‘झीरो’ टीआरपीवाला ‘हीरो’ पत्रकार

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक -२०२१

श्रीरंजन आवटे

बिहारमधल्या चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी या छोट्या गावातला रवीश नावाचा मुलगा रवीश कुमारझाला हा प्रवास इंटरेस्टिंग आहे. खडतर आहे. घरातलं वातावरण कर्मठ स्वरूपाचं. कर्मठता एवढी की रवीशने आंतरजातीय लग्न केलं म्हणून आजही नातेवाईकांमध्ये आणि त्याच्यात संवाद नाही. वडील कनिष्ठ सरकारी नोकर. घरात नातेवाईक जमिनीवरच्या वादात अडकलेलेअशा सगळ्या वातावरणात रवीशने शिक्षण पूर्ण केलं आणि उच्च शिक्षणासाठी दिल्लीत गेला. रवीशच्या ऐन उमेदीच्या काळात देशही आर्थिकराजकीयसांस्कृतिक संक्रमणाच्या महत्वाच्या टप्प्यावर उभा होता. नव्वदचं हे दशक देशाचा चेहरामोहरा बदलवून टाकणारं होतं. रवीशसाठीहीमोतिहारी टू दिल्लीहा प्रवास मोठा होता.

00000000000000

2 ऑगस्ट 2019. नेहमीप्रमाणे अनेक फोन येत होते. काही अनोळखी नंबर्सवरुन येणार्‍या धमक्या त्याला सवयीच्या झाल्या होत्या. तेवढ्यात एक कॉल आला. नंबर फिलिपीन्सचा आहे, असं कळत होतं. ‘हे बघ ट्रोलर मला कशी धमकी देतात ते पाहा,’असं शेजारच्या व्यक्तीला सांगत त्याने फोन उचलला आणि आणि क्षणात सारंच बदललं. ‘तुमच्या पत्रकारितेतील कारकिर्दीसाठी यंदाचा मॅगसेसे पुरस्कार तुम्हाला प्रदान करण्यात येतो आहे,’ असं सांगणारा तो फोन होता.

     अर्थात रवीश कुमारांना मॅगसेसे मिळाला, त्या दिवशीची ही गोष्ट.

     मैं ही हूँ। पत्रकार। टीवी वाला। अधूरा कवि। क्वार्टर लेखक। दो बटा तीन ब्लागर।

 इन्स्टाग्रामवर अशी आपली ओळख सांगणारा हा आगळावेगळा पत्रकार म्हणजे रवीश कुमार.    

त्या दिवशी सोशल मीडिया रवीशमय झाला, कारण हा पुरस्कार केवळ या माणसाला नसून आपल्याला आहे, अशीच सर्वांची भावना होती. रवीशला ‘अरे तुरे’ करावं वाटावं आणि त्याचा पुरस्कार जणू आपल्याला आहे, असं वाटावं असं नेमकं काय आहे रवीशमध्ये? एखाद्या अभिनेत्याविषयी, सेलेब्रिटी कलाकाराविषयी अशी जवळीक वाटते, असं अनेकदा दिसते. पत्रकाराबाबत हे अगदीच दुर्मीळ आहे आणि त्यामुळे रवीशचं वेगळेपण ठळकपणे लक्षात येतं.

