मनस्वी चित्रकार दिलीप बडे

-प्रवीण बर्दापूरकर

दिलीप बडेची ओळख आम्हा दोघांच्याही विद्यार्थीदशेपासूनची . आम्ही दोघंही मराठवाड्यातले पण , ओळख झाली ती मात्र मुंबईत . तेव्हा तो ‘जेजे’ला होता आणि मी मुंबईत पोटासाठी पत्रकारितेच्या धबडग्यात नुकतंच शिरलो होतो . तेव्हा आठवड्यातून एखादी तरी चक्कर ‘जेजे’ ला मारण्याचा माझा रिवाज होता . कारणं दोन . एक म्हणजे जगण्याची दिशा अजून सापडलेली नव्हती आणि दुसरं म्हणजे दिशा न सापडण्याचं ते सैरभैरपण ‘जेजे’च्या परिसरात गेलं की हळूहळू विरत जात असे . मित्रांच्या भेटी आणि तिथले रंगभ्रम मन शांत करत असे  . त्या काळात कुणीतरी ‘अरे , हा तुमच्या मराठवाड्याचा.’ अशी ओळख करुन दिली . आम्ही एकमेकांच्या चौकशा केल्या पुढच्या काही भेटीत चौकशीतलं जुजबीपण कायम राहिलं . खरं तर , आम्ही दोघंही एकमेकांच्या खूप निकट कधीच आलो नाही पण ,जेव्हा केव्हा भेटतं असू तेव्हा दुरावा मुळीच नसे .

अशीच काही वर्षे गेली . मी पणजी , कोल्हापूर , सातारा , चिपळूण मार्गे एकदाचा नागपूरला पडाव टाकला . पत्रकारितेतही बऱ्यापैकी स्थिरावलो . तेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मी भक्तिभावानं हजेरी लावत असे . त्यापैकी सर्वात संस्मरणीय ठरलं ते १९८३ झाली झालेलं अंबाजोगाईचं साहित्य संमेलन . या संमेलनात ह . मो . मराठेंची ‘माणूस’ म्हणून ओळख झाली . कोलकात्याच्या वीणाताई आलासेंची पक्की जान-पहेचान’ झाली . ज्याचा पुढे मी उल्लेख ‘स्वामी’ करत असे आणि माझ्या पत्रकारितेतल्या दीर्घ प्रवासाचा सख्खा साक्षीदार ठरलेल्या श्याम देशपांडेची ओळख झाली . अंबाजोगाई  साहित्य संमेलनाच्या कल्पक सजावटीचं नेतृत्व दिलिप बडे याचं होतं . आमची पुन्हा भेट झाली . आम्ही कडाडून भेटलो . त्याची प्राध्यापकी , चित्र वगैरे आणि माझ्या पत्रकारितेबद्दलच्या गुजगोष्टी झाल्या . ज्या असोशीनं आम्ही भेटलो तितक्याच तटस्थपणे आम्ही एकमेकांचा निरोप घेतला . मग आमच्या अधूनमधून भेटी होत राहिल्या . त्या सभा , समारंभात किंवा चक्क रस्त्यावरही . अशा भेटीत गिले शिकवे चालत . एकमेकांच्या घरी येण्याचं वचन आम्ही एकमेकांना दिलं आणि ते कधीच पाळलं नाही ; हेही आमच्या मैत्रीचं एक वैशिष्ट्यं म्हणायला हवं .

दिलीप ‘जेजे’ तच प्राध्यापक झाला . मग औरंगाबादलाही आला . कला महाविद्यालयाचा डीन वगैरे झाला . शासकीय सेवेत बढत्या आणि बदल्या होत असतात , तशा त्या त्याच्या होत गेल्या , तसंच त्या पत्रकारितेत माझ्याही बाबतीत झाल्या . ही एकमेकांची खबरबात राखत आम्ही असूत .
महत्त्वाचं म्हणजे या काळात दिलीप एक चित्रकार म्हणून चांगलाच प्रस्थापित झाला . आमच्या पहिल्या भेटीपासून लक्षात आलेलं दिलीपचं एक वैशिष्ट्यं म्हणजे तो विलक्षण मनस्वी होता . डोईवरचे किंचित मागे वळवलेले केस , उत्सुकतेच्या डोहाकाठचे डोळे , थोडसं फुगीर नाक , कपाळावर आठ्यांचं जाळं आणि दाढीधारी गोलसर चेहरा आणि काहीशी स्थूल शरीरयष्टी असं दिलीपचं वैशिष्ट्यं होतं . तो हसतही माफक असे ; त्यापैकी निम्म हसणं त्याच्या दाढीत विलीन होत असे . त्याच्याकडे बघितल्याबरोबर तो शासकीय अधिकारी-कर्मचारी किंवा कार्पोरेटमध्ये काम करणारा नाही हे सहज जाणवत असे  पण , तो चित्रकार आहे अशी चाहूल सगळ्यांनाचा लागत असेच असं नाही . मात्र दिलीप बडे  हे नाव ऐकलं की , त्याच्या ओळखीचे रंग आपोआप गडद होत जात असतं . हे घडण्याचं कारण या मधल्या काळात ‘पोर्टेट’कार म्हणून त्याचं झालेलं नाव . महात्मा ज्योतिबा फुले , शाहू महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर , बाळासाहेब ठाकरे अशा काही पोर्टेटस्नं दिलीपला नाव , वलय आणि स्थैर्यही दिलं . पोर्टेट करणारे महाराष्ट्रातले जे काही समकालीन चित्रकार होते त्यात दिलीपचं नाव आवर्जून आणि आदरानं घेतलं जाऊ लागलं . स्थैर्य येऊनही दिलीपचं मनस्वीपण काही कमी झालं नाही हे मात्र खरं . मोठी क्षमता असूनही दिलीप पोर्ट्रेटच्या वर्तुळातच अडकत गेला , यांची खंत किमान मला तरी वाटत असे .

