अमरावतीत दुर्मीळ ‘पर्ण वटवट्या’ पक्षाची नोंद

-वैभव दलाल

उन्हाळी स्थलांतर करणाऱ्या पक्षांचे निरीक्षण व छायाचित्रण करतांना एप्रिल महिन्यात मनोज बिंड, वैभव दलाल, अभिमन्यू आराध्य आणि प्रशांत निकम पाटील यांनी ‘फिकट पायाचा पर्ण वटवट्या’ या पक्षाचे छायाचित्र टिपून देशस्तरावर महत्वपूर्ण नोंद करण्यात यश मिळविले आहे. या पक्षाचे इंग्रजी नाव ‘पेल लेग लिफ वॅरब्लर’ असे असून अंदमान निकोबार बेटांवरील तुरळक नोंदी वगळता भारताच्या मुख्य भूमीवरील ही पहिलीच महत्त्वपूर्ण नोंद ठरली आहे.  फिलोस्कोपस टेनेलीपस असे शास्त्रीय नाव असलेल्या हा पक्षाची ओळख पटवण्यासाठी जगविख्यात पुस्तक ‘बर्डस ऑफ इंडियन सबकॉन्टिनेंटल’ चे लेखक टीम इन्स्कीप, मुंबई येथील पक्षी अभ्यासक आशिष बाबरे आणि पक्षीतज्ञांच्या फेसबुक ग्रुपची मोलाची मदत झाली.

 साधारणपणे १० ते ११ से.मी. लांबीचा हा चिमुकला पक्षी इतर पर्ण वटवट्या प्रमाणेच फारसा आकर्षक दिसत नसला तरी फिकट गुलाबी रंगाचे पाय आणि खालच्या चोचेच्या मुळाशी असलेला फिकट गुलाबी रंग हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. सोबतच हिरवट राखाडी पंख, लांब भुवई, पंखांवर फिकट अस्पष्ट दोन पांढऱ्या रेषा व गळ्याखालील पांढरा भाग या त्याच्या ओळख-खुणा आहेत. झाडांच्या पानाआड दडलेले अगदी छोटे कीटक, कृमी हे याचे खाद्य आहे. ते टिपण्यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हात झाडांच्या वरच्या भागातच याचे जास्त विचरण होते. परंतु नंतर ऊन तापू लागताच झुडुपांच्या सावलीत तुलनेने कमी उंचीवर याच्या हालचाली आढळून येतात. फिलॉसकॉपीडी कुळातील ह्या अस्थिर व चपळ पक्षाचे दर्शन भारतात दुर्मिळ असल्याने याबाबत स्थानिकस्तरावर फारशी माहिती उपलब्ध नाही. आंतरजालावरील माहिती आणि ईबर्ड या जागतिक दर्जाच्या वेबसाईटवर  हा पक्षी प्रामुख्याने  जपान, व्हिएतनाम, थायलंड, म्यानमार या देशात आढळत असल्याची माहिती मिळते.  बांगलादेश व अंदमान निकोबार बेटांवर याची तुरळक नोंद दिसून येते. याचाच भाऊबंद असलेल्या ‘सखलीन लिफ वॅरब्लर’ या पक्षाशी याचे दिसण्याच्या आणि आवाजाच्या बाबतीत कमालीचे साध्यर्म असते. ईबर्ड या वेबसाईटवर सुद्धा या पक्षाचे भारतातील एकही छायाचित्र अद्यापही उपलब्ध नाही, यावरून अमरावतीमध्ये झालेल्या या आश्चर्यकारक नोंदीचे आणि छायाचित्राचे महत्व लक्षात येते.