     बिहारमधल्या चंपारण जिल्ह्यातील मोतीहारी या छोट्या गावातला रवीश नावाचा मुलगा ‘द रवीश कुमार’ झाला, हा प्रवास इंटरेस्टिंग आहे. खडतर आहे. घरातलं वातावरण कर्मठ स्वरूपाचं. कर्मठता एवढी की, रवीशने आंतरजातीय लग्न केलं म्हणून आजही नातेवाईकांमध्ये आणि त्याच्यात संवाद नाही. वडील कनिष्ठ सरकारी नोकर. घरात नातेवाईक जमिनीवरच्या वादात अडकलेले. अशा सगळ्या वातावरणात रवीशने शिक्षण पूर्ण केलं आणि उच्च शिक्षणासाठी दिल्लीत गेला. रवीशच्या ऐन उमेदीच्या काळात देशही आर्थिक-राजकीय-सांस्कृतिक संक्रमणाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर उभा होता. नव्वदचं हे दशक देशाचा चेहरामोहरा बदलवून टाकणारं होतं. रवीशसाठीही मोतीहारी टू दिल्ली हा प्रवास मोठा होता. इतिहास विषयात पदवी घेऊन त्यानं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास एज्युकेशन इथे पत्रकारितेचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. या काळात पत्रकारिताही बदलत होती. प्रिंटचा विस्तार झालेला असला, तरी त्याचसोबत इलेक्ट्रॉनिक माध्यमं वाढत होती. तंत्रज्ञानाचा प्रस्फोट होत होता. 24 बाय 7 चालणार्‍या वृत्तवाहिन्या जन्माला येत होत्या. खाउजा धोरण, बाबरी पतन, विकेंद्रीकरणाचं धोरण, मंडल-कमंडल राजकारण अशी सगळी राजकारणाची मध्यभूमी बदलत चालल्याच्या पार्श्वभूमीवर रवीशने एनडीटीव्ही जॉइन केलं.

     सुरुवातीला रवीश कुमारला रिपोर्टर म्हणून एक शो देण्यात आला. ‘रवीश की रिपोर्ट’ या नावाने तो विशेष प्रसिद्ध झाला. वेश्यांचे प्रश्न असोत की रेडलाइटमध्ये राहणार्‍या इतरांचे, फूटपाथवर राहणारे गरीब असोत की विशिष्ट कारागीर, पायाभूत व्यवस्थांचे प्रश्न असोत की अस्मितांचे, रवीशचं हे रिपोर्टिंग लक्षवेधक ठरलं. त्याच्या रिपोर्टिंगचं वेगळेपण अनेक गोष्टींमध्ये आहे. मुळात आपण टीव्हीवर आहोत, याचा कुठलाच आवेश त्याच्या सबंध देहबोलीत नसतो. जिथे जातो तिथल्या माणसांमध्ये इतक्या सहजपणे मिसळून जातो की, हातात माइक नसला की, तो त्या वस्तीतच अनेक वर्षांपासून राहातो आहे, असं प्रेक्षकाला आणि त्या वस्तीतल्या माणसांनाही वाटतं. कधी कामगारांच्या सोबत त्यांच्या ताटात जेवता जेवता रिपोर्टिंग करतोय, तर कधी मायावतींच्या प्रचारसभा हत्तीवर बसून कव्हर करतोय, तर कधी कधी गलिच्छ वस्त्यांमधल्या अरुंद बोळातून जात, कारमधून, सायकल-रिक्षातून, कुठल्यातरी इमारतीच्या गच्चीतून अशा वेगवेगळ्या प्रकारे रिपोर्टिंग करण्याचं त्याचं अफलातून कसब अनुकरणीय आहे. ट्रायपॉड न वापरता रिपोर्टिंग करणं त्यानं सुरू केलं. त्यामुळे अनेक अंधार्‍या जागांपर्यंत तो पोहोचू शकला. त्या त्या ठिकाणच्या लोकांनाही तो सहज बोलतं करू लागला. कॅमेरामुळं येणारं अवघडलेपण त्याच्या देहबोलीत कधीच परावर्तित होत नाही. अनेक वेळा रवीश बोलत असतो आणि कॅमेरा मात्र रवीशच्या ऐवजी तो परिसर किंवा तो विषय अधिक नीट समजेल, अशा गोष्टींवरून फिरत असतो. त्यावरुन रवीश किती उत्तम दिग्दर्शक आहे, याची प्रचिती येत राहाते.

