महिला दिन: सजग, संवेदनशील पुरुषांना जपून ठेवलं पाहिजे!

-सानिया भालेराव

“One is not born, but rather becomes, a woman.” – Simone de Beauvoir

सिमोन द बोव्हुआर या फ्रेंच लेखिकेने १९४९ मध्ये ‘द सेकंड सेक्स’ हे एकदम ढासू पुस्तक लिहून चांगलं काम केलं असलं तरीही तिने चूक सुद्धा केलीच. कारण ‘आत्मभान’ हा लै डेंजर शब्द तिने बायकांपर्यत पोहोचवला. सिमोन म्हणाली, की “जोवर स्त्रियांमध्ये आत्मभान येत नाही तोवर शाश्वत सुख काय असतं हे त्यांना उमजणार नाही”. खऱ्या अर्थाने त्याकाळात मानसिकता बदलण्याचं क्रांतिकारी काम सिमोन बाईंनी केलं यात दुमत नाही. स्त्रीला पुरुष दुय्यम समजतो असा सिद्धांत मांडून फेमिनिझमचं वारं ओढवून घेणाऱ्या सिमोन ताईंची मला आज फार आठवण येते आहे. दुर्दैव हे की आजही तिने जे काही खरडून ठेवलं आहे त्यातलं बरंचसं लागू होतं. भले ते तुकड्या तुकड्यांमध्ये असेल पण समाजाच्या टॉप पासून ते अगदी बॉटम पर्यंत श्वास घेऊ शकणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्याबाबतीत कुठे ना कुठे ते लागू होतं आहे. स्वातंत्र्य, आत्मभान याचा साधा अर्थ सुद्धा माहिती नसणाऱ्या, ज्यांच्यापर्यंत सिमोनचे सोडा माझे सुद्धा शब्द पोहचू शकत नाही अशा लाखो बायका आहेत आता या क्षणी! परित्यक्त्या स्त्रिया, विधवा, बलात्कार पीडित लहान मुली, तरुणी, स्त्रिया आणि अगदी वृद्ध बायका, डोमेस्टिक, सेक्शुअल व्हॉयलन्सने पीडित असणाऱ्या स्त्रिया .. फार मोठी लिस्ट आहे.. या सर्व स्त्रिया, त्यांच्यावर होत असलेले अत्याचार मी कामाच्या निमित्ताने बघितले आहे आणि यावर लिहीत सुद्धा असते. म्हणूनच मी कितीही स्त्री पुरुष समानतेचे ढोल पिटले तरीही हे जग पुरुषांचं आहे हे सत्य आहे आणि हे मला माहित आहे.

पण महिला सबलीकरण, जेंडर गॅप, लिंग समानता यावर तेच ते लिहून मला जाम भंगार बोअर झालं आहे राव.. सो आज वूमन्स डे- म्हणून जो काही हा दिवस आहे त्यादिवशी मत असणाऱ्या, ते मांडू शकणाऱ्या आणि स्वतःच्या स्त्रीत्वाची ढाल न बनवणाऱ्या बायकांबद्दल आणि सजग , विचारी आणि स्त्रीला माणूस म्हणून बघू शकणाऱ्या फँटॅस्टिक पुरुषांबद्दल बोलावं असं वाटलं. आपण बाई आहोत म्हणजे कोणीतरी ग्रेट आहोत किंवा अगदीच पिचलेल्या बिचाऱ्या आहोत अशी दोनीही टोकं न मानणाऱ्या काही बायका आहेत. तसंच लिंगभेद न मानणारे, स्त्रीला एक माणूस म्हणून बघणारे पुरुष सुद्धा आहेतच. आणि या प्रचंड दुर्मीळ पुरुष प्रजातीची फार मोठी गोची या काळात होते आहे. कारण स्त्री पुरुष समानता ते मानतात, स्त्रीला ती केवळ स्त्री आहे म्हणून वेगळं वागवत नाहीत आणि स्त्रीचा आदर देखील त्यांना करता येतो. आता आपण बायका म्हणून आपल्याला हे कळणार नाही की या पुरुषांसाठी हे असं राहणं आणि जगणं किती अवघड आहे ते. सिमोन ताईंनी जेव्हा पुस्तक लिहिलं तेव्हा हे कुल टाईप पुरुष फारच नगण्य असावेत. पण आज त्यांचं प्रमाण तसं वाढलं आहे आणि म्हणून वूमन्स डे प्रित्यर्थ अशा फँटॅस्टिक पुरुषांना थँक यू म्हणायला पाहिजे असं मला वाटलं.

सगळे पुरुष बाईसाठी वखवखलेले लांडगे नसतात आणि ना  तिला दाबून तिच्यावर वर्चस्व दाखवण्यात त्यांना सो कॉल्ड मर्दानगी वाटते. सजग, प्रेमळ आणि अत्यंत विचारी, लिंगभेदापलीकडे जाऊ शकणारे पुरुष असतात. आता जर माझ्या समस्त बहिणी वर्गाला “असे देखील पुरुष असतात?” असा प्रश्न पडला असेल तर बायांनो तुमचं सर्कल चुकतं आहे. शक्य असल्यास नवीन बिंदू घेऊन, परीघ विस्तारून पुन्हा एकदा वर्तुळ आखायला घ्या.

