अज्ञात विवेकानंद

इतिहासातील काही व्यक्तिमत्त्वं अशी आहेत, ज्यांच्याबद्दल भारतीयांना अपार कुतूहल, श्रद्धा आणि आदरभाव आहे. स्वामी विवेकानंदांचं नाव यामध्ये अग्रणी आहे. अध्यात्माचा झेंडा जगभर रोवणारे आणि शिकागोत ‘बंधू आणि भगिनींनो..’ अशा संबोधनाने भाषणाला सुरुवात करून अमेरिकेला जिंकून घेणारे, एवढीच माहिती आपल्याला विवेकानंदांबद्दल असते. उणेपुरे 39 वर्ष, 5 महिने, 24 दिवसांचं आयुष्य जगलेल्या विवेकानंदांच्या आयुष्यातील असंख्य पैलू अद्यापही अज्ञातच आहेत. ख्यातनाम बंगाली लेखक शंकर यांनी मात्र ‘अचेना अजाना विवेकानंद’ (अनोळखी अपरिचित विवेकानंद) या पुस्तकाच्या माध्यमातून एक वेगळे विवेकानंद जगासमोर आणले आहेत. केवळ सात वर्षात या पुस्तकाच्या दीड लाखापेक्षा जास्त प्रती खपल्या आहेत. मराठीसह अनेक भाषांमध्ये पुस्तकाचा अनुवाद झाला आहे. विवेकानंदांचे भाऊ महेंद्रनाथ व भूपेंद्रनाथांनी लिहिलेल्या आठवणी, स्वामीजींच्या मानसकन्या भगिनी निवेदितांचे पुस्तक, स्वामीजींच्या सहकार्‍यांसह अनेकांनी लिहिलेली पुस्तकं, देशविदेशातील त्यांचा पत्रव्यवहार या सार्‍यांचा अभ्यास करून शंकर यांनी विवेकानंदांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक अज्ञात पैलू जगासमोर आणले आहेत. या पुस्तकाचं विशेष वैशिष्टय़ म्हणजे विवेकानंदांचं असामान्यत्व तर त्यातून जाणवतंच, पण त्यापेक्षा अधिक त्यांचं माणूसपण पानापानातून डोकावतं. संन्यास घेऊनही लौकिक जगावर माया करणारा, आई, भावंडे आणि सहकारी मित्रांमध्ये मन गुंतून बसलेला, त्यांच्याशी थट्टामस्करी करणारा, बहिणीच्या आत्महत्येमुळे डोळय़ात पाणी येणारा, नोकरीसाठी कोलकात्याच्या रस्त्यावर वणवण फिरणारा, घरातील मालमत्तेच्या वादावरून व्यथित झालेला, खाण्याची आणि खिलविण्याची आवड जोपासणारा, स्वयंपाकघरात अनेक यशस्वी-अयशस्वी प्रयोग करणारा, शेकडो आजारांशी निकराने झुंजणारा.. असे स्वामीजींचे चकित करणारे असंख्य रूपं या पुस्तकातून आपल्यासमोर येतात.………………………………………….……………………………………………………………………………………
विवेकानंदांच्या चेहर्‍यावरून ते अगदी शांत, संयमित असतील, असं वाटतं. मात्र त्यांच्या बालपणी ते अतिशय खोडकर होते. त्यांची आई भुवनेश्वरी सांगायच्या – ‘लहान असताना हा इतका व्रात्य होता की, याला सांभाळताना एक नाही, तर दोन आया हैराण व्हायच्या.’ विवेकानंदांची आई त्यांना प्रेमाने ‘बिलू’ म्हणायची. या बिलूचा पुढे ‘बीरेश्वर’ व नंतर ‘नरेन’ झाला. त्यांचे बीरेश्वर हे नाव बरेच वर्ष प्रचलित होते. त्यांचे आणखी एक लाडाचे नाव होते ‘ठेंगू साला.’ त्यांच्या एका आजोबाने विवेकानंदांच्या कमी उंचीमुळे त्यांना हे नाव दिले होते. त्यांच्या कुटुंबातील सारेजण पावणेसहा, सहा फूट उंच होते. विवेकानंदांना एकूण नऊ भावंडं होते. भुवनेश्वरींचे पहिले अपत्य मुलगा होता. त्यानंतर एक मुलगी झाली. मात्र जन्मानंतर काही महिन्यातच या दोघांचाही अकाली मृत्यू झाल्याने या दोघांचेही नाव वा इतर काही माहिती मिळत नाही. तिसरे अपत्य हारामणी ही मुलगी. ही 22 वर्षे जगली. त्यानंतरची स्वर्णमयी. ही दीर्घकाळ जगली. पाचवे अपत्यही मुलगीच. पण तीसुद्धा जगली नाही. विवेकानंद हे सहावे. सातवी किरणबाला, आठवी योगिंद्रबाला. नववे महेंद्रनाथ व दहावे भूपेंद्रनाथ. विवेकानंदांचे हे दोन्ही भाऊ दीर्घायुषी होते. त्यांनीच विवेकानंदांच्या अनेक आठवणी लिखित स्वरूपात नमूद