    पुढे रात्री 9 ते 10 चा रवीशचा ‘प्राइम टाइम शो’ सुरू झाला आणि त्यातून रवीशमधली अभ्यासक वृत्ती अधोरेखित झाली. कोणत्याही शोच्या सुरुवातीला रवीश सुमारे 7-8 मिनिटांची मोठी प्रस्तावना करतो. संपूर्ण शो बघितला नाही, तरीही या प्रस्तावनेतच प्रेक्षकाला विषयाचा पुरेसा अंदाज येतो. चर्चेत सहभागी झालेल्या व्यक्तींना बोलायला तो पुरेसा अवकाश देतो. आपण कोणाची उलटतपासणी करत आहोत, असा त्याचा आवेश नसतो. आपण देशाच्या वतीने प्रश्न विचारत असल्याचा आवही तो आणत नाही. मूळ प्रश्नाला न्याय मिळेल, अशी चर्चा घडवण्यावर त्याचा भर असतो. डिबेट शोजचं रूपांतर कोंबड्यांच्या झुंजीसारखं झालेलं असताना रवीशच्या या शोज्चं विशेषत्व नजरेत भरतं. शांत पण नेमका प्रश्न विचारत तो समोरच्या व्यक्तीला निरुत्तरही करतो. 2014 नंतर त्याच्या शोजमध्ये सातत्याने भाजप प्रवक्ते अडचणीत येऊ लागले. अखेरीस भाजप प्रवक्त्यांनी रवीशच्या शोवर बहिष्कार घातला.

     रवीशने डिबेट शोचं रूपांतर डॉक्युमेंट्रीच्या धर्तीवर आखलं. त्यात अनेक प्रयोग केले. टीव्हीवरील आक्रस्ताळ्या चर्चाविश्वाला उत्तर म्हणून त्याने संपूर्ण स्क्रीन काळ्या रंगात दाखवून शोची सुरुवात केली. विखारी आवाजाचं पार्श्वसंगीत लावून आजच्या अवस्थेविषयी त्याने प्रभावी मांडणी केली. रोहिथ वेमुला प्रकरण, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील तथाकथित देशद्रोही घोषणांचं वादग्रस्त प्रकरण या सार्‍यांविषयी चपखल भाष्य करतानाच त्याने लोकांना अंतर्मुख व्हायला भाग पाडलं. एनडीटीव्हीवर एक दिवसाचं बॅन आलं, तेव्हा माइम या कलाप्रकाराचा वापर करत त्याने एक अप्रतिम प्राइम टाइम शो केला. ‘बागों में बहार है’ या गाण्याच्या ओळी त्याने ‘अच्छे दिन’च्या पोकळ देखाव्याकडे मार्मिक निर्देश करत वापरल्या. रवीशची उपरोधाची शैलीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो उपरोध टोकदार आहे, पण बोचकारणारा नाही. त्याला एक नर्म विनोदाची किनार असते, त्यात खुसखुशीतपणा असतो.

त्याची भाषा इतकी साधी आणि प्रवाही असते की, त्यातून सामान्य प्रेक्षकासोबत त्याची पटकन नाळ जुळते. ‘है ना’ हे खास बिहारी टोनमध्ये म्हणत तो सर्वांसोबत दिलखुलास हसतो. भाषेच्या एकूणच वापराविषयी तो कमालीचा सजग आहे. विविध भाषांविषयी त्याला आस्था आहे. भाषिक राजकारणाची जाण आहे. त्याच्या साध्या सोप्या हिंदीमुळे लोकांशी तो सहज जोडला जातो. ‘इश्क में शहर होना’ हे त्याचं लघुप्रेमकथांचं (लप्रेक) पुस्तक असो, किंवा ‘कस्बा’ हा त्याचा ब्लॉग असो, त्याच्यातलं कवीमन, लेखकाची शैली या गोष्टी लगेच लक्षात येतात.

     ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ म्हणतात, आजच्या मुख्यप्रवाही पत्रकारितेची एबीसी म्हणजे एडवरटाइजमेंट, बॉलिवूड आणि क्रिकेट. रवीशला ही बारखडी अमान्य आहे. उथळ विषयांवर सवंग चर्चा करण्यात त्याने कधीच वेळ खर्ची घातला नाही. त्याने मूलभूत मुद्दे ज्या प्रकारे समोर आणले आहेत, त्याचे धडे हे पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात द्यायला हवेत.

