पंछी बनु, उडता फिरू…  

– आशुतोष शेवाळकर

१९९५-९६ मध्ये पुण्याचे माझे जवळचे ज्येष्ठ मित्र प्रवीण गुप्ते यांनी ‘बिल्डरकी’ सोडून ‘स्पॅन एअर’ ही विमान सेवेची कंपनी सुरू केली. कल्पनेत किंवा स्वप्नात सुद्धा नसलेला एक वेगळाच प्रांत तेव्हा माझ्या दृष्टीच्या टप्प्यात अचानकच आला. त्यांनी ही कल्पना मला सांगितली तेव्हा आश्चर्यानी वासलेला माझा ‘ऑ’ त्यांच बोलणं संपेपर्यंत बंद झालेलाच नव्हता. सेसना-2 ही 14 सीटरची छोटीच विमानं घ्यायची, पुणे-नागपूर-इंदोर अशा मोठ्या कंपन्या विमानं नेत नाहीत त्या शहरांना जोडायचं, ही ‘ट्विन इंजिन’ विमानं असल्यामुळे एक इंजिन खराब झालं तरी दुसऱ्या इंजिननी ते लँड करू शकतं त्यामुळे ती ‘सेफ’ आहेत वगैरे त्यांची कल्पना त्यांनी मला समजावून सांगितली.

शेवटी एक दिवस पेट्रोलची टाकी छोटी असल्याने ठिकठिकाणी थांबत व विमानांना टॉयलेट नसल्यानी पायलटसना प्लास्टिकच्या पिशवीतच लघवी करावी लागत, अमेरिकेवरून ती दोन विमान भारतात आलीत. पुणे विमानतळावर जाऊन आम्ही त्यांची नवीन गाडीची करावी तशी पूजा केली.

नागपूरला त्यावेळेस ‘एअर ट्रॅफिक’ अगदीच कमी होता. पायलटसना प्रशिक्षणासाठी इथलं आकाश ‘सेफ’ व इथल्या विमानतळाचं भाडंही कमी, या दोन कारणांमुळे प्रवीणभय्यानी ती विमानं नागपूरला पाठवलीत. या विमानांबाबत प्रशिक्षण द्यायला सेसना कंपनीचे पायलट अमेरिकेवरून आले होते.

मदतीचा हातभार लावत हे सगळं जवळून पाहिल्यामुळे ‘एव्हीएशन’च्या दुनियेचा एक नवाच आयाम तेव्हा माझ्या आयुष्यात उघडल्या गेला. विमानाच्या चाकांनी ‘टेक ऑफ’ च्या वेळी जमीन सोडल्यावर पुन्हा ‘लँडिंगच्या’ वेळी ती जमिनीला टेकतात यातल्या मधल्या वेळेला ‘फ्लाइंग टाइम’ म्हणतात, इंधन व इतर खर्चाचा हिशोब ‘पर फ्लाइंग अवर’ केल्या जातो, विमानाला सगळ्यात जास्त धोका ‘लँडिंग’ च्या वेळेस, दूसरा धोका ‘टेक ऑफ’ च्या वेळेस व सगळ्यात कमी ते हवेत उडत असतांना असतो, अशा या क्षेत्राच्या अनेक तांत्रिक बाबी मला त्या काळात समजल्यात.

प्रशिक्षण संपवून ही विमान पूर्णपणे रिकामी पुण्याला परत जात होती. आईला तेव्हा पुण्याला जायचं होतं म्हणून मी तिला त्या विमानात पाठवलं. एका विमानात ती एकटी व दुसरं रिकामं विमान तिच्या दिमतीला ‘पायलट कार’ सारखं पुढे अशा ‘चार्टर्ड फ्लाईट’ पेक्षाही वरच्या दिमाखात ती पुण्याला  गेली. प्रवीणभय्यानी तिच्या नावाचं एक तिकीट बनवलं व ते ‘फर्स्ट पॅसेंजर ऑफ स्पॅन एव्हिएशन’ म्हणून त्यांच्या ऑफिसच्या स्वागतकक्षामधल्या बोर्डवर लाऊन ठेवलं.

या विमानांमधून मग मी अनेकदा प्रवास केला. दोन पायलटस् मिळून हे विमान चालवायचे व मधे काहीच ‘पार्टिशन’ नसल्याने सगळ्या प्रवाशांना ते विमान कसं चालवतात आहेत हे दिसायचं. माझी सीट अर्थात तेव्हा सगळ्यात मानाची अशी पायलटच्या मागची एक नंबरची असल्याने मला तर सगळ्या बटनांसकट विमान चालवण्याचे सगळेच बारकावे दिसू शकत. छोटं विमान असल्याने त्यात बसून आकाशात विहरतांना आपण उडणारे पक्षी असल्यासारखंच वाटायचं.

