सारेच संघाचे!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांचे नाव घेतल्यावर झालेल्या टीकेचा सूर हा, भाजपच्या मातृसंस्थेला गांधी मानवणार कसे असा होता आणि त्या टीकेस रा. स्व. संघाला गांधी प्रातस्मरणीय आहेतच असे उत्तरही मिळाले होते. परंतु मग संघाच्या प्रातस्मरणीय यादीचीच छाननी करावयाचे ठरवले, तर अनेक अंतर्विरोध दिसतात. या अंतर्विरोधांचा उपयोग राजकीय पातळीवर वेळोवेळी झालेला आहेच हेही दिसते, असे सांगणारा हा पत्र-लेख..

bapu महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीची तारीख २ ऑक्टोबर २०१९ ही असली, तरी तिचे वेध पंतप्रधान नरेंद्र मोदींना आत्तापासून लागले आहेत. अमेरिकेतील त्यांच्या भाषणात त्यांनी याचा खास उल्लेख करून देशभरात सफाई अभियान सुरू करून स्वच्छ भारत निर्माण करण्याचा संकल्प जाहीर केला. sam08गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले असा उल्लेख पंतप्रधान मोदींनी त्या भाषणात दोनदा केला.
गांधीजींना जाहीरपणे प्रात:स्मरणीय ठरवून खासगीत त्यांची यथेच्छ टिंगलटवाळी आणि निंदानालस्ती करण्याचे कार्य संघ परिवार आजवर करत राहिला आहे. परंतु ही टवाळी खासगी आणि अनौपचारिक राहिल्याने अशा गोष्टी छापील माध्यमांत आल्या नाहीत आणि त्या खासगीतील टवाळीचा प्रतिवाद जवळपास अशक्य ठरला. अशा संघाचे स्वयंसेवक असलेले नरेंद्र मोदी गांधीप्रेमाने इतके कासावीस का झाले, त्यांचे गांधीप्रेम अचानक का उचंबळून आले, याचा विचार करणे भाग आहे.
संघाखेरीजही अन्य हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींना नेहमीच द्वेष्य मानले; परंतु श्रद्धाळू भारतीय जनतेला गांधी नेहमीच संतांप्रमाणे पूज्य राहिले आहेत. जनतेने त्यांचा संत म्हणून स्वीकार केला आहे. अशा संत गांधींना त्यांच्या समाजकारणापासून आणि राजकारणापासून वेगळे करता आले, तर गोहत्याविरोधी, रामराज्याचे स्वप्न पाहणारे, धर्मातराला विरोध असणारे, हिंदू धर्मावर श्रद्धा असणारा गांधी जणू संघाचेच विचार मांडत होते, असा भ्रम जनतेत पसरविणे संघ परिवाराला फारसे जड जाणार नाही. गांधी जन्मशताब्दीच्या वर्षी, १९६९ मध्ये सरसंघचालक गोळवलकर गुरुजींनी असा प्रयत्न केला होता. गांधीजींचा आत्माच जणू गुरुजींच्या रूपात भूतलावर वावरत आहे, असा प्रचार संघ स्वयंसेवक करीत होते.
आता त्याच प्रकाराची पुनरावृत्ती होत आहे आणि संघ ती चलाखीने करण्याचा प्रयत्न करीत आहे.
स्वराज्याच्या पूर्वअटींमध्ये गांधीजींनी हिंदूमुस्लीम ऐक्य, स्वदेशी आणि अस्पृश्यतानिवारण या तीन गोष्टींचा समावेश केला होता. काहीही साध्य करण्यासाठी अहिंसा ही गांधीजींची पूर्वअट होती आणि या अहिंसेच्या रक्षणासाठीच हा महात्मा जगला आणि मेला. यापैकी काहीच आत्मसात करायची इच्छा नसताना गांधीजी स्वच्छतेचे भोक्ते होते, असे म्हणत गांधीजींच्या नावे स्वच्छता अभियान सुरू करणे ही भोळ्याभाबडय़ा लोकांची फसवणूक होय.
जनतेची अशी फसवणूक संघ अगदी पहिल्यापासून करत आला आहे. स्वामी विवेकानंद, बंकिमचंद्र चटोपाध्याय आणि योगी अरविंद यांचे आम्ही वैचारिक वारस आहोत, असा संघाचा दावा आहे; परंतु संघ त्यांच्या विचारातील, केवळ संघाला जो वैचारिक आणि राजकीयदृष्टय़ा सोयीचा आहे, तितकाच भाग लोकांसमोर आणतो. ‘हिंदू विचारवंता’च्या न परवडणाऱ्या विचारांबद्दल संघ मौन बाळगतो.
हिंदूंनी शारीरिकदृष्टय़ा सुदृढ व्हावे, या स्वामी विवेकानंदांच्या उक्तीचा आधार संघ त्याचा संदर्भ न सांगता घेत असतो. हिंदूंनी त्यांचे पौरुष, शौर्य आणि धैर्य परत मिळवावे, एवढेच सांगून न थांबता त्यासाठी विवेकानंद यांनी गोमांस खाण्याचा आणि फुटबॉल खेळण्याचा सल्ला दिला आहे, परंतु हे सांगण्याचा स्वामीजींचा उद्देश वेगळा आहे. स्वामीजी शरीर आणि मन यांची एकात्मता अपेक्षितात आणि निरोगी मनासाठी त्यांना सशक्त शरीर हवे आहे, कुणावर हल्ला करण्यासाठी नाही. आध्यात्मिक विकासासाठी त्यांना सशक्त शरीर हवे, ही गोष्ट संघ सांगत नाही. विवेकानंदांच्या अद्वैत वेदान्ताच्या गप्पा संघ मारतो; परंतु हे तत्त्वज्ञान नैतिक, सामाजिक आणि राजकीय बाबींशी निगडित असून संपूर्ण मानव वंशाच्या भविष्यासाठी आहे आणि दारिद्रय़ व अन्याय यांचा नाश करून ते सहिष्णुता, समता, शांतिपूर्ण सहअस्तित्व, बंधुता, लोकशाही आणि सामाजिक न्याय यांच्याशी संबंधित आहे ही गोष्ट संघ कधीच सांगत नाही.
बंकिमचंद्राच्या वंदे मातरम्चा गजर संघ उच्चरवाने करतो. बंकिमचंद्र बंगाल प्रांताचे होते. तेथील मुसलमान राज्यकर्त्यांचे वर्णन त्यांनी ‘असमंजस, धर्मवेडे, वाकडय़ात शिरणारे, कामुक आणि अनैतिक’ असे केले आहे ही गोष्ट खरी. परंतु बंकिमचंद्रांचा रोख सर्व मुसलमानांविरुद्ध नव्हता, तर ‘बिघडत चाललेल्या जुलमी मुसलमानांविरुद्ध’ होता आणि बंकिमचंद्रांना जुलमी मुसलमान जितके अप्रिय होते, तितकेच बिघडत चाललेले जुलमी हिंदूही अप्रिय होते, याची प्रचीती त्यांच्या उत्तरायुष्यातील लिखाणातून येते. संघ हे विचारात घेत नाही.
योगी अरविंद संघाला पूज्य आहेत. परंतु ‘मुसलमानांचे राज्य परकीयांचे राज्य म्हणून येथे फार काळ राहिले नाही. ते या देशाचेच बनून गेले. मोगलांच्या राज्यात देशात सुंदर इमारती बांधून त्यांची निगा राखण्यात आली. ते जनतेला उपकारक ठरले. औरंगजेबाचे धर्मवेड लक्षात घेतले तरी मुसलमानी राज्य तत्कालीन युरोपीय राज्यांपेक्षा धार्मिक बाबतीत अधिक उदार आणि सहिष्णु होते,’ असे योगी अरविंदांचे प्रतिपादन होते. संघ या प्रतिपादनाशी सहमत होणार नाही, परंतु हिंदूंना पूज्य असणाऱ्यांना संघाला सोयीस्करपणे वापरायचे आहे, जणू त्यांचेच विचार आम्ही पुढे चालवीत आहोत, असा आभास निर्माण करायचा आहे.