     अलीकडच्या काळात रोजगार, शिक्षण, शेती आणि आरोग्य या प्रश्नांकडे त्याने खूप मोठ्या प्रमाणावर लक्ष वेधलं. आधीच चुकीची धोरणं, त्यात नोटबंदी मग जीएसटी आणि आता कोविड या सार्‍या पार्श्वभूमीवर बेरोजगारीची समस्या भयंकर वाढली. रवीशने यावर नौकरी सिरीज केली. अक्षरशः पन्नासहून अधिक शोज केले. निवड होऊनही शासनाने नियुक्त्या केलेल्या नाहीत, हे दाखवून दिलं. जिथे परीक्षा घेतल्या नाहीत, तिथे परीक्षा घ्यायला भाग पाडलं. या सगळ्याचा परिणाम म्हणून हजारो तरुणांना रोजगार मिळाला. यापैकी अनेकजण मोदीभक्त होते, तर काहीजण रवीशचा द्वेष करणारे होते. त्यापैकी काहींना रवीशच्या पत्रकारितेचे मोल जाणवले. देशभरातल्या शिक्षणाचा आढावा घेताना त्याने काही विद्यापीठांवर आणि शैक्षणिक संस्थांवर लक्ष केंद्रित केलं. प्राध्यापकांच्या भरतीचा अभाव, संसाधनांचा अभाव, शिक्षणाची सुमार गुणवत्ता, असे अनेक मुद्दे त्याने ऐरणीवर आणले.

     तीन वादग्रस्त कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकर्‍यांचं अनेक महिन्यांपासून सुरू असलेलं आंदोलन मेनस्ट्रीम मीडियाने कव्हर केलं नाही. या मेनस्ट्रीम मीडियाला रवीशने ‘गोदी मिडिया’ असं नाव दिलेलं आहे. त्यामुळे सध्या राष्ट्रीय माध्यमात ‘गोदी मीडिया विरुद्ध एकटा रवीश कुमार’ असं चित्र निर्माण झालेलं आहे. रवीशने प्रत्यक्ष शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन त्यावर शोज केले. रवीशचं शेतकर्‍यांनी प्रेमानं स्वागत केलं, तर गोदी मीडियाच्या अनेकांना प्रवेशही दिला नाही. शेतकरी आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्नही गोदी मीडियाने केला.

   मार्च 2020 पासून देशभर कोविड महासाथीमुळे थैमान माजले. उत्तर भारतात तर पायाभूत सुविधांचा अभाव, पुरेशा चाचण्याही न होणं, अशा पार्श्वभूमीवर रवीशने कोविड काळात स्थलांतरित मजूरांचे, कोविडबाधितांचे प्रश्न पटलावर आणले. या सगळ्या मूलभूत मुद्यांसह आजच्या हुकूमशाही सत्तेला तो सतत प्रश्न विचारत राहतो. सत्य सांगताना तो जराही कचरत नाही. धार्मिक ध्रुवीकरण असो वा भांडवलशाहीचं अत्युच्च टोक, सर्व प्रश्नांवर रोखठोक भूमिका तो मांडतो. न्या. लोया खटल्याविषयी धाडसाने शो करणारा हिंदी मीडियातील रवीश हा एकमेव पत्रकार आहे. गुजरातमधील दंगे घडवण्यात मोदी-शहांच्या भूमिकेवर प्रकाश टाकणार्‍या ‘गुजरात फाइल्स’ या पुस्तकावर चर्चाही त्यानेच घडवून आणली. म्हणून तर त्याचा आवाज या ना त्या प्रकारे बंद करण्याचा प्रयत्न होतो आहे. रवीशसह एनडीटीव्हीच सत्ताधीशांच्या रडारवर आहे. प्रणव रॉय (एनडीटीव्हीचे मालक) यांच्या संपत्तीवर रेड टाकून धमकावण्याचाही प्रयत्न झाला. जीवे मारण्याच्या धमक्या सातत्याने येत असल्या, तरी आपण बोलत राहिलं पाहिजे, असं रवीश कुमारला वाटतं. या संदर्भाने ‘फ्री व्हाइस’ हे त्याचं अलीकडेच प्रसिद्ध झालेलं पुस्तकही महत्त्वाचं आहे. भीतीचा फैलाव सर्वत्र झालेला आहे आणि घाबरलेलं असणं म्हणजे सुसंस्कृत असणं, अशी नवी व्याख्याच जन्माला येते आहे, असं त्यानं या पुस्तकात नोंदवलं आहे.

