काँग्रेसची स्थिती यापेक्षा वाईट होणार?

इतिहास आणि वर्तमानातील घडामोडींचं नेमकं आकलन असणारे जे मोजके sonia and rahul gandhiलेखक देशात आहेत त्यामध्ये रामचंद्र गुहा यांचं नाव अव्वल आहे़. कुठलाही पूर्वग्रह न बाळगता व्यक्ती आणि घटनांचं नीरक्षीर विवेकाने, संदर्भ आणि पुराव्यांची जोड देऊन ते विश्लेषण करतात़. देशभरातील आघाडीच्या वर्तमानपत्रात ते नियमित स्तंभलेखन करतात़. आपल्या ताज्या स्तंभात त्यांनी ‘काँग्रेस पक्ष नेहरु -गांधींना विसरून का जाऊ शकत नाही?’ या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात काँग्रेस नेहरु-गांधी घराण्यावर एवढा दयनीयपणे का अवलंबून आहे? असा प्रश्न विचारतानाच अलीकडच्या दोन दशकातील काँग्रसच्या अवनतीचं नेमकेपणाने विश्लेषण केलं आहे़. गांधी-नेहरू कुटुंबाचा करिश्मा ओसरतो आहे, हे स्पष्टपणे नमूद करतानाच ‘मतदार जसजसा अधिक युवा होतो आहे, तसतसे जवाहरलाल नेहरू वा इंदिरा गांधी यांनी काय केले, हे आता कुणाला आठवत नाही़. तरुण पिढीला आता वंशावळ-वारसा अशा गोष्टींचे अप्रूप उरले नाही,’ हे गुहा यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे़. ‘इंदिरा गांधींनी १९७५ नंतर काँग्रेस पक्षाचे रुपांतर एका कुटुंबाच्या दुकानात केले’, हे अतिशय रोखठोकपणे नमूद करतानाच तेव्हापासून काँग्रसमध्ये मानसिक परावलंबनाची संस्कृती निर्माण झाली़. त्यामुळे या घराण्याशिवाय हा पक्ष जिवंत राहू शकत नाही, एकसंघ राहू शकत नाही, अशी जी भावना काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली, त्याचा सविस्तर वेध गुहा यांनी आपल्या लेखात घेतला आहे . एकेकाळी देशातील लहानमोठ्या प्रत्येक जनसमूहाचे आणि त्यांच्या आकांक्षांचे प्रतिनिधीत्व करणा-या काँग्रेसच्या चाहत्यांनी व त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही हा लेख अवश्य वाचायला हवा़.
खरंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जागांचा निच्चांक (केवळ ४४) गाठल्यापासून काँग्रेसच्या भवितव्याची चर्चा सुरु झाली आहे . विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी आवश्यक तेवढ्या जागाही काँग्रेस या निवडणुकीत मिळवू शकली नाही़. आणिबाणीनंतर झालेल्या निवडणुकीतही काँग्रेसची एवढी दयनीय अवस्था झाली नव्हती़. आकड्यांवर जर नजर टाकली तर १९८९ च्या निवडणुकीपासूनच काँग्रेसच्या घसरगुंडीला सुरुवात झाली आहे, हे लक्षात येतं. १९९१ च्या निवडणुकीदरम्यान राजीव गांधींची हत्या झाली होती़ तरीही तेव्हा स्पष्ट बहुमत मिळविण्यात काँग्रेसला अपयश आलं होते़. त्या निवडणुकीत मिळालेल्या २४४ जागा या गेल्या २५ वर्षातील काँग्रेसच्या लोकसभेतील सर्वाधिक जागा आहेत . तेव्हापासून तीनदा काँग्रेस सत्ता मिळविण्यात यशस्वी ठरली. पण प्रत्येकवेळी मित्रपक्षांची मदत त्यांना घ्यावी लागली़. २००९ च्या निवडणुकीचा अपवाद वगळला तर १९९६ पासून काँग्रेसला दीडशे जागाही मिळवत्या आल्या नाहीत़. राज्यांच्या पातळीवर विचार केला तर देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तरप्रदेशात गेल्या ३० वर्षापासून काँग्रेसला सत्ता मिळविता आली नाही़. सत्ता जाऊ द्या, काँग्रेस तिथे दुसरया -तिसऱ्या क्रमांकावरही नाही़. लगतच्याच बिहारमध्येही १९९० पासूनच काँग्रेस कुठेच नाही़. तिथेही तिसरा-चौथा क्रमांकच असतो़. पश्चिम बंगालमध्ये १९७७ पासून काँग्रेसचं नामोनिशान नाही़. आधी कम्युनिस्ट पक्ष आणि आता ममता बॅनर्जी त्यांना डोकं वर काढू देत नाही़. दक्षिणेत तामिळनाडूत १९६९ पासूनच काँग्रेसला भुईसपाट करुन टाकण्यात आलं आहे . तिथे आलटून पालटून कधी अण्णा द्रमुक (जयललिता) तर कधी द्रमुक (करुणानिधी) असा खेळ सुरु असतो़. गुजरातमध्ये १९९५ पासून केवळ भाजपा आहे . ओडिसात २००० पासून बिजू जनता दलाच्या नवीन पटनायकांचंच राज्य आहे़. मध्यप्रदेश व छत्तीसगडमध्ये २००३ पासून काँग्रेस विरोधी बाकावरच आहे़. नाही म्हणायला राजस्थान, आंधप्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, हिमाचल प्रदेश, केरळमध्ये काँग्रसला अधूनमधून सत्ता मिळाली आहे़ मिळते आहे .