संघाच्या राजकारणाबाबत नरहर कुरुंदकर लिहितात, ‘ज्या राजकारणाचा प्रवाह जनतेला वास्तविक प्रश्नांबद्दल शहाणे करण्याच्या खटपटीत नसतो, तर याउलट जनतेच्या श्रद्धा बेमालूमपणे आपल्या राजकारणासाठी ज्यांना वापरायच्या असतात, त्यांना सगळेच संत आत्मसात करणे भाग असते.’
द्वैतमतवादी मध्व संघाला प्रमाण आहेत. मध्वांनी ज्यांना ‘कलियुगातील राक्षस’ म्हटले ते शंकराचार्यही संघाला मान्य आहेत. यज्ञवादी वेद संघाचेच, यज्ञविरोधक बुद्ध हा तर खास संघाचा. शिवाजी महाराज आणि राणा प्रताप हे तर हिंदूंचे राज्यकर्ते म्हणून संघाला प्रिय आहेतच; पण पंजाबात मराठय़ांच्या विरोधात लढलेले शीखही संघाचेच! सगळेच आमचे म्हणून टाकल्यावर एकेकाचे कार्य, त्याचे वेगळेपण तपासायची गरजच काय? हिंदू समाजाची ही जुनी परंपरा आहे. आम्ही एकेकाला संत, देव, महात्मा असे म्हणून पूजनीय करतो, देवळात बसवितो, त्यानंतर आमचे रस्ते सरळ होतात. कारण कोणालाच समजून घ्यायची गरज नसते. वैचारिक चिकित्सेचीही गरज नसते.”
गांधीजींना आत्मसात करण्याचा मोदींचा उद्योग लोकांच्या श्रद्धांचा वापर बेमालूमपणे राजकारणासाठी करण्याच्या संघाच्या परंपरेचाच भाग आहे. त्यासाठीच संघाला गांधी नावापुरता हवा आहे.
संघाची आणखी एक मोठी अडचण आहे. स्वातंत्र्य आंदोलनात वा समाजसुधारणेच्या चळवळीत भाग घेतलेला कुणीही नावाजलेला नेता संघाकडे नाही. त्यासाठीच सरदार पटेलांना हिंदुत्ववादी ठरविण्याचा अट्टहास संघ करत आला आहे. आता त्याच पंक्तीत गांधीजींना आणण्याचा प्रयत्न संघ त्यांचे राजकीय आणि सामाजिक विचार वगळून करू पाहत आहे. स्वातंत्र्य आंदोलनापासून आणि सामाजिक सुधारणांच्या चळवळींपासून जाणीवपूर्वक दूर राहिलेला संघ आता ती उणीव दूर करण्याचा प्रयत्न गांधीजींच्या नावे स्वच्छता अभियान चालवून करू पाहत आहे, गांधींचा खोटा वारसा अन्य राजकारणी मिरवतात, त्यात आता नवी भर पडली आहे.
– विवेक कोरडे
(सर्वोदयी कार्यकर्ता), मुंबई
(सौजन्य -लोकसत्ता)

Leave a Comment