लग्नपरंपरा : थोडं बदलता येईल का?

-नीलिमा क्षत्रिय

    घर पहावे बांधून आणि लग्न पाहावे करून असं जे म्हणतात ते उगीच नाही. घर बांधणं तरी एकवेळ सोपं. पैसा असेल तर कंत्राटदारावर सगळं सोपवता येतं. उलट मनासारखं काम झालं नाही तर त्याला धारेवरही धरता येतं. पण लग्नाचं मात्र कितीही कंत्राटं द्या, पण रितीच्या नावाखाली लोक -विशेषत: बायका जो काही गोंधळ घालतात त्याला तर काही लिमिटच नाही. शुभ- अशूभ, डावा हात – उजवा हात, मुलीची बाजू – मुलाची बाजू, प्रत्येक ठिकाणी हळद कुंकू, पाच फळं, सात पानं, नऊ फुलं, अकरा खारका, आंब्याची डहाळी, कणकेचा दिवा. त्याला काळ्या चिंधीचीच वात, भाताची मूद, नैवेद्य काय काय सामान लागेल त्याचा नेमच नाही.

      हे सगळं पूर्वी घरासमोर मांडवात लग्न होत तेव्हा ठीक होतं, पण आता घरापासून लांब कार्यालयात, रिसोर्ट्सवर लग्न करताना हे सगळं सामान त्या त्या वेळी पेश करणं म्हणजे त्या घरातल्या बायकांची कसोटीच ठरते.  त्याच्यातही एकदा वापरलेलं सामान परत वापरायचं नाही, दुस- या विधीसाठी परत वेगळी यादी..जिवाचा आटापिटा करून लोक सगळं गोळा करतच राहतात.

       शंभर दोनशे वर्षांपूर्वीच्या कृषी प्रधान ग्राम संस्कृतीतील सगळ्या पद्धती, ज्यांचे आताच्या शहरी जीवनमानाशी कुठलेही संदर्भ लागत नाहीत. त्याकाळी हाताशी असलेल्या वस्तु वापरून काही विधी पार पाडले जात असतील, त्याच वस्तु…  उदा. गोव-या, ऊस, गोमुत्र, लाह्या, कर्दळीची पानं, केळीचे खुंट, फुलं अशा वस्तु पुण्या – मंबईसारख्या ठिकाणी लोक दिवस चे दिवस घालवत आणि पेट्रोल – पाणी जाळत जमवत रहातात.

    अशाच एका लग्नात, आदल्या दिवशीच्या कुठल्यातरी विधीसाठी, नवरीचा भाऊ पांजरपोळात गोमूत्र आणायला गेला आणि तोंडावर गाईची लाथ खाऊन आला. डोळ्याखाली गालावर, नाकावर, हनुवटीवर मिळून दहा टाके पडले. लग्नभर तोंडावर त्या टाक्यांची कलाकुसर घेऊन फिरत होता.

  बायकांना स्वयंपाकघरात जास्तीत जास्त गोंधळ घालता यावा असंच सगळं लग्नकार्याचं डिझायनिंग केलं गेलेलं असतं. शेंगदाण्याचे, मुरमु-याचे मोठाले लाडू काय, सारणाच्या पु-या काय.. ‘कशासाठी करायचं हे’ म्हटलं की…’करावं लागतं, शास्त्र असतं ते…” हे उत्तर ठरलेलं.

वंशसातत्य हेच पूर्वीच्या ग्राम संस्कृतीमधे सर्वात जास्त महत्वाचे मानले जाई. लग्न विधीमागे वंशसातत्य हे महत्वाचे इप्सित. मग त्याला अनुसरून हळद कुटताना पण  ‘लेकुरवाळी’ हळकुंडे कुटायला घ्यायची. पण मग त्यामागचं लॉजिक समजून न घेता लेकुरवाळी हळकुंडे नसतील तर महिला वर्गातली  एखादी खूप ग्यानी महिला लेकुरवाळ्या हळकुंडांसाठी हटून बसते. दहा मैलांवरच्या दुकानात जाऊन तशीच लेकुरवाळीच हळकुंडे आणायची, तोपर्यंत जमलेल्या सगळ्यांना तिष्ठायला लावायचं आणि रक्त आटवायचं, ह्याला खरंच काही अर्थ आहे का? पण लग्न कार्यात यजमानीन बाईला जास्तीत जास्त अडचणीत टाकणा-या अशा एक दोन ग्यानी बायका असतातच.

