हौस.. बाग फुलवण्याची!

  -नीलिमा क्षत्रिय

हाती नाही बळ, 

 दारी नाही आड, 

त्याने लावू नये फुलझाड… 

  माझ्या हाती बळ नाही, दारी आडही नाही. पण सध्या माझी फुलझाडे मस्त बहरली आहेत.  ही बागबगिच्याची हौस म्हणजे सेकंड इनिंग आहे. तीस बत्तीस वर्षांपूर्वी जेव्हा घर बांधलं तेव्हा हेss थुईथुई नाचून झाडं लावली होती. नजरेसमोर तर वृंदावन गार्डन फिके पडेल असे प्लॅन्स तेव्हा विहरत होते. नर्सरीत जाऊन तेव्हा वट्ट पाचशे रूपये ( लक्षात घ्या, ३२ वर्षांपूर्वीचे )खर्चून भारी भारी रोपे आणली. त्यात नाजूक, रंगीबेरंगी फुलांची रोपे तर होतीच पण नवीनच फॅड आलेली क्रिसमस ट्री, रबर ट्री, पाम ट्री अशी बरीच आंग्लवंशीय झाडे पण होती.  त्यांना मोठ्या कुंडीत लावावं लागतं म्हणे, मग हे ss भल्या मोठाल्या, काही त्याच्या आतल्या, काही आणखी छोट्या अशा ब-याच कुंड्या अगदी रिक्षा करून घरी आणल्या. त्यातही वट्ट पाचशे रूपये जिरले. गेटच्या एका बाजूला बोगनवेल, एका बाजूला जुई, आत पोर्चच्या मागे बाजूला गुलाब, एकीकडे बटन गुलाब, मागच्या बाजूला एका कोप-यात पेरू, सिताफळ, नारळ, पपई, झालंच तर मधे मधे भाजीपाला, त्यात वांगी, भेंडी, कोथिंबीर, मेथी, गवार, झालंच तर भोपळ्याचा वेल, काकड्या फार महाग देतात मेले भाजीवाले म्हणून काकडीच्या बिया तर तीन चार ठिकाणी पेरून टाकल्या. बघू म्हटलं जास्तच पीक आलं तर वाटून टाकू ओळखीपाळखीत. पण ओळखी पाळखीतही लोक फार खडूस असतात हो.. आणि फुकट दिलं तर त्याची किंमतही रहात नाही. जाऊ दे, नाहीतर एखाद्या  भाजीवाल्याला विकूनही टाकू. असे मोठ मोठे प्लॅन्स पण रचून झाले. नारळ पण खूप येतात म्हणे आले की… ते नारळ विकणारे लोक येऊन तोडून नेतात म्हणे, भाव कमी देतात, पण एकगठ्ठा घेऊन जातात, म्हणजे आपल्या डोक्याला काही ताप नाही. घरच्यापुरती काय पाच पंधरा काढून घेतली की बाकीची देऊनच टाकायची. सगळं ठरवून टाकलं होतं मी.

  घराच्या आजूबाजूला अजून बांधकामं चालूच होती. तिथे पडलेले मोठाले दगड पण ‘सेतू बांधा रे’ स्टाईलने मुलींनी आणि मी वेचून वेचून डोईवर वाहून आणले, आणि ते कलात्मकतेने(!)रचले. मातीचा.. वाळूचा थर देत, तिथे छोटंसं रॉक गार्डन पण केलं. तिथे सगळे कॅक्टस लावले.आता कोणाच्याही घरी गेलं की सगळं लक्ष त्यांच्या बागेतच असायचं. कुठून कुठून कॅक्टसच्या कटींग्ज आणल्या असतील त्याची तर गिनतीच नाही.  पण आपल्याकडे ना कलेची किंमतच नाही कोणाला. ते दगडांवरचं ‘रॉक गार्डन’ बघून, ‘हे गबाळ का काढून टाकलं नाही बांधकामाचं’ .. असा प्रश्न जेव्हा एकाने केला तेव्हा तोच दगड उचलून त्याच्या डोक्यात घालण्यासाठी फार हात शिवशिवले होते.अंडरग्राउंड  पाण्याच्या टाकी शेजारी उगं फूटभर जागा उरली होती ती तरी का सोडा म्हणून तिथे एक  पाम ट्री लावून टाकलं. त्या पामने  तर ऐसपैस मुळं पसरवत चार वर्षात आख्खी पाण्याची टाकी भेगाळून टाकली. ती टाकी दुरूस्त करायला,  बांधताना झाला नाही एवढा खर्च झाला. आणि अर्थातच पाम ची आहूती पडली.