मात्र एकंदरीत गेल्या २५ वर्षातील काँग्रेसचा आलेख हा घसरताच आहे . ती घसरण आणखी आणखी तीव्र होते आहे . ज्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष प्रबळ आहेत तिथे तर काँग्रेसची अवस्था अतिशय चिंताजनक आहे . उत्तरप्रदेश, बिहार, तामिळनाडू, बंगाल या राज्यांमध्ये पुन्हा सत्तेत यायचं स्वप्नही ते पाहू शकत नाही, अशी स्थिती आहे . मध्यप्रदेश, छत्तीसगड, राज्यस्थान, केरळ, अशा दोनच पक्ष प्रबळ असलेल्या राज्यांमध्येच कॉग्रेसला सत्तेत परत येण्याची संधी आहे . महाराष्ट्र अनेकवर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे . पण येथेही स्वत:च्या ताकदीवर काँग्रेस भविष्यात कधी सत्तेवर येईल, अशी परिस्थिती नाही़. काँग्रेसने ही स्थिती स्वत:च्या कर्माने ओढवून घेतली आहे़. रामचंद्र गुहा यांनी म्हटल्याप्रमाणे गांधी-नेहरु घराण्यावर असलेलं मानसिक परावलंबन आणि टोकाचं व्यक्तिस्तोम यामुळे काँग्रेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होऊन गेली़. खरं तर १९९१ ते ९६ या काळात काँग्रेसला या स्थितीतून बाहेर पडण्याची उत्तम संधी लाभली होती़. पी़ व्ही़ नरसिंहरावांसारखा अतिशय जाणकार, हुशार पंतप्रधान नेता म्हणून काँग्रेसला लाभला होता़. पण इंदिरा गांधींच्या काळापासून लाचारी रक्तात भरलेल्या काँग्रेसींनी ती संधी वाया घालविली़. त्यांनी सोनिया गांधींची आरती गाऊन त्यांच्याच हाती सारी सुत्रे जातील अशी व्यवस्था केली़. काँग्रेसजवळ सक्षम नेत्यांची कधीच कमी नव्हती़. त्या काळातही शरद पवार, प्रणव मुखर्जी, अर्जुन सिंह, माधवराव शिंदे, राजेश पायलट, विलासराव देशमुख, करुणानिधी, गुलाम नबी आझाद असे अनेक नेते होते़. पण काँग्रेसमध्ये गांधी घराण्याशी निष्ठा हाच नेत्याची सक्षमता मोजण्याचा एकमेव निकष असल्याने अनेक कर्तबगार नेते सडवले गेलेत़. नरसिंहराव पंतप्रधान असताना सोनिया गांधींकडून त्यांना कशी वागणूक मिळत होती, याची माहिती अलीकडेच बाहेर आली आहे़. देशाच्या अर्थव्यवस्थेला निर्णायक वळण देणा-या या कर्तबगार नेत्याची पक्षात आठवणही उरु नये याची सोनियांच्या कॅम्पमधून प्रकर्षाने काळजी घेण्यात आली़. महाराष्ट्राचे दोन मातब्बर नेते यशवंतराव चव्हाण व शरद पवार यांच्याबाबतही गांधी घराणं असंच वागलं. जेव्हा अनिर्बंध सत्ता व जनतेचा पाठिंबा होता तेव्हा हे चालून गेलं. मात्र गांधी-नेहरु घराण्याच्या करिष्मा आता जवळपास ओसरला आहे़. आता मतदार असलेली नवीन पिढी इतिहासाचं ओझं बाळगून जगत नाही़. काँग्रेसने हे लक्षात घेऊन आपल्या कार्यशैलीत बदल केला नाही, तर भविष्यात यापेक्षा वाईट दिवस पाहावे लागले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही़. मात्र लोकसभेतील दारुण पराभवानंतर काँग्रेसने काही धडा घेतला हे किमान गेल्या दीड वर्षात तरी दिसून आले नाही़. ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते ज्या पद्धतीने वागलेत आणि आताही राहुल गांधींना काँग्रेसचे अध्यक्ष बनविण्याची तयारी पाहता इतिहासातून काहीही शिकण्याची काँग्रेसची तयारी नाही, असेच दिसते़.
(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत)
8888744796

Previous articleकाश्मिरची डोकेदुखी आणखी वाढणार
Next articleभाजपा स्वतंत्र विदर्भ देणार?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here