लोककला हव्यात आणि लोककलावंत?

-डॉ. मुकुंद कुळे

………………………………………………………………………………………..

सध्या शहरांतून लावणीला बरे दिवस आलेत. लावणी पडद्यावरची असो किंवा रंगमंचावरची, शहरी रसिक मंडळी लावणीसाठी खुळावलेली दिसतात. कार्यक्रम संपला की लावणीकलावंतांबरोबर मोठ्या हौसेनं फोटो काढून घेतात आणि समाज माध्यमांवर कुठेकुठे डकवतातही… बघताना छान वाटतं. निम्न स्तरातला लावणीकलावंत आणि मध्यम व उच्च मध्यमवर्गीय स्तरातला रसिक प्रेक्षक यांच्यातील भेद अगदी सहज मिटल्यासारखा वाटतो. दोघेही एकदम समान पातळीवर आल्यासारखे वाटतात… पण हे क्षणभरच! रंगमंचावरचा वावर संपला आणि चेहऱ्यावरचा रंग उतरला, की लावणी कलावंतांची आणि रसिक प्रेक्षकांची दुनिया वेगवेगळीच असते. तिचा एकमेकांशी दुरान्वयानेही संबंध नसतो. म्हणजे काही काळासाठी का होईना ‘कलात्मक’ पातळीवर कलावंत आणि प्रेक्षक हे दोघेही समान पातळीवर येतात, मात्र प्रत्यक्षात त्यांची सामाजिक-सांस्कृतिक दुनिया किंवा अवकाश वेगवेगळाच असतो.

कलेच्या पल्याड कलावंत कसा जगतो आणि कसा राहतो, हे सर्वसामान्य रसिक प्रेक्षकांना ठाऊक नसतं. त्यांच्यासाठी कलावंताचा रंगमंचावरचा कलात्मक अवकाश तेवढाच खरा असतो. त्याउपर त्यांना कलावंतांच्या खाजगी आयुष्याविषयी काही देणंघेणं नसतं. केवळ लावणी कलावंतच नाही, गोंधळ-जागरण करणारे लोककलावंत किंवा आराधी-भराडी-दशावतारी सगळ्याच लोककलावंतांच्या बाबतीत हीच तऱ्हा. या साऱ्यांच्या कला, त्यांचा रंगमंचीय आविष्कार पाहताना सुखद, लोभस आणि हव्याहव्याशा वाटतात. त्या आकर्षणातून क्षणभरासाठी त्या लोककलावंतांबद्दल, त्यांच्या कलांबद्दल प्रेम-जिव्हाळाही दाटून येतो. त्यांच्या कलेला मनापासून दादही दिली जाते. तरी प्रत्यक्षात या कलांचा आस्वाद घेणारा रसिक प्रेक्षक आणि लोककलावंत यांच्या दुनियेत जमीन-अस्मानाचं अंतर असतं नि आहे. कारण या लोककला आणि लोककलावंत आपल्या एकूणच जगण्याच्या मूल्यव्यवस्थेचा भाग नाहीत. किंबहुना त्यांना आपल्या मूल्यव्यवस्थेत आज काहीही स्थान नाही.