१९७७ पासून पत्रकारितेच्या निमित्तानं मराठवाड्याबाहेर मुशाफिरी केल्यावर मी ९८मध्ये ‘लोकसत्ता’चा विशेष प्रतिनिधी म्हणून माझी औरंगाबादला बदली झाली . दिलीप बहुधा ‘लोकसत्ता’चा वाचक असावा . मग एक दिवस तो गुलमंडीवरच्या आमच्या कार्यालयात आला . एव्हाना त्याचा संप्रदायही निर्माण झाला असावा . कारण आधी तो येणार असल्याची , मग आल्याची वर्दी आली आणि मग तो आला . औरंगाबादच्या माझ्या या छोट्या वास्तव्यात आमच्या बऱ्याच भेटी झाल्या पण , आम्ही काही कौटुंबिक पातळीवर एकत्र आलो नाही . असा काही विषय निघाला की , आम्हा दोघांतही एक अवघडलेपण येत असे . पुढे ते आम्ही नकळत स्वीकारुनही टाकलं . त्यामुळे अर्थातच आमच्या मैत्रीवर फार काही परिणाम झाला नाही . मात्र ही मैत्री गहरी झाली नाही , हे खरंच.

दिलीपचा स्वभाव मनस्वी असला तरी विविध संस्था आणि चळवळींशी तो घट्ट बांधला गेलेला आहे हे औरंगाबादच्या त्या वास्तव्यात सहज लक्षात आलं . अनेकांच्या पाठीवर त्याचा खंबीर हात असे पण , तो त्यानं कधी दृश्यमान होऊ दिला नाही , हेही लक्षात येत गेलं . अर्थात त्याचं मला फारसं आश्चर्य वाटलं नाही कारण चळवळ दिलीपच्या रक्तातच होती . अनेक वर्षांपूर्वी एक पँथर म्हणून सक्रीय असलेला तरुण दिलीप बडे मी पाहिलेला होता . फरक इतकाच की , तरुण वयातला त्याचा तो अंदाज आता खूपच समंजस आणि प्रौढही झालेला होता . जे काही बोलायचं ते मध्यम आवाजात आणि ठामपणे , हे त्याचं तरुणपणी जाणवलेलं वैशिष्ट्यं कायम असल्याचं आमच्या औरंगाबादच्या भेटीत जाणवलं . त्याच्या कृतीलाही भर्राटपण नाही तर एक शांतपणा असे . आमच्या याही अशा भेटीत त्याच्या स्टुडिओला भेट देण्याचे वादे ठरले पण , ते कधीच निभावले गेलेचं नाही .

२४ मार्च २००३ ला मी पुन्हा औरंगाबाद सोडलं आणि नागपूर , दिल्ली अशी  वारी करुन २०१५ मध्ये पुन्हा औरंगाबादला परतलो ; स्थायिकच झालो . कुठल्याशा चित्र प्रदर्शनात दिलीपची भेट झाली . मधल्या काळातल्या क्षेमकुशलचा बॅकलॉग भरुन निघाला आठेक दिवसांनी दिलीपचा फोन आला . त्याला त्याचं एक चित्र मला भेट म्हणून द्यायचं होतं . दुसऱ्या दिवशी चाणक्यपुरीतल्या आमच्या घरी तो आला ते तीन पेंटिंगस् घेऊन . ब्रेकफास्ट करताना भरपूर गप्पा झाल्या . बेगम मंगलाची आणि त्याची ओळख करुन दिली . त्याच्या परिचित मृदु शैलीत त्यानं माझ्या बेगमशीही गप्पा मारल्या . आणलेल्यापैकी एक चित्र मी निवडावं असा दिलीपचा आग्रह होता . मी अमूर्त शैलीतलं चित्र निवडलं . त्याला जरा आश्चर्य वाटलं ते ओळखून मी दिलीपला म्हणालो , ‘पोर्टेटच्या प्रवाहात वाहात जाऊन अॅबस्ट्रॅक्टची सावली तू विसरलास गड्या .’ मग सुहास बहुळकर यांचं ‘चित्रकार गोपाळ देऊसकर’ हे पुस्तक मी त्याला भेट म्हणून दिलं . शब्द आणि चित्रांचा असा मेळ म्हणजे आमची मैत्री होती .

नंतरही अधूनमधून आम्ही ओझरते भेटलो आणि अचानक बातमी आली ती दिलीपच्या निधनाची . कुठलंच मरण समर्थनीय नसतं . कुणाचंही मरण समर्थनीय  नसतं मग दिलीप बडेचंही मरण कसं काय समर्थनीय असेल ? पानगळीचा मोसम नसतानाही एखादं पान असं अचानक गळून पडणं समर्थनीय कसं ठरेल  ?  पानं गळण्याच्या या वार्ता कधी थांबणार आहे कुणास ठाऊक ?

 

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर – type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleनरेंद्र लांजेवार : बुलढाण्याचा सांस्कृतिक दूत…   
Next articleमहिला दिन: सजग, संवेदनशील पुरुषांना जपून ठेवलं पाहिजे!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.