Me Too !बायकांनी बोललं तरी प्रॉब्लेम, नाही बोललं तरी प्रॉब्लेम.

लेखक – मंगेश सपकाळ , मेलबोर्न ऑस्ट्रेलिया

कुठलाही ट्रेंड आला किंवा कुठलीही नवीन गोष्ट मार्केटमध्ये आली, कि त्याला समर्थन-विरोध दोन्ही मिळत असतं. समर्थन देणारे त्याला समर्थन का द्यावं म्हणून मत मांडतात, तर विरोध करणारे किंवा त्याबाबतीत गंभीर नसणारे त्याची खिल्ली उडवून मोकळे होतात.

तनुश्रीने मांडलेलं मत, ज्यात ती म्हणते की, “Me Too सारखी गोष्ट भारतात यशस्वी होणं शक्य नाही”. आणि हे एकदम खरंय. का ?
कारण लोकांची मानसिकताच मुळात तशी नाही, की एखाद्या गोष्टीचं गांभीर्य समजून घेण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. कदाचित रोज नवीन बातम्या, रोज नवीन काहीतरी मिर्च-मसाला मिळत असल्यामुळे की काय कुणास ठाऊक, पण लोकांचा कोडगेपणा प्रचंड वाढलाय.

सेक्शुअल Abuse, या गोष्टी किती टोकाच्या आहेत, याची आपल्याला जाणीव असायला हवी.

बायकांना गृहीत धरण्याचे प्रकार सगळीकडे पाहायला मिळतात. देश असो – विदेश असो, लाळ टपकवणारी पुरुषजात सगळीकडे पाहायला मिळते. भारताबाहेर राहणाऱ्या काही भारतीय मैत्रिणींचे किस्से देखील फार वेगळे नाहीत. त्यात जर ती स्त्री डिवोर्स झालेली असेल, एकटी राहत असेल तर तिला ‘अव्हेलेबल’ समजून घडणारे प्रकार तर फारच किळसवाणे आहेत.

“दहा वर्षांनी तिला का आठवण आली”, हे विचारणं प्रचंड मूर्खपणाचं लक्षण आहे. आपल्याला १०/१२/२०/३० वर्षांपूर्वीच्या चांगल्या-वाईट गोष्टी आठवत नाहीत का ? कोणीतरी एखादी गोष्ट सांगतो, आणि आपण मग आपल्या इतिहासातल्या गोष्टी आठवून त्यावर फेसबुकची पानं खरडत बसतो की. तेव्हा कोणी म्हणतं का, “आताच का आठवलं ?”

आपण असा काय समाज घडवलाय की बायकांनी विश्वासाने या गोष्टी सांगाव्यात कोणाला, त्यावर बिनधास्तपणे व्यक्त व्हावं. नुसतं तिने सेक्सवर लिहिलं की संस्कृतीवर आघात होतो तुमच्या, नाहीतर मग ती स्लट तरी होते.
मुलांनी आपल्या पालकांशी मनमोकळेपणाने बोलावं, त्यांना सगळं सांगावं… असं वातावरण निर्माण करण्याची जवाबदारी “पालकांची” असते. तसं स्त्रियांनी मोकळेपणाने वागावं, वावरावं, व्यक्त व्हावं… ही जवाबदारी समाजाची नाही का झाली ?
कुठली व्यक्ती मुद्दाम, हौसेने आपल्यावर झालेला अन्याय लपवून ठेवेल ? त्यामागची कारणं पाहणं ही आपली जवाबदारी नाही का झाली ?

उलट स्त्रियांनी ह्या गोष्टी बोलाव्यात, व्यक्त कराव्यात म्हणून पुरुषांनी पुढाकार घ्यायला हवा. कुणास ठाऊक आपल्याच घरातील किती स्त्रिया घुसमटत असतील. जेवढ्या गोष्टी बाहेर येतील, तेवढा समाज जागृत होईल आणि त्यावर भविष्यात काळजी घेण्यासाठी प्रयत्नशील राहू शकेल.
साला बायकांनी बोललं तरी प्रॉब्लेम, नाही बोललं तरी प्रॉब्लेम.