मला कायम असं वाटतं की पिढ्यांपिढ्या पिचलेला वर्ग जेव्हा वर येऊ पाहतो तेव्हा परंपरागत वर्चस्व असलेला वर्ग त्याच्याशी कसा वागतो, त्याला हात देऊन कसं स्वतःच्या बरोबरीने उभं करतो हे फार महत्वाचं आहे आणि म्हणूनच जेव्हा अगदी एक जरी स्त्री आज खरोखरीची लिंग समानता मानून, एक माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यामागे तिच्या सोबत अन आजूबाजूला असलेल्या सजग पुरुषांचं फार मोठं काँट्रीब्युशन असतं. ” माझा नवरा, मला मैत्रिणींबरोबर जाऊ देतो बाहेर महिन्यातून एकदा किंवा आमच्याकडे चालतं छोटे कपडे घालते मी तर किंवा मी पिते दारू बाहेर पार्टीजमध्ये, माझा नवरा नाही काही म्हणत” हे असल्या उथळ स्टेटमेंट्स पुरतं हे काँट्रीब्युशन नाहीये. स्वातंत्र्य म्हणजे हे नव्हे. मी या पलीकडच्या गोष्टींबद्दल बोलते आहे. आणि अशा सजग पुरुषांना जपून ठेवलं पाहिजे आणि त्यांचं आयुष्यात असणं किती मोलाचं आहे हे सांगितलं पाहिजे.

सो माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या रोल्समध्ये जे सजग पुरुष आहेत, ज्यांनी मला मी बाई आहे म्हणून ना डोक्यावर बसवलं आणि नाही कमी लेखलं, मी कमी पडते आहे, याची जाणीव सुद्धा न करून देता वेळोवेळी मला साथ दिली. मी त्यांना साथ देत असतांना कुठेही कमीपणा मानून घेतला नाही, मित्रं जे नितळ नजरेने माझ्याकडे बघू शकतात आणि आज काय सुरेख दिसते आहे पासून कसला अवतार केला आहे म्हणून मैत्रीची आब राखत मला आतून जिवंत ठेवतात आणि जग माझं नसलं तरीही ते माझं आहे याची मला पदोपदी खात्री वाटेल असं वागतात, त्या सर्व पुरुषांना आपल्याकडून एक सॅल्यूट बॉस! फॉल्स फेमिनिझमच्या चक्रीवादळात आत्मभानाची लक्तरं सांभाळून स्त्री असूनही स्त्रीत्वाचा गैरफायदा न घेता राहणं जसं अवघड तसंच एकीकडे बहिरे करणारे फेमिनिझमचे भोंगे आणि दुसरीकडे अमानुषपणे पौरुषत्व बाहेर काढणाऱ्या नराधमांच्या बातम्या वाचून अशा पुरुषांबद्दल वाटणारा राग… यात होरपळताना विचारी, अनबायस्ड आणि प्रेमळ पुरुष बनून जगणं हे सुद्धा पुरुषांसाठी अवघडच आहे.

सिमोन ताई जेव्हा म्हणातात की “वन बिकम्स अ वूमन”, तर हे बिकम्स आहे नं.. बनणं… ते बनणं म्हणजे स्त्रीत्व उमजण्याचा प्रवास आहे. फक्त चूल व मुलं हे स्त्रीत्व नाहीये आणि स्वातंत्र्याच्या नावावर वाट्टेल तसं वागून मुद्दामून पुरुषांची, समाजाची जिरवायची म्हणून स्वैर वागणं असं सुद्धा ते नाहीये. केवळ स्त्री आहात म्हणून स्त्रीत्व गवसेल असं नाही. पुरुषाला सुद्धा ते गवसू शकतं. जुने फ़ंडे मॉडिफाय करण्याची वेळ आता आली आहे. स्त्री असून स्त्रीत्व न उमजलेल्या चिकार स्त्रिया मी पाहिल्या आहेत आणि पुरुष असून सुद्धा स्त्रीत्वाची लोभस किनार पांघरलेले पुरुष मी पाहिले आहेत. आणि म्हणून स्त्रीत्व ही काही विशिष्ट एका जेंडरची मक्तेदारी नव्हे. मग आहे काय ही भानगड.. तर हा प्रवास आहे.. आपापला.. .शहाणं, सजग होण्याचा. आत्मभान या शब्दाचा अर्थ उमजण्याचा प्रवास सोपा नसणारचं.. नको ती वळणं येऊन तोंडावर आपटण्याची वेळ येईल, नको ती माणसं भेटून मिळवलेल्या आत्मविश्वासाचा कचरा होईल, स्वतःवर शंका येईल असे अनुभव सुद्धा येतील. कदाचित पण स्वतःवर विश्वास ठेऊन चालत राहायचं.. स्वतःपासून बदल केले तर निदान उत्तरं आणि वाटा मिळू शकतात. एखादा अनुभव वाईट आला म्हणून सगळ्यांना त्याच चष्म्यातून पाहायचं नाही, असं स्वतःला सांगत राहायचं. अवघड असू शकेल पण जमेल.. मला, तुम्हाला आणि आपल्या सगळ्यांना.. या प्रवासाच्या जेंडर विरहित तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा!

– [email protected]

(लेखिका नाशिक येथे MET’s Institute of Pharmacy येथे कार्यरत आहेत)

सानिया भालेराव यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –सानिया भालेराव– type करा आणि Search वर क्लिक करा.

 

Previous articleमनस्वी चित्रकार दिलीप बडे
Next articleप्लेगबाधित मुलांना पाठीवर नेणाऱ्या सावित्रीबाईंची शौर्यगाथा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.