मूल्यव्यवस्था म्हणजे एकप्रकारची नीती व्यवस्था. ही नीती किंवा मूल्यव्यवस्था धार्मिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक अशा मानवी जगण्याच्या सर्व अंगाना व्यापून असते आणि ती जगापासून, राष्ट्रापर्यंत ते एखाद्या छोट्या गावातील घरापर्यंत झिरपत येत असते. ही नीतीव्यवस्था उदार हवी, सर्वांना सामावून घेणारी हवी. पण हा झाला आदर्शवाद झाला, प्रत्यक्षात तसं घडतंच असं नाही. किंबहुना तसं घडतच नाही. भारतातला किंवा अगदी जगातलाही जातिवाद, धर्मवाद, वर्णवाद पाहिला की ही नीतिव्यवस्था किती तकलादू होती आणि आहे, ते उघड होतं. अगदी आजच्या काळातही फार सुखावह चित्र नाही. तरीही खूप आश्वासक नसलं, तरी काहीसं समावेशक असं धोरण पूर्वीच्या ग्रामसंस्कृतीत होतं. अलुते-बलुतेदारांच्या समाजरचनेत होतं आणि त्याचं कारण होतं- तत्कालीन ग्रामीण समाजरचनेतील धार्मिक-आर्थिक मूल्यव्यवस्था. विशेषतः धार्मिक मूल्यव्यवस्था. ही व्यवस्था सण-वार, रुढी-परंपरा मानणारी होती. समाजाला काहीशी अंधश्रद्धही करणारी होती. परंतु सश्रद्ध असल्यामुळेच, पहाटेच्या पाऱ्याला येणाऱ्या वासुदेवापासून रात्र जागवणाऱ्या गोंधळ-जागरणापर्यंतच्या कलांना आणि त्या सादर करणाऱ्या कलावंतांना समाजात काहीएक स्थान होतं. कुळधर्म-कुलविधी म्हणून सादर केल्या जाणाऱ्या या लोकविधा किंवा लोककलांवर त्या-त्या समाजाची उपजीविका चालत होती. अर्थात केवळ उपजीविका म्हणून हे कलावंत या कला सादर करत नव्हते. तो त्यांचा जीवनधर्म होता. अर्थात तो काही त्यांनी स्वेच्छेने स्वीकारलेला नव्हताच. निम्नस्तरांतील भटक्या समूहांवर परंपरेने एकप्रकारे तो लादलेलाच होता, त्यांच्या अगतिक परिस्थितीचा फायदा घेऊन. परंपरेचाही उफराटा न्याय कसा तो बघा- निम्न स्तरांतील हे भटके कलावंत स्वतः दैन्यावस्थेत राहायचे, मात्र देवाकडे समृद्धीचं दान मागायचे ते यजमानासाठी. यजमानाच्या घरी त्याच्या सुखासाठी देवाकडे दान मागताना, गोंधळ घालताना किंवा जागरण सादर करताना ही मंडळी आपल्या दैवत व्यवहाराशी एकरूप होऊन जायची. मग तिथे यजमान, समोर उपस्थित असलेले भक्त किंवा रसिक यांचं अस्तित्त्वच नष्ट व्हायचं. तिथे जे सादर व्हायचं, तो त्यांचा केवळ आचारधर्म असायचा. प्रत्यक्षात तिथे कलावगैरे काहीही नसायचं.

आज एकूणातच नागर प्रेक्षकांसमोर सादर होणाऱ्या ‘प्रयोगात्म लोककला’ या मुळात लोकविधा आहेत. त्या ‘कला’ म्हणून जन्माला आलेल्या नाहीत, तर धार्मिक अधिष्ठानांशी संबंधित असे ते विधी आहेत. या लोकविधांमधलं कलातत्त्व नागर संस्कृतीत वाढलेल्या लोकांना मागाहून जाणवलं आणि त्यांनी अनागर जीवनसंस्कृतीत भरण-पोषण झालेल्या या लोकविधा नागर रंगभूमीवर-रंगमंचावर आणल्या. परिणामी गेल्या काही वर्षांत तर गोंधळ-जागरण-दशावतार-लावणीसारख्या लोककलांना नागर संस्कृतीत अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालं. यातली लावणी किंवा तमाशा हा लोककलाप्रकार प्रथमपासूनच रंजनप्रधान होता आणि आहे. मात्र महाराष्ट्राच्या मातीतल्या किंबहुना जगातल्या बहुतांशी प्रयोगात्म लोककला या मूळ रंजनासाठी निर्माण झालेल्या नाहीत. त्यात ‘रंजन’मूल्य मागाहून शोधण्यात आलं. आणि या रंजनमूल्यातूनच या लोकविधा कालांतराने लोककला झाल्या. याच लोककलांना गेल्या काही वर्षांत नागर रंगभूमीवर सन्मानाचं स्थान मिळालेलं दिसतं. पण प्रत्यक्षात ते खरं नाही. वेगवेगळ्या महोत्सवांतून किंवा वेगवेगळ्या व्यासपीठावर लोककलावंतांना आणि त्यांच्या कलेला स्थान मिळत असलं, तरी व्यासपीठावरून खाली उतरल्यावर त्या लोककलावंतांच्या आणि त्यांच्या लोककलेच्या वाट्याला अंधारच येत आहे. कारण एवढी वर्षं झाली, शतकं उलटली तरी या लोककलावंतांचं सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक स्थान काही उंचावलेलं नाही.

