बाज बहादुराला रूपमतीच्या गाण्याने वेडं केलं की सौंदर्याने ठाऊक नाही, पण तो स्वतःही गाण्यातला दर्दी होता. त्याला गाण्याचा गळा आणि कान दोन्हीही होतं म्हणे… त्यामुळे त्याने तिथेच रूपमतीला लग्नाची मागणी घातली. शेवटी सुलतानच तो, त्याला नाही म्हणायची प्राज्ञा ना रूपमतीची होती ना तिच्या पालकांची. तरीही रूपमतीने त्याला ठणकावून सांगितलं म्हणतात- मी तुझ्याबरोबर येईन, पण माझा धर्म बदलणार नाही आणि मला आचार-विचारांचं स्वातंत्र्यही तुला द्यावं लागेल…!’ बाज बहादुराने कसलेच आढेवेढे घेतले नाहीत. त्याला तिला बंधनात ठेवायचं नव्हतंच मुळी. त्याला तिला मनमुक्त गाऊ द्यायचं होतं आणि तिचं गाणं मनसोक्त ऐकायचं होतं. त्याने तिची अट विनातक्रार मान्य केली. मग तीही आली त्याच्याबरोबर विनासायास. एवढंच कशाला, रूपमती वाढली होती नर्मदेच्या काठावर. नर्मदेच्या दर्शनाशिवाय ती कधीच अन्न-पाणी ग्रहण करत नसे. तेव्हा तिच्यासाठी त्याने आपल्या मांडवगडावर (मांडू) अगदी उंच ठिकाणी खास वास्तूही उभारली, जी आज रूपमती मंडप नावानेच ओळखली जाते. त्या मंडपातील एका उंच मनोऱ्यावरून रूपमतीला आपल्या माता नर्मदेचं दर्शन घडायचं… एवढं सगळं बाज बहादुराने केल्यावर रूपमतीही फार काळ आपल्याला रोखू शकली नाही. तिने स्वतःला केलंच त्याला समर्पित. तिनेच कशाला त्यानेही केलं स्वतःला तिला समर्पित.