विजय कुबडे:-अनासक्त, निरहंकारी व प्रेमळ मित्र!

अ‍ॅड.किशोर देशपांडे

अमरावती येथील सुप्रसिद्ध ‘कुबडे ज्वेलर्स’ या आस्थापनेचे संस्थापक आणि सराफा व्यावसायिक श्री.विजय महादेवराव कुबडे यांनी आज वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. मागील सुमारे पन्नासेक वर्षांपासून आम्ही जिवलग मित्र आहोत व त्यामुळे त्यांची निदान अर्धशतकी वाटचाल तरी मी अगदी जवळून पाहिली आहे.

कुबडे घराण्याकडे अमरावतीच्या तारखेड्याची पाटीलकी होती. गेटच्या आतील जुन्या अमरावतीच्या भाजीबाजाराजवळ तारखेड्यात कुबडेंचा वाडा होता. विजयचे वडील स्व. महादेवराव नामदेवराव कुबडे हे एक स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांना ब्रिटिश सरकारने कैदेतही टाकले होते. पुढे महादेवरावांनी सराफ्यातील प्रताप चौकात दुकान भाड्याने घेऊन छोट्या स्वरूपात सराफा व्यवसाय सुरू केला. विजयचे शिक्षण ज्ञानमाता हायस्कूल व शिवाजी कॉलेजमध्ये झाले. तथापि शालेय जीवनातच त्याला वडिलांच्या व्यवसायास हातभार लावण्यासाठी रोज अनेक तास दुकानात घालवावे लागत. त्यावेळी कुटुंबाच्या उत्पन्नाचे इतर स्त्रोत आटले होते व विजय महादेवरावांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेच पूर्णवेळ तो वडिलांसोबत दुकानात बसून व्यवसाय करू लागला.

विद्यार्थीदशेपासूनच विजयला सामाजिक कार्याची आवड नि जिज्ञासा होती. १९७० साली जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या ‘तरूण शांती सेना’ नामक संघटनेने इंदौर येथे देशभरातील युवक-युवतींचे एक शिबीर आयोजित केले होते. तेव्हा मी नागपूरला शिकत होतो आणि काही मित्रांच्या आग्रहास्तव त्या शिबिरास गेलो होतो. अमरावतीहून स्व. एकनाथराव हिरुळकर देखील विजयला व इतर काही युवकांना सोबत घेऊन शिबिरास आले होते. तीच आमची पहिली भेट होती आणि पुढील दोन-तीन वर्षांत अशा अनेक शिबिरांमध्ये आम्ही भेटत राहिलो. एकदा मी खरूजेसारखा दुर्धर चर्मरोग घेऊन बिहारवरून अमरावतीला परतलो होतो. तेव्हा येथील इर्विन हॉस्पिटलमध्ये मला जवळजवळ दोन-तीन आठवडे भरती व्हावे लागले. माझ्या दोन्ही हातांचे पंजे हे पूर्णपणे सडल्यासारखे झाल्यामुळे पट्ट्यांनी झाकून ठेवले होते. परिणामी मला माझ्या हातांचा कोणताही उपयोग करता येत नव्हता. त्यावेळी विजयशी माझी फार काही घट्ट मैत्री नव्हती; तरीही रोज पहाटे इर्विनमध्ये येऊन विजय माझे सर्व प्रातर्विधी स्वहस्ते उरकून देत असे आणि हे सर्व तो न कंटाळता स्वेच्छेने करीत असे.

पुढे त्याच्याच बोलण्यातून मला असे समजले की, लवकर उठण्याची व इतरांची सेवा करण्याची त्याला अजिबात सवय नव्हती. दोन्ही हात निकामी झालेल्या व्यक्तीला प्रातर्विधी आटोपण्यात मदत म्हणजे काय-काय करावे लागत असेल, याची वाचकांनीच कल्पना करून पहावी. विजयचा स्वभाव इतका निगर्वी आहे की त्याने या गोष्टीची वाच्यता कधीही केली नाही. त्या प्रसंगापासूनच विजयशी माझे विशेष भावनिक नाते जुळले. माझ्या आईला विजयचे विशेष कौतुक वाटायचे कारण तो फॅशनेबल कपडे वापरत नव्हता आणि स्वतः सोन्या-चांदीच्या व्यवसायात असूनही, साधी अंगठीदेखील बोटात घालत नसे.आमच्या अनेक हरहुन्नरी मित्रांसोबत विजयने देखील यथाशक्ती विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात व चळवळीत उत्साहाने भाग घेतला.

