अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा ४० वर्षाचा गौरवशाली इतिहास

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनेला शनिवारी ( ९ सप्टेंबर) डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्काराने नागपुरात गौरविण्यात येणार आहे . डॉक्टर सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्र व सी . मो . झाडे फाउंडेशन या संस्थांच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारानिमित अंनिस व तिचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला आढावा – संपादक
………………………………………….

-अविनाश दुधे

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनेचा इतिहास मोठा रंजक आहे. १९८0 च्या दशकात नागपुरात रॅशनलिस्ट असोसिएशन ही संघटना चर्चेत होती. तेव्हाचे नागपूर विद्यापीठाचे मानसशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. चंद्रशेखर पांडे, उमेश चौबे, पत्रकार म.य. दळवी ही मंडळी या असोसिएशनमध्ये कार्यरत होती. अंधश्रद्धा, बुवाबाजी, भोंदूगिरी अशा विषयांत चर्चा, व्याख्यानं, जनजागृती हे काम या असोसिएशनच्या माध्यमातून चालत असे. याच मंडळींनी पुढाकार घेऊन नंतर मानवीय नास्तिक मंचची स्थापना केली. सुधाकर जोशी, नागेश चौधरी हे सुद्धा त्यांच्यासोबत सक्रिय होते. १९८१-८२ मध्ये विख्यात रॅशनॅलिस्ट बी. प्रेमानंद महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आले होते. नागपुरात त्यांच्या इंग्रजी भाषणांचा मराठीत अनुवाद करण्याचं काम श्याम मानवांनी केलं. मानवांनी तेव्हा इंग्रजीची प्राध्यापकी सोडून पत्रकारिता सुरू केली होती. ‘तरुण भारत’ या दैनिकात ते युवकांचा स्तंभ चालवित असत. वेगवेगळ्या पुरोगामी संघटनांमध्येही ते सक्रिय होते. त्या काळात अब्राहम कोवूरांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. विदर्भात मोठय़ा प्रमाणात असलेल्या अंधश्रद्धा, भोंदू महाराजांचं वाढलेलं प्रस्थ या विषयात काहीतरी केलं पाहिजे, हा मानव आणि त्यांच्या सहकार्‍यांमध्ये नेहमी चर्चेचा विषय असे. प्रेमानंदांच्या दौर्‍याने त्या विचाराला बळकटी आली. सर्वसामान्य लोकांना समजेल आणि रुचेल अशा भाषेत त्यांच्यापर्यंत हा विषय नेला पाहिजे, यावर नास्तिक मंचच्या कार्यकर्त्यांमध्ये एकवाक्यता होऊन श्याम मानवांच्या नेतृत्वात डिसेंबर १९८२ मध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जन्म झाला. ‘आमचा देवा-धर्माला विरोध नाही. देवाधर्माच्या नावाखाली शोषण करणार्‍या, लुबाडणूक करणार्‍यांविरुद्ध आमचा लढा आहे’, ही भूमिका घेऊन या कामाला सुरुवात झाली.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने १९९0 चं दशक अक्षरश: गाजवून सोडलं होतं. समितीच्या कामाचा तेव्हा महाराष्ट्रभर गाजावाजा होता. श्याम मानव व त्यांची टीम जवळपास चार दशक विदर्भात हीरो होती. तो काळ काही फार जुना नाही. अगदी आता काही वर्षापूर्वीची वर्तमानपत्रं पाहिली तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पराक्रमाने रकानेच्या रकाने भरलेले आढळतील. स्थापनेनंतर लवकरच अंनिसने विदर्भात खळबळ उडवून दिली होती. चमत्कार व दैवी शक्ती अंगात असल्याचा दावा करणार्‍या अनेक बुवा-महाराजांना समितीने आव्हानं देणं सुरू केले होते. बेबी राठोड, गुलाबबाबा, शेळकेबाबा, रज्जाक बाबा अशा अनेकांचा समितीने भंडाफोड केला. अनेक मांत्रिक व वर्धेच्या शहाडे महाराजांसारख्या नामांकित ज्योतिष्यांनाही समितीने थेट आव्हान दिलं होतं. कालांतराने तर देशभर ख्याती असलेल्या पायलटबाबा, कृपालू महाराज, बोलका पत्थरवाले पटवर्धन, सुंदरदास महाराज, नैनोदचा बाबा, शुकदास महाराज, आनंदीमाता, परिअम्मा, अशा अनेकांचे पितळ समितीने जनतेसमोर उघड केले. शकुंतलादेवीसारख्या अनेकांवर फजित होऊन नागपूर सोडण्याची पाळी आली होती. अलीकडच्या काही वर्षात कंबलवाले बाबा, ज्योतिषी नंदकिशोर जकातदार, पवन महाराज, तवेवाले बाबा, रवींद्र बाबा, डॉ. स्नेह देसाई , बागेश्वर बाबा आदींना पळवून लावण्याची कामगिरीही अंनिसच्या नावावर आहे. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर श्याम मानव आणि बागेश्वर बाबा यांचे वादविवाद चांगलेच गाजले होते .

