नवयुगाचा नवयोग

 

  • योगी अरविंद घोष यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने

    -अखिलेश किशोर देशपांडे 

          विज्ञान आणि अध्यात्म हे साधारणतः एकमेकांपासून पूर्णतः वेगळे असे भिन्न प्रांत मानले जातात. कारण विज्ञान हे ईश्वर अस्तित्वात नाही असे गृहीत धरून, सृष्टीचा किंवा विश्वनिर्मितीचा शोध घेण्याचा प्रयत्न करते (किंवा असे आपण मानतो). याउलट ‘अध्यात्म’ हे ईश्वराचे अस्तित्व गृहीत धरून तसा शोध घेण्याचा प्रयत्न करते, असाही आपला एक समज असतो. विज्ञान व अध्यात्म यांच्यात असा भेद करण्यामागे आणखी एक सबळ कारण आहे. जड-तत्त्वांपासून बनलेल्या विश्वसृष्टीच्या रचनेत ‘चैतन्याचा अंश लपलेला आहे की नाही, याचा छडा लावण्यात विज्ञानाला फारसा रस नाही. अध्यात्माला मात्र त्यातच खरा रस आहे. विश्वसृष्टीतील अनेक गूढ रहस्यांची उकल करण्यात विज्ञानाला रस तर आहे, पण त्याचे ‘सर्वमान्य’ होणारे व्यापक सिद्धांत मांडणे हा विज्ञानाचा खरा हेतू असतो. म्हणजेच काही निवडक वैज्ञानिकांनी या रहस्यांचा तपास घेणे आणि त्यावर शिक्कामोर्तब करण्याचा अधिकार असणाऱ्या संस्थांनी त्या शोधांना ‘अधिकृत’ म्हणून मान्यता देणे, असा प्रकार विज्ञानात चालतो. परंतु या मर्यादित समूहाबाहेर असणारा प्रचंड मोठा जनसमुदाय हा फक्त शालेय अथवा त्यापुढील शिक्षणातून ते ज्ञान ‘ग्रहण’ करण्याचे काम करतो. त्या ज्ञानाच्या प्रत्यक्ष शोधात तो सहभागी नसतो. अर्थात सर्वांना ते शक्यही नसते.

     परंतु विज्ञान म्हणजे ‘धर्मसंस्था’ नव्हे. म्हणूनच एकदा आपल्याला झालेले ज्ञान हे सार्वकालिक आहे, असा दावा विज्ञान करूच शकत नाही. त्यामुळेच पुढेही सातत्याने अभ्यास करून प्रचलित असणाऱ्या धारणांच्या विरोधी जाणारे निष्कर्ष विज्ञानाला काढता येतात. आपणांस पूर्वी झालेले ज्ञान हे अपुरे नि अर्धवट होते, असे विज्ञान उदारपणे स्वीकारते. किंबहुना तोच विज्ञान या संकल्पनेचा गाभा आहे. इथेच विज्ञानाची नाळ ही अध्यात्माशी जुळते. पुरातन काळापासूनच अध्यात्माने धर्मसंस्थेचा सतत आधार घेतला. कारण पूर्वीच्या काळी ईश्वराचा तपास घेताना त्या-त्या वेळी विकसित झालेल्या अध्यात्मशास्त्राला धर्माशिवाय समाजमान्यता मिळणे कठीणच होते. अब्राहम, मोझेस, येशू आणि पैगंबर यांना आपापल्या ‘व्यक्तिगत’ स्तरावर झालेल्या ज्ञानाचे वहन करण्यासाठी धर्माची गरज भासली. त्यापुढे जाऊन असेही म्हणता येईल की त्यांना झालेल्या ईश्वरविषयक ज्ञानाची सार्वजनिक अभिव्यक्ती, ही त्यावेळी धर्माच्या माध्यमातून होणेच अपरिहार्य होते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून कदाचित असेही म्हणता येईल की, ईश्वराने आपल्या अभिव्यक्तीसाठी अनेक धर्मांचा एक साधन म्हणून उपयोग करून घेतला. परंतु विविध धर्मांमध्ये

  • होणारी ईश्वराची विभागणी ही त्यामुळेच अटळ ठरली. मग कालौघात साध्यापेक्षा साधनांचे स्तोम हे जास्त माजले. कारण इप्सित साध्याकडे जाण्याचा हाच ‘एकमेव’ योग्य मार्ग आहे, असा दावा ती साधने करू लागली. मग भांडणं पेटली आणि हे फक्त निरनिराळ्या धर्मांच्याच बाबतीत झाले असे नव्हे. तर एकाच धर्मातील अनेकविध पंथांमध्ये असे हेवेदावे सुरू झाले. ईश्वरप्राप्तीसाठी उत्सुक असणाऱ्या विविध योगपद्धती देखील आपापसांत भिडल्याची अनेक उदाहरणे आहेत. परिणामी अध्यात्म हे धर्माच्या चौकटीत ‘बंदिस्त’ होत गेले.