उलट कालौघात या लोकविधा-लोककला सादर करणाऱ्या लोककलावंतांच्या सामाजिक प्रतिष्ठेत घसरणच झाली. पूर्वी गोंधळ-जागरणासारखे वार्षिक कुळाचार-कुलविधी करणारे म्हणून त्यांना तत्कालीन समाजरचनेत किमान काही स्थान होतं. परंतु बदलत्या काळात ही संपूर्ण व्यवस्थाच उद्ध्वस्त झाली. ग्रामीण आणि शहरी भागातली जनता वेगळ्या अर्थाने अधिकाधिक कट्टर व धार्मिक होत चालली असली, तरी परंपरेने चालत आलेल्या कुळाचार-कुलविधींचं पालन कमी होऊ लागलेलं आहे. परिणामी गोंधळ-जागरण-भराड यांसारखे लोकविधी करणाऱ्या समाजाच्या हातून त्यांचं उपजीविकेचं साधन निसटलेलं आहे. शिक्षणामुळे आणि त्यातून समाज सुधारल्यामुळे हे परिवर्तन झालं असतं, तर एका अर्थाने ही चांगलीच बाब असती, परंतु प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही. आजही गोंधळी, वाघ्या-मुरळी, आराधी-भराडी, वासुदेव या बहुतेक समाजांत शिक्षणाचं प्रमाण कमीच आहे. त्यात अऩागर व नागर दोन्ही ठिकाणच्या प्रतिष्ठितांनी परंपरेचा हात सोडल्यामुळे या लोककलावंत समाजांवर कायमचीच बेकारीची कुऱ्हाड कोसळलेली आहे. अशात जुनं ते सोनं या न्यायाने गेल्या काही वर्षांत शहरी भागांत लोककलांना बरे दिवस आलेत आणि या लोककला नागर रंगमंचावर सादर होऊ लागल्या आहेत. तरीही, लोककला सादर करणाऱ्या लोककलावंतांना खरोखरच बरे दिवस आलेत का? हा प्रश्न उरतोच आणि त्याचं उत्तर ठामपणे ‘नाही’ असंच आहे. तेव्हा लावणीपासून ते गोंधळ-जागरणापर्यंतच्या लोककला या कितीही शहरी रंगमंचावर सादर झाल्या आणि नागरी लोकांनी त्या डोक्यावर घेतल्या तरी, त्यामुळे त्यांच्यातलं सामाजिक-सांस्कृतिक अंतर काही पुसलं जाणार नाहीय. ते अंतर पुसण्यासाठी, कमी होण्यासाठी खरंतर प्रयत्न व्हायला हवेत. किंबहुना लोककला हव्यात, तर आमचे लोककलावंत हवेत का, हा खरा प्रश्न आहे.

म्हणजेच प्रयोगात्म लोककला आता नागर रंगमंचावर सादर व्हायला लागल्या असल्या किंवा विद्यापीठांतून त्यांचं शिक्षण मिळायला लागलं असलं तरी, त्यामुळे या लोककलावंतांचं आणि त्यांच्या कलेचं सामाजिक-सांस्कृतिक स्थान काही उंचावलेलं नाही. ते उंचावणार असेल आणि या कलावंतांना सामाजिक-सांस्कृतिक प्रतिष्ठा मिळणार असेल, आर्थिक स्थैर्य मिळणार असेल तरच या लोककला टिकण्याला अर्थ आहे, अन्यथा त्यांना वेळीच मूठमाती दिलेली बरी!

(साभार : दैनिक पुण्यनगरी)

(लेखक हे लोककला व लोकपरंपरेचे अभ्यासक आहेत)

9769982424

मुकुंद कुळे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात मुकुंद कुळे– type करा आणि Search वर क्लिक करा.

 

 

 

Previous articleराजद्रोहाचं राजकारण !
Next articleबाईची पर्स
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.