क्रिकेटपटूंच्या बायकांमुळे भारताचा पराभव झाला?

भारतीय माणसांचं बुद्धी आणि तर्क यांच्यासोबत काय वाकडं आहे कळत नाही. आयुष्यातील यश-अपयश, घटना-दुर्घटना वा इतर कुठलाही प्रसंग असो,…त्याची नेमकी कारणमीमांसा करण्याऐवजी वेगळंच काहीतरी शोधून काढलं जातं. आता हेच पाहा… भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौर्‍यावर आहे. या दौर्‍यात दुसरा कसोटी क्रिकेट सामना जिंकल्यानंतर सलग तीन सामने आपण हरलोत. क्रिकेट सामन्यातला पराभव म्हणजे देशाचा पराभव असे मानण्याची प्रथा आपल्याकडे असल्याने या पराभवासाठी बळीचा बकरा शोधणंही क्रमप्राप्त होतं. त्यानुसार क्रिकेटपटूंच्या बायका आणि विराट कोहलीची गर्लफ्रेंड सिनेअभिनेत्री अनुष्का शर्मामुळे हा पराभव झाल्याचा जावईशोध संघ व्यवस्थापनाने लावला आहे.


 बायकांमुळे क्रिकेटर खेळ आणि सरावाकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकले नाहीत, त्यांचा वेळ शॉपिंग आणि बायकांसोबत रमण्यातच जात होता, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे आगामी दौर्‍यात क्रिकेटपटूंना बायकांना सोबत नेऊ द्यायचं की नाही, यावर म्हणे, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड विचार करणार आहे. हे वाचून गंमत वाटली. काही वर्षांपूर्वी मोहिंदर अमरनाथने भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या पदाधिकार्‍यांना इ४ल्लूँ ा ख’ी१२ म्हटलं होतं, त्याची यानिमित्ताने आठवण झाली. भारतीय क्रिकेटपटू काही पहिल्यांदा बायकांना घेऊन दौर्‍यावर गेले नाहीत. अलीकडच्या काही वर्षांत जवळपास प्रत्येक दौर्‍यात क्रिकेटपटूंच्या बायका सोबत असतात. दौर्‍यानिमित्त अनेक महिने घराबाहेर राहावे लागत असल्याने त्यात काही गैरही नाही. बायका सोबत असताना यापूर्वी अनेकदा आपला संघ जिंकलाय आणि हरलाही आहे. मात्र बायकांवर जाहीरपणे दूषण लावण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पराभवासाठी क्रिकेटपटूंच्या बायकांना जबाबदार धरण्याची ही मानसिकता टीपिकल भारतीय आहे. पूर्वीचे सनातनी जसे काहीही वाईट झालं तर स्त्रियांना जबाबदार धरत, तसाच हा प्रकार आहे. सध्या जगातील सर्वच देशांचे क्रिकेटर, फुटबॉलपटू, टेनिसपटू आणि इतरही खेळांचे खेळाडू दौर्‍यावर जाताना आपल्या बायका वा प्रेयसीला घेऊन जातात. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज या संघांचे क्रिकेटपटू भारतात येतात तेव्हा अध्र्यापेक्षा जास्त खेळाडू आपल्या गर्लफ्रेंड्सना घेऊन घेतात. त्यांच्याकडे त्यात काही वावगं मानलं जात नाही. आपला विराट कोहली यावेळी पहिल्यांदाच उघडपणे अनुष्का शर्माला घेऊन गेला, तर आपल्यासाठी ती मोठी बातमी होती. अनुष्काचं जाणं आणि विराटचं अपयशी होणं, हा योगायोग होता. अनेक वर्षांनतर त्याला बॅडपॅच आला आहे. मात्र त्याच्या अपयशाचा संबंध अनुष्कासोबत असण्याशी लावण्यात आला. गेल्यावर्षी भारतीय संघ न्यूझीलंड दौर्‍यावर असताना अनुष्का तेथे गेली होती. तेव्हा विराटने दोन शतकं झळकावली होती. तेव्हा त्याचं श्रेय कोणी अनुष्काला दिलं नव्हतं. आता मात्र विराटच्या अपयशाला तीच कारणीभूत आहे, असं चित्र रंगविलं जातं आहे.आपल्याकडे स्त्री-पुरुष संबंधांबाबत ज्या पद्धतीने विचार केला जातो, तिथे हे असेच मूर्खपणाचे निष्कर्ष निघणार, यात काही नवल नाही.