       परंतु धर्मसंस्था म्हणजे अध्यात्म नव्हे. कारण ईश्वर आणि धर्म या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. किंबहुना ईश्वर म्हणजे नेमकी काय भानगड आहे हेच अजून पुरते स्पष्ट झालेले नाही. भारतीय उपनिषदांमधील ‘अव्दैत’ मान्यते नुसार, चराचर सृष्टीत लपलेले परमात्म्याचे चैतन्य-तत्त्व हेच ईश्वर आहे. पण तसे जर असेल तर सर्वच धर्मांची पारलौकिक गरज संपुष्टात येते. मग समाजाचे नियमन व नियंत्रण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूल्यव्यवस्थेची निर्मिती करणे, एवढीच भौतिक गरज भागविण्यापुरता धर्मशिल्लक राहतो. अशावेळी त्या-त्या समाजातील मानवी परस्परसंबंधांचे स्वरूप नेमके कसे असावे, हेही ठरविण्याचे काम धर्मच करतो. त्यामुळे पारलौकिक बाबींशी निगडीत असणाऱ्या अध्यात्मापासून धर्म हा अधिकाधिक दुरावत जातो.शिवाय धर्म हा मुळातच लवचिक नि अथांग असणाऱ्या पारलौकिक क्षेत्राभोवती कुंपण घालण्याचे काम करतो आणि परिणामी ताठर होत जातो. मग विश्वसृष्टीबाबतचे नवीन संशोधन, अभ्यास, तपास व त्यातून निघणारे निष्कर्ष यांच्यात त्याला फारसा इंटरेस्ट उरत नाही. अशाप्रकारे तो एकूणच नावीन्याप्रती उदासीन व प्रतिकूल बनत जातो.

    विज्ञान हे प्रामुख्याने धर्माच्या अशा ताठरते-विरोधात बंड करते. कारण त्याशिवाय विज्ञानाला स्वतःचा विकास करणे अशक्य होऊन बसते. परंतु पारलौकिक क्षेत्रातून धर्माची कायमस्वरूपी हकालपट्टी करणे, हे विज्ञानाच्या आटोक्याबाहेरचे काम आहे. कारण ईश्वरावर श्रद्धा असणाऱ्या सर्वसामान्य आस्तिकांच्या जाणीवेत धर्म आणि अध्यात्म हे एकरूप झालेले असतात. वैज्ञानिक प्रगतीचा आधार घेऊनच अनेक प्रकारच्या आधुनिक विचारधारा विकसित झाल्या. त्यांच्यामुळे प्रभावित झालेले कित्येक नास्तिकसुद्धा धर्म व अध्यात्म यांत गल्लत करताना आढळतात. त्यामुळे ईश्वर नावाची भानगड ही खरोखरच अस्तित्वात आहे की नाही, हे न तपासताच आस्तिक व नास्तिक भांडायला लागतात. मग त्या भांडणातून उद्भवलेले (आणि आपलीच बाजू कशी योग्य आहे हे ठासून सांगणारे) अनेक युक्तिवाद तयार होतात. त्यांना संघटित करणारी पुष्कळ मठे, पीठे नि व्यासपीठे जन्माला येतात. विविध समूहांनी बनलेला सामाजिक व राजकीय परिसर हा याच स्वरूपाच्या चर्चा आणि वादविवादांनी व्यापून जातो. त्यामुळे धर्म आणि अध्यात्म यांच्यातील सीमारेषा ही आणखीनच धूसर होत जाते.

