नितीशकुमार यांचा राजकीय इतिहास ‘भाजपानुकूल’ समाजवाद्यांना तंतोतंत शोभणारा आहे . शिवाय भाजपसोबत जो काही तळ्यात-मळ्यातला खेळ सत्तेसाठी नितीशकुमार खेळले आहेत तो खेळ ‘आयाराम गयाराम’ संस्कृतीचे भारतीय राजकारणातले महामेरु भजनलाल यांनाही लाजवणारा आहे . थोडक्यात देशातल्या विद्यमान राजकारणात सत्तेसाठी संधीसाधूपणा करणारे नितीशकुमार हे ‘विश्वगुरु’ आहेत . असाच खेळ त्यांनी त्यांच्याच पक्षाचे शरद यादव यांच्यासोबत मांडला होता . लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबतही सत्तेसाठी कोलांट उड्या मारणारे नितीशकुमारच आहेत . नैतिकतेचा आव आणून जीतन मांझी यांना काही काळ मुख्यमंत्रीपदावर बसवणारे आणि हे मांझी डोईजड होत आहेत हे लक्षात आल्यावर त्यांना उचलून फेकणारेही नितीशकुमारच आहेत . जॉर्ज फर्नाडिस यांच्यासोबत समता पार्टी स्थापन करणारे आणि नंतर त्याच जॉर्ज फर्नाडिस यांना धोबीपछाड देणारे नितीशकुमार आहेत . नितीशकुमार यांची प्रत्येक चाल दीर्घकाळ भाजपसोबत राहून इतर पक्षांना टांग मारण्याची म्हणजेच भाजपचा फायदा करुन घेणारी आहे हे लक्षात घेतलं की , नितीशकुमार यांनी स्वत:ला पंतप्रधानपदाचा तिसरा पर्याय म्हणून समोर आणण्याचा जो खटाटोप सुरु केला आहे तो राहुल गांधी आणि काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ला अपशकुन करण्याची तिरकी चाल तर नाही ना , असा प्रश्न निर्माण होतो .