सरकारसोबत चर्चा केलीच पाहिजे!

सरकारसोबत चर्चाच करायची नाही म्हणणारे मराठा मोर्चामुळे निर्माण झालेला परिणाम मातीत मिसळवायला निघालेले आहेत. सरकार प्रचंड दबावात आहे. याचा फायदा घेऊन आरक्षण, शेतीचे प्रश्न, शिक्षणातील सवलती आणखीही जे जे शक्य शक्य आहे ते पदरात पाडून घेतलं पाहिजे. ही संधी गमावली, तर हे ऐतिहासिक मोर्चे केवळ इतिहासाचा भाग बनून राहतील.
……………………………………………………
क्रांतिदिनापासून सुरू झालेल्या मराठा मोर्चांना maratha-morchaआता जवळपास दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटलाय. आतापर्यंत २२ मोर्चे झालेत. आणखी बरेच निघतील. या मोर्चांनी महाराष्ट्र दणाणून गेला आहे. गेला दीड महिना संपूर्ण राज्य याच एका विषयाभोवती फिरत आहे. खूप वर्षानंतर एखाद्या घटनेमुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. लाखालाखाचे मोर्चे महाराष्ट्राने याअगोदर पाहिले नव्हते, अशातला भाग नाही. पण कुठलाही आवाज नाही. गोंधळ नाही. नारेबाजी नाही. उन्माद नाही. दहशत नाही. केवळ आपल्या मागण्यांचे फलक घेऊन लाखो स्त्री-पुरुष रस्त्यावरून मार्गक्रमण करतात. निर्धारित ठिकाणी पोहोचून राष्ट्रगीत म्हणून जेवढय़ा शांततेत एकत्रित आलेत तेवढय़ाच शांततेत विसजिर्त होतात. मोर्चा आटोपल्यावर रस्त्यावर झालेला कचरा स्वच्छ करतात. हे चित्रच महाराष्ट्राला नवीन आहे. त्यामुळेच एक शब्दही न बोलता व्यक्त होत असलेला हा मूक आक्रोश तमाम पत्रकार, अभ्यासक व समाजशास्त्रज्ञांसाठी अभ्यासाचा विषय झाला आहे.