संपूर्ण भारतातील ही अत्यंत दुर्मीळ नोंद असल्यामुळे पुढील सविस्तर अभ्यासाच्या दृष्टीने पक्षी अभ्यासक आणि पक्षी विषयातील संशोधक यांच्या दृष्टीने महत्वाची व आव्हानात्मक बाब ठरली आहे. पक्ष्यांचे स्थलांतर साधारणपणे सप्टेंबर महिन्यापासून सुरू होते. मे-जून महिन्यापर्यंत त्यांचा मूळ ठिकाणी जाण्याचा परतीचा प्रवास सुरु होतो. या मार्गात अमरावती आणि विदर्भाचा प्रदेश हा भौगोलीक दृष्टया एक मध्यवर्ती ठिकाण ठरतो. त्यामुळे हिवाळ्यातील मुख्य स्थलांतर आणि उन्हाळ्यातील परतीचे स्थलांतर या दोन्ही घटनांमध्ये या प्रदेशाचे विशिष्ट महत्त्व आहे.  या नोंदीच्या निमित्ताने अमरावती जिल्ह्याचा परीसर हा स्थलांतरीत पक्ष्यांसाठी एक महत्वाचा आणि खात्रीचा स्थलांतरमार्ग आहे हे पुन्हा अधोरेखित झाल्याच्या उत्साहपूर्ण भावनेसह जिल्ह्यातील पक्षीनिरीक्षक, अभ्यासक, छायाचित्रकार यांनी आनंद व्यक्त केला आहे, सोबतच पक्षी निरीक्षक, छायाचित्रकार यांना जिल्ह्यातील विविध वने, जंगलात निरीक्षणाकरीता जाण्यासाठी वनविभागाकडून अधिकृत ओळखपत्रे व आवश्यक ते शुल्क आकारून जंगल भ्रमंतीच्या वेळेत अधिक सवलत मिळाल्यास अमरावतीच्या जंगलाची ओळख वाघ व वन्यप्राण्यांपुरतीच मर्यादित न राहता इतर विविधांगी वैशिष्ट्ये जगासमोर आणणे शक्य होईल असा आशावाद व अपेक्षा नोंदकर्त्यानी वृत्तपत्र प्रतिनिधीकडे व्यक्त केली आहे

अमरावतीच्या परिसरात घेण्यात ही आलेली महत्त्वाची नोंद म्हणजे गेल्या १० वर्षांपासून जोपासलेल्या पक्षी छायाचित्रण छंदाच्या प्रवासातील आजवरचा सर्वात महत्वाचा क्षण आहे. या निमित्ताने शहर आणि जिल्ह्याच्या नावाची देशपातळीवर दखल घेतल्या जाईल याबद्दल समाधान वाटते. दिसण्याच्या बाबतीत वॅरब्लर प्रजातीच्या बहुतांश पक्ष्यांमध्ये एकसारखेपणा असतो त्यामुळे त्यांची नेमकी व कमी श्रमात ओळख पटवण्यासाठी त्यांच्या आवाजाचे ध्वनिमुद्रण करणे हा खात्रीचा मार्ग आहे. अशी व्यवस्था निदान प्रादेशिक स्तरावर असणे गरजेचे आहे. याबाबत वनविभागासारख्या शासकीय यंत्रणेने पुढाकार घ्यावा. जिल्ह्यातील मेळघाटसारख्या समृद्ध जंगलप्रदेशात अश्या अनेक अशक्य वाटणाऱ्या नोंदीची शक्यता आहे. त्यासाठी निरीक्षणातील सातत्य महत्वाचे आहे. मात्र अशा ठिकाणी वेळेचे अनिवार्य बंधन मारक ठरते. त्यासाठी उत्साही, जबाबदार पक्षीनिरीक्षक व छायाचित्रकारांना वेळोवेळी जंगल भेटीकरिता वेळेबाबत सवलत दिल्यास जिल्ह्यातील निसर्गाचा आणखी बराच खजिना उलगडू शकतो.

(लेखक नामवंत छायाचित्रकार आहेत)

9823018768

Previous articleहौस.. बाग फुलवण्याची!
Next articleलोकसंस्कृती व लोकपरंपरांचा जागर करणारे ‘शिवार’ संमेलन
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.