बाईची पर्स

-नीलिमा क्षत्रिय

बाईची पर्स म्हणजे एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. एक बाय दीडच्या पर्समधे आख्खा हत्ती हरवून जाईल इतकं सामान भरलेलं असतं.पर्सशिवाय बाई म्हणजे तलवारीशिवाय सैनिक. खरेदीची लढाई लढायची म्हटलं की पर्स हवीच. या पर्सचे पण सैनिकाचे कसे भाला बर्ची, बंदूक, तोफ, मिसाईल्स वगैरे आयुधं असतात, तसे वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे अगदी फळं, भाजी आणायला जाताना बारीकसं चिरकूट पाकीट चालतं. चालतं म्हणण्यापेक्षा ते खूपच सोपं पडतं. आजकाल त्याऐवजी स्लिंगबॅग्ज आल्यात. ह्या दप्तरासारख्या गळ्यातून पट्टा घालून कमरेवर विसावलेल्या असतात. ह्या पण किरकोळ खरेदीला भलत्याच कम्फर्टेबल ठरतात. दोन्ही हात मोकळे रहातात, खाली वाकून भाजी घेताना पर्स हातातून किंवा खांद्या वरून पडतही नाही.

दुस-या प्रकारची पर्स म्हणजे जरा मोठी एका खांद्याला लटकवायची पर्स. ही पर्स साधारण पणे साड्यांची खरेदी, ज्वेलरकडची खरेदी, भांडी खरेदी, अशावेळी वापरायची असते. अशावेळी हँड पर्स वापरणे नच्छो! कारण साड्यांच्या खरेदीत ते फारच बाधक ठरू शकतं. साडी खरेदी करताना एकतर हे मोठाले ढिगारे उपसावे लागतात. तीन चार जणी वेगवेगळ्या खरेदी करत असतील तर तेवढे ढीग दुकानातल्या गाद्यांवर लागलेले असतात. असा ढिगांमधे हँड पर्स गेली तर सापडता सापडता मुश्किल होऊ शकते. कारण तो माहोलच इतका बेहोषीचा असतो की बस. दुकानदार तन-मन-धन ओतून पुढ्यात साड्या टाकत असतो. पण साड्या खरेदीला बसलेल्या बाईला कधीच पुढे टाकलेल्या साडीत रस नसतो. बाईचं लक्ष नेहमी रॅक मधल्या साड्याकडेच असतं. असंच एकदा एका बाई बरोबर आलेल्या कंटाळलेल्या नव-याने स्वत:च साडी पसंत करून दुकानदाराची ह्या अभेद्य चक्रव्युहातून सुटका करावी म्हणून शेजारच्या ढिगातील एक साडी उपसून काढायचा प्रयत्न केलेला. पण दुस-याच क्षणी ती साडी नसून दुस-या ढिगापुढच्या बाईचा पदर आहे हे त्याच्या लक्षात आलं.. त्यानंतर त्याच्यापुढे जो, घनघोर प्रसंग ओढवला ते आता सांगणे नकोच. कारण आपण पर्स विषयी बोलत होतो.

जरा जवळच्या प्रवासात, नोकरदार महिलांची थोडी मोठी पर्स असते. ह्या पर्समध्ये लिपस्टिक, कंगवा, चाव्या, चष्माघर, गॉगल, वेट टिश्यू, टिकल्यांचं पाकीट, टूथपेस्ट ब्रश, ओडमॉस, डिओड्रंट, आवळा सुपारी, आवळा कँडी, चुइंगम, हात रूमाल, जुने बिलं, चांगल्या नोटा, चुरगळलेल्या नोटा,टिकल्यांची पाकिटं, रबरबँडचं फुटकं पाकीट,ज्यातून सगळी रबरबँड्स पर्सभर पसरलेली असतात, सुटी नाणी, कधीकाळी हळदीकुंकवाला आलेले वातडलेल्या अवस्थेतले पान सुपारी , तिळगुळाचे दाणे, रेवड्या, एखादं सुगंधी बडीशोपचं पाकीट, मोबाईल, चार्जर, क्रेडीट कार्ड, एखादा नॅपकीन, पॅरासिटॅमॉल, व्हिक्स च्या गोळ्या असा सगळाच बाजार असतो. ह्यातही एकच कप्पा असलेली पर्स असेल तर सगळ्या वस्तू गळ्यात गळे घालून इतक्या सुखेनैव नांदत असतात की त्यांचा काडीमोड करू म्हणता शक्य होत नाही. शिंक आली म्हणून रूमाल काढायला जावं तर कंगवा हातात येईल, कंगवा काढायला जावं तर मोबाईल हातात येईल इतकी मंडळी एकमेकांशी लॉयल असतात. बरं पर्स जरा जुनी झाली की अस्तराच्या टिपा उसवतात, किंवा चिल्लरच्या वजनाने कोप-यात फाटतात. आणि ब-याच वस्तू त्या चोरवाटेनं आत दडून बसतात. कधी कधी तर असं काही झालेलं आहे हे ही लक्षात येत नाही मग टाकली वस्तू पर्स मधे की गायब, टाकली वस्तू की गायब असा प्रकार सुरू होतो. आणि मग अगदीच किल्ल्या वगैरे सारखी निकडीची वस्तू गायब झाली की कसून शोध घेतला जातो, आणि नाद सोडून दिलेल्या वस्तू सापडतात. तेव्हा घबाड सापडल्या सारखा आनंद होतो.