अर्थात असा मूर्खपणा केवळ आपल्याकडेच होतो, असेही नाही. नुकत्याच झालेल्या फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान रशिया, बोस्निया-हज्रेगोव्हिना, चिली आणि मेक्सिकोच्या संघ व्यवस्थापनाने स्पर्धेदरम्यान आपल्या खेळाडूंना बायको वा गर्लफ्रेंडला सोबत नेण्यास आणि शारीरिक संबंध ठेवण्यास पूर्णत: बंदी घातली होती. बोस्निया-हज्रेगोव्हिना संघाचे प्रशिक्षक सॅफट सुसिक यांनी फतवाच काढला होता. आमच्या खेळाडूंना ब्राझीलमध्ये कामक्रीडा करण्यास सक्त मनाई आहे. त्यांना फार तर हस्तमैथुन करता येईल. ब्राझीलला आम्ही पर्यटनासाठी आलो नाही, तर विश्‍वचषक खेळायला आलो आहोत, असे त्यांचे म्हणणे होते. मेक्सिको संघाचे प्रशिक्षक गिग्वेल हेरेरा यांनीही त्यांचाच कित्ता गिरविला होता. एखादा खेळाडू एक महिना शरीरसंबंधाशिवाय जगू शकत नसेल, तर तो व्यावसायिक खेळाडू म्हणण्याच्या मुळीच लायकीचा नाही, असे ते म्हणाले होते. रशिया, चिलीच्या संघ व्यवस्थापनाचीही थोड्याफार फरकाने अशीच भूमिका होती. अर्थात एवढे कठोर निर्बंध घालूनही हे चारही संघ प्राथमिक फेरीतच गारद झाले होते, हा भाग वेगळा. दुसरीकडे विश्‍वविजेता र्जमनी, उपविजेता अज्रेन्टिना, माजी विजेता स्पेन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, उरुग्वे आणि इंग्लंड या संघांनी खेळाडूंना बायको वा गर्लफ्रेंडसोबत राहण्याची मुक्त परवानगी दिली होती. नायजेरियाच्या प्रशिक्षकांनी ‘सेक्सचा आनंद फक्त बायकोसोबत घ्या, मैत्रिणीसोबत नाही’, असा सल्ला दिला होता. यजमान ब्राझीलचे प्रशिक्षक लुईस स्कोलारी यांनीही सेक्सला अटकाव केला नव्हता, पण बेडवर जास्त कसरती करू नका, असा सल्ला त्यांनी दिला होता.

विश्‍वचषकादरम्यान प्रशिक्षकांचे हे नमुनेदार सल्ले चांगलेच गाजले होते. शारीरिक संबंधाच्या विषयातील अज्ञानामुळे हे असे प्रकार होतात. ‘ब्रह्मचर्य हेच जीवन आणि वीर्यनाश हा मृत्यू..’, असे सांगणार्‍या आपल्या देशात, तर आपल्याला हे जरा लवकरच पटतं. खरं तर बायको, प्रेयसी वा गर्लफ्रेंड सोबत असल्याने वा त्यांच्यासोबत शारीरिक संबंधाने खेळाडूंच्या मैदानातील कामगिरीवर प्रतिकूल परिणाम होतो, हे म्हणण्याला काहीही शास्त्रीय आधार नाही. या विषयात वेस्ट इंडीजचे महान क्रिकेटपटू सर फ्रँक वॉरेल, गॅरी सोबर्स (अभिनेत्री अंजू महेंद्रसोबत याचा साखरपुडा झाला होता), विवियन रिचर्ड्स (अभिनेत्री नीना गुप्ताच्या मुलीचा हा बाप आहे.) यांचे किस्से जुने क्रीडा पत्रकार कौतुकाने सांगतात. दिवसाचा खेळ संपला की रात्री उशिरापर्यंत मद्य आणि त्यानंतर पहाटेपर्यंत कुठल्यातरी मदनिकेच्या मिठीत हे महान खेळाडू राहायचे. पहाटे हॉटेलवर परतल्यानंतर केवळ दोन-तीन तासांची झोप घेऊन मैदानावरही ते जोरदार परफॉर्मन्स द्यायचे. फ्रँक वॉरेलचा एक किस्सा आहे. एका कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजची दुसर्‍या दिवसाअखेर वाईट परिस्थिती होती. तरी हे महाशय त्या रात्री मद्य आणि मदनिकेत रंगून सकाळी सात वाजता हॉटेलवर परतले. त्याचा व्यवस्थापक जाम भडकला. वॉरेल त्याला शांतपणे म्हणाला, मी रात्री काय करतो, याच्याशी तुला काही देणं-घेणं नाही. मी मैदानावर व्यवस्थित खेळलो नाही, तर तू बोलायचं.’ त्या सकाळी लडखडत्या अवस्थेत हॉटेलमध्ये आलेल्या वॉरेलने दोन तास झोप घेतली. त्यानंतर खेळ सुरू झाल्यानंतर काहीच न झाल्याच्या आविर्भावात तो खेळपट्टीवर गेला. शानदार द्विशतक ठोकलं आणि वेस्ट इंडीजला तो सामना जिंकून दिला. संध्याकाळी पुन्हा आनंद साजरा करायला तो मोकळा. अर्थात वेस्ट इंडीजची संस्कृतीच वेगळी आहे. दिवसाचा खेळ संपला की, खेळ विसरायचा आणि रिलॅक्स व्हायचं. मग ज्याला मद्य प्यायचंय त्याने मद्य प्यावं आणि ज्याला रोमान्स करायचाय त्याने रोमान्स करावा. पण पुन्हा सकाळी दहा वाजता रात्र विसरायची आणि फक्त खेळाचा विचार करायचा., हे त्यांची जगण्याची पद्धत आहे.