   खरं म्हणजे एखादं आंब्याचं झाड पण लावायचं फार मनात होतं. म्हणजे असा डेरेदार आम्रवृक्ष दारी उभा, त्यावर कोकिळा अशी कुहू कुहू ताना घेते आहे. मोहर असा नुसता तटतटला आहे, त्याचा मंद सुगंध हवेवर उधळतो आहे. भर दुपारी  त्याच्या गच्च सावलीत ‘अंबुवा के तले.. सावनके झुले’..वगैरे वगैरे.. पण शेजार पाजारच्या रूक्ष काळजीयुक्त सूचना-

 “त्याची मुळं भिंती फोडतील ना”..

 त्यांच्याही भिंती खेटूनच ना, त्यामुळे त्यांनी मला त्या अविचारापासून कसोशीने रोखलं.

  तर अशी सगळी बाग पहिल्याच वर्षी लावून झाली. दोन महिन्यात निकाल लागला तो भाजीपाल्याचा. भेंडी बरीचशी उगवलीच नाही, वांगी पण दोन चारच रोपे उतरली. त्यामानाने गवार बरी उतरली. मेथी चांगली उगवली.. पण महिन्याभरात जेमतेम अर्धी जुडी निघेल इतकी निघाली. त्या वेळी बाजारात रूपयाला दोन जुड्या मेथी मिळत होती. त्यामुळे ती एवढीशी मेथी उपटायची पण इच्छा राहिली नाही. भेंडीच्या रोपांची फुलं येईपर्यंत प्रगती झाली. नंतर त्या रोपांनी माना टाकल्या. चार वांग्याची रोपं मिळून एक वांगं कसंबसं निघालं. कोथिंबीर तर उगवलीच नाही. गवारीला सात आठ शेंगा आल्या. काकडीच्या बिया तीन ठिकाणी लावल्या  पण ते एकाच ठिकाणी उगवलं. उगवलं ते पण कुपोषित असल्यासारखं. जेमतेम भिंतीवर चढलं असेल नसेल तोवर त्याच्यावर कीड पडली. आणि एक दिवस ते आपणहून अल्ला को प्यारं झालं. घोसाळ्याचा आणि भोपळ्याचा वेल मात्र अंगात आल्यासारखे वाढले. अगदी कंपाऊंडची भिंत काबिज करून खिडक्यांमधून ही डोकवायला लागले. म्हणजे अशी वेळ आली की किचनच्या खिडकीतून नुसता हातही बाहेर काढायची गरज नाही. सकाळी उठून पहावं तर ओट्यावर भलामोठा भोपळा माझी वाट पहात कटण्यासाठी तय्यार पडलेला असावा. इतकी त्या वेलाने माया केली. पण शेवटी अती पसारा.. आणि भोपळा, घोसाळे खाणारे कोणी नाही, तोडायला कोणी नाही, तोडले तरी वाटायला कोण जाईल.. नंतर नंतर त्यावर पण कीड पडली म्हणून ते वेल पण फराफरा उपटून काढावे लागले.

    पेरूचं झाड मात्र चांगलं वाढलं. त्याचे पेरू पण अगदी खोब-यासारखे आणि खूप गोड होते. माझ्या मुली आणि त्यांच्या मैत्रिणी, गल्लीतले बारके पोरंटोरं सुट्टीच्या दिवशी, दिवस दिवस भर झाडावरच पोट भरायचे.  पण नंतर नंतर त्या झाडावर पांढ-या रंगाच्या माशी सारखी कीड पडली. ती नंतर नंतर इतकी वाढली की पूर्ण घराभोवती त्या माशा भिनभिनताना दिसायच्या. त्याला बरीच फवारणी पण केली, पण त्या माशा काही पिच्छा सोडीनात. झाडही सुकत गेलं, मग शेवटी ते झाड तोडलं.सिताफळ खूप छान वाढलं, तीस बत्तीसवर्षे त्या झाडाने मधूर फळे दिली. मोठमोठ्या टपो-या डोळ्यांची सिताफळं. दोन हातांच्या ओंजळीत मावेल असं एक एक सिताफळ. एवढ्या वर्षात कधीही बाजारातून सिताफळं आणली नाहीत.  आताशा ते झाड वठत चाललं, फळं पण  कमी झाली. पण आहे अजूनही. ते मधे तोडायचे चाललं होतं, पण मुली सातासमुद्रापलीकडूनही आडव्या पडतात. मुलींचं म्हणणं…