मराठा क्रांती मोर्चांची मालिका सुरू होण्याला आता बरेच दिवस झाले असल्याने काही गोष्टी आता बर्‍यापैकी स्पष्ट झाल्या आहेत. या मोर्चांना जी लाखोची गर्दी उसळत आहे ती स्वयंस्फूर्तीने होत आहे, यात कुठलीही शंका उरली नाही. मोर्चाला येण्यामागची प्रेरणा जातीची अस्मिता असली तरी मोर्चातील गर्दी ही सर्वसामान्य माणसाची, शेतकरी-कष्टकर्‍यांची गर्दी आहे. या मोर्चांमुळे माझ्या आयुष्यातील काही प्रश्न मार्गी लागतील, या आशेने माणसं गर्दी करत आहेत. या मोर्चांचे ठिकठिकाणचे आयोजक आहेत, त्यात दोन प्रकारची माणसं आहेत. एक आहेत प्रस्थापित-सुस्थापित मराठे. त्यांचे कुठे ना कुठे हितसंबंध जुळले आहेत. या वर्गाला समाजाच्या मागण्यापेक्षा आपलं प्रस्थ कसं सुरक्षित राहिलं, याची काळजी अधिक आहे. मोर्चांच्या निमित्ताने होत असलेल्या विशाल शक्तिप्रदर्शनाने हा वर्ग आपले खुंटे अधिक बळकट करून घेण्याच्या प्रयत्नात आहे. दुसरा वर्ग आहे तो आहे तरुण वर्ग. या वर्गाची कमिटमेंट मात्र फक्त समाजाच्या मागण्यांसोबत आहे. या वर्गाला शरद पवार, अजित पवार, संभाजीराजे, उदयनराजे, विखे पाटील, भय्यूजी महाराज, पुरुषोत्तम खेडेकर…आणखीही जे काही मराठा नेते आहेत, त्यांच्याशी काही देणेघेणे नाही. मराठा समाजाच्या या नेत्यांनी समाजाचे जेवढे नुकसान केले तेवढे दुसरे कोणीच केले नाही, असे हा तरुण वर्ग बिनधास्तपणे सांगतो आहे. (महाराष्ट्रातील नामांकित कवी ज्ञानेश वाकुडकर यांनी अतिशय मार्मिक उदाहरणाद्वारे मराठा तरुणाईला याविषयात सजग केले आहे. गावातील चोरट्यांचा बंदोबस्त करावा यासाठी पोलीस स्टेशनवर निघालेल्या मोर्चात आपल्यातलेच घरंदाज डाकू शांतपणे सामील होत आहेत, हे पाहून आपण हुरळून जाणार आहोत का? ते अगदी शिस्तीत एका रांगेत चालत आहेत, हे सांगण्यात धन्यता मानण्याचा गाढवपणा पुन:पुन्हा आम्ही करणार का? असे प्रश्न करून त्या डाकूंना तुरुंगात घालण्यासाठी आग्रही राहा, असे आवाहन त्यांनी केले आहे.) त्यामुळेच अनेक ठिकाणी नेत्यांनी डोक्यावर हात ठेवण्याचा प्रय▪केल्याबरोबर या तरुणांनी अतिशय तडफेने तो झिडकारून टाकला. आमचा हा लढा केवळ सत्ताधार्‍यांविरुद्ध नाही, तर आम्हाला एवढी वर्षे गृहीत धरणार्‍या मराठा नेत्यांविरुद्ध आहे, असे हे तरुण खुलेआमपणे सांगाताहेत. या तरुण वर्गाची प्राथमिकता आहे आरक्षण, शिक्षणातील सोयीसुविधा आणि शेतीचे प्रश्न. या मोर्चांकडे कृपया जातीचे मोर्चे म्हणून पाहू नका. मराठा समाजातील उद्याच्या पिढीचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत, असे ते कळकळीने सांगत आहेत. ज्या ज्या ठिकाणी तरुणांकडे मोर्चाची सूत्रे होती अशा सोलापूर, पुणे, अमरावती आदी ठिकाणी मोर्चाला एक व्यापक स्वरूप देण्याचा प्रय▪या तरुणांनी केला. मोर्चात वेगवेगळ्या समाजघटकांना सामावून घेण्याचा प्रय▪तर त्यांनी केलाच सोबत शेती आणि शिक्षणाच्या मागण्यांना अग्रक्रम मिळेल, हे त्यांनी पाहिले. स्वामिनाथन आयोग लागू करा, मराठा विद्यार्थ्यांना ईबीसीची र्मयादा वाढवून द्या, उच्च अभ्यासक्रमात शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांंसाठी जागा राखीव ठेवा, अशा मागण्या त्यांनी केल्या. मराठा समाजातील तरुणांना समाजाचे नेमके प्रॉब्लेम काय आहेत, हे समजले आहेत, हे सांगणारी ही धडपड आहे. त्यामुळेच सध्या ठिकठिकाणी मराठा नेत्यांना त्यांच्यामागे फरपटत यावे लागत आहे. महाराष्ट्रात हे पहिल्यांदाच घडत आहे.

मात्र परीक्षा आता पुढे आहे. लाखो-करोडोंच्या या मूक गर्दीला पुढे काय वळण लागणार याचा अंदाज कोणालाच येत नाहीय. मराठय़ांनी अभूतपूर्व एकजुटीचे प्रदर्शन घडवत भल्याभल्यांची मती गुंग केली आहे. मात्र ही गर्दी मराठय़ांमधल्याच काहींचे डोके फिरवू शकते. त्यातून वातावरण बिघडविण्याचा प्रय▪होणारच नाही, याची खात्री देता येत नाही. मराठा मोर्चांची धूम सुरू असताना मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी अमेरिकेतून एक लेख लिहिला. त्यात शरद पवार, अजित पवार व इतर मराठा नेत्यांवर टीका करतानाच मराठा समाजाच्या दानावर आणि खरकट्यावर अनेक गैरमराठा समाज गब्बर झालेत, अशी मुक्ताफळे उधळलीत. त्याचा आम्हाला अभिमान आहे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. या वाक्यामध्ये सरंजामशाहीचा दर्प येतो. (जिथे जिथे शक्य आहे तिथे खेडेकरांचा मराठा सेवा संघ या मोर्चांंची यशपताका आपल्या डोक्यावर बांधण्याच्या तयारीत आहे.) या अशा प्रवृत्तीमुळे मराठा समाजाबद्दल बाकी समाज शंकीत असतो, हे समाजातील तरुण पिढीने हे लक्षात घेतलं पाहिजे.