    मानवसमाजाच्या ऐतिहासिक टप्प्यांचा विचार करायचा झाल्यास, प्राचीन आणि मध्ययुगीन काळात एकूणच जगभरात विविध धर्मांचे प्राबल्य राहिले आहे. धर्माने आखून दिलेल्या नियम-चौकटींनी मानवाचे खाजगी आणि सार्वजनिक आयुष्य नियंत्रित केले. तसेच मानवी परस्पर-संबंधांमध्ये पाळल्या जाणाऱ्या किमान नैतिकतेचा स्त्रोतही धर्मातच असल्याचे सांगितल्या गेले. समाजपरत्वे या नैतिकतेची व्याख्या जरी वेगवेगळी असली, तरी या नैतिकतेची किमान पातळी राखण्याचे काम धर्माने स्वतःकडे घेतले. त्यासाठी मानवी व्यवहारांवर अनेक प्रकारची बंधने लादली. ती न पाळणाऱ्यांना दंडित करण्याची प्रथाही निर्माण केली. मानवी व्यवहारांची नीट घडी बसविण्याचे कार्य अंगावर घेऊन असंख्य परंपरा, चालीरीती व संकेत जन्माला घातले. मानवी अंतरंगातील विनाशकारी आणि जीवनविरोधी अशा आसुरी प्रेरणांना पायबंद घालण्यासाठीच हा सगळा खटाटोप करण्यात आला. आधुनिक काळात हेच काम ‘कायदा’ करतो आहे. विज्ञान आणि धर्मनिरपेक्ष कायदा यांचा विकास हा सोबतीनेच झाल्याचे दिसून येते. पण कायदा हा मानवी नैतिकतेच्या स्वरूपाविषयी काही विशिष्ट आग्रह बाळगून असतो.

    तथापि आधुनिक कायद्याच्या नजरेत ‘धर्म’ हा मानवी नैतिकतेचा मूलस्त्रोत नाही. मानवाला माणूस म्हणून जन्मल्यामुळे प्राप्त झालेले काही अपरिहार्य नैसर्गिक अधिकार आणि एकमेकांच्या अधिकारांवर टाच न आणण्याचे कर्तव्य, अशी वैचारिक बैठक ही साधारणपणे नैतिकतेचा आधुनिक मूलस्त्रोत मानली जाते. त्यामुळेच लोकांच्या वतीने कायदा करून राष्ट्रांतर्गत मानवी व्यवहारांचे नियमन हे राज्यसंस्थेनेच करावे, अशी धारणा आजच्या आधुनिक काळात स्थिरावली आहे. परिणामी मानवाच्या खाजगी आणि सार्वजनिक व्यवहारांवरील धर्माचे नियंत्रण हे पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसते. यमनियम हे धर्माचे असोत वा कायद्याचे, जीवनविरोधी वृत्तीमुळे निर्माण होणाऱ्या विनाशी प्रवृत्तींना स्वतःचे व समाजाचे नुकसान करण्यापासून रोखण्याचा कसोशीने प्रयत्न करणे, एवढेच त्यांच्या अस्तित्वामागील प्रयोजन असते. मानवी अंतरंगाची मशागत करून अशा या वृत्ती-प्रवृत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याचे काम हे अध्यात्माचे असते.

    जगातील सर्वच भागांमध्ये विकसित झालेल्या आध्यात्मिक योगप्रवाहांनी मानवी अंतरंगाला बदलविण्याचे ध्येय बाळगलेले दिसते. परंतु त्यासाठी मानवी अंतरंगातील जीवनविरोधी प्रेरणांना संपूर्णतः नष्ट करणे आवश्यक आहे, याचे पुरेसे भान त्या योगप्रवाहांना कधीच नव्हते. उलट धर्माचा आधार घेऊन स्वतःचा प्रसार करणाऱ्या जवळपास सर्वच योगप्रवाहांनी, मानवाला जीवनाबद्दल उदासीन बनविण्याचे कामच जास्त केले. यांपैकी बहुतांश योगप्रवाहांनी जरी आत्म्याला मान्यता दिली असली, तरी आत्म्याच्या मृत्युपश्चात होणाऱ्या प्रवासालाच त्यांनी अतिरिक्त महत्व दिले. परिणामी आध्यात्मिक इतिहासातील बराच कालावधी हा ऐहिक जीवनाला दुय्यम लेखण्यात आणि प्रत्यक्ष अनुभवास न आलेल्या अशा पारलौकिकाची आस धरण्यात खर्ची पडला. असे जरी असले तरी, मानवी व्यवहारांचा विकारयुक्त पसारा हा सर्वच कालखंडात सर्वत्र पसरलेला होता. मानवी प्रकृतीमधील विकारांनी धर्माचा आश्रय घेऊन संकुचित नैतिकतेचे स्तोम माजवले आणि त्यातून उद्भवलेल्या ढोंगी वर्तनाला अध्यात्माच्या नावाने खपवले. यथावकाश विकसित झालेल्या आधुनिक विज्ञानाने या ढोंगीपणावर झगझगीत प्रकाशझोत टाकायला सुरुवात केली. त्यातूनच धर्मपीठांनी तोपर्यंत रुजवलेल्या धारणांना आव्हान दिले जाऊ लागले. संशोधकवृत्ती हाच गाभा असणाऱ्या मूळ अध्यात्माला धर्माने बंदिस्त केल्यामुळे, ‘विज्ञान विरुद्ध अध्यात्म’ असा खोटा संघर्ष उभा राहिला. त्यामुळे प्राचीन काळापासून चालत आलेल्या योगाभ्यासातून प्राप्त झालेल्या मिळकतींना एकीकडे हीन लेखल्या जाऊ लागले आणि दुसरीकडे विज्ञानाविषयीचा संशय बळावून त्याची हेटाळणी केल्या जाऊ लागली.

