विनोबांचा दुसरा आक्षेप असा की या निवडणूक प्रक्रियेमध्ये ५१ टक्के मते मिळविणारे उरलेल्या ४९ टक्के लोकांवर राज्य करणार. (खरंतर ३५-४० टक्के मत मिळविणारे देखील उरलेल्या ६०–६५ टक्के लोकांवर राज्य करतच आहेत). त्यांचा हा मुद्दा पटण्यासारखा होता. परंतु सर्वसंमतीने राज्यकारभार चालावा हा विनोबांचा आग्रह व्यावहारिक नव्हता. इथल्या जातिग्रस्त समाज-व्यवस्थेतील भीषण विषमता ही सर्वसंमतीच्या आदर्श तत्वाला पोषक नव्हती व अद्यापही नाही. तथापि निवडून न देणाऱ्या मतदारांशी राज्यकर्त्यांची वागणूक नेमकी कशी असावी आणि ती उचित नसल्यास मतदारांनी काय करावे, असे कळीचे प्रश्न हे शिल्लक राहतातच.
अर्थात बदल घडायला वेळ हा लागेलच आणि हळूहळू का होईना, पण बदल हे निश्चितच घडताहेत. शेवटी उत्क्रांतीची प्रक्रिया ही अशीच असते. यथावकाश मानवी जाणीवही व्यापक होत आहे. गांधी-नेहरू-आंबेडकर यांच्या जाणीवा भारतीय समाजातील बहुतांश लोकांपेक्षा अधिक विकसित व संवेदनशील होत्या. परंतु एकंदर भारतीय समाजाची सरासरी जाणीव ही अधिक उन्नत होण्यापूर्वीच संविधान स्वीकारले गेले. ज्यांच्या जाणीवा अविकसित, मागास अथवा काळाची पावले न ओळखता भूतकालीन वैभवात रमणाऱ्या राहिल्या, त्यांनाही विकसित होण्यासाठी सत्तेत वाटा मिळविण्याची संधी प्राप्त होणे आवश्यक असावे. अन्यथा त्यांच्यातील सूडबुद्धीने व निराशेने जास्त विध्वंसक रूप धारण केले असते. उत्क्रांतीची दिशा ही एकूणच चेतनेचा अधिकाधिक विकास होत राहण्याची दिसते. स्वातंत्र्य, समता नि बंधुभाव ही मूल्ये ज्या फ्रेंच राज्यक्रांतीतून उगवली, त्या क्रांतीनंतर लगेच तिथे नेपोलियनची एकाधिकारशाही स्थापन झाली. परिणामी वरील मूल्यांना व्यापक स्वीकृती मिळण्यास दीडेकशे वर्षांचा कालावधी लोटला. विज्ञान व तंत्रज्ञान यांनी जगात त्या मूल्यांना पोषक व अनुकूल परिस्थिती निर्माण केल्यामुळे अशी व्यापक मान्यता मिळू शकली. माहिती तंत्रज्ञान व जागतिकीकरणाच्या लाटेमुळे आपल्या देशातही विशेषतः नवीन पिढीला समता, स्वातंत्र्य आणि बंधुभावाचे व्यावहारिक मोल समजत आहे.
सही विश्लेषण।