विमान ‘टेक-ऑफ’ साठी जमिनीवरून वर उडवायला जे हँडल असतं त्याला ‘जॉय स्टिक’ म्हणतात, ‘टेक-ऑफ’ च्या वेळी ती ‘स्टिक’ पुढे करणाऱ्या पायलटच्या हातामागे दुसऱ्या पायलटनी हात ठेवायचा असतो, कारण काही कारणाने पहिल्या पायलटचा हात सरकला तर ‘स्टिक’ झटक्याने पुन्हा मागे येऊन विमानाचा कपाळमोक्षच व्हायचा. अशा विमान चालवण्याच्या काही तांत्रिक बाबी मला मग कळायला लागल्यात. आकाराने छोटी असल्यामुळे ती विमानं ढगाला भेदून जातांना खूप हादरत असत. ‘विंडस्क्रीन’ मधून समोर उभा ठाकलेला मोठा ढग दिसू लागला की मुख्य पायलट बाजूच्या पायलटला त्या ढगांमध्ये जे छिद्र आहे त्यातून अलगदपणे असं विमान काढू असं हातानीच दाखवून सांगत असे. मग ते दोघं मिळून विमान थोडं वर घेत शिताफीने त्या ढगाच्या मधल्या छिद्रामधून पलीकडे बाहेर काढत. त्यामुळे मुळीच हादरे बसत नसत. हे सगळं कुतुहलानी न्याहाळत माझा प्रवास चालत असे.

त्यानंतर 1997 मध्ये अमेरिकेच्या बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या बोस्टनच्या अधिवेशनासाठी ‘की नोट स्पीकर’ म्हणून बाबांना निमंत्रण आलं. अधिवेशन आटोपल्यावर आम्ही सगळेच कुटुंबीय अमेरिकेत काही दिवस फिरत होतो. त्या प्रवासात ‘लास व्हेगास’ वरून ‘ग्रँड कॅनियन’ ला जातांना मला याही पेक्षा छोट्या विमानात बसायला मिळालं. एकच पायलट चालवत असलेल्या त्या विमानात सातच सिटस् होत्या. त्यापैकी चार सीटस वर आई, बाबा, मनीषा व मीच होतो. त्यामुळे आपला ड्रायव्हर चालवत असलेल्या घरच्या गाडीत बसल्यासारखं तेव्हा वाटत होतं. पांढरी हाफ चड्डी, पांढरा हाफ शर्ट व मोठा बेल्ट असा ड्रेस घातलेले अगदी जुन्या इंग्लिश दिवसांसारखे हे पायलट असतात. मला तेव्हा रिचर्ड बाक व त्याच ‘सर जोनाथन लिव्हींगस्टोन सीगल’ हे पुस्तक आठवत होतं. ‘ग्रँड कॅनियन’ कडे जातांना जगातलं  सगळ्यात मोठं धरण ‘हॉवर डॅम’ पण लागतं. त्याच्या विशाल सागरासारख्या पाण्यावरून जातांना ते विमान पूर्ण तिरपं करून खिडकीतून पायलटनी आम्हाला ते विशाल धरण दाखवलं. विमान पूर्ण तिरपं  करणं, पुन्हा सरळ करणे हे तो अत्यंत कसबाने, पोटातलं पाणीही हलू न देता करत होता.

त्यानंतर छोट्या विमानात बसण्याची संधी मला न्यूझीलंडला ‘ख्राइस्ट चर्च’ वरून ‘क्वींन्स टाऊन’ ला बसने जातांना मिळाली. दक्षिण ध्रुवाच्या दिशेने सतत वर चढत जाणारा, आजूबाजूला बर्फाळ पर्वतांच्या रांगा, नयनरम्य निसर्ग, मधे मधे अगदी खालचा तळ दिसणार्‍या स्वच्छ पाण्याची तळी असा तो रस्ता आहे. मधे बस थांबायची तेव्हा प्रत्येक इंचाइंचावर सुंदर निसर्ग असलेल्या त्या जागेवर लघवी करणं हे सुद्धा महापातक असलेल्या गुन्ह्यासारखं वाटायचं. मधे कधी कुठल्या तळ्याजवळ गाडी थांबली तर ओंजळी भरून भरून मी त्या तळ्याचं पाणी पिऊन घ्यायचो. याच रस्त्यावर मध्ये एक ‘टुरिस्ट एअरपोर्ट’ होता. त्या गावात बस तीन तास थांबवून प्रवाशांना या एअरपोर्टवरच्या विमानातून दूरवर दक्षिण ध्रुवाकडे जाणाऱ्या बर्फाळ पर्वतांवर ‘स्की प्लेन’ नी जाऊन येण्यासाठी वेळ दिला जात असे. हे पण विमान असंच सात सिटर होतं. त्याला चाकांव्यतिरिक्त ‘स्की’च्या असतात तशा दोन लांब पट्ट्या होत्या व या पट्ट्यांनी बर्फावर ‘स्की’ करत ते विमान ‘लँडिंग’ करू शकत असे.

