सेपिअन्स – मानवजातीचा अनोखा इतिहास

Sapiens: A Brief History of Humankind’ हे युव्हाल नोआ हरारी यांचं जगभरात गाजलेलं पुस्तक. ‘A Brief History of Time’ नंतर सर्वांत जास्त गाजलेलं पॉप्युलर सायन्सचं हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या जगभरात १५ लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत आणि ३० हून अधिक भाषात अनुवाद झाला आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद (सेपिअन्स- मानवजातीचा अनोखा इतिहास )वासंती फडके यांनी केला असून ते १० मे रोजी डायमंड पब्लिकेशन्सच्या वतीनं प्रकाशित होत आहे. या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणाचा हा संपादित अंश..

……………………………………………………………………………………………………………………………

आज ‘महाविस्फोट’ (बिगबँग) या नावानं ओळखली जाणारी घटना सुमारे साडेतेरा अब्ज वर्षांपूर्वी घडून आली. या महाविस्फोटातून पदार्थ, ऊर्जा, काळ आणि अवकाश ही मूलभूत तत्त्वं अस्तित्वात आली. आपल्या विश्वातल्या या मूलभूत तत्त्वांची कथा म्हणजेच भौतिकशास्त्र होय.

त्यानंतर पदार्थ आणि ऊर्जा यांच्या एकत्रीकरणातून अस्तित्वात आलेल्या ‘अणू’या नावानं ओळखल्या जाणाऱ्या गुंतागुंतीच्या रचना सुमारे तीन लाख वर्षांनी तयार व्हायला लागल्या. त्या एकमेकांमध्ये मिसळून रेणू तयार झाले. अणू-रेणूंची कथा आणि त्यांच्यात होणाऱ्या क्रिया प्रतिक्रिया म्हणजेच रसायनशास्त्र होय.

‘पृथ्वी’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या ग्रहावर सुमारे ३.८ अब्ज वर्षांपूर्वी काही रेणू एकत्र आले आणि त्यांच्यातून विशेषतः मोठ्या आणि गुंतागुंतीच्या रचना असलेल्या सजीवांची निर्मिती झाली. या सजीवांची कहाणी म्हणजेच जीवशास्त्र होय.

सुमारे सत्तर हजार वर्षांपूर्वी ‘होमो सेपिअन’या सजीवांच्या जातीनं याहूनही अधिक गुंतागुंतीच्या ‘संस्कृती’नामक रचनांची निर्मिती केली. या मानवी संस्कृतींचा उत्तरोत्तर जो विकास होत गेला, त्याला‘इतिहास’ असं संबोधलं जायला लागलं.

इतिहासाला आकार देण्यासाठी तीन महत्त्वाच्या क्रांती कारणीभूत ठरल्या. अदमासे सत्तर हजार वर्षांपूर्वी बोधात्मक (कॉग्निटिव्ह) क्रांतीनं इतिहासाची सुरुवात झाली. सुमारे बारा हजार वर्षांपूर्वीच्या कृषिक्रांतीनं त्याला गती दिली. केवळ पाचशे वर्षांपूर्वी सुरू झालेल्या वैज्ञानिक क्रांतीनं कदाचित इतिहासाची अखेर होऊन काहीतरी पूर्णपणे वेगळंच उदयाला येऊ शकेल. या तीन क्रांतींनी मानवावर आणि त्याच्या बरोबरीनं भूतलावर राहणाऱ्या इतर सजीवांवर काय परिणाम झाला याची माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल.

‘इतिहास’ ही ज्ञानशाखा अस्तित्वात येण्यापूर्वीही मानव भूतलावर वावरत होताच. आधुनिक मानवप्राण्याशी बरंचसं साम्य असलेले प्राणी सुमारे पंचवीस लाख वर्षांपूर्वीपासून भूतलावर अस्तित्वात होते,पण कितीतरी पिढ्या उलटल्यानंतरही,त्यांच्या बरोबरीनं राहणाऱ्या इतर अगणित सजीवांपेक्षा ते वेगळे उठून दिसत नव्हते.

आजच्या एखाद्या माणसानं वीस लाख वर्षांपूर्वी पूर्व आफ्रिकेत भटकंती केली असती, तर त्याला पुढे दिलेली दृश्यं दिसली असती – आपल्या बाळांना कुशीत घेऊन गोंजारणाऱ्या चिंतातुर आया, आईच्या धाकातून वेगळी होऊन चिखलात निर्धास्तपणे हुंदडणारी मुलं, टोळीच्या नियमांविरोधात संतप्त झालेले लहरी तरुण,शांततेत जीवन घालवू इच्छिणारे थकले-भागलेले वृद्ध, छाती पिटून आपल्या पौरुषत्वानं स्थानिक सुंदरींवर प्रभाव पाडणारे वस्तीतले दादालोक आणि याचा अनुभव असणारे किंवा हे सगळं पाहिलेले शहाणेसुरते लोक. प्रेम, क्रीडा, मैत्री यांबरोबरच सत्ता किंवा उच्च दर्जा प्राप्त करण्यासाठीही प्राचीन मानव स्पर्धा करत असे. अशाच कृती चिंपांझी, बबून आणि हत्ती हे प्राणीही करत असत. या गोष्टी करणं हे त्यामुळेच मानवाचं असं खास वैशिष्ट्य नव्हतं. मानवाचे वंशज एक दिवस चंद्रावर पाऊल ठेवतील, अणुविभाजन करतील आणि जनुकीय संकेतावलीचा (जेनेटिक कोडचा) शोध घेतील याची मानवासकट तेव्हाच्या कोणत्याच प्राण्याला जराशीही कल्पना नव्हती. प्रागैतिहासिक मानवाविषयी एक महत्त्वाची बाब लक्षात घेणं आवश्यक आहे – त्या काळातले गोरिला, काजवे किंवा जेलीफिश सभोवतालच्या पर्यावरणावर जितका प्रभाव टाकत, तितकाच प्रभाव त्या काळातला मानव टाकत होता.

प्राणिवैज्ञानिक सजीवांचं वर्गीकरण जातींमध्ये करतात. जे प्राणी एकमेकांबरोबर राहतात, संभोग करतात आणि जननक्षम अपत्यांना जन्म देतात; ते सर्व एकाच जातीत मोडतात. घोडे आणि गाढवं यांची शारीरिक लक्षणं सारखीच आहेत आणि फार मागे न जाता त्यांचा अलीकडचा इतिहास पाहता, त्यांचे पूर्वज एकच असले, तरी या दोन प्राण्यांमध्ये लैंगिक आकर्षण जवळजवळ नसतंच. त्यांना एकत्र राहण्यासाठी भाग पाडलं, तर त्यांच्यात समागम होतो. त्यांची पिल्लं‘खेचरं’ म्हणून ओळखली जातात. ती वांझ असतात. गाढव किंवा घोडा यांपैकी एकाच्या किंवा दोघांच्याही डीएनएमध्ये बदल केला आणि त्यांच्यात समागम घडवून आणला, तरी या डीएनए-बदलाचा जन्माला येणाऱ्या खेचरांवर काही परिणाम होत नाही. परिणामी, या दोन भिन्न जाती असल्याचं मानलं जातं. त्यांची उत्क्रांती दोन भिन्न मार्गांनी झाली आहे. याउलट बुलडॉग आणि मोठ्या कानाचा केसाळ कुत्रा (स्पॅनिअल) या दोघांची रूपं वेगळी असली,तरी ते एकाच जातीचे सदस्य आहेत आणि त्यांच्या डीएनएची पातीही (पूल) एकच आहेत. ते आनंदानं एकत्र राहतात. त्यांची पिल्लं मोठी होऊन इतर कुत्र्यांच्या संपर्कात येऊन अनेक पिल्लांना जन्म देतात.

ज्या जाती समान पूर्वजांपासून उत्क्रांत झाल्या आहेत, त्यांचा समावेश एकाच शीर्षकाच्या प्रजातीत केला जातो (genus -प्रजाती) (genera-त्याचं अनेकवचन). सिंह, वाघ, बिबटे, जॅग्वार (दक्षिण अमेरिकी बिबटे) या सर्वांचा समावेश ‘पँथेरा’ या प्रजातीत केला जातो. एखाद्या सजीवाचं प्राणिविज्ञानातलं नेमकं स्थान सांगण्यासाठी प्राणिवैज्ञानिक दोन स्तरांचा समावेश असलेल्या नावानं त्या त्या सजीवाला संबोधतात. उदाहरणार्थ, सिंहाला पँथेरा लिओ असं म्हटलं जातं. याचा अर्थ पँथेरा या प्रजातीतली लिओ ही जात आहे. हे पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येकाची ‘होमो’ ही प्रजाती आणि ‘सेपिअन्स’ ही जात आहे असं गृहीत धरायला काही हरकत नाही.

प्रजातींचे कुळात (फॅमिलीनुसार) गट पाडले जातात. उदा. मार्जार कुळामध्ये सिंह, वाघ,चित्ता, घरातली मांजरं यांचा समावेश होतो. श्वान कुळात लांडगे, कोल्हे, जॅकल्स यांचा अंतर्भाव होतो आणि हत्ती कुळात हत्ती,मॅमथ, मॅस्तोडॉन यांचा समावेश होतो. संस्थापक मादीपर्यंत किंवा नरापर्यंत जाऊन एका कुळातल्या सर्वांचा मागोवा घेता येतो. घरातल्या लहान मनीमाऊपासून ते भयावह सिंहापर्यंत सर्वांचं पूर्वज म्हणजे अडीचशे लाख वर्षांपूर्वी भूतलावर राहत असलेली एक मांजर होतं.

होमो सेपिअन्सही एका कुळाचे सदस्य आहेत. ही महत्त्वाची वस्तुस्थिती म्हणजे इतिहासानं काळजीपूर्वक जपलेलं एक गुपित आहे. होमो सेपिअन्स स्वतःला वेगळे,कुळापासून तुटलेले, विशेषतः अनाथ मानत;पण वस्तुस्थिती तशी नाही. कुणाला आवडो वा न आवडो, ‘पुच्छहीन महावानर’ वा‘कपी’ (ग्रेट एप्स) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि गोंगाट करणाऱ्या मोठ्या कुळाचे आपण सदस्य आहोत. पूर्वजांपैकी जिवंत असलेल्या आपल्या निकटच्या सग्यासोयऱ्यांमध्ये चिंपांझी, गोरिला, ओरांग उटांग यांचा समावेश होतो. चिंपांझी आपल्या सर्वांत जवळच्या गणगोतांपैकी एक आहेत. अदमासे साठ लाख वर्षांपूर्वी महावानराच्या एका मादीला दोन मुली झाल्या. त्यांपैकी एकीचे वंशज चिंपांझी बनले, तर दुसरी आपली ‘आजी’ बनली.

दडलेले सांगाडे

होमो सेपिअन्सनी आणखी एक त्रासदायक गुपित दडवून ठेवलं होतं – आपल्याला पुष्कळ असंस्कृत नातेवाईक तर होतेच, पण एके काळी आपल्याला बऱ्याचशा बंधु-भगिनीही होत्या. गेल्या दहा हजार वर्षांपासून आपल्या सभोवतीही आपल्याला आपली एकच जात दिसत होती, म्हणून‘आपणच फक्त मानव आहोत.’ असा विचार करण्याची सवय आपल्याला लागली. तरीही‘मानव’ या शब्दाचा खरा अर्थ ‘होमो प्रजातीतला प्राणी’ असा आहे. या प्रजातीत होमो सेपिअन्सखेरीज इतरही जाती होत्या. भविष्यकाळात कधीतरी सेपिअन्स नसलेल्या मानवाबद्दल आपल्याला विचार करावा लागणार आहे. शेवटच्या प्रकरणात आपण त्याविषयी विचार करू. हा मुद्दा अधिक स्पष्ट करून सांगण्यासाठी मी‘सेपिअन्स’ ही संज्ञा ‘होमो सेपिअन्स’साठी वापरणार आहे, तर ‘मानव’ ही संज्ञा ‘होमो या प्रजातीत समाविष्ट होणाऱ्या सर्वांसाठी’वापरणार आहे.

पंचवीस लाख वर्षांपूर्वी पूर्व आफ्रिकेत अ‍ॅस्ट्रेलोपिथिकस (दक्षिणेकडचा महावानर) या प्रजातीच्या महावानरापासून मानव प्रथम उत्क्रांत झाला. या प्राचीन मानवांपैकी काही पुरुष आणि काही स्त्रिया यांनी जवळजवळ २० लाख वर्षांपूर्वी आपलं जन्मस्थान सोडलं आणि ते उत्तर आफ्रिकेच्या विस्तृत प्रदेशात, युरोपमध्ये आणि आशियात स्थायिक होण्यासाठी निघाले. उत्तर युरोपमधल्या बर्फाळ प्रदेशातल्या जंगलात निभाव लागण्यासाठी आणि इंडोनेशियातल्या उष्ण जंगलांच्या प्रदेशात जिवंत राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक क्षमतांची गरज होती. त्यामुळे त्या त्या परिस्थितीत निभाव लागण्याच्या दृष्टीने उपरोक्त क्षमतांनी तिथली तिथली मानवी लोकसंख्या उत्क्रांत होत गेली. परिणामी,भिन्न जाती निर्माण झाल्या आणि वैज्ञानिकांनी त्यांना भारदस्त लॅटिन नावं दिली.

युरोपमध्ये आणि पश्चिम आशियात उत्क्रांत झालेल्यांना वैज्ञानिकांनी ‘होमो निअँडरथेलेन्सिस’ (निअँडर खोऱ्यातला माणूस) असं नाव दिलं. ‘निअँडरथल’ या लोकप्रिय नावानं त्यांचा उल्लेख केला जातो. निअँडरथल आपणा सेपिअन्सपेक्षा वजनानं भारी आणि पिळदार स्नायू असलेले होते. पश्चिम युरेशियाच्या थंड हवामानाशी जुळवून घेण्यात ते वाकबगार ठरले. आशियाच्या अतिपूर्वेकडच्या प्रदेशात‘होमो इरेक्टस’ची वस्ती होती. ‘इरेक्टस’म्हणजे ‘ताठ कण्याचा माणूस’. हा जवळजवळ २० लाख वर्षं जम बसवून होता. आपल्या सध्याच्या जातीला म्हणजे होमो सेपिअन्सना हा विक्रम मोडता येईल की नाही अशी शंका वाटते. आत्तापासून पुढची हजार वर्षं तरी होमो सेपिअन्स तग धरून राहतील की नाही याचीच शंका आहे. त्यामुळे पुढच्या २० लाख वर्षांची बात न केलेली बरी!

इंडोनेशियातल्या जावा बेटावर ‘होमो सोलेन्सिस’ राहत होते, म्हणजेच ‘सोलो खोऱ्यातला माणूस’. इंडोनेशियातल्या फ्लोरेस या आणखी एका बेटावरच्या माणसांना खुजेपणाच्या प्रक्रियेतून जावं लागलं. जेव्हा प्राचीन माणसं फ्लोरेस बेटावर पोहोचली, तेव्हा तिथल्या समुद्राच्या पाण्याची पातळी खाली होती. मुख्य बेटावरून फ्लोरेस बेटापर्यंत सहज जाता येत असे; पण जेव्हा पाण्याची पातळी वाढली, तेव्हा फ्लोरेसवरची काही माणसं त्या बेटावरच अडकून पडली. बेटावर उदरनिर्वाहाची साधनं तुटपुंजी होती. धिप्पाड लोकांना अन्न भरपूर लागे. त्याअभावी ते प्रथम मृत्यूमुखी पडले. आकाराने लहान माणसं बऱ्यापैकी तग धरून राहिली. अशा प्रकारे फ्लोरेसमधल्या पिढ्या खुजा झाल्या. या अनन्यसाधारण जातीला वैज्ञानिकांनी ‘होमो फ्लोरेसिएन्सिस’ हे नाव दिलं. या लोकांची कमाल उंची एक मीटर आणि कमाल वजन २५ किलोग्रॅम असे. तरीही ते दगडाची हत्यारं बनवत आणि कधीकधी बेटावरच्या हत्तींची शिकार करत. तिथले हत्तीही खुजे असत, ही बाब लक्षात घेतली पाहिजे.

इ.स.२०१० साली सैबेरियात उत्खनन करताना वैज्ञानिकांना विस्मृतीत गेलेल्या सेपिअन्सच्या एका भावंडाची ओळख पटली. तिथल्या डेनिसोवा गुहेत अवशेषाच्या स्वरूपात बोटाचं एक हाड सापडलं. ते बोट आजपर्यंत अपरिचित असलेल्या मानवजातीचं असल्याचं त्याच्या जनुकीय विश्लेषणानंतर सिद्ध झालं. आपले असे किती सगेसोयरे इतर गुहांमध्ये,इतर बेटांवर आणि इतर हवामानाच्या प्रदेशांमध्ये स्वतःच्या अस्तित्वाची ओळख पटण्याची वाट पाहत आहेत, कोण जाणे!

जेव्हा युरोपमध्ये आणि आशियात मानव या प्रकारे उत्क्रांत होत होता, तेव्हा पूर्व आफ्रिकेतल्या मानवाची उत्क्रांतीही थांबलेली नव्हती. मानवजातीत अनेक नव्या जातींची भर पडत होती. तिथे ‘होमो रुडोल्फेन्सिस’ म्हणजे ‘रुडॉल्फ तळ्याकाठचा माणूस’, ‘होमो इरगेस्टर’म्हणजे ‘कष्ट करणारा माणूस’ आणि अखेरीस ज्याला आपण विनय बाजूला सारून ‘होमो सेपिअन्स’ म्हणजेच ‘शहाणा माणूस’ असं नाव दिलं, तो माणूस (आपण) अशा जाती उत्क्रांत झाल्या.

यांपैकी काही जातींचे सदस्य आकारमानाने थोराड होते, तर काही खुजे होते; काही जण भीतिदायक शिकारी होते, तर काही जण शांतपणे वनस्पती गोळा करणारे होते; काही एका बेटावर राहिले, तर अनेक जणांनी निरनिराळ्या खंडांवर भटकंती केली; पण ते सर्व जण ‘होमो’ या प्रजातीतले होते आणि ते सर्व मानव प्राणी होते.

१) होमो रुडोल्फेन्सिस (पूर्व आफ्रिका), २) होमो इरेक्टस (पूर्व आशिया), ३) होमो निअँडरथेलेन्सिस (युरोप आणि पश्चिम आशिया) हे सर्व मानव आहेत.

या सर्व जाती ज्या प्रकारे एका सरळ रेषेत दाखवल्या आहेत, तशाच प्रकारे त्यांच्याकडे पाहण्याची तार्किक चूक अनेकांकडून केली जाते; म्हणजे इरगेस्टरचं रूपांतर इरेक्टसमध्ये झालं, इरेक्टसचं परिवर्तन निअँडरथलमध्ये झालं आणि निअँडरथलचं उत्क्रांत रूप म्हणजे आपण सर्व जण. भूतलावर एका विशिष्ट काळी एका विशिष्ट जातीचाच मानव राहत होता अशी आपली भ्रामक समजूत हे एकरेषीय प्रतिमान करून देतं. तसंच आपण अनुक्रमे पाहत असलेल्या जाती ही आपलीच भ्रामक रूपं असल्याचंही हे प्रतिमान भासवतं. खरी गोष्ट अशी आहे की, २० लाख वर्षांपूर्वीपासून ते दहा हजार वर्षांपूर्वीपर्यंत या वेगवेगळ्या मानवजातींचं एकाच वेळी ‘पृथ्वी’ हे वसतिस्थान होतं… आणि का असू नये?आज भूतलावर कोल्हे, अस्वलं आणि डुकरं यांच्या अनेक जाती आहेत. शंभर सहस्रकांपूर्वी या पृथ्वीवर माणसांच्या किमान सहा जाती तरी वावरल्या (वावरत) होत्या. कदाचित सध्या केवळ आपली जातच अस्तित्वात असणं हे भूतकाळात अनेक जाती अस्तित्वात असण्याच्या तुलनेत वैशिष्ट्यपूर्ण आणि दोषदर्शक आहे. आपणा सेपिअन्सना आपल्या भावंडांची स्मृती दडपून टाकण्यासाठी सबळ कारणं मिळाली आहेत. त्याबाबत आपण पुढे पाहूच.

विचारक्षमतेचं मोल

मानवाच्या या जातींमध्ये अनेक फरक असले, तरी सर्व मानवजातींमध्ये काही वैशिष्ट्यं समान होती. या वैशिष्ट्यांमधली सर्वांत लक्षणीय बाब म्हणजे इतर प्राण्यांच्या तुलनेत माणसाच्या मेंदूचा असलेला मोठा आकार! ६० किलो वजनाच्या सस्तन प्राण्याच्या मेंदूचा आकार सुमारे २०० घनसेंमी. असतो. २५ लाख वर्षांपूर्वीच्या प्राचीन स्त्री-पुरुषांचा मेंदू ६०० घनसेंमी. इतका होता. आधुनिक सेपिअन्सचा मेंदू सरासरी १२०० ते १४०० घनसेंमी. इतका असतो. निअँडरथलांचा मेंदू यापेक्षाही मोठा होता.

उत्क्रांती होत असताना मोठ्या आकाराच्या मेंदूची निवड करावी हे आपल्याला योग्य वाटतं. आपण उच्च बुद्धिमत्तेच्या इतके मोहात आहोत की, मेंदूची शक्ती जेवढी जास्त तेवढं अधिक चांगलं असं आपण गृहीत धरतो; पण जर असं असतं, तर मार्जार कुळानेही आकडेमोड करणाऱ्या मांजरांची पैदास केली असती आणि एव्हाना डुकरांनीही अवकाशसंचाराचा कार्यक्रम सुरू केला असता. प्राणिजगतात भव्य मेंदूचा इतका अभाव का आहे?

आकारानं मोठ्या मेंदूसाठी शरीरातली अधिक ऊर्जा खर्च होते. विशेषतः मोठ्या कवटीत बसवलेला मेंदू बाळगून वावरणं सोपं नाही. तसंच त्याला ऊर्जा पुरवणंही कठीण असतं. होमो सेपिअन्समध्ये शरीराच्या एकूण वजनाच्या सुमारे दोन ते तीन टक्के वजन मेंदूचं असतं. मात्र शरीर विश्रांती घेत असताना शरीरातली २५ टक्के ऊर्जा मेंदूसाठी खर्च होत असते. तुलनेनं इतर महावानरांना (गोरिला, चिंपांझी यांना) विश्रांतीच्या काळात मेंदूसाठी फक्त आठ टक्के ऊर्जा खर्च करावी लागते. प्राचीन मानवांना आकारानं मोठ्या असलेल्या मेंदूसाठी दोन प्रकारे किंमत मोजावी लागली. एक म्हणजे अन्नाच्या शोधात त्यांना खूप वेळ घालवावा लागला. दुसरं म्हणजे त्यांच्या स्नायूंचा शोष झाला. ज्याप्रमाणे संरक्षणासाठी राखून ठेवलेला पैसा ठिकठिकाणची सरकारं शिक्षणाकडे वळवतात, त्याप्रमाणेच मानवांनी हाताच्या स्नायूंची ऊर्जा मज्जापेशींकडे वळवली. सॅव्हानाच्या गवताळ प्रदेशात तग धरून राहण्यासाठी हे डावपेच उपयुक्त ठरत होते,हे मत आजही सर्वमान्य नाही. चिंपांझी होमो सेपिअन्सबरोबर वादविवादात जिंकू शकत नाही, पण तो माणसाला एखाद्या चिंध्यांच्या बाहुलीप्रमाणे फाडू शकतो.

आकारानं मोठ्या असलेल्या मेंदूनं आपल्याला बरंच काही दिलं आहे. आपण मोटारी आणि बंदुका निर्माण करू शकतो. मोटारींमुळे आपण चिंपांझीपेक्षा वेगाने हालचाल करू शकतो. तसंच चिंपांझीशी झटापट करण्यापेक्षा बंदुकीमुळे आपण सुरक्षित अंतरावरून त्याच्यावर गोळी झाडू शकतो. मोटारी आणि बंदुका या अगदी अलीकडच्या गोष्टी आहेत. वास्तविक, २० लाख वर्षांपूर्वी मानवी चेतासंस्थेचं जाळं वाढत होतं. गारगोटीच्या दगडाचे चाकू आणि टोकदार काठ्या यांखेरीज तेव्हाच्या मानवाकडे दाखवण्यासारख्या काहीच गोष्टी नव्हत्या. या २० लाख वर्षांमध्ये मानवाच्या मोठ्या आकाराच्या मेंदूची उत्क्रांती पुढे कशी नेली गेली? खरं सांगायचं, तर त्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही.

आणखी एक मानवी वैशिष्ट्य म्हणजे दोन पायांवर उभं राहून ताठ चालणं. उभं राहून सॅव्हानातली शिकार शोधणं वा शत्रूवर नजर ठेवणं सोपं होतं. त्यामुळे पुढे सरकण्यासाठी अनावश्यक असलेले हात दगडधोंडे फेकणं,हातानं खुणा करणं अशी इतर कामं करण्यासाठी मोकळे राहत असत. हात जितकं जास्त काम करत, तितका तो माणूस जास्त यशस्वी होत असे. उत्क्रांतीच्या या दबावानं हाताच्या तळव्यांमधल्या आणि बोटांमधल्या मज्जातंतूंच्या जाळ्याचं केंद्रीकरण झालं आणि तिथले स्नायू अधिक सुसंवादी बनले. परिणामी, मानव आपल्या हातांनी अधिक गुंतागुंतीची कामं करायला लागला. विशेषतः ते हात अत्याधुनिक साधनं तयार करायला लागले आणि त्यांचा वापरही करायला लागले. अशा साधनांचा पहिला पुरावा २५ लाख वर्षांपूर्वींच्या अवशेषांमध्ये सापडला आहे. या साधनांची निर्मिती आणि त्यांचा वापर या दोन कसोट्या लावूनच पुरातत्त्ववेत्ते प्राचीन माणसाची ओळख पटवतात.

ताठ चालण्याचे काही तोटेही आहेत. चार पायांवर चालणाऱ्या आणि तुलनेने लहान डोकं असलेल्या प्राण्यांना आधार देण्याच्या दृष्टीने आपले पूर्वज असलेल्या वानरांचा सांगाडा लाखो वर्षं विकसित होत गेला. त्यामुळे ताठ उभं राहण्याशी जुळवून घेणं हे आपल्यासाठी एक प्रकारचं आव्हानच होतं. आपल्या या कुशल हातांची आणि दूरवर पाहण्याच्या क्षमतेची किंमत मानवाला पाठदुखीसारख्या आणि अवघडलेल्या मानेसारख्या व्याधींनी मोजावी लागली.

स्त्रियांना तर अधिक मोठी किंमत मोजावी लागली. ताठ चालीसाठी कंबर (कटिप्रदेश) अरुंद असावी लागते. त्यामुळे योनिमार्ग अरुंद होतो. जेव्हा मुलांची डोकी हळूहळू मोठी होत होती, नेमका तेव्हाच हा बदल होत होता. जन्मतानाच होणारा मुलाचा मृत्यू हे मानवी मादीच्या दृष्टीनं एक खूप मोठं संकट बनलं. नवजात अर्भकाचा मेंदू आणि डोकं लहान आणि लवचीक असताना ज्या स्त्रियांनी मुलांना लवकर जन्म दिला, त्यांची प्रसूती ठीक होऊन त्या जगल्या आणि त्यांनी अधिक मुलांना जन्म दिला. नैसर्गिक निवडीनं आधी जन्माला आलेल्यांवर कृपा केली. खरोखरच, इतर प्राण्यांशी तुलना केली, तर जन्माला येताना मानवी अर्भकाची पूर्ण वाढ झालेली नसते. त्याच्या अनेक महत्त्वाच्या शरीररचना-शरीरसंस्था विकसित झालेल्या नसतात. जन्माला आल्यावर घोड्याचं शिंगरू थोड्याच अवधीत दुडक्या चालीने धावायला लागतं. जन्मानंतर काही आठवड्यांमध्येच मांजरीची पिलं स्वतःचं भक्ष्य मिळवण्यासाठी आईला सोडून निघून जातात. मानवी बाळं मात्र जन्मतः असहाय असतात. स्वतःची भूक भागवण्यासाठी,संरक्षणासाठी आणि शिक्षणासाठी ती अनेक वर्षं वडीलधाऱ्यांवर अवलंबून असतात.

हीच वस्तुस्थिती मानवजातीच्या विलक्षण सामाजिक क्षमतांसाठी आणि अनन्यसाधारण सामाजिक समस्यांसाठी कारणीभूत ठरलेली आहे. एकट्या मातांना आपल्या बाळासाठी, स्वतःसाठी आणि बरोबरच्या इतर मुलांसाठी पुरेसं अन्न गोळा करणं कठीण जात असे. मुलांना वाढवताना कुटुंबीयांची आणि इतर शेजाऱ्यांची मदत सतत लागत असे. एका मानवाचं संगोपन करणं हे अख्या टोळीचं काम होतं. त्यामुळेच मजबूत सामाजिक बंध निर्माण करण्याची कुवत असलेल्या व्यक्तींवर उत्क्रांतीने मेहेरबानी केली. शिवार मानव जन्माला येताना अविकसित असल्यामुळे त्याला इतर प्राण्यांपेक्षा अधिक शिक्षित आणि सामाजिक बनवणं शक्य आहे. इतर सस्तन प्राण्यांची गर्भातून बाहेर पडणारी पिलं भट्टीतून बाहेर काढलेल्या मातीच्या भांड्यांसारखी चकचकीत असतात. त्यांना पुन्हा आकार देण्याचा प्रयत्न केला, तर ती मोडण्याची वा त्यांवर चरा पडण्याची शक्यता असते. मानवी गर्भाशयातून मानव ओतीव काचेसारखा बाहेर येतो, त्यामुळे त्याला आश्चर्यकारकरीत्या हवा तसा आकार देता येतो; म्हणूनच आपल्या मुलांना आपण ख्रिश्चन वा बौद्ध होण्यासाठी, भांडवलदार वा समाजवादी बनवण्यासाठी किंवा युद्धपिपासू किंवा शांतताप्रिय होण्यासाठी शिक्षण देऊ शकतो.

मोठ्या आकाराचा मेंदू, साधनांचा वापर,शिकण्याची विलक्षण क्षमता आणि गुंतागुंतीच्या सामाजिक संरचना हे सर्व खूप मोठे फायदे आहेत असं आपण गृहीत धरतो. या सर्व बाबींनी मानवाला भूतलावरचा सर्वांत शक्तिमान प्राणी बनवलं ही बाब आपल्याला स्वयंसिद्ध वाटते. जेव्हा दोन दशलक्ष वर्षांपूर्वी मानव अगदी दुबळा आणि बिनमहत्त्वाचा प्राणी होता, तेव्हाच्या मानवाकडेही वर उल्लेख केलेली सगळी गुणवैशिष्ट्यं होती. एक दशलक्ष वर्षापूर्वीचा मानव मोठ्या आकाराचा मेंदू असूनही आणि दगडाची तीक्ष्ण हत्यारं बाळगूनही नेहमी हिंस्र प्राण्यांच्या भीतीच्या सावटाखाली राहत होता. त्याला क्वचितच मोठी शिकार मिळत असे. तो मुख्यतः वनस्पती गोळा करून, मातीतून खुरप्यानं कीटक उकरून आणि छोट्या प्राण्यांची शिकार करून आपली गुजराण करत असे. तसंच इतर बलवान हिंस्र प्राण्यांनी मारलेल्या जनावरांचं उरलेलं कुजकं मांस खात असे.

प्राचीन काळात वापरल्या जाणाऱ्या दगडाच्या हत्यारांचा उपयोग मुख्यतः हाडं फोडून त्यांच्यातल्या अस्थिमज्जा मिळवण्यासाठी केला जात असे. हेच त्या वेळच्या मानवजातीचं वैशिष्ट्य होतं असं काही संशोधक मानतात. ज्याप्रमाणे सुतार पक्ष्यांनी झाडाच्या खोडातले कीटक उकरून काढण्यात प्रावीण्य मिळवलं,त्याप्रमाणे आदिमानवांनी हाडांमधून अस्थिमज्जा मिळवण्यात विशेष कौशल्य दाखवलं. अस्थिमज्जा का? समजा,सिंहांच्या एखाद्या कळपानं जिराफावर हल्ला करून त्याला ठार मारलं, तर सिहांचं खाण्याचं काम उरकल्यावरही तुम्ही तिथं जाऊ शकणार नाही. तुम्हाला चिकाटीनं थांबावं लागेल, कारण तुमच्या आधी तिथं तरस आणि कोल्हे यांचा क्रमांक लागतो. त्यांच्या खाण्याच्या कामात तुम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. त्यांचं उरकल्यानंतरच तुम्ही आणि तुमचं टोळकं त्या मृत जनावराजवळ जाण्याचं धाडस करू शकता. डावी-उजवीकडे काळजीपूर्वक बघून नंतर त्यातला खाण्यालायक भाग तुम्ही फस्त करू शकता.

मानवी इतिहास आणि मनोविज्ञान समजून घेण्याची ही गुरूकिल्ली आहे. अन्नसाखळीतल्या ‘होमो’ या प्रजातीचं स्थान अगदी अलीकडेपर्यत निश्चितच मध्यभागी होतं. लक्षावधी वर्षं मानव लहान प्राण्यांची शिकार करत होता आणि जेवढं गोळा करता येईल, तेवढं गोळा करत होता. हे करता- करता मोठ्या प्राण्यांची शिकार बनत होता. फक्त चार लाख वर्षांपूर्वीपासून मानवाच्या अनेक जाती नियमितपणे मोठ्या प्राण्यांची शिकार करारला लागल्या होत्या. होमो सेपिअन्सचा उदय झाल्यापासून गेल्या एक लाख वर्षांमध्ये झेप घेऊन मानवाने अन्नसाखळीत सर्वोच्च स्थान मिळवलं आहे.

Sapiens: A Brief History of Humankind’ हे युव्हाल नोआ हरारी यांचं जगभरात गाजलेलं पुस्तक. ‘A Brief History of Time’ नंतर सर्वांत जास्त गाजलेलं पॉप्युलर सायन्सचं हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या जगभरात १५ लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत आणि ३० हून अधिक भाषात अनुवाद झाला आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद (सेपिअन्स- मानवजातीचा अनोखा इतिहास )वासंती फडके यांनी केला असून ते १० मे रोजी डायमंड पब्लिकेशन्सच्या वतीनं प्रकाशित होत आहे. या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणाचा हा संपादित अंश..

सौजन्य -हिनाकौसर खान

Previous articleडिअर जिंदगी!
Next articleसंतांना सत्याकडे नेणाऱ्या ज्ञानाचा पत्ताच नव्हता
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.