लोकसंस्कृती व लोकपरंपरांचा जागर करणारे ‘शिवार’ संमेलन

-टीम ‘मीडिया वॉच’

लोककला , लोकसंस्कृती व परंपरांना उजाळा देणारे अनोखे ‘शिवार संमेलन’ नुकतेच वर्धा शहरालगतच्या कुरझडी (जामठा) शिवारात पार पडले. बहुरूपी रामायण, गोंधळ, आणि तुकडोजी महाराजांच्या भजनांच्या सादरीकरणाने हे संमेलन आगळेवेगळे ठरले . काळाच्या प्रवाहात विस्मरणात जात असलेल्या लोककला व परंपरांचा जागर या संमेलनात करण्यात आला.

कृत्रिम झगमगाट आणि भपकेबाजपणापासून दूर राहत कृषी व लोकसंस्कृतीचे जतन करणाऱ्या ग्रामीण भागातील कलावंतांच्या कलागुण प्रकटीकरणासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, असे संमेलनाच्या संयोजिका, किरण बहुद्देशीय सेवा संस्थेच्या डॉ. रत्ना चौधरी यांनी सांगितले.

  महाराष्ट्रात वर्षभर वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यिक, सांस्कृतिक संमेलनांचे आयोजन होत असते. मात्र तापमान ४० डिग्रीच्या आसपास पोहचले असताना चक्क शेतशिवारात हे संमेलन आयोजित करण्यात आले होते.  या संमेलनात वर्धा जिल्ह्यातील खरांगणा(मोरांगणा) येथील जय भवानी गोंधळी मंडळाचे अशोक मारोतराव रेणके, साहिल अशोक रेणके,राजीव गुलाब मोरे यांनी अप्रतिम ‘गोंधळ’ सादर केला.डाहाका आणि तुणतुण्याच्या लयतालात त्यांनी रेणुकामाता व अंबामाईचा गजर करीत ‘गोंधळ’ केला. ‘गोंधळ’ हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय लोककला प्रकार आहे. मुळात हे  एक प्रकारचे विधीनाट्य आहे. ज्यात नृत्य आणि गायनवादन यांचा समावेश असतो. महाराष्ट्रात अनेक गोंधळी परिवारांनी ही लोककला टिकवून ठेवली आहे. खरांगणा(मोरांगणा)चे रेणके परिवार त्यापैकीच एक आहे. गोंधळ या लोककलेला पुनर्जीवित करण्याचे काम हा परिवार करतो आहे.

    भटके विमुक्त समाज सेवा संस्थेच्यावतीने लोकसंस्कृती दर्शन कार्यक्रमांतर्गत “लोक रामायणातील – रावण-मंदोदरी संवाद” हे बहुरूपी लोकनाट्य सादर करण्यात आले. वर्धा जिल्ह्यातील केळझर येथील काही लोककलावंत हे भटके विमुक्त बहुरूपी कला कुटुंबातील आहेत. गेली कित्येक वर्षे ते अविरतपणे बहुरूपी कला, लोकनाट्य, राष्ट्रीय गीतगायन, लोक रामायण इत्यादी लोककला प्रकार सादर करीत असतात. या लोकनाट्याची रचना शंकरराव शिंदे यांची होती.निर्मिती ताराचंद माहुरे  यांनी केली तर दिग्दर्शन वामनराव माहुरे यांचे होते. यात माधवराव जगताप, गोपाल माहुरे, तुकाराम माहुरे,रामराव माहुरे, पुरूषोत्तम सुरतकार, किसनाजी जगताप, वसंतराव जाधव, भाष्करराव शिंदे, शंकरराव सुरतकार आदिंनी विविध भूमिका सादर केल्यात. हे लोकनाट्य बहारदार झाले. प्रचलित रामायण नाट्यापेक्षा वेगळे असे हे लोकरामायण होते.

          ‘लोकसंस्कृती दर्शन’ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भजने श्री गुरूदेव सेवा मंडळाने सादर केली. ग्रामगीता आणि गांव-शेत -शिवार हे या भजनांचे केंद्र होते. ही भजने जयवंत भालेराव, प्रकाश राऊत, संजय वाके,कृष्णा सोलव, प्रविण वृंदे आदींनी सादर केली. संमेलन संयोजिका डॉ. रत्ना चौधरी नगरे, डॉ. सुधीर अग्रवाल, मंदा तरंगे, डॉ. संदीप हातेवार, अर्चना हातेवार,अनिकेत पेंदाम, प्रा. वर्षा फुंडे, नीरज आगलावे, प्रफुल पुणेवार,रवींद्र देशमुख, विष्णु कुमार, छाया राडे, प्रवीण सालोडकर, राहुल तळवेकर यांनी सर्व कलावंतांचे स्वागत आणि सत्कार केला. संपूर्ण लोकसंस्कृती  दर्शन कार्यक्रमाचे संचालन अनिता कडू यांनी तर माधुरी देशमुख यांनी आभार मानले.

  या संमेलनात कवी संमेलाचेही आयोजन करण्यात आले होते.कवयित्री डॉ. मीरा निचळे, ज्योती भगत यांच्यासह शुभम सोरते (गिरड), रुपेश कोरेकर (नागरी हिंगणघाट), स्वप्नील सरडे (इंझाळा), समरिन सय्यद अली (दहेगाव मिस्कीन), मधुर येसनकर (सिंदी मेघे), निखिल कोहळे या नवोदित कवींनी बोलीतील शेतीमातीच्या कवितांसोबतच सामाजिक आशयाच्या आणि नव्या जाणिवांचा वेध घेणाऱ्या कविता सादर केल्या. पल्लवी पुरोहित यांनी शैलीदार निवेदनाने या संमेलनात रंगत आणली. काव्यसंमेलनाचे अध्यक्ष संजय इंगळे तिगावकर यांनी याप्रसंगी बोलताना, प्रतिभेवर कुणाचाही मालकीहक्क नसतो. तिला जातीधर्माचे, गरिबी -श्रीमंती किंवा शहरी आणि ग्रामीण असे बंधनही नसते. मनाचे शिवार मोकळे केले की ती फुलून येते, असे प्रतिपादन केले. प्रारंभी दुपट्टा, टोपी, पुस्तक, वृक्षरोप आणि सन्मानचिन्ह देऊन सर्व कवींचा सत्कार करण्यात आला. कविसंमेलनाची भूमिका शिवार संमेलनाच्या संयोजिका डॉ. रत्ना चौधरीयांनी विशद केली.

(संयोजिका -डॉ. रत्ना चौधरी-9096193665)

Previous articleअमरावतीत दुर्मीळ ‘पर्ण वटवट्या’ पक्षाची नोंद
Next articleलग्नपरंपरा : थोडं बदलता येईल का?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.