     लोकशाहीची हत्या झालेली आहे आणि या हत्येला माध्यमं जबाबदार आहेत. माध्यमांमधला हा सगळा कोरसचा आवाज, म्हणजे लोकशाहीच्या हत्येचं पार्श्वसंगीत आहे, अशी मांडणी रवीश करतो आहे. माध्यमांमध्ये जनतेचं प्रतिबिंब नाही. रिपोर्टिंग संपल्यात जमा आहे. एका मालकाप्रति आपली निष्ठा अर्पण करण्यापलीकडे आता काहीही उरलं नसल्याची खंत त्याने अनेकदा बोलून दाखवली आहे.

     रवीशला प्रत्यक्ष भेटण्याचा योग 2015 साली आला. रवीशला एका व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. एका अलिशान हॉटेलमध्ये रवीशच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रवीश आल्यानंतर अवघ्या पंधराव्या मिनिटाला हॉटेलच्या खाली आला आणि एकटाच चालू लागला. थोड्या वेळाने विद्यापीठात जायचे म्हणून आम्ही पाहायला गेलो, तर रवीश समोरच असलेल्या रस्त्यावरच्या माणसांना भेटून पुण्याविषयी समजून घेत होता. कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून त्याला मिळत असलेली ट्रीटमेंटही त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट वाटत होती. कार्यक्रमाच्या स्थळी असलेल्या व्हीआयपी रूममध्ये जातानाही त्याने ‘नो व्हीआयपी’ ही सुरू केलेली सिरीज अनेकांना आठवली. आपण सामान्य आहोत, माध्यमामुळे आपल्याला वलय प्राप्त होते आणि आपल्याला सामान्य माणसाप्रमाणेच वागणूक मिळावी, अशी त्याची प्रामाणिक धारणा आहे. त्याच्या भाषणाच्या स्क्रिप्टची प्रिंट काढायला त्यानं मला सांगितलं. गंमत म्हणजे, रवीशची ओळख करून  देण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मी त्याची करून दिलेली ओळख त्याला आवडल्याचं त्यानं आवर्जून सांगितलं. अवघ्या तीस मिनिटांच्या भाषणात त्यानं अतिशय सूत्रबद्ध अशी मांडणी केली. सहसा मोठ्या व्यक्तींच्या जवळ गेल्यानंतर त्यांच्यातल्या लक्षवेधक विसंगती पाहून मी त्यांच्यापासून दूर गेलो आहे. रवीश हा काही मोजक्या व्यक्तींपैकी एक आहे ज्याच्या सार्वजनिक प्रतिमेपेक्षाही अधिक त्याचं व्यक्तिगत असणं खरंखुरं आहे, असं मला वाटलं.

     समाजाचा आरसा सतत हातात धरणारा हा माणूस स्वतःकडेही चिकित्सकपणे पाहातो. स्वतःला प्रश्न विचारत राहातो. स्वतःविषयी लिहिताना त्यानं ब्लॉगवर म्हटलं आहे-

मैं एक सरल इंसान हूँ, मगर आप लोगों की तरह अनेक अंतर्विरोधों से भरा हुआ भी आपको मेरे लिखे और जीये में अंतर दिख सकता है, मगर किसी प्रयोजन के तहत ऐसा करने का प्रयास नहीं करता। समाज और खुद के अंतर्विरोधों से टकराना ही तो व्यक्तित्त्व और नज़रिये का सतत विकास है।

     इतका आरस्पानी असणारा रवीश शाळेतल्या त्याच्या गुरुजींनी सांगितलेलं ‘शौक ए दीदार है तो नजर पैदा कर’ या वाक्यात जगण्याचा सारांश सापडल्याचं सांगतो. त्याच्या मॅगसेसे सन्मानानं समाजातल्या सर्वहारा वर्गाला आपली कॉलर टाइट झाल्यासारखं वाटतं, यातच त्याच्या कामाची पावती आहे आणि रवीशचं असणं हे आपणा सर्वांना नवी दृष्टी विकसित करण्याचं आवाहन आहे.

