संत गाडगेबाबा आणि प्रबोधनकार ठाकरे

-संतोष अरसोड

               प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे… बस नाम ही काफी है. लेखणीतून अंगार पेरणारा अक्षरतपस्वी. सत्याची कठोर परीक्षा घेणारा सत्यशोधक. चिकित्सक पध्दतीले लेखण करणारा सच्चा संशोधक म्हणून प्रबोधनकार ठाकरे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. जाती-पातीच्या भिंती उद्ध्वस्त करणारे लेखन ही प्रबोधनकारांची खास स्टाईल. भटा-भिक्षुकांच्या पाखंडीपणावर कठोर शब्दात हल्ले करून प्रबोधनकारांनी भटी मायाजाळाचा पर्दाफाश केला. त्यांचा एक-एक शब्द धार्मिक शोषणाच्या वणव्यात जळणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यासाठीच असायचा. इतके परखड, स्पष्ट लिखाण फार कमी लेखक करतात. प्रबोधनकारांच्या लेखणीने महाराष्ट्राला एक नवी दिशा दिली आहे. ‘भिक्षुकशाहीचे बंड’, ग्’रामण्यांचा इतिहास’, ‘शेतकऱ्यांचे स्वराज्य’, ‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’, ‘कुमारिकांचे शाप’, ‘पोटाचे बंड’, ‘वैचारिक ठिणग्या’, ‘हिंदवी स्वराज्याचा खून’, ‘दगलबाज शिवाजी ‘यासह विविध चिकित्सक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहेच. न्यायाची बाजू घेताना कुणाचीही भिडमुर्वत न ठेवणारा झुंझार पत्रकार, परखड वक्ता अशी प्रबोधनकारांची ओळख. ‘प्रबोधन’ नावाच्या पाक्षिकातून  त्यांनी विपूल असे वैचारिक लिखाण केले आहे. संत गाडगेबाबा यांचे वस्तुनिष्ठ चरित्र लिहून त्यांनी एका विज्ञानवादी, बुध्दीप्रामाण्यवादी, सत्यशोधक गाडगेबाबांची ओळख महाराष्ट्राला करून दिली. कुठल्याही साधु-संतांच्या चमत्काराच्या फंदात न पडणाऱ्या प्रबोधनकारांनी संत गाडगेबाबांची निष्काम सेवा ओळखली होती. म्हणूनच त्यांनी संत गाडगेबाबांचे चरित्र लिहिण्यास होकार दिला. संत गाडगेबाबा नावाच्या संतामध्ये काय जादू आहे, हे त्यांनी स्वत: कीर्तन ऐकून तपासले आणि त्यानंतरच पुस्तकरूपी अक्षरांची फुले वाहिली. सन १९५२ ला त्यांनी संत गाडगेबाबांचे चरित्र लिहून या कर्मयोग्याचा ‘समाजवादी सत्यशोधक’ असा उल्लेख केला. कीर्तन, प्रवचन करून पोट भरणाऱ्या भटा, भिक्षुकांची चामडी सोलून काढणारे प्रबोधनकार संत गाडगेबाबांच्या कीर्तनात मात्र न्हाऊन निघायचे. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या प्रबोधनकारांना संत गाडगेबाबा आपल्या जातकुळीतील वाटत होते. म्हणूनच ते बाबांच्या गोरक्षणात यायचे तर बाबा सुध्दा प्रबोधनकारांच्या घरी जायचे. असा हा स्नेह एका वैचारिक धाग्याने विणला गेला होता.