अर्थात ज्यांना झेपतं त्यांनीच हे करायचं असतं. आपल्याकडचे क्रिकेटर हे असं करायला गेले तर चार-पाच सामन्यानंतर करिअर संपून जायचं. वेस्ट इंडीजच्या खेळाडूंची तुलना केल्यास आपले खेळाडू खूपच सोवळे आहेत. तरीही क्रिकेटरच्या प्रत्येक पिढीत कोणी ना कोणी कलंदर असतोच. आता धोनी आणि चमूला शिस्त लावण्यासाठी क्रिकेट संचालक म्हणून नेमण्यात आलेल्या रवी शास्त्रीने त्याच्या चांगल्या दिवसांत काय रंग उधळलेत, याचा क्रिकेट जगताला अजून विसर पडला नाही. अभिनेत्री अमृता सिंगसोबतचं त्याचं प्रकरण, टेनिसपटू ग्रॅबिएला सॅबाटिनीसोबत जोडलेलं नाव, डिस्को-पबमधल्या त्याच्या नाचण्याला खूप वर्ष उलटली नाहीत. अजय जडेजा, युवराजसिंग, हरभजनसिंग, श्रीशांत हे असे प्ले बॉय प्रत्येक पिढीत होते. अर्थात जोपर्यंत कामगिरी व्यवस्थित असते, तोपर्यंत अशा विषयाचा फार गाजावाजा होत नाही. उलट कौतुकच जास्त होते. मात्र खेळाडू व संघ अपयशी व्हायला लागला की, त्याची सारी कुंडली बाहेर येते. खेळाडूंच्या प्रेयसी, बायकांसोबतच्या संबंधाचा खेळावर खरंच काही परिणाम होतो, याचा क्लिनिकल र्जनल ऑफ स्पोर्ट्स मेडिसीनने अतिशय शास्त्रशुद्ध अभ्यास केला आहे. महत्त्वपूर्ण सामन्याच्या दरम्यान वा अगोदरच्या दिवशी शारीरिक संबंध ठेवणार्‍या हजारो खेळाडूंचा अभ्यास केल्यानंतर अशा प्रकारच्या संबंधामुळे खेळाडूंवर कुठलाही नकारात्मक परिणाम होत नाही, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. वैद्यकीय व मानसोपचार तज्ज्ञही याबाबत सकारात्मक मतच व्यक्त करतात. शारीरिक संबंधामुळे खेळाडू रिलॅक्स होतात. चिंता आणि नैराश्यावर त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने मात करता येते. यामुळे मानसिक आरोग्य सुदृढ राहते आणि कामगिरीत सुधारणाच होते, असे त्यांचे म्हणणे आहे. थोडक्यात सांगायचं झाल्यास बायका व प्रेयसी सोबत असल्याने भारतीय क्रिकेटपटूंची कामगिरी ढेपाळली, असे म्हणण्यात काहीही अर्थ नाही. वन डे व टी-२0 क्रिकेटचा अतिरेक, कसोटी क्रिकेटकडे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष, भारतातील निर्जीव खेळपट्टय़ा, दज्रेदार वेगवान गोलंदाजांना खेळण्याची सवय नसणे अशा अनेक कारणांमुळे भारताने मार खाल्ला आहे. पहिल्यांदाच हे घडतं असं नाही. तीन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया व इंग्लंडने त्यांच्या देशात असाच दारुण पराभव केला होता. त्यापासून काहीही बोध न घेणार्‍या भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डांंचा हा पराभव आहे. त्यामुळे उगाच वडाची साल पिंपळाला लावण्यात काहीही अर्थ नाही.

(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत)

भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६

Previous articleविदर्भवाद्यांना वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही
Next articleआरक्षणाचा खेळ बनतोय काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गळ्याचा फास
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.