पुणेरी ख्रिश्चन्स आणि खडकीची वेलंकणी मातेची यात्रा

-कामिल पारखे

`पुणेरी ख्रिश्चन’ हे विशेषण ऐकूनच काही जण चकित होण्याची शक्यता आहे.तर आज एका कार्यक्रमानिमित्त हे पुणेरी ख्रिश्चन लोक प्रचंड संख्येने एकाच ठिकाणी आलेले दिसले. असा योग दुर्लभ असतो, सटीसहामाही ते असे एकत्र आलेले असतात.`पुणेरी ख्रिश्चन्स’ म्हणून ओळखले जाणारे लोक पुण्याच्या मध्यवर्ती पेठेत, आजूबाजूला आणि शेजारच्या पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या संख्येने आढळतात. पुणेरी ख्रिश्चन लोक आपल्या आजूबाजूला वावरत असतानाही त्यांच्या विशिष्ट गुणधर्मानुसार ते चटकन ओळखले जात नाहीत. त्यांची संख्या अंदाजे दीड ते दोन लाख असण्याची शक्यता आहे.

आजचे निमित्त होते पुणे-मुंबई महामार्गावर खडकी येथे आता चालू असलेल्या वेलांकणी मातेच्या नोव्हेना- प्रार्थना. मारिया माऊलीच्या म्हणजे मदर मेरीच्या ८ सप्टेंबर च्या सणानिमित्त त्याआधी दहा दिवस या नऊ दिवसांच्या नोव्हेना प्रार्थना सुरू होतात, त्यास पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि देहू परिसरातील ख्रिस्ती भाविक येत असतात. पुणे, पिंपरी चिंचवड आणि थेट देहूरोड परिसरातील कॅथोलिक ख्रिस्ती भाविकांना वर्षांतून एकदा एकत्र आणणारे खडकीचे सेंट इग्नेशियस चर्च हे एकमेव देऊळ आहे. मुंबईत ज्यांनी बांद्रा येथे माऊंट मेरी बॅसिलिका येथल्या नोव्हेना आणि यात्रेला भेट दिली आहे त्यांना मी काय म्हणतो आहे याची थोडीफार कल्पना येईल. या नोव्हेना- प्रार्थनाच्या दहा दिवसांपैकी सुट्टीचा मुहुर्त साधून शनिवारी आणि रविवारी या भागांतील भाविक प्रचंड संख्येने खडकी लष्कर भागातील ऑल सेंट्स स्कूलच्या जवळ असलेल्या सेंट इग्नेशियस चर्चला भेट देतात.
आम्हीसुद्धा सप्टेंबर महिन्याच्या या पहिल्या शनिवारी खडकीला नित्यनेमाने जात असतो, आजही गेलो होती.

मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरला होता. सकाळी वाटले यात्रेतल्या स्टॉलवाल्यांचा आजचा धंदा पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाणार. पण सकाळी अकरापर्यंत पाऊस गायब झाला होता.
तर यानिमित्त पुणेरी ख्रिश्चन लोकांचे एकगठ्ठा दर्शन होते. या पुरुष आणि महिलांकडे नुसती एक नजर टाकली तरी जाणकार व्यक्तींना ते तमिळ, गोवन, मराठीभाषिक, मल्याळी किंवा दाक्षिणात्य आहेत हे कळत असते. कपाळावर कुंकू नि गळ्यात मंगळसूत्र असलेल्या महिला, नऊवारी लुगडे नेसलेल्या ज्येष्ठ महिला, डोक्यावर फुलांच्या घनदाट गजरांच्या माळा असलेल्या महिला, फ्रॉकमध्ये – पाश्चिमात्य पेहेरावात असलेल्या महिला. विविध तऱ्हेचे पोशाख असलेल्या आणि त्यातून नकळत आपल्या संस्कृतीची ओळख देणाऱ्या या महिला. पुरुषांच्या बाबतीत तसे वेगळे काही दिसत नाही, इथे धोतर, रंगीबेरंगी पागोटे असलेले, पायजमा आणि गांधी टोपी असलेले पुरुष दिसत नाहित, हरेगावात मतमाऊली यात्रेत मात्र हे चित्र अजूनही दिसते.

खडकीच्या या वेलंकाणी यात्रेनिमित्त ख्रिस्ती धर्माच्या वैश्विक रूपाचे दर्शन घडते. या नोव्हेना प्रार्थना प्रामुख्याने इंग्रजीत असतात, तसेच पुण्यातल्या ख्रिस्ती लोकांमध्ये बोलल्या जाणाऱ्या मराठी,कोकणी, हिंदी, तमिळ आणि मल्याळी भाषेत असतात.असा बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक कार्यक्रम पुणे शहरात कुठे कधी असा नित्य नियमाने होत असेल असे वाटत नाही.तसा मदर मेरीचा आठ सप्टेंबरचा सण जगभर साजरा होतो, विशेषतः पोर्तुगालमध्ये फातिमा येथे आणि फ्रान्समध्ये लुर्डस येथे. यापैकी फ्रान्सच्या लुर्ड्स या मेरियन डिव्होशन सेंटरला म्हणजे तीर्थक्षेत्राला मी भेट दिली आहे.
बांद्रा येथे माऊंट मेरी बॅसिलिका यात्रेला खडकीप्रमाणेच बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक ख्रिस्ती समाज गोळा होतो. याच काळात श्रीरामपूर तालुक्यात हरेगाव येथे जमलेल्या लाखो भाविकांच्या गर्दीतून मराठीभाषक ख्रिस्ती समाजाचे दर्शन घडत असते. खडकीतल्या चर्चमध्ये भरणाऱ्या या वेलांकणी यात्रेचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे नोव्हेनादरम्यान मारिया माऊलीची साडी, चोळी आणि श्रीफळसह ओटी भरण्यासाठी रांगेत उभ्या राहिलेल्या महिला.साडीचोळीने मदर मेरीची ओटी भरण्याची ही परंपरा मूळचे तमिळ असलेले भाविकांमध्ये आढळते.चर्चमध्ये मिस्साविधी संपल्यावर भाविक मग देवळाबाहेर भरलेल्या यात्रेतल्या स्टॉलवर गर्दी करतात.“आधी पोटोबा, मग विठोबा” अशी आमच्या ग्रामीण भागाकडे एक म्हण आहे. इथे घटनाक्रम उलटा होता.

खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर लोकांची झुंबड होती. सहसा इतरत्र न मिळणारे खाद्यपदार्थ इथे यात्रेचे दहाही दिवस विक्रीला असतात. उदाहरणार्थ, चिकन समोसा, चिकन कटलेटस, मसालेदार चिकन सँडविच, बिफ कटलेट्स आणि पोर्क विंदालू,.. चोरिस पाव मात्र कुठे दिसले नाही.बरेचसे `अभक्ष्य’ या सदरात मोडणारे आणि त्यामुळे नेहेमीच्या दुकानात सहसा न मिळणारे.घरून लवकर निघाल्याने जाम भूक लागली होती, त्यापैकी काही पदार्थांवर तिथेच ताव मारला आणि काही पदार्थ पॅक करुन पार्सल घेऊन आलो.यात्रेला हौशे, नवशे आणि गवशे असतात, इथेही असतात. विशेषतः अशा स्टॉलवर ते हमखास दिसतात. यात्रा आठ सप्टेंबरपर्यंत आहे. क्षुधा शांती करण्यासाठी किंवा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी पुन्हा एकदा येथे चक्कर. मारण्याचा इरादा आहे.

(लेखक नामवंत पत्रकार व ब्लॉगर आहेत)
९९२२४१९२७४

[email protected]