    खरंतर “जाणीवेला (Consciousness) जडापेक्षा (Matter)  स्वतंत्र अस्तित्व आहे की नाही”, एवढाच मुद्दा आस्तिक-नास्तिक वादाच्या मुळाशी आहे. आपल्यापरीने हा शोध घेण्याचा प्रयत्न विज्ञान करतेच आहे – पण केवळ बुद्धीच्या सहाय्याने. अध्यात्म मात्र बुद्धीपलीकडे जाण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करते. १) अशा या प्रयत्नांचे नेमके स्वरूप काय आहे? आणि २) त्यांची गरज नेमकी कशासाठी आहे? हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न ‘श्रीअरविंद-योग’ करतो. प्रस्तुत लिखाणाला श्री अरविंद घोष यांच्या चरित्रकथनात मुळीच रस नाही. कारण त्याविषयीची पुष्कळ माहिती सर्वत्र आणि सहज उपलब्ध आहे. अग्रणी स्वातंत्र्य-सैनिकांपैकी तेही एक होते, १९१०च्या सुमारास ते सर्वकाही सोडून तत्कालीन फ्रेंच वसाहत असणाऱ्या पुद्दुचेरीला (Pondicherry) कायमच्या वास्तव्यास गेले आणि तिथेच त्यांनी एका आश्रमाची स्थापना केली, एवढी किमान माहिती इथे पुरेशी आहे. अनेकांना कदाचित ते माहितीपण असेल. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे अरविंद घोषांचा जन्म हा ‘१५ ऑगस्ट १८७२’ रोजी झाला होता आणि भारताला जेव्हा १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ते जिवंत होते. त्यादिवशी त्यांच्यावयाची ७५ वर्षे पूर्ण झाली आणि यावर्षीचा १५ ऑगस्ट म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव. म्हणूनच यावर्षीच्या १५ ऑगस्टला श्रीअरविंदांच्या दीडशेव्या जयंतीदिनाकडे सुद्धा लक्ष वेधले जावे, हाही या लिखाणाचा एक उद्देश. पण श्रीअरविंद-योगावर थोडेसे विवेचन करण्याचा प्रयत्न करणे हा त्याचा मुख्य हेतू.

    ‘बुद्धीपलीकडे जाणे’ या गोष्टीचा नेमका अर्थ श्रीअरविंद-योग उलगडून सांगतो. त्यासाठी जाणीवपूर्वक करावयाच्या प्रयत्नांचे तपशील पुरवतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे योग, अध्यात्म, साधना, ईशप्राप्ती, ध्यानधारणा इत्यादी बाबी या जीवन-विन्मुख नसून जीवन-सन्मुख आहेत असे तो ठासून सांगतो. प्रस्थापित धर्माचारांना थेट फाटा देऊन पारलौकिकाची सांगड ही ऐहिकाशी घालतो; इतकेच नव्हे तर दोघांमधील ‘व्दैतच’ नाकारतो. कारण विश्वसृष्टीच्या जडभौतिक तत्त्वांमध्ये दडलेले सुप्तावस्थेतील चैतन्य जागवून, परस्परविरोधी भासणाऱ्या सर्वच घटकांमधील ‘एकत्व’ शोधणे हेच ह्या योगाचे मूळ ध्येय आहे. श्रीअरविंदांनी ‘सुप्रामेंटल’ असे नामकरण केलेल्या उच्च-दिव्य सामर्थ्यास थेट मानवी जीवनात उतरवण्याची अभिप्सा बाळगणाऱ्या ह्या योगाजवळ जुन्या योगप्रवाहांची अज्ञ हेटाळणी नाही की आधुनिक विज्ञानाविषयीचा संशयी नकार नाही आणि हेच त्याचे सगळ्यात मोठे बलस्थान आहे. प्रकृतीमधील विविध प्रकारच्या परस्परविरोधी रचनांमध्ये ‘सुसंवाद’ (Harmony) निर्माण करणे हेच त्याचे ध्येय आहे आणि तेही त्यारचनांची स्वतंत्र वैशिष्ट्ये टिकवून! केवळ मानवी अथवा सजीवच नव्हे तर निर्जीव सृष्टीमध्येही दिव्य सुप्रामेंटल सामर्थ्याचे अवतरण त्याला शक्य करायचे आहे. तसे करून झीज नि मृत्य-तत्त्वावर मात करणे आणि मानवी जीवन हे खरोखरच चिरंतन बनविणे, असा त्याचा अंतिम आदर्श आहे. त्यामुळेच तो जीवनविरोधी प्रेरणांच्या थेट विरोधात उभा ठाकतो. हा योग जगू इच्छिणाऱ्या प्रत्येकालाच आपल्यामधील विनाशकारी तत्त्वांना ओळखणे आणि त्यांना या अतिमानस योगप्रवाहात समर्पित करणे आवश्यक आहे. म्हणूनच इथे प्रचारकी शिकवण्यांना काही स्थान नाही. ह्या योगाच्या प्रत्येक साधकाला स्वतःच्या अंतरंगातील खोल डोहात शिरायचे आहे आणि अंतरात्म्याच्या मार्गदर्शनाखाली स्वतःमधील विकारांना सुप्रामेंटलच्या धारेमध्ये विसर्जित करायचे आहे. निरंतर चालणारी ही प्रक्रिया प्रत्यक्ष जगत राहणे म्हणजेच श्रीअरविंद योगसाधना!