गेल्या ४० वर्षात विदर्भातील प्रत्येक मोठय़ा शहरात समितीच्या शाखा स्थापन झाल्या आहेत . समितीच्या कार्याचा विस्तार केवळ विदर्भातच नाही तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, कोकण, खानदेशमध्येही झाला आहे. गुजरात, मध्यप्रदेश, गोवा, उत्तर प्रदेशातही श्याम मानव व त्यांचे कार्यकर्ते जाऊन आले. अनेक मोठे ज्योतिषी व महाराजांना आव्हान देण्याचं काम जोरात होतं. तेव्हा काहींनी तुमची संघटना मान्यताप्राप्त नाही, असा मुद्दा काढल्याने १९८६ मध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाने संघटनेची अधिकृत नोंदणी करण्यात आली. श्याम मानव हे अखिल भारतीय संस्थापक संघटक होते. पहिले अध्यक्ष प्रा. चंद्रशेखर पांडे, तर कार्याध्यक्षाची जबाबदारी सुप्रसिद्ध विचारवंत प्रा. भा.ल. भोळे यांच्याकडे होती. उमेशबाबू चौबे, रूपाताई कुळकर्णी, हरीश देशमुख, नागेश चौधरी, सुधाकर चौधरी, सुरेश अग्रवाल ही मंडळी पदाधिकारी होती.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा उल्लेख आला की अनेकांच्या डोळ्यांसमोर बुवा -महाराजांचा भंडाफोड एवढीच एक गोष्ट येते . मात्र शेकडो भंडाफोड केले तरी नवनवीन बुवा – महाराज तयार होतच राहतात हे लक्षात आल्यानंतर सर्वसामान्य माणसाला विवेकी बनवणे, त्याला तर्क व बुद्धीने विचार करण्याची सवय लावण्याची आवश्यकता समितीच्या लक्षात आली . अंधश्रद्धांची निर्मिती का होते?, माणसं ढोंगी , बुवा -महाराजांना शोषणाला बळी का पडतात ? महिलांचे देव -धर्माच्या नावाखाली लैंगिक शोषण का होते , याचा सखोल अभ्यास करून प्रा. श्याम मानव यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळांची आखणी केली . मानवी मेंदू , मन कसे काम करते हे लक्षात घेऊन स्वसंमोहन व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा , कौटुंबिक स्वास्थ कार्यशाळा सुरू करण्यात आल्या . त्यातून विवेकी ब बुद्धीप्रामाण्यवादी कार्यकर्ते तयार होण्यास सुरुवात झाली . वेगवेगळ्या क्षेत्रातील स्त्री – पुरुषांनीही या कार्यशाळांचा लाभ घेऊन स्वत:च्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणलेत. अलीकडच्या काही वर्षात जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समिती आग्रही आहे . जादूटोणाविरोधी कायद्याचा मसुदा तयार करण्यात श्याम मानव यांचाच पुढाकार असल्याने त्यांनी अतिशय परिणामकारक पद्धतीने या कायद्याच्या विषयात पोलिस अधिकारी , कर्मचारी व व वेगवेगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेतले आहे .अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही या विषयात सखोल अभ्यास करून ग्रामीण भागात कायद्याविषयी प्रबोधन सुरु केले आहे.

अंनिसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जिवाची बाजी लावून समाजप्रबोधनासाठी स्वत:ला समर्पित केल आहे. श्याम मानव, उमेश चौबे, हरीश देशमुख, विजय मोकाशी , ज्ञानेश मावळे, गणेश हलकारे, आशू घाटे लक्ष्मीकांत पंजाबी, दिलीप सोळंके, मधुकर कांबळे, अरविंद पाटकर, शरद वानखडे, गोविंद भेंडारकर , हरिभाऊ पाठोडे, प्रा. अशोक राणा, मधुकर कांबळे,पुरुषोत्तम आवारे , दत्ताभाऊ शिरसाट, सुनील यावलीकर, विनोद अढाऊ, अंबादास खंडसे , श्रीपाद अभ्यंकर,उदय मठकर, मिलिंद बागवे, संध्या बागवे , रवींद्र खानविलकर, हरिष इथापे, संजय इंगळे तिगावकर, मंगेश खेरडे , राजू खिरडे अशा असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या आयुष्याची महत्त्वाची वर्ष अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामासाठी दिली आहेत. सध्याच्या पिढीत शशी गमरे, प्रशांत सपाटे, छाया सावरकर, डॉ. स्वप्ना लांडे, प्रा.सुचिता ठाकरे, मृणाल डगवार, पंकज वंजारे ,किशोर वाघ, नरेंद्र पाटील , शेखर पाटील, हरिष केदार , सुमित उगेमुगे ,नीलेश मिसाळ आदी कार्यकर्ते झोकून देऊन काम करत आहे .

हे सुद्धा आठवणीने वाचा. खालील लिंकवर क्लिक करा –अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या इतिहासाची मोडतोड https://bit.ly/3h78jXd

………………………………………….

(लेखक ‘मीडिया वॉच’ अनियतकालिक, दिवाळी अंक, पब्लिकेशन व वेब पोर्टलचे संपादक आहेत )

8888744796

………………………………………….

अविनाश दुधे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –अविनाश दुधे– type करा आणि Search वर क्लिक करा.

 

Previous article|| ‘नागपूर पत्रिका’तील दिवस ||
Next articleपुणेरी ख्रिश्चन्स आणि खडकीची वेलंकणी मातेची यात्रा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.