त्या विमानानी आम्ही दक्षिण ध्रुवाच्या दिशेने दूर पर्यंत गेलो. ग्लेशिअर्समधून, उंच उंच बर्फाळ पर्वतरांगावरून उडवत ते विमान पायलटनी एका पर्वताच्या शिखरावर असलेल्या सपाट मैदानाच्या बर्फावर उतरवलं. त्या जागी जवळपास एक हजार फूट त्रिज्येचा नायलॉनच्या लाल दोरीनी गोल आखला होता. ‘टूर एस्कॉर्ट’ बाईनी सांगितलं “इथे तुम्हाला थोडं फिरून यायचं असेल तर या, पण या लाल दोरीच्या बाहेर चुकूनही जाऊ नका. या दोरीच्या रेषेच्या बाहेर कुठे दरी असेल ते सांगता येत नाही. तिथे तुमचा पाय जरी पडला तरी तुम्ही हजारो फूट खोल बर्फात गाडल्या जाल.” मला पृथ्वीच्या या  टोकावरच्या प्रदेशातला निर्मनुष्य सन्नाटा अनुभवायचा होता. त्यामुळे मी फिरत त्या लाल दोरीच्या टोकापर्यंत जाऊन आलो.

सगळ्यात छोट्या विमानात बसण्याची एक संधी मला ‘वॉशिंग्टनला’ आली. अचलपूरचे अशोक देशमुख हे अमेरिकेत जाऊन बिल गेट्सचा जवळचा सहकारी म्हणून काही दिवस काम करून तिथेच स्थायिक झाले होते. त्यांचं स्वतःचं एक छोटं ‘फोर सीटर’ विमान होतं. त्यांच्याकडे जेवायला गेलो असतांना मी त्यांच्या विमानाचा विषय काढला. ते म्हणालेत “तुला फिरायचं आहे का त्या विमानातून?” मी आनंदाने उठून उभे राहतच ‘हो’ म्हणालो. मग मी व मनीषा त्यांच्या गाडीनी वॉशिंग्टनच्या  खाजगी विमानतळावर गेलो. तिथे अनेकांची अशी छोटी छोटी विमानं ‘पार्क’ केलेली होती. गेटमधून आत शिरत आम्ही गाडीनी अगदी त्यांच्या विमानापर्यंत गेलो. त्यांनी स्वतःच विमानावरचं खाकी कव्हर काढलं, मग आम्ही तिघांनी मिळून ते विमान नीट पुसलं. त्यांनी गेज टाकून विमानच ऑईल, पेट्रोल वगैरे काहीतरी चेक केलं. मग आम्ही विमानात बसलो. ते स्वतः पायलटच्या सीटवर, त्याच्या बाजूच्या ‘को पायलट’च्या  सीटवर मी व मागच्या दोन सीटपैकी एका सीटवर मनीषा. त्यांनी विमान हळूवार चालवत धावपट्टीवर आणलं, धावपट्टीवर थोडच धावत ते विमान लगेच ‘एअर बोर्न’ पण झालं. आकाराने छोटं असल्यानी उडण्यासाठी त्याला जास्ती दौडवावं लागत नसे. त्यांनी ‘इअर फोन’ घातला व मलाही एक ‘इअर फोन’ घालायला दिला. विमान हवेत ‘एअर बोर्न’ होताच अनेक आवाजांचे कल्लोळ त्या ‘इअर फोन’ मधून ऐकू येऊ लागले. ही छोटी विमानं अगदीच खालून उडवायची असतात म्हणून त्यांच्यासाठी ‘एयर ट्रॅफिक कंट्रोल सेंटर’ नसतं. आपण विमान चालवतांना स्वतःच लोकेशन स्वतःच ‘अनाऊन्स’ करायचं असतं, म्हणजे इतर लोकं त्यांच्या विमानाचा मार्ग त्याप्रमाणे ‘अॅडजस्ट’ करतात, असं त्यांनी मला सांगितलं. इतक्या आवाजांचा कल्लोळ त्यामुळे त्या ‘इअर फोन’ मधून येत होता.

वॉशिंग्टनला एक मोठी पूर्ण गोल चक्कर आम्ही त्या विमानानी मारली. मधेच विमान तिरपं करुन ते आम्हाला खिडकीतून हे ‘व्हाईट हाऊस’, हे ‘सीआयए’ चं ‘हेड क्वार्टर’ असं दाखवत होते. कारच्या समोरच्या सीटवर बसल्यावर जसं  समोरच्या व बाजूच्या काचेतून सभोवतालचं सगळंच दिसतं तसं त्या छोट्या ‘फोर सिटर’ विमानातून दिसत होतं. आपली ‘कार’ हवेत उडवता आली आणि तिच्यात बसूनच आकाशात फिरता आलं तर जसं वाटेल तसं त्या विमानात बसून आकाशात फिरतांना वाटत होतं.

(लेखक शेवाळकर डेव्हलपर्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत)

9822466401

(आशुतोष शेवाळकर यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –आशुतोष शेवाळकर– type करा आणि Search वर क्लिक करा.)

Previous articleचार्वाक नावाचा चमत्कार!
Next articleमिथकात अडकलेले उद्धव ठाकरे…  
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here