करून ठेवल्या आहेत. मालमत्तेचे वाद सुरू होण्याअगोदर विवेकानंदांच्या घरची आर्थिक स्थिती भक्कम होती. त्यांना व त्यांच्या बहिणींना प्राथमिक शिक्षण मिशनरी शिक्षण संस्थेत मिळाले. त्यांच्या बहिणींना तर इंग्लिश शिक्षिका घरी शिकवायला यायच्या. आई भुवनेश्वरींनाही इंग्रजी चांगलं येत असे. त्या भगिनी निवेदितांसोबत इंग्रजीत चर्चा करत. विवेकानंदांनी पदवी कलाशाखेत घेतली. बहुतांश मोठय़ा माणसांसारखाच त्यांचाही हुशार विद्यार्थी म्हणून लौकिक नव्हताच. ज्या इंग्रजीवरील प्रभुत्वामुळे त्यांनी अमेरिका, युरोपला जिंकले, त्या इंग्रजीमध्ये त्यांना प्रवेश परीक्षेत सत्तेचाळीस, प्रथम वर्षाला शेहेचाळीस आणि पदवी परीक्षेत छपन्न गुण मिळाले होते. इतिहास, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र या सार्‍या विषयात त्यांना सरासरी पन्नास, पंचावन्न गुण होते. विद्यालयाच्या परीक्षेतील गुणांचा आयुष्यातील परीक्षेसोबत काहीच संबंध नसतो, हे विवेकानंदांचे गुण पाहिले की पुन्हा पटते.
…………………..…………………….……………………………………………………………………………………
विवेकानंदांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाचे अतिशय वाईट दिवस सुरू झाले. त्यांचे वडील विश्वनाथबाबूंच्या नावावर त्यांच्या एका मित्राने भरमसाठ कर्ज काढून ठेवले होते. दुसरीकडे विवेकानंदांच्या कुटुंबातही मालमत्तेची भांडणं इतकी विकोपाला गेली की, विवेकानंदांच्या आईंना मुलांना घेऊन घर सोडावं लागलं. एका दिवसात ते रस्त्यावर आले. अक्षरश: खायचे वांदे व्हायला लागले. तेव्हाचे अनुभव विवेकानंदांनी लिहून ठेवले आहेत – ‘बाबांचे सुतक फिटण्याआधीच नोकरीच्या शोधासाठी वणवण सुरू झाली. अनवाणी, उपाशीपोटी, फाटक्या कपडय़ात नोकरीसाठी अर्ज घेऊन मी दुपारच्या रणरणत्या उन्हात भटकत होतो. ऑफिसमागून ऑफिस पालथे घालत होतो. पण सगळीकडून नकार मिळत होता. माझी बाहेरच्या जगाशी झालेली ही पहिलीच ओळख अशी जिव्हारी लागली. खरीखुरी माणुसकी इथं मिळणं कठीण. दीनदुबळय़ांना इथं जागा नाही.’ एका अन्य ठिकाणी त्यांनी त्यावेळी घराची अवस्था कशी होती हे लिहून ठेवलंय -‘पहाटेच उठून घरात काय आहे-नाही, याचा अंदाज मी घेत असे. सगळ्यांना पुरेसं जेवण मिळू शकणार नाही, हे लक्षात येताच, मला एकेठिकाणी जेवायला बोलावलंय, असं आईला सांगून घराबाहेर पडत असे. मग कधी काही खात असे, तर कधी उपवास घडायचा. स्वाभिमानापायी घरात किंवा बाहेर, कोणाजवळ काही बोलत नसे.’ त्या काळात त्यांच्या काही मित्रांनी त्यांना वाईट मार्गाला लावण्याचाही प्रयत्न केला. एकेदिवशी दोन मित्रांनी त्यांना एका हॉटेलमध्ये नेले. तेथे त्यांनी दारू पिण्याचा सल्ला दिला. त्यानंतर गाणं-बजावणं झालं. काही वेळानंतर मित्रांनी त्यांना एका बाजूच्या खोलीत आराम करण्यास सांगितलं. तिथं ते एकटे पहुडले असता एक तरुण स्त्री खोलीत शिरली. ..हळूहळू तिनं आपलं खरं रूप दाखविलं आणि आपला हेतूही सांगितला. तेव्हा विवेकानंद ताबडतोब तेथून बाहेर पडले. घरी आल्यावर मात्र त्यांनी आईला गमतीने ‘आपण आज बाई व बाटलीची मजा चाखली’, हे सांगितलं. त्या काळात परिसरातील काही श्रीमंत देखण्या स्त्रियांचाही विवेकानंदांवर डोळा होता. विवेकानंदांनी त्यांचा स्वीकार केल्यास स्वत:ची संपूर्ण संपत्ती त्यांच्या नावावर करण्याचे आमिष त्यांनी दाखविले होते.घरची परिस्थिती अतिशय खराब असतानाही विवेकानंद या आमिषाला बळी पडले नाही.