अध्यात्माची आवड हा माझ्या नि विजयच्या मैत्रीमधील आणखी एक समान दुवा होता. जसजशी आमची ती आवड वाढत गेली, तसतसे आम्ही दोघेही सामाजिक कार्यापासून अलिप्त होऊ लागलो. अर्थार्जनासाठी विजयला सराफा व्यवसायात व मला वकिलीत अधिकाधिक वेळ घालवावा लागला; मात्र आम्ही नियमित एकमेकांना भेटत राहिलो व अजूनही भेटतो. तरूणपणी त्यांच्या सराफ्यातील दुकानात मी सायंकाळी जाऊन बसायचो आणि मग आम्ही जवळपासच्या उत्तम चाटवाल्यांकडे जाऊन भरपेट खायचो. तसेच आम्ही एकमेकांच्या कुटुंबातील सुखदुःखांमध्ये कायम सहभागी होत राहिलो. साधारण पंचवीसेक वर्षांपूर्वी विजयरावांचा मोठा मुलगा समीर हा आपल्या वडिलांसोबत सराफा व्यवसायात उतरला आणि पंधरा वर्षांपूर्वी त्याने पुढाकार घेऊन गांधी चौक येथील जागेत एक भव्य शोरूम निर्माण केली. गांधीचौकातील ही जागा विजयरावांनी दूरदृष्टीने पूर्वीच विकत घेऊन ठेवली होती.

यथावकाश विजयराव वयपरत्वे व्यवसायातून निवृत्त होत गेले. अमरावती जिल्ह्यातील खेड्यापाड्यांतून येणारे मराठमोळे ग्राहक हे विजयरावांनी आपल्या सौजन्यपूर्ण नि उदार वागणुकीने, तसेच चोख व प्रामाणिक व्यवहारामुळे बांधून ठेवले होतेच. समीरने त्यात आणखी भर घालून शहरी ग्राहकांनादेखील शोरूमकडे आकर्षित करून घेतले. समीरने सराफा व्यवसायाचा विस्तार तर केलाच; शिवाय इतरही अनेक व्यावसायिक क्षेत्रांमध्ये धडाडीने पदार्पण केले. त्याचा लहान भाऊ आरोहण हा राजापेठ चौकामध्ये एका भव्य हॉटेलच्या निर्माणात गुंतलेला आहे. विजयरावांची थोरली मुलगी सौ. शबाना योगेश गावंडे ही तिच्या पतीसोबत अनेक देश फिरून नुकतीच ठाण्याला सेटल झाली आहे. विजयरावांच्या सहचारिणी सौ. तारावहिनी यापण गेल्या अनेक दशकांपासून आध्यात्मिक साधना करीत आहेत. पतीच्या व मुलांच्या सर्व उपक्रमांमध्ये त्यांचाही उल्लेखनीय सहभाग असतो आणि आपल्या तीन नातवंडांच्या त्या आवडत्या आजी आहेत. व्यावसायिक निवृत्तीनंतर कर्म, ज्ञान व भक्ती या तिन्ही योगांचा सुंदर मेळ साधून उभयता पती-पत्नींची आध्यात्मिक साधना ही अव्याहत सुरू आहे.

‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’, असे समर्थांनी सांगितले होते. चुकून एखादे सत्कर्म हातून घडले तर ते कोणाला तरी सांगण्याची प्रबळ इच्छा आपल्या मनात असते. परंतु सतत सत्कर्म करत राहणे हीच ज्याची प्रकृती आहे आणि त्याबाबत ज्याला वाच्यता करण्याची इच्छादेखील होत नाही, असा विजयराव कुबडेंसारखा परममित्र लाभणे हे मी माझे भाग्यच समजतो. अनासक्त व निरहंकारी स्वभाव, व्यावसायिक सचोटी, जिज्ञासू वृत्ती, प्रेमळपणा असे अनेक असामान्य गुण त्यांच्या ठायी वसले आहेत. त्यांच्या सहवासाचा कधीही कंटाळा येत नाही. म्हणूनच त्यांची साधना ही प्रगतीपथावर राहण्याकरिता त्यांना निरामय शतायुष्य लाभो – ही शुभेच्छा.

(लेखक ज्येष्ठ विधिज्ञ व छात्र संघर्ष युवा वाहिनीचे माजी राज्य संयोजक आहेत )

9881574954

 

Previous articleएकनाथराव हिरुळकर: सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्यभर झटलेला कार्यकर्ता
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here