‘बायकांना बघून पुरुषांची वासना जागृत होणं’ फारच नॉर्मल आहे, निसर्ग आहे तो. काहीही चुक नाही त्यात. पण कोणाला त्रास होईल असल्या नजरा देखील आपल्या असू नये, हे कळायला हवं. कोणाकडे पाहणं हे देखील कोणाची प्रायव्हेट स्पेस डिस्टर्ब् करणं आहे.. हे समजायला हवं. कोणाच्याही शरीराला स्पर्श करण्याआधी, मग ती आई-बाप असो कि नवरा-बायको की मुलं, त्या व्यक्तीची Consent महत्त्वाची असते, आहे… या गोष्टी लहान वयातच मुलांना शिकवायला हव्यात. कोणाची प्रायव्हेट स्पेस जपणं हे ऑप्शनल नाही, तर ते Must आहे, हा विचार लहानपणीच मुलांवर रुजवायला हवा.

आपल्या घरातल्या बायका या Abuse ला बळी पडणार नाहीत, हे कशावरून ?

Me Too ची खिल्ली उडवणं, वगैरे प्रकार कोडगेपणाचं लक्षण आहे.

उलट Me Too सारखे ट्रेंड पुरुषांवर एक प्रेशर निर्माण करतील, जी चांगली गोष्ट आहे. आणि ज्याला कर नाही त्याला डर तरी कशाला हवा. आणि जर आपल्याला तो विश्वास नसेल, तर मग ‘बदलाला वाव’ आहेच की. लहान असो, मोठा असो, की अजून कोणी, कोणाला स्पर्श करताना प्रत्येकाने लाख वेळा विचार करावं, हा विचार रूळायलाच हवा.

————–

दुसरीकडे,

काही बायकाही अशा पेटून उठतात जसं काय, पुरुष जन्माला येतानाच रेपिस्ट होऊन येतो. कुठली तरी ‘बाईच’ जन्माला घालते ना त्यालादेखील. मग आपण जन्माला घातलेल्या कार्ट्यांची जवाबदारी त्यांना नुसतं मोठं करण्याची नसून ‘तो नैतिकता पाळतोय का, हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे हे पटवून का घेत नाही ? तो शिकून किती मोठा होतो, किती पैसा कमावतो, जगतो-मरतो, हे दुय्यम आहे, वैयक्तिक आहे. पण त्याच्यामुळे इतरांना त्रास होत नाही, हे शिकवणं, रुजवणं ही प्राथमिक जवाबदारी आयांनी घ्यायला हवी. मुलं असणाऱ्या आयांनी तर ‘जास्त सतर्क’ असायला हवं.

किती बायका आहेत, जे ठामपणे सांगू शकतात की त्यांच्या घरातले पुरुष, मग तो बाप असो, नवरा असो कि मुलगा, बाहेर जाऊन नैतिकतेचं पालन करतो, इतर कुठल्याही स्त्रीला त्रास होईल असं वागत नाही ? आणि जर हा विश्वास नसेल तर मग इथे पुरुषांच्या विरोधात गरळ ओकण्यात काय हशील ?

आपण करतो ते फक्त वितंडवाद. कोण श्रेष्ठ हाच वाद. एकीकडून पुरुष राग काढणार, दुसरीकडून फेमिनिस्ट नावाचा बुरखा घातलेल्या स्त्रिया पुरुषांवर भडास काढण्याची संधी शोधत राहणार…. याने साध्य काहीच होत नाही., होणार नाही.

यातून, ‘सेक्स एज्युकेशन’ ही काळाची गरज आहे’, येवढं जरी प्रगतशील भारताला कळलं तरी पुरेसं आहे.

(लेखक उपहास , वक्रोक्ती व विनोदी पद्धतीने अनेक विषयांचा परखड वेध घेतात. लेखक स्वतःचा परिचय अतिशय हट्टी , अतिशय निर्बुद्ध , अतिशय अश्लील , अतिशय दुराचारी-अविचारी , अतिशय उद्धट …. वगैरे वगैरे..असा देतात   )

Previous articleमहात्मा गांधींची टीव्हीवरील दुर्मीळ मुलाखत – सन १९३१
Next articleआदिम मातेचे स्तन आणि अस्मितांचे पान्हे…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.