–नीलांबरी जोशी
मेटा म्हणजे पूर्वाश्रमीच्या फेसबुकचं बाजारपेठेतलं मूल्य २६ टक्क्यांनी घसरुन २३००० कोटी डॉलर्सनी खाली आलं. ही बातमी धुमाकूळ घालते आहे. फेसबुक या सोशल मीडिया कंपनीपासून मेटाव्हर्सच्या व्हर्च्युअल जगाकडे चाललेली झुकेरबर्गची वाटचाल वादळी आहे याचं हे एक प्रत्यंतर. न्यूयॉर्क टाईम्सपासून अनेकांनी हे का घडलं असावं याची कारणमीमांसा केली आहे.
एक तर, फेसबुकचीच भावंडं असलेल्या इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअॅप या कंपन्यांच्या यूजर्समध्ये गेल्या वर्षभरात भर पडलेली असली तरी फेसबुकनं गेल्या वर्षभरात ५ लाख यूजर्स गमावले आहेत. फेसबुकच्या जन्मानंतर गेल्या १८ वर्षांत हे प्रथमच घडलं आहे. याचं एक कारण म्हणजे यूजर्सची संख्या वाढण्याच्या कळसाला फेसबुक पोचलं असं असू शकतं. त्यानंतर फक्त खाली येणंच घडतं.
फेसबुकचे यूजर्स कमी होण्यामागे दोन बलाढ्य कंपन्या आहेत. एक म्हणजे अॅपल आणि दुसरी गुगलं. अॅपलनं आपल्या आयफोनमध्ये “फेसबुक (किंवा तत्सम अॅप्स) तुमच्या आॉनलाईन अॅक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवून आहेत, ते तुम्हाला चालेल का?” यावर “हो” किंवा “नाही” असा चक्क पर्यायच दिला.
आता “लोकांना तुमच्या हालचालींवर लक्ष ठेवू का?” असा थेट प्रश्न फेसबुक आणि इतर अॅप्स विचारायला लागल्यानंतर अनेकजणांनी “नाही”चा पर्याय स्वीकारला. झालं.. फेसबुक आपल्या यूजर्सचा डेटा गोळा करुन तो इतरांना विकतं. हा त्यांचा कमाईचा भरभक्कम स्त्रोत मोठ्या प्रमाणात आटला.
*******
दुसरं म्हणजे, आयफोन वापरणारे लोक हे फेसबुकवरच्या जाहिरातदारांचे महत्वाचे ग्राहक होते. अॅंड्रॉईड अॅंप वापरणार््यां पेक्षा अॅपल वापरणार््याे लोकांची पर्चेसिंग पॉवर जास्त होती. आयफोनवरुन इंटरनेट वापरणारे मोबाईलवर दिसणार््यार जाहिरातींमधली उत्पादनं विकत घेण्यात खूप जास्त पैसे खर्च करत होती. अॅपलमुळे फेसबुकचे यूजर्स कमी झाल्यानंतर जाहिरातदारांना फेसबुकवर जाहिराती देऊन मिळणारा फायदा कमी होत गेला.
अॅपलनं केलेल्या या बदलामुळे मेटाला पुढच्या वर्षात १००० कोटी डॉलर्सचा फटका बसणार आहे. “सोशल मीडियावरुन जाहिराती करणाऱ्या कंपन्या या छोट्या उद्योगधंद्यांमध्ये मोडतात. त्यांच्या खपावर अॅपलच्या या धोरणानं परिणाम होईल, त्यामुळे अॅपलनं आपलं धोरण बदलावं” असा स्टॅंड मेटानं घेऊन पाहिला. पण अॅपल आपलं धोरण बदलेल अशी शक्यता कमी.
*******
आता अॅपल वापरणाऱ्यांना फेसबुक आणि फेसबुकवरच्या जाहिराती कमी दिसणार हे उघड आहे. त्यावर उपाय म्हणून आॉनलाईन जाहिरातींचं बजेट वळवायला कोणती कंपनी उपलब्ध आहे? याचं जाहिरातदारांना सापडलेलं उत्तर म्हणजे गुगल.
गुगलवरुन गेल्या काही दिवसांतलं ई-कॉमर्स सर्च वापरुन उत्पादनांचा रेकॉर्डब्रेक खप होतो आहे. थोडक्यात गेल्या तीन महिन्यांमध्ये मेटानं गमावलेले पैसे गुगलनं कमावले आहेत.
मेटासारखं गुगल काही एकट्या अॅपलवर फार अवलंबून नाही. गुगलवर जाहिरातदारांसाठी अनेक वेगळ्या योजना आहेत. तसंच अॅपलच्या सफारीवर गुगल हे default search engine आहेच. अॅपलच्या युजर्सचा डेटा गुगलकडे मोठ्या प्रमाणात जमा होऊन जाहिरातदारांना फायदा होतो आहे. जर जाहिरातदार असेच “गुगल सर्च अॅडस”कडे ओढले गेले तर मेटाचं अवघड आहे.
*******
मेटाचा अजून एक शत्रू म्हणजे टिकटॉक. टीनएजर्समध्ये छोट्या व्हिडिओ पोस्टसच्या फीचरमुळे भराभर पसरणारं हे अॅप मेटाची डोकेदुखी वाढवतंय. मेटाच्या इन्स्टाग्राम या भावंडाला टिकटॉकची चांगलीच टक्कर आहे.
“इन्स्टाग्राम रील्स” हे टिकटॉक व्हि़डिओसारखं फीचर मेटानं आणलं खरं. पण ते फीचर पैसे मिळवून देत नाही. व्हिडिओ अॅडसमधून पैसे मिळवणं हा मार्ग धीमा आहे कारण आपण व्हिडिओ अॅडस “स्किप” करु शकतो आणि बरेच यूजर्स तेच करतात. रील्सची संख्या जास्त आणि त्यामानानं पैसे कमी असं हे फीचर मेटाला उपयोगी नाही.
*******
Last but not least, आपलं व्हर्च्युअल आयुष्य बदलून टाकण्याचा दावा करणाऱ्या मेटाबद्दल अनेकजण साशंक आहेत. हे खूप यशस्वी होईल इथपासून एक फॅड आहे इथपर्यंत याबाबत मतंमतांतरं आहेत.
गेल्या वर्षभरात १००० कोटी डॉलर्स मार्क झुकेरबर्गनं मेटावर घालवले आहेत. ते वसूल होतील याची चिन्हं दिसत नाहीत. झुकेरबर्ग आपले कर्मचारी, यूजर्स आणि गुंतवणूकदार यांना त्याच्यावर विश्वास ठेवायला सांगतो आहे. त्यात अमेरिकेतल्या “फेडरल ट्रेड कमिशन”कडून मेटाची विश्वासार्हतेबद्दल वारंवार होणारी चौकशी हा प्रकार झुकेरबर्गच्या डोकेदुखीचं अजून एक कारण आहे. (तो एका वेगळ्या लेखाचा विषय आहे)
यापूर्वीच्या सगळ्या उड्या आणि कोलांट्याउड्या झुकेरबर्गच्या फायद्याच्या ठरल्या असल्या तरी मेटाबाबत मात्र त्याचे अंदाज चुकले असावेत असा इशारा वॉल स्ट्रीटनं दिला आहे हे नक्की.
*******
आपल्या हातात झिंग आणणारे व्हिडिओ गेम देऊन, दुसरीकडे सतत “जहॉं तेरी यह नजर है, मेरी जान मुझे खबर है” म्हणत इंटरनेट आणि सोशल मीडियावरुन आपली माहिती या कंपन्या गिळंकृत करत असतात. आज त्याच कंपन्या कोट्यावधी डॉलर्सचा आर्थिक युध्दाचा गेम खेळण्यात हिरिरीनं गुंतल्या आहेत.
संदर्भ :
https://exbulletin.com/business/1450738/
https://www.theguardian.com/…/facebook-stock-shares…
(नीलांबरी जोशी ‘कार्पोरेट कल्लोळ’ , ‘झपूर्झा’, ‘जिथे मुलांना पंख फुटतात’ आदी गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत)
[email protected]
………………………………………………………………………………………….