.…………………..…………………….……………………………………………………………………………………

काही काळानंतर विवेकानंदांना एका शाळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. तिथे तीन महिने शिकविल्यानंतर चांपातला येथील एका अन्य शाळेत त्यांना मुख्याध्यापक म्हणून संधी मिळाली. त्या शाळेच्या सचिवांना मात्र विवेकानंद पसंत पडले नाहीत. त्यांनी विद्यार्थ्यांना या मुख्याध्यापकाला शिकविता येत नाही, अशी तक्रार करायला लावली. त्या तक्रारीचा आधार घेऊन त्यांनी विवेकानंदांना नोकरीवरून काढून टाकले. त्यानंतर गयेजवळ एका जमीनदाराकडे त्यांना एक नोकरी मिळाली. पण ते गेले नाहीत. दरम्यानच्या काळात ते रामकृष्ण परमहंसांच्या संपर्कात आले होते. त्यांचं सानिध्य आणि शिकवणीने ते एवढे भारून गेलेत की, वयाच्या 24 व्या वर्षी त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. तो विवेकानंदांचा नवीन जन्म होता. विवेकानंदांनी संन्यास घेतला खरा, पण आपली आई आणि भावंडं अपार दारिद्रय़ाशी झगडत असताना आपण संन्यास स्वीकारला याची बोच त्यांच्या संवेदनशील मनाला शेवटपर्यंत होती. त्यामुळे संन्यासीवस्थेतही आपल्या आईला नियमित आर्थिक मदत मिळावी, यासाठी ते धडपडत होते. कुटुंबातील मालमत्तेबाबत न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातही ते लक्ष घालत होते. व्याख्यानं, पुस्तक लेखनाचं मानधन व शिष्य आदरपूर्वक देत असलेली सारी रक्कम ते आईकडे पाठवीत असे. स्वामीजींच्या आध्यात्मिक ज्ञानाने प्रभावित झालेले राजस्थानातील खेतडी संस्थानचे महाराज अजितसिंहांना त्यांनी आपली आई हयात असेपर्यंत तिला दरमहा शंभर रुपयांची मदत करा, अशी विनंती केली होती. आपल्या परदेशातील भक्तांनाही ते आईला मदत पाठवायला सांगत असे. स्वत:चे श्रद्ध करून संन्याशी झाल्यानंतरही आईबद्दलचं प्रेम त्यांनी शेवटपर्यंत सोडलं नाही. ‘जो आईची पूजा करत नाही, तो कधीच मोठा होत नाही’, असे ते सांगायचे.
…………………..…………………….……………………………………………………………………………………