“इतकी वर्षे फळं खाल्ली त्याची, आता जेव्हा जाईल तेव्हा जाऊ दे, तोडायचं नाही”.

  पपईचं झाड नुसतंच वाढलं. फुलं यायची नुसती पण पपई कधी धरली नाही त्याला. पुन्हा कोणीतरी सांगितलं ते नर झाड असेल. त्याला फळ लागणार नाही. अशी सनक आली ना. नर्सरीवाल्याने फसवल्याचा फार राग आला. पण उगीचच ते झाड तोडून टाकायचा जीव झाला नाही. असू दे म्हटलं राहील तोवर राहील. वर्षभर राहिलं ते. आणि एका पावसाळ्यात वादळात मोडून गेलं.

   नारळाचं रोप काही लागलंच  नाही. ते रोप आणलं तेव्हा छान टवटवीत होतं, पण लावल्यावर चारच दिवसात मलूल दिसायला लागलं.

  कोणीतरी म्हणालं, “त्याला मीठ घाला.  समुद्रकिनारी मिठामुळेच चांगलं वाढतं. “

   तेव्हा गुगल बिगल नव्हतं ना. कोणीही काहीही सांगितलं तेच खरं वाटायचं. चांगलं  किलोभर मीठ त्याच्या बुडी सरकवलं. ते त्याला काही झेपलं नाही वाटतं. जेमतेम पंधरा दिवसात त्याने राम म्हटलं.

गुलाब तीनचांगले आठ दहा वर्षे सांभाळले पण  नंतर नंतर पांढरी बुरशीसारखी कीड लागल्यावर ते पण हळूहळू जळून गेले.

  नाजूक रंगीबेरंगी फुलझाडांनी नर्सरीतून घरी आल्यावर दोन चार दिवसच फुलं दावली. पुन्हा कधी त्यांना फूल म्हणून आलं नाही. नंतर ते तसेच “रूठे रूठे पिया” राहिले. त्यांना मनवायचे बरेच प्रयत्न केले पण त्यांनी मला दाद दिली नाही. हळूहळू एकेकाने  मला अलविदा केलं.

 गेटमधली बोगनवेल पाहून कोणीतरी म्हटलं की, ‘काटेरी झाडं लावू नाहीत दारात’, म्हणून तो वेल शहीद झाला. मला पण त्याचा वैतागच  झाला होता. नुसती वेड्यासारखी वाढ त्याला. आवरता आवरत नव्हता. जुईवरून एकदा घरात साप आला. त्याने घरात बराच हडकंप माजला. जुई पण कटली. दोन्ही वेली गेल्यावर लक्षात आलं, घरात किती अंधार झाला होता त्यांच्यामुळे.

  मधूमालती पोर्चवर चढवली होती, पण तिचा इतका कचरा पडायचा, आणि पावसाळ्यात  खाली पडलेल्या फुलांचे फरशीवर डाग पडायचे. फरशी काळीकिट्ट पडून गेली. मग ती फक्त बाहेरच्या बाजूने राहील अशी कापून टाकली. ती बाहेरून अजूनही आहे.

 रहाता राहिले कॅक्टस. ते अगदी दाराशेजारीच होते. लहान मुलं येता जाता हात लावत, हातात काटे रूतत. कपड्यांना काटे चिकटत. पुन्हा दारात काटेरी झाडं नकोत म्हणून ते पण काढले.

   एक खूप मोठ्या अळू सारख्या पानांचं रोप होतं. त्याला ब्रह्मराक्षस नाव होतं. ते पण दारात लावू नाही म्हणे. ते पण काढलं.