एका लग्नात  मुहुर्तमेढ रोवायचं काम चालू होतं.  मेढ रोवून झाल्यावर टोकाला गवत बांधायचं राहिल्याचं अशाच ग्यानी बाईने यजमानांच्या नजरेस आणून दिले. गवत आणलेलं नव्हतं. शहरात कुठलं गवत मिळायला, त्यांनी दुधवाल्याला सांगून ठेवलं होतं..तो रोज आणतो आणतो करत राहिला, आणि शेवटी हात वर करून मोकळा झाला.  दोन तरूण पोरं लगेच ‘झायलो’ गाडी घेऊन गवत आणायला पिटाळले गेले. ते अर्धा तास घना घना फिरले, आणि गवताऐवजी हिरवा घास घेऊन आले. भटजी म्हणाले चालेल..घास पण चालेल…बांधा. पण ग्यानी बाई गवतासाठी हटून बसल्या. ऐकेचना. शेवटी भटजींनी मेढ रोवण्याचे व्यवहारी कारण सांगितले…. पुर्वीच्या काळी दारात मेढ पाहिली की लोकांना लग्नघर ओळखू यायचं.जास्त शोधावं लागायचं नाही. आता तर- गुगल मॅप लावला की गाडी बरोब्बर दारात ऊभी राहाते. मेढेच्या शेजारी रांजणात पाणी भरून ठेवायचे. मेढेला गवत, चारा बांधलेलाच असायचा. बाहेरगावाहून येणारी मंडळी बैलगाडीने यायची. त्यांच्या बैलांना आल्याबरोबर पाणी आणि चारा मिळायचा. आता न बैल राहिले न बैलगाड्या, पण लोक त्या लुप्त झालेल्या बैलांसाठी गवत आणायला पेट्रोल जाळत गाडीतून फिरतात.

  लग्नात मुलगी डाव्या हाताला बसण्याऐवजी उजव्या हाताला बसली म्हणून लग्नात रूसणारे पण असतात. पूर्वी पुरूषाचा उजवा हात शस्त्र चालवण्यासाठी मोकळा रहावा म्हणून मुलीला डाव्या हाताला ठेवत. आता कोणतं शस्त्र चालवायचंय नवरदेवाला. पण नाही, उजवा वरचढ, डावा कनसर…असंही काही गणित डोक्यात असावं, त्यामुळेही मुलीच्या उजवीकडे बसण्याला विरोध असेल.

    त्या काळी व-हाड जंगलातून जायचं..आडवाटा असायच्या..रस्त्याने माणसंच काय, चिटपाखरूही नसायचं.. चोर दरोडेखोरांची भिती असायची..स्वत:च्या आणि पत्नीच्या संरक्षणासाठी मुलाकडे शस्त्र… कट्यार असणं गरजेचं असायचं. आता काय गरज आहे त्या कट्यारीची? पण लग्नभर एअरकंडीशन्ड हॉल मधे, ती कट्यार, लिंबू बिंबू खोचून नवरदेव मिरवत रहातो.

  जेवणाचं तर खूपच अवडंबर माजत चाललं आजकाल..जितकी जास्त श्रीमंती तितका मेनू मोठा.. लांबलचक. त्याच्यात मग चायनीज पासून थाई, इटालियन पर्यंत सगळं…”अतिथी देवो भव” मानण्याची आपली संस्कृती..पण अशा जेवणात अतिथी नाईलाजाने भिक्षेक-याप्रमाणे हातात थाळी घेऊन फिरत रहातो.. सगळ्या स्टॉल्सवर झुंबड उडालेली असते..अशा ठिकाणी स्वत:चा आब राखून जेवणं किती कठीण..यजमान स्टेजवरून सगळी गंमत बघत असतात….ह्याच्या त्याच्या ताटात बघून पदार्थ शोधायचे..वाढून आणायचे, कधी खाल्लेलं नसल्याने ब-याच वेळा ते आवडत नाही की टाकून द्यायचे… वाया घालवलेलं अन्न ढीगाने कच-यात जातं. बरं, इतके पदार्थ असूनही, जेवल्यावर.. ‘घरीच पिठलं भात खाल्ला असता तर बरं झालं असतं’, असं वाटत राहातं. कशासाठी हे सगळं… त्याऐवजी साध्या आईस्क्रीम वर लग्नाचा विचार करायला काय हरकत आहे…