युरोप, अमेरिकेतील स्वामी विवेकानंदांचं आयुष्य अगदी वेगळं होतं. तेथे त्यांनी सुख आणि कष्ट या दोन्ही गोष्टींचा मोठय़ा प्रमाणात अनुभव घेतला. तिथे त्यांना कधी रस्त्यावर रात्र काढावी लागली, तर कधी भक्तांनी त्यांना पंचतारांकित हॉटलेमध्ये ठेवले. तेथील वास्तव्याबाबत त्यांनी आपल्या एका भक्ताला पत्रात लिहिलं होतं-‘कलाकौशल्य आणि भोगविलास यामध्ये जशी ही माणसं बिनतोड आहेत, तशीच पैसा कमावण्यात आणि खर्च करण्यातही बेजोड.’ अमेरिकेत त्यांनी अध्यात्माचा जसा प्रसार केला, तसाच भारतीय खाद्यपदार्थाचाही केला. ‘अमेरिकेत वेदान्त आणि बिर्याणी यांचा एकाचवेळी प्रचार करण्याचं धाडसी काम त्यांनी केलं,’ असे एका लेखकाने नमूद करून ठेवलंय. मांसाहाराचं वावडं त्यांना कधीच नव्हतं. त्यांच्या कुटुंबात मासे आणि मटण पूर्वीपासून आवडीने खाल्लं जायचं. एकदा एका हॉटेलमध्ये मांसाहार करून आल्यानंतर त्यांनी रामकृष्ण परमहंसांना त्याबद्दल माहिती दिली होती. त्यावर त्यांनी कुठलीही नापसंती दर्शविली नव्हती. परमेश्वरप्राप्ती वा अध्यात्माच्या मार्गात मांसाहारामुळे काही अडचण निर्माण होते असे हे दोघेही गुरुशिष्य मानत नसे. स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत असताना आपला खाण्याचा आणि खिलविण्याचा शौक मनापासून पूर्ण केला. अनेकदा स्वत:च स्वयंपाकघरात घुसून ते वेगवेगळ्या डिशेस तयार करत असे. त्यांचं त्या विषयातील कौशल्य पाहून सारेच अचंबित होत. अंडे आणि माशांचे अनेक रुचकर पदार्थ ते तयार करत. एका लेखकाने लिहून ठेवलं आहे की, ‘धर्माबद्दल काही न बोलता केवळ रसनेच्या रहस्यभेदात त्यांनी लक्ष घातले असते, तरी ते अमर झाले असते.’ अमेरिकेत असताना ते आईस्क्रिम आणि सिगारेटच्याही प्रेमात पडले होते. जेवल्यानंतर त्यांना गोड खायला आवडायचं. एकेप्रसंगी ते निवेदिताला म्हणाले होते- ‘माझ्यासारख्या माणसाचं सगळंच टोकाचं. मी भरपूर खाऊ शकतो. तसाच अजिबात काही न खाताही राहू शकतो. सतत धूम्रपान करतो आणि त्याशिवायही राहू शकतो. इंद्रियदमन करू शकतो. पण संवेदनांचं आकलन करणंही मला जमतं.’ अमेरिकेतील त्यांच्या वास्तव्याचे, त्यांच्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक स्थितीचे बारीकसारीक तपशील तेथील त्यांच्या शिष्यांनी लिहून ठेवले आहेत. ते सारं मुळातूनच वाचण्याजोगं आहे.

(संदर्भ- अज्ञात विवेकानंद, लेखक-शंकर , अनुवाद- मृणालिनी गडकरी, राजहंस प्रकाशन, पुणे)

(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे वृत्तसंपादक आहेत.)

भ्रमणध्वनी-8888744796

Previous articleखोडकेंची खरी परीक्षा 2014 मध्येच!
Next articleकुंभमेळ्याच्या रोचक कथा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.