  रबर ट्री ने तर दोन वर्षांतच वडाच्या झाडाचं रूप धारण केलं. ते कुंडी फोडून वाढत सुटलं. आता त्याला पारंब्या पण फुटतात की काय ह्या विचाराने मला घाम फुटला. मग एक मैत्रीण तिच्या मंगल कार्यालयात लावायला ते घेऊन गेली. क्रिसमस ट्री जळून गेलं. आणि साधारण चार पाचच वर्षात माझी गार्डनिंगची हौस पुरती फिटली.  त्यानंतर सगळ्या कुंड्या एकात एक घातलेल्या अवस्थेत वर्षानुवर्षे कोप-यात पडून राहिल्या. तीनचार वर्षांपूर्वी त्या कोणा कोणाला देऊन टाकल्या. पुन्हा कुठलंही झाड म्हणून लावलं नाही.

  पण आता परत तीस वर्षांनी त्या हौसेने उसळी मारली.  त्याला कारण झालं ओल्या कच-यापासून मी बनवलेलं कंपोस्ट! एवढं कंपोस्ट तयार होतंय, त्याचा सदुपयोग नको का करायला? पण आता मी सावधपणे बाग फुलवली. आता मोठी झाडे, वेली, मातीत झाडे लावणे नच्छो. सरळ हलक्या फुलक्या रंगीबेरंगी हँगिंग कुंड्या आणल्या, इथे- तिथे, गेटला, ग्रीलला टांगून दिल्या, कंपोस्ट आणि माती मिसळून ऑफीस टाईमची पिवळी, गुलाबी रोपे लावून टाकली. ती पण कोणाकडून तरी दोन चार काड्या आणून. त्यांना ना कीड लागत ना कष्ट! जळाले तरी पुन्हा तयार करता येतात. वाईट वाटत नाही आणि जीव थोडा थोडा होत नाही.

   पण इथेही विशेष असं घडलं की रोपं अगदी सैरावैरा वाढत होती. पण एक फूल येईल तर शप्पथ. मी आपली घाल कंपोस्ट.. घाल कंपोस्ट.. ताजं घाल.. जुणं घाल, पण नाहीच. सगळी रोपं.. “आम्ही नाही ज्जा”… अशा पवित्र्यात.

माझा जीव लाल पिवळी फुलं बघायला कासावीस. पण एकही रोप काही मनावर घ्यायला तयार नाही. म्हटलं ह्यांना जरा म्युझिक थेरपी देऊन बघू, म्हणून सकाळ दुपार संध्याकाळ संगीताचा रतीब लावला. सकाळी भूपाळ्या काय,, दुपारी रोमँटीक सॉन्ग्ज काय,  रात्री जगजीतसिंगच्या गझला काय. नुसतं संगीतच संगीत. पण रोपं… “आम्ही नाई ज्जा”..

   आता काय करावं बा म्हटलं. मग माझ्या मुलीचा वर्गमित्र स्वानंद, त्याची एकदम आठवण झाली. तो यातला तज्ञ आहे. त्याला फोन केला म्हटलं ‘बा स्वानंदा, हे असं असं झालंय, एवढी कंपोस्ट मधे रोपं लावली, पण एक फूल येईना ना बा!’ तो म्हणाला, ‘कंपोस्ट  मधे नत्र भरपूर असतं पण फुलं येण्यासाठी आवश्यक स्फूरद कमी असतं. त्याकरता तुम्ही ‘प्रोम’ नावाचं एक सेंद्रिय खत मिळतं ते पण द्या”.

  मग ते खत त्याच्याकडून आणलं. चमचा चमचा सगळ्यांना घातलं. आणि आठवडाभर मला पुण्याला जावं लागलं. परतून बघते तर सगळ्या कुंड्या लाल पिवळ्या फुलांनी लगडलेल्या.

  आता लहान लेकराला बाळघुटी द्यावी तशी माझ्या बागेला प्रोम घुटी देणं चालू आहे. हळूहळू पुन्हा मोठी बाग फुलवण्याचा मोह होतोय.

(नीलिमा क्षत्रिय या ‘दिवस आलापल्लीचे’ ‘दिवस अमेरिकेचे’ या गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत .)

8149559091

Previous articleही तर काँग्रेसचं अस्तित्व नाममात्र करणारी मृत्यूघंटाच !
Next articleअमरावतीत दुर्मीळ ‘पर्ण वटवट्या’ पक्षाची नोंद
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.