     पुण्यामधल्या या कार्यक्रमात रवीश कुमारची ओळख करून देताना मी यशवंत मनोहरांच्या ओळींचा उल्लेख केला होताः

शब्दांची पूजा करत नाही, मी माणसांसाठी आरती गातो

ज्यांच्या गावी उजेड नाही, त्यांच्या हाती सूर्य ठेवतो !’

     या ओळींच्या न्याय देणारा आणि अशी प्रकाशबीजं पेरणारा खराखुरा पत्रकार, म्हणजे रवीश कुमार. तो सोबत असणं, हे समाजासाठीचं बहुमोल संचित आहे. तो स्वतः जेव्हा कोविडबाधित होता, तेव्हा अनेकांनी फोन करून चौकशी केली. कित्येकांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली. त्याचा प्राइमटाइम कधी सुरू होतोय, याची सर्वजण आतुरतेने वाट पहात होते. रवीश स्वतःला नेहमीच ‘झीरो टीआरपीवाला’ म्हणतो, पण तो हीरोपण नाकारणारा लोकांच्या मनातला ‘हीरो पत्रकार’ आहे, हे निश्चित! रवीश हा खरा लोकशिक्षक आहे. भारतीय माध्यमांचं उरलंसुरलं शहाणपण त्यानं टिकवलं आहे आणि प्रत्येकाच्या मनात एक आशा तेवत ठेवली आहे.

——–

श्रीरंजन आवटे हे कवी लेखक आहेत.

9762429024

Previous articleएड्स, निरोध, वेश्या आणि अशोक अलेक्झांडर..
Next articleममतांची मुंगेरीलालगिरी !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

  1. अनेकवेळा रविषकुमार यांनी मोदी यांच्या विरोधात ते नाहीत, काँग्रेस ची सत्ता असतानाही त्याची पत्रकारिता आता सारखीच होती असे त्यांच्या प्राईम टाईम कार्यक्रमातून विषद केले, करतात. तथापि अंध भक्त हे मानावयास तयार नाहीत, हे दुर्दैवी आहे. सत्तेत कोणीही असो, काम करताना त्यांच्या कडून चुका होणारच, किंवा लोकविरोधी निर्णय घेतल्यास, त्यांना प्रश्न विचारणे, चुका आम लोकांच्या नजरेस आणून देणे हे प्रामुख्याने पत्रकारांची जबाबदारी असताना, सद्य स्थितीत पत्रकार सत्तेचे लांगूलचालन करणारे झाले हे दुर्दैवी आहे.
    आज दिल्ली पासून गल्ली पर्यंत पत्रकारिता, (अपवाद वगळता) ज्या पद्धतीने सुरू आहे त्याचा उबग येतो.
    सत्ताधीश यांच्या विरोधात गेल्यास विविध धाडी टाकून त्यांचे जिणे हराम केल्या जात आहे, एनडीटीव्ही च्या मालकावर आणि रविशकुमार यांच्या विरोधातील असले प्रकार घडले, मात्र ते बाधले नाही, ते अभिनंदनास पात्र आहेत.
    मॅगसेसे पुरस्कार मिळाल्यावर त्यांचे अभिनंदन न करण्याचा कोतेपणा, सर्वांनी अनुभवला आहे. त्याचे शल्य रविशकुमार यांना असेल. पण लोकांनी त्यांना भरभरून प्रेम दिले, हे काही कमी नाही.
    दोन दिवसा पूर्वी ज्येष्ठ पत्रकार विनोद दूवा यांचे निधन झाले त्यांच्या निधनाची आणि कार्याची माहिती हा एक स्वतंत्र विषय असताना प्राईम टीव्ही चॅनल आणि प्रिंट मीडिया ने सुद्धा पाहिजे तश्या बातम्या दिल्या नाहीत, एकूणच निधना नंतरही त्यांच्या विषयी मनाचा कोतेपना पहावयास मिळाला ते गोदी मीडिया वाले नव्हते म्हणून हा आकस! हे फारच झाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here