    वर आपण पाहिलेच की विज्ञान हे या विश्वसृष्टीचे रहस्य उलगडणारे एक ‘सर्वमान्य’ सूत्र शोधण्याच्या खटाटोपात आहे. पण या पृथ्वीवरील फार मोठा जनसमुदाय हा त्यात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नाही. हा श्रीअरविंद-योग मात्र या शोधात सर्वांना सहज सामावून घेता येणारे एक सोपे समीकरण मांडतो. योगसाधनेतील संशोधनात आपल्याला जे काही गवसले, त्यावर शिक्कामोर्तब करणाऱ्या कुठल्याही ‘बाह्य’ संस्थेची किंवा रचनेची गरज नाही असे तो म्हणतो. प्रत्येक व्यक्तीच्या आंतमध्ये दडलेला ‘अंतरात्मा’ हीच एक सर्वोच्च Certifying Authority असल्याचे तो ठामपणे सांगतो. इतकेच नाही तर त्याच्या कायमस्वरूपी जागृतीचे अनेक मार्ग दाखवतो. अधिकाधिक वरच्या स्तरांतील सुप्रामेंटल दिव्यचेतना जेव्हा आपल्यामार्फत खाली उतरते, तेव्हा ती (धर्मासकट) सर्वच प्रस्थापित चौकटींची मोडतोड करते या तथ्याकडे तो आवर्जून लक्ष वेधतो. तसेच दिव्यचेतनेच्या उच्चस्तरांचा कुठलाही नवीन शोध हा ‘अंतिम’ असू शकत नाही, अशी त्याची पक्की धारणा आहे. विज्ञानामुळे तर अगदी सामान्य माणूसदेखील या विश्वसृष्टीचे रहस्य उकलण्याची हिंमत करू लागला. पण त्यासाठी बुद्धीची एक किमान विकसित पातळी असणे आवश्यक आहे. ह्या श्रीअरविंद-योगाचे मात्र तसे नाही. “संपूर्ण (निर्जीव-सजीव) प्रकृतीच योग करत आहे” अशी त्याची ठाम धारणा असल्यामुळे, सर्व मानवजात ही त्या योगप्रक्रियेत एकाचवेळी सहभागी होऊ शकते. शिवाय योगसाधनेची खडतर वाट ही प्रत्येकालाच आपापली स्वतंत्रपणे चालायची आहे. एखाद्या गुरूच्या मार्गदर्शनातच ती चालावी, अशी कुठलीही सक्ती हा योग करत नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे काहीतरी गवसू शकते आणि ते ‘गवसणे’ त्याच्या अंतरात्म्याला मान्यही असू शकते. त्यामुळे सर्वमान्य होणारे सार्वकालिक सिद्धांत मांडण्याचा कुठलाच आग्रह श्रीअरविंद-योगात नाही. राज्यशास्त्राच्या परिभाषेत सांगायचे झाल्यास, श्रीअरविंद-योगाने अध्यात्माचे अभूतपूर्व असे ‘लोकशाहीकरण’ घडवून आणले आहे.

    (लेखक अखिलेश देशपांडे हे युवा विधीज्ञ असून नुकतेच त्यांचे ‘अटळ गांधी’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे)

    9420128660

     

     

 

Previous articleस्वातंत्र्य आणि लोकशाही
Next articleसीमा शेटे-रोठेंचे ‘गाव कारागीर’ : शोध भूमी सत्वाचा!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here