पर्सला जितके जास्त कप्पे असतील तितका तिचा ओहदा मोठा असतो. पण ही पर्स वापरताना स्मरणशक्तीचा अगदी कस लागतो, जिने ब-याच वेळा आपल्यापासून फारकत घेतलेली असते. मग मोबाईल वाजला की टाराटरा सगळ्या चेन्स उघडल्या जातात. जिवाच्या आकांताने मोबाईल चा शोध सुरू होतो. मोबाईल सापडेपर्यंत मरणाच्या घाईने कोकलणारा मोबाईल कॉल कट झाल्याने मेल्या सारखा गपगार पडतो.

ब-याचदा पर्स वरून पर्सनॅलिटी ओळखू येते. संध्याकाळच्या वेळी एखाद्या पर्सच्या उघड्या चेनमधून पालकाची जुडी डोकावत असेल तर समजून जावं की ती एखाद्या नोकरदार संसारी गृहिणी ची पर्स आहे. हिच्यावर ब-याच जबाबदा-या असतात. डस्टर खडू पासून ते घरी बाळंतपणासाठी आलेल्या लेकीच्या बाळंतबत्तिशाचं पाकीट त्यात असतं. लेकीपाशी थांबलेल्या सासूचं… आईचं कैलासजीवनही त्यात असतं.

लग्नकार्यात वापरायच्या पर्सेस वेगळ्या असतात. ह्या नुसत्याच मिरवायच्या पर्सेस असतात. ह्या मोबाईल सांभाळण्या व्यतिरिक्त कोणतीच जबाबदारी अंगाला लावून घेत नाहीत. फार फार तर एखादा कंगवा, लिपस्टिक बस्स. फार ओझं ह्यांना सोसतच नाही. लग्न कार्यात ओझं असतं ते नवरीच्या आईच्या पर्स मधे. कुठली वस्तू तिला कधी काढून द्यावी लागते त्याचा नेमच नसतो. त्यामुळे तिची पर्स सगळं सोबतच बाळगून असते.

लेकुरवाळीच्या पर्समध्ये डायपर, कॉलेज कन्येच्या पर्समध्ये सॅनिटरी नॅपकीन दडलेला असू शकतो.

घरात अनेक पर्सेस असल्या तरी एखादी पर्स खास मर्जीतली असते. म्हणजे कुठं बाहेर निघालं की हात बरोबर त्याच पर्सच्या पट्ट्याला जातो. बाईचं हे पर्सप्रेम प्रकरण घरातल्यांसाठी चेष्टेचा विषय असतो पण तिला तिच्याशिवाय जमत नसतं.

“ए आई, ती पर्स फेक आता, इतक्या पर्सेस आहेत ना घरात.”

“असू दे, पण हिच्यासारख्या सर्वसमावेशक नाहीत त्या.

असं म्हणून बाई त्याच पर्स ला चिकटून असते..

ब-याचदा एकच पर्स वापरणे, अशा करताही सोपं पडतं की तीन तीनदा पैसे ह्या पर्स मधून त्या पर्समध्ये ट्रान्सफर करण्याचा कंटाळा. सारखी ही पर्स ती पर्स असं करणा-यांना एखाद्या वेळेस दुकानदारापुढे ओशाळं व्हायची पण वेळ येऊ शकते. कारण पर्समध्ये पैसेच नाहीत हे पर्स उघडल्यावर लक्षात येतं. अशा वेळी भाजीवाले बिचारे, ” असू द्या मॅडम, द्या नंतर म्हणतात.”

मग आठवणीने ते पैसे नेऊन देणं येतं.

ऑनलाईन पेमेंट मुळे मात्र ब-याच प्रमाणात ही फजिती आता टळते.

पण पर्स घेऊन वावरणं खरं म्हणजे खूपच अडचणीचं असतं. पुरूषांच्या दोन तीन खिशात सगळं आवश्यक सामान मावून जातं. दोन्ही हात सतत मोकळे. तीनदा खांद्यावरची पर्स सांभाळणं नाही, मोबाईल वाजला तर शोधाशोध नाही, फक्त कुठल्या खिशात काय ठेवतो ते लक्षात राहिलं की झालं.

पुरूष खिशांप्रमाणेच सगळ्या गोष्टी व्यवस्थित वेगवेगळ्या ठेऊ शकतात. पण बायका मात्र पर्समधल्या सामानासारखीच सगळ्या गोष्टींची सरमिसळ करतात, सगळ्या मध्ये गुंतत रहातात. अलिप्तपणा बायकांना जमतच नाही. जमून चालतही नाही. परिणामी पर्स सारख्याच कौटुंबिक जीवनात, नात्या गोत्यांच्या गुंत्यात पण गुरफटत रहातात. मनाचं अस्तर फाटतच रहातं. सुनेचा कप्पा वेगळा, मुलीचा वेगळा, माहेरचा वेगळा, सासरचा वेगळा, नोकरी व्यावसायिक असेल तर तो वेगळा, असं बायकांचे होत नाही. मुलीचा कप्पा उघडायला जातात तर सुनेचा कप्पा उघडला जातो, तो पटकन बंद करून मागे फिरावं तर तिथेच घुटमळत बसतात. पुन्हा मुलीचा कप्पा उघडतील, तेव्हा इकडच्या कप्प्यातलं सामान तिकडे टाकतील.. नोकरीच्या कप्प्यात संसारातला भाजीपाला टाकतील, संसाराच्या कप्प्यात नोकरीचा मस्टर घुसवतील.. असे गोंधळ करत रहातात. त्यातून बरंच रामायण महाभारत घडतं. पण त्याला इलाज नाही.

(नीलिमा क्षत्रिय या ‘दिवस आलापल्लीचे’ व ‘दिवस अमेरिकेचे’ या गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत .)

8149559091

Previous articleलोककला हव्यात आणि लोककलावंत?
Next articleरबीन्द्रनाथ टागोर: काळाच्या, जगाच्या पलीकडे नेऊन ठेवणारा कवी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here