   संत गाडगेबाबांच्या सामाजिक क्रांतीकडे प्रबोधनकार एक सत्यशोधक पत्रकार म्हणून पहात होतेच. मुंबईत बाबांची अनेक ठिकाणी कीर्तने व्हायची. ज्या एकमेव कीर्तनाची ध्वनीफित उपलब्ध आहे, ते कीर्तनसुध्दा मुंबईतच झालेले. प्रबोधनकार ठाकरे यांनी दादर येथील कॅडेल रोडवर असलेल्या एका वाडीत झालेले संत गाडगेबाबांचे कीर्तन ऐकले होते. हे कीर्तन इतर टाळकुट्या, पोटभरू कीर्तनकारांपेक्षा वेगळे आहे, याची जाणीव त्याचवेळी प्रबोधनकारांना झाली होती. एक समाजवादी सत्यशोधक या रूपात प्रबोधनकार बाबांना पहात होते. म्हणूनच त्यांनी संत गाडगेबाबा यांच्या चरित्रात त्यांचे सत्यशोधकीय दृष्टीकोनातून परखड लिखाण केले. सन १९५२ पर्यंतच्या संत गाडगेबाबांच्या क्रांतीकारी प्रवासाची प्रबोधनकारांनी अत्यंत ताकदीने मांडणी केली. या सबंध चरित्रातून दीनदुबळ्याचा उद्धार, विज्ञानवादी संत गाडगेबाबा उभा करण्यात प्रबोधनकारांनी कुठलीच कसर बाकी ठेवली नाही. संत गाडगेबाबा प्रसिध्दीपासून दूर राहात असल्याने त्यांच्या जीवनातील अनेक घटना मात्र समोर आल्या नाहीत. असे असले तरी जो समाजवादी महानायक प्रबोधनकारांनी या चरित्रातून उभा केला त्याला तोड नाही.

प्रबोधनकार म्हणतात, “धर्मपंथ असो वा धर्मग्रंथ असो, त्यातल्या यच्चयावत दांभिक पिसाटांचा कडाडून निषेध करणारा आणि देश काल वर्तमानानुसार जनतेला निर्मळ माणुसकीचा नवा आचार-विचार-धर्म शिकविणारा साधू म्हणा, संत म्हणा किंवा महात्मा म्हणा, काय वाटेल ते नाव द्या, श्री गाडगेबाबांच्या पूर्वी कोणी झालेला आढळत नाही आणि पुढे त्यांची ही लोकोत्तर परंपरा कोणी टिकवून चालविल असेही वाटत नाही. त्यांच्या निस्पृहतेला, निरिच्छतेला ‘निरूपमा’ हेच विशेषण छान शोभते.” इतक्या स्पष्ट आणि परखड शब्दात प्रबोधनकारांनी ही मांडणी केली आहे. संत गाडगेबाबांचा विचार पुढे जाईल की नाही, ही प्रबोधनकारांनी व्यक्त केलेली शंका आजसुध्दा खरी ठरलेली आहे. संत गाडगेबाबांचे चरित्र लेखण करीत असताना प्रबोधनकारांनी इथल्या भिक्षुकशाहीतील शोषणाचा कठोर शब्दात समाचार घेतला. आणि त्या अनुषंगाने हे चरित्र लेखन झाल्यामुळे संत गाडगेबाबांच्या चळवळीस योग्य न्याय मिळाला आहे.

संत गाडगे महाराजांच्या चळवळीच्या अनुषंगाने १९५२ ला ‘जनता जनार्दन’ नावाचे पाक्षिक सुरू करण्यात आले होते. या पाक्षिकाचे पुढे मासिक झाले. संपादक म्हणून अच्चुतराव देशमुख तर कार्यकारी संपादक म्हणून कैकाडी बुवा होते. मात्र या पाक्षिकाच्या संपादनाची संपूर्ण जबाबदारी प्रबोधनकारांनीच सांभाळली होती. या पाक्षिकात प्रबोधनकारांचे तेजस्वी विचार सातत्याने प्रकाशित होत असल्यामुळे महाराष्ट्र प्रबोधनात न्हाऊन निघत होता. विशेष म्हणजे बाबांवर इतके प्रेम असूनही जेव्हा केव्हा बाबांचे अनुयायी चुकीच्या पध्दतीने वागत असत त्यावेळी त्यांच्या वागणुकीवर या पाक्षिकातून प्रहार करण्यास प्रबोधनकारांनी कुठलीही कसर बाकी ठेवली नाही.

