. माझ्या पुस्तकांमध्ये आपण आहोत त्यापेक्षा वेगळेच कोणी तरी आहोत असं भासवणाऱ्या – imposter व्यक्तिरेखा नेहमी येतात” असं लेविन्स्की स्वत:च एका मुलाखतीत म्हणतो.

**********

“अडलंय का?” हे दोनच पात्रांचं नाटक. त्याला आत्ताच्या काळाला अनुसरुन असलेली भयावह पार्श्वभूमी आहे. एका शहरातले खर्च कमी कसे करायचे याचा सल्ला घेण्यासाठी एक कॉर्पोरेट कंपनी नेमली जाते. शहरातल्या नाट्यगृहाच्या खर्चात कपात करायचा निर्णय ती समिती घेते. या निर्णयाला शहरातलं कोणीच फारसा विरोध करणार नाही अशी जवळपास सगळ्यांना खात्री(!) असते. हा निरोप आता नाट्यगृहाला घरच मानणाऱ्या अभिनेत्याला / मालकाला देण्याचं काम फक्त उरलेलं असतं.

कंपनीतर्फे हा निरोप घेऊन येणारी पॉला आणि नाट्यगृह हेच आयुष्य असलेला तो अभिनेता यांच्यातली जुगलबंदी या नाटकात दोन तास आपल्याला खिळवून ठेवते.

या जुगलबंदीत अतुल पेठेनं निभावलेल्या निरनिराळ्या भूमिका पहाताना वरच्या झेन कथेत “जसं झेन गुरुला आपण माणूस आहोत का फुलपाखरु?” असा प्रश्न पडतो तसं “इमोशनल ब्लॅकमेल करणाऱ्या एका निष्ठुर माणसापासून थिएटर वाचावं म्हणून पडती भूमिका घेणाऱ्या एका असहाय्य माणसापर्यंत अतुल पेठेनं रंगवलेल्या अनेक व्यक्तिरेखांमधली कोणती व्यक्तिरेखा खरी असा प्रश्न पडत जातो.

तसंच या व्यक्तिरेखांद्वारे लेविन्स्कीनं त्याचे आवडते imposter किती ताकदीनं उभे केले आहेत तेही सतत जाणवतं. निपुण धर्माधिकारी यानं त्याचं भारतीय रुपांतरही उत्तम केलं आहे.

***********

पॉलाच्या सादरीकरणात (हे काम पर्ण पेठेनं खूप उत्तम केलं आहे..) एक प्रश्न समोर येतो तो म्हणजे “पिंक स्लीप”ची दहशत. गेल्या काही वर्षांमध्ये “आपण आज गेल्यावर संध्याकाळपर्यंत कंपनीत असू का?” अशी खात्री नसणं, यानं नैराश्य आलेल्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. ज्यांना काढून टाकायचं आहे त्यांना तो मेसेज देणं याचाही अनेकांना ताण येतो. त्या दृष्टिकोनातून “मार्जिन कॉल”, “अप इन द एअर” आणि “वर्ल्डस अपार्ट” हे तीन चित्रपट आठवतात. यातल्या “वर्ल्डस अपार्ट”मध्ये तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये  कपात करण्यासाठी आलेली एक कॉर्पोरेट अधिकारी नकळत त्यातल्या एका कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडलेली असते अशी जरा गुंतागुंतीची कथा आहे.

***********

“अडलंय का?” या नाटकातला एक मोनोलॉग ऐकताना मात्र खूप अधांतरी वाटायला लागलं. आपापल्या कामांवर, यंत्रांवर, सहकाऱ्यांवर प्रेम करणारी सामान्य माणसं ही जमातदेखील आता नामशेष व्हायला लागली आहे. कोरोनाच्या आॉनलाईन, वर्क फ्रॉम होमच्या काळात ते आता जाणवायला लागलं आहे. “लेथ जोशी” चित्रपटातला जोशी त्याच्या मशिनवर कसं प्रेम करतो ते एक उत्तम उदाहरण आहे. जपानी manufacturing च्या संस्कृतीत जास्त आऊटपुट का मिळतं? याचं उत्तर त्यांचं त्यांच्या कारखान्यांवर, यंत्रांवर एक माणूस समजून असणारं प्रेम हेही एक कारण आहे. हारुकी मुराकामीच्या प्रत्येक पुस्तकात, मोटारगाड्यांची वर्णनं ज्या पध्दतीत येतात तो अभ्यासाचा विषय आहे. त्याच्या कथांमध्ये गाड्या हे केवळ एक यंत्र नसतं, तर गाडीचा मालक एक जवळिक असलेली गोष्ट म्हणून त्याच्याकडे पहातो. आपणही अनेकदा आपल्या पहिल्या टू व्हीलरपासून सगळ्या गाड्यांपर्यंत nostalgic असतो. हे झालं यांत्रिक गोष्टींचं..

जिथे कलेचा स्पर्श आहे तिथे तर काय घडत असेल? पूर्वीचे रेकॉर्डिंग स्टुडिओज, तिथला जिव्हाळा, एकत्र केलेलं काम आता डिजिटलच्या युगात हरवल्याच्या गोष्टी अनेक वादक सांगत असतात. तसंच नाटकांचं. नाटकात काम करणाऱ्या माणसांना आपण जिथे आयुष्यभर वावरलो, रंगभूमीवर प्रेम केलं ते सोडताना, विस्कटताना काय होत असेल?

हे सगळं तो मोनोलॉग ऐकताना आतून जाणवत गेलं आणि खूप त्रास झाला.

अतुलनं हा मोनोलॉग खूप उत्तम केलाय.. !

**********

अखेरीस, “शिक्षणक्षेत्रातलं आत्ताचं मॅन्युफॅक्चरिंगसारख्या उत्पादनाचं मॉडेल मुळात बदलायला हवं. एकाच साच्यात घातलेल्या, ठाकूनठोकून बाहेर येणाऱ्या, एकमेकांच्या मताला अनुमोदन देणाऱ्या- अशा लोकांच्या ठरावीक संख्येच्या बॅचेस बाहेर काढणं आत्ता शिक्षणक्षेत्रात सर्रास चालू आहे. ते बदलायला हवं. त्याऐवजी मुलांची जोपासना शेतीच्या तत्वांवर व्हायला हवी. माणसाचं बहरणं ही यांत्रिक प्रक्रिया नसून ती सहजी उमलत जाणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. विकासाच्या, वाढीच्या टप्प्यानंतर माणूस कशा प्रकारे सुरेख उमललेला असेल ते आधी कधीच निश्चित नसतं. त्यासाठी, शेतकरी जसं पिक तरारुन येईल यासाठी जसं पोषक वातावरण तयार करतो, तसंच तुम्हीही माणूस जोमानं बहरेल अशी फक्त परिस्थिती निर्माण करु शकता.” असं केन रॉबिनसन या शिक्षणतज्ञांचं म्हणणं आठवलं.

आपापल्या वृत्तीनुसार मुलांना बहरु आणि उमलू दिलं तर कला, रंगभूमी यांच्यावाचून “अडलंय का?” हा प्रश्न ती पिढी कदाचित विचारणारही नाही. नाही का?

(नीलांबरी जोशी ‘कार्पोरेट कल्लोळ’ , ‘झपूर्झा’, ‘जिथे मुलांना पंख फुटतात’ आदी गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत)

[email protected]

………………………………………………………………………………………….

नीलांबरी जोशी यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –नीलांबरी जोशी– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleसंत गाडगेबाबा आणि प्रबोधनकार ठाकरे
Next articleभाजप विरोधाची कच्ची मोळी !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.