यशाच्या धुंदीत वास्तवाचा विसर पडल्यास यश मातीमोल व्हायला वेळ लागत नाही. मराठा मोर्चे हे कुठल्याही जातिधर्माविरुद्ध नाही, असे सांगितले जात असले तरी मराठा समाजातील मोठा वर्ग आपल्यावर नाराज आहे. आपल्याला असलेल्या अँट्रासिटी अँक्टच्या संरक्षणाबाबत त्यांना संताप आहे, हे दलित समाजाच्या लक्षात आलं आहे. रिअँक्ट न होण्याचा शहाणपणा त्यांनी दाखविला असला तरी मनाने तो मराठा समाजापासून आणखी दूर गेला आहे, हे वास्तवही समजून घेतलंच पाहिजे. दलित, मराठा किंवा इतर कुठल्याही जातीतील काही माणसं एक्स्ट्रिम असतात. त्यामुळे सरसकटपणे कुठल्याही जातिसमूहाबद्दल एक मत बनवायचं नसतं, हे भान सगळ्याच जातिसमूहाचं नेतृत्व करणार्‍यांनी ठेवलं नाही, तर परिस्थितीच्या आकलनात गोंधळ होतो आणि त्याचे पडसाद कृतीत उमटतात. मराठा समाजाच्या या मोर्चातून जातीची अस्मिता कट्टरतेकडे झुकणार नाही, याची काळजी समाजातील तरुणांना घ्यावी लागणार आहे. जातीचा अभिमान वाटायला लागला की धर्माचा अभिमान वाटायला लागणं ही काही फार दूरवरची गोष्ट नसते. माणसं एकत्रित करण्यासाठी ‘जात’ हा फॅक्टर कामी पडतो. मात्र त्याचं रूपांतर दुरभिमानात झालं की ‘मराठा’ म्हणून वाटणारा अभिमान ‘हिंदू’ असण्याच्या अभिमानात परावर्तित व्हायला वेळ लागणार नाही. कुठल्याही अस्मितेने भारलेले तरुण हे धर्माच्या ठेकेदारांसाठी सॉफ्ट टार्गेट असतात. महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी संस्था-संघटना मराठा मोर्चांंबाबत अजिबात रिअँक्ट होत नाहीय. सहभागीही होत नाही. मात्र जिथे त्यांना शक्य आहे तिथे ते सक्रिय मदत करताहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन जातीची अस्मिता कुठपर्यंंत ताणायची याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. आता मोर्चांंचे प्रत्यक्ष परिणाम दिसायला हवेत. सरकारसोबत चर्चाच करायची नाही म्हणणारे मोर्चांंमुळे निर्माण झालेला परिणाम मातीत मिसळवायला निघालेले आहे. सरकार प्रचंड दबावात आहे. याचा फायदा घेऊन आरक्षण, शेतीचे काही प्रश्न, शिक्षणातील सवलती आणखीही जे जे शक्य शक्य आहे ते पदरात पाडून घेतलं पाहिजे. त्यासाठी उत्तम होमवर्क करून, अभ्यासकांसोबत चर्चा करून वाटाघाटीचे मुद्दे ठरविले पाहिजे. मराठा समाज मैदानातील लढाई जिंकला आहे. आता चर्चेतून भरीव काही मिळविलं पाहिजे. नाहीतर हे ऐतिहासिक मोर्चे केवळ इतिहासाचा भाग बनून राहतील.

(लेखक हे ‘पुण्य नगरी’च्या अमरावती-अकोला आवृत्तीचे संपादक आहेत.)

Previous articleसावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीही पुसला जाणार नाही…
Next articleलाजिरवाणे, संतापजनक!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.