     मान्यवरांचे सत्कार हे पण एक न झेपणारं प्रकरण.. ज्यांचे सत्कार होतात ते मान्यवर आणि बाकीचे तुमच्या लग्नासाठी वेळ खर्चून आलेले काय मूर्ख का?..

    कन्यादान होईपर्यंत, मुलाच्या आईवडिलांनी जेवायचं,  मुलीच्या आईवडिलांनी उपास धरायचा…थोडक्यात उपाशी रहायचं. त्यांना बीपी आहे की डायबेटीस आहे, गोळी घ्यावी लागते का.. ह्या गोष्टी एकदम गौण. उपाशी राहाणं महत्वाचं. मुलीचे आईवडील ना ते..त्यांनी सगळ्यांची जेवणाखाण्याची सोय करायची आणि स्वतः दाताचं पाणी गिळत रहायचं दिवसभर..ब-याच वेळा तर लाखो रूपये केटररला देऊन मुलीचे आईवडील उपाशी पोटीच(जेवूनही न जेवल्यासारखंच) हॉलमधून बाहेर पडतात.

  आहेर हे तर मोठ्ठंच प्रकरण… निव्वळ डोक्याचा ताप अन् कामाचा व्याप वाढवणं. लग्नाचं निम्मं बजेट ह्या मानपानाच्या खरेदीत बसून जातं. बरं ती खरेदी पण डोळे झाकून केली जाते. देण्याघेण्याच्या साड्या दाखवा म्हटलं की, दुकानातला विक्रेता कमावलेल्या निर्विकारपणे ठराविक टाईपच्या साड्या महिला वर्गाच्या पुढ्यात फेकतो, महिला वर्गपण तेवढ्याच कमावलेल्या निर्विकारपणे त्यातल्या साड्या निवडतो. त्यातल्या त्यात शत्रूपक्षात मोडणा-या नणंद, तिची सासू, भावजई, तिची आई अशांकरीता स्पेशल निर्विकारपणा. देणं आणि घेणं. ह्याचं त्याला त्याचं ह्याला, ह्या फिरवाफिरवीत सगळं गणगोत गरगरत रहातं. रूसणं फुगणं , नावं ठेवणं ह्यातच लग्नाचं मांगल्य हरवून जातं. त्या ऐवजी कोणीच कोणाला काही दिलं नाही की घेतलं नाही तर सगळं किती सोपं होतं…

  एका लग्नात कन्यादानाच्या वेळी भटजी मुलाला सांगत होते, आता तुम्ही दोघे गृहस्थ धर्मात प्रवेश करत आहात. त्याचे काही नियम सांगतो.. ‘आता इथून पुढे तुझा पगार तू बायकोला द्यायचा, तिचं रक्षण पण तूच करायचं,’.. मुलगा म्हणाला ‘चालेल.माझा पगार तिला देईन तिचा मी घेईन, तिला माझ्यापेक्षा जास्त पगार आहे आणि ती ब्लॅकबेल्ट आहे, ती स्वत:चंच काय माझं पण रक्षण करेल’…

   असे सगळे सामाजिक संदर्भ बदलत असताना कालबाह्य होत चाललेल्या रूढी परंपरांमधे काळानुरूप बदल करायला काय हरकत आहे?

  बरं, न का करेना बदल, पण पुजा सांगणा-यानी एक प्रबोधन म्हणून  त्या रितींमागचा कार्य कारणभाव तरी उलगडून सांगावा. काही ठिकाणी सांगतात पण, पण फार कमी…

(नीलिमा क्षत्रिय या ‘दिवस आलापल्लीचे’ ‘दिवस अमेरिकेचे’ या गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत .)

8149559091

Previous articleलोकसंस्कृती व लोकपरंपरांचा जागर करणारे ‘शिवार’ संमेलन
Next articleतेच ते आणि , तेच ते …
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here