प्रबोधनकार ठाकरे आणि संत गाडगेबाबा यांच्यामध्ये वैचारिकदृष्ट्या प्रचंड साम्य होते. ज्या मानवी मूल्यांसाठी संत गाडगेबाबांनी झुंज दिली त्याच मानवी मूल्यांसाठी आणि समाजाला विवेक भान यावे म्हणून प्रबोधनकारांनी लेखन आणि कृती केली. हुंड्यासाठी वरपिता रूसला तेव्हा लग्न रद्द करून नियोजित वधूचा विवाह हुंडा न घेणाऱ्या मुलाशी लावून देण्याचा संत गाडगेबाबांच्या आयुष्यातील एक प्रसंग प्रबोधनकारांनी संत गाडेबाबांच्या चरित्रात रेखाटला आहे. संत गाडगेबाबांनी हुंड्यासारख्या अनिष्ठ रूढींवर कठोर शब्दात प्रहार केलेले आहेत. हुंडा निर्मूलनाच्या क्षेत्रात प्रबोधनकारांचे योगदान फार मोठे आहे. या विकृत प्रकाराचा प्रबोधनकारांनी तीव्र धिक्कार केला आहे. त्यांनी ‘हुंडा प्रतिबंधक स्वयंसेवक सेना’ मुंबईत स्थापन केली होती. एक व्यापक असे समाज प्रबोधन हुंड्यासारख्या रूढीच्या विरोधात प्रबोधनकारांची ही सेना करीत होती. वधुपित्याचे आर्थिक आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, यासाठीच प्रबोधनकारांची ही तळमळ होती. त्यांच्या या चळवळीमुळे अनेक वरपित्यांना हुंड्याच्या रुपात घेतलेल्या रकमा परत करणे भाग पडले. हा विचार संत गाडगेबाबांच्या हुंडा निर्मूलन चळवळीच्या अधिक जवळ नेणारा आहे. शेतकऱ्यांबाबत संत गाडगेबाबा व प्रबोधनकार ठाकरे यांना असलेली कणव, धार्मिक शोषणाबाबत दोघांचीही भूमिका एकसमान होती. म्हणूनच एका प्रबोधनकाराचे चरित्र दुसऱ्या प्रबोधनकाराने अत्यंत ताकदीने लिहून प्रबोधनाचे एक नवे विद्यापीठ निर्माण केले.

संत गाडगेबाबांच्या प्रकृतीबाबत प्रबोधनकारांना प्रचंड चिंता वाटायची. यासंदर्भात त्यांनी खंतही व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, “गेले कित्येक महिने आजाराने त्यांच्या प्रकृतीला पछाडले आहे. काही डॉक्टरी इलाज करावे, सांगावे तर तुफानी वावटळीप्रमाणे श्री बाबांच्या दौऱ्यापुढे ते फोल ठरतात. कितीही वेदना चालू असल्या, उभे राहताना पदोपदी शरीराचा तोल जात असला तरी त्यांचे वावटळी कीर्तनांचे कार्यक्रम अखंड चालूच. क्षणाचीही उसंत नाही, विश्रांती ही चिजच ठावी नाही.” अशा प्रकारे बाबांच्या प्रकृतीविषयी प्रबोधनकारांना प्रचंड काळजी वाटत असायची. यातूनच या दोन महामानवांचे संबंध स्पष्ट होतात. सन १९५५ मध्ये आचार्य अत्रे यांनी महात्मा फुले यांचेवर चित्रपट काढण्याचे ठरविले होते. त्याचे मंगला चरण हे गाडगेबाबांनी म्हटले होते तर शुटींगची सुरूवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते करण्यात आली होती. यावेळी माईसाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, शाहीर अमर शेख उपस्थित होते. या चित्रपटात सुलोचना यांनी सावित्रीबाई आणि भाऊराव पेंढारकर यांनी ज्योतीराव फुले यांची भूमिका साकार केली होती. या चित्रपटात प्रबोधनकार ठाकरे यांचा सहभाग होता. महात्मा फुले यांचा सत्यशोधकी विचार पुढे नेणारे संत गाडगेबाबा व प्रबोधनकार ठाकरे हे म्हणूनच एक-दुसऱ्यांचे आधारस्तंभ ठरतात. सोबतच ते महाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीचेही आधारस्तंभ ठरतात.

 (लेखक ‘मीडिया वॉच’ वेब पोर्टल व  दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक आहेत)

9623191923

संत गाडगेबाबा यांचा हा एकमेव बोलता व्हिडिओ आहे. एक अन्य Video मेहरबाबांसोबत आहे. पण त्यात बाबा बोलताना दिसत नाहीय . हा Video आचार्य अत्रे यांनी निर्मित व दिग्दर्शित महात्मा फुले चित्रपटातील आहे . चित्रपटाच्या सुरुवातीलाच हा ५१ सेकंदाचा व्हिडिओ गाडगेबाबा कसे दिसत , कसे बोलत याचे दर्शन घडवतो.

Previous articleसंत गाडगेबाबांचा एकमेव बोलता व्हिडिओ
Next articleअडलंय का?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here