‘क्वीन’ कंगनाचा भन्नाट प्रवास

‘तनू वेड्स मनू रिटर्न्‍स’ हा चित्रपट सध्या प्रचंड गाजतोय. १०० कोटींच्या उत्पन्नाचा आकडा चित्रपटाने कधीच ओलांडलाय. एकेका शहरात चार-चार चित्रपटगृहांत झळकूनही ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड उतरायला तयार नाहीत. या चित्रपटातील कंगना राणावतच्या अभिनयाची जबरदस्त चर्चा सगळीकडे सुरू आहे. कंगनाने अगदी एकहाती हा सिनेमा खेचून नेला. नायकांची दुनिया मानल्या जाणार्‍या बॉलीवूडमध्ये सलमान, आमिर, शाहरुख या सुपरस्टार नायकांच्या चित्रपटांच्या बरोबरीने एका नायिकेचा चित्रपट १०० कोटींच्या वर व्यवसाय करतो, ही गोष्ट अनेकांना अचंबित करून गेली आहे. महानायक अमिताभ बच्चनही कंगनाच्या अदाकारीने प्रभावित झाले आहेत.त्यांनी कंगनाला लिहिलेल्या अभिनंदन पत्रात ‘मै अपने आपको भाग्यशाली समजता हू की मै इस उद्योग से जुडा हू, जिस मे कंगना बसती है’ या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कंगनाने या चित्रपटात ‘तनू’ आणि ‘दत्ताे’ या दोन
व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यामुळे तनूला वेगळं आणि दत्ताेला वेगळं kanganaअशी दोन पत्र अमिताभने कंगनाला पाठविली आहेत. तनूला लिहिलेल्या पत्रात अमिताभ म्हणतात, ‘असं फार कमी वेळा घडते की एखाद्याचा अभिनय पाहताना डोळे भरून येतात. तू मला रडविलं.’ दुसर्‍या पत्रात ‘तनूसारख्या दिसणार्‍या तिला जिला दत्ताे म्हटलं गेलं तिला माझ्या शुभेच्छा सांग,’ असे अमिताभने लिहिलंय. या प्रशंसेने कंगना सुखावली नसती तर नवल होतं. ती उत्कृष्ट अभिनय करते यावर अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार दोनदा मिळाल्याने शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र साक्षात अमिताभ बच्चनच्या या पत्रांनी ती भारावून गेली आहे. ‘ही दोन पत्रं नसून दोन पदकं आहेत. हे पत्र माझ्या आयुष्यातील अत्युच्चम पुरस्कार आहे. हे दोन्ही पत्रं मी फ्रेम करून दिवाणखान्यात लावणार आहे,’ असे तिने सांगितले आहे. ‘बच्चन साहेबांच्या पत्रांमुळे आपली पोरगी खरोखर काहीतरी चांगलं करते आहे हे आता माझ्या पालकांनाही कळलं असेल,’ हे सांगायलाही ती विसरली नