मध्यम उंची , किंचित स्थूल शरीरयष्टी , केसांची एक वेणी घातलेली , चेहऱ्यावर कायम गांभीर्य , किंचित काजळ घातलेले टपोरे काळेशार डोळे आणि अत्यंत शालीनपणे नेसलेली साडी , असं सुलभा पंडित यांचं व्यक्तिमत्त्व होतं . त्या फार लोकांत मिसळत होत्या असंही दिसत नसे पण , परिचितांशी हसतमुखानं संवाद साधण्याची त्यांची शैली लक्षात आलेली होती . त्यांचा आवाज किंचित किनरा होता . मध्यम पट्टीत त्या बोलत . एक छानशी रसाळ लय त्यांच्या बोलण्याला होती . शांतपणे बसून आणि चेहऱ्यावर गांभीर्य पांघरुन त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेत असत . संगीतातली त्यांची डोहखोल जाणकारी त्यांच्या साप्ताहिक सदरात उमटत असे . संगीताचं किमान सखोलही ज्ञान नसल्यानं अशा सर्वच ज्ञानी माणसांपासून दूरच राहण्याचा शिरस्ता मी तेव्हा तरी पाळलेला होता . मात्र समोरासमोर आलो तर ‘नमस्कार’ किंवा ‘काय कसं’ अशा शब्दांची देवाणघेवाण न चुकता होत असे . हा सिलसिला आणखी काही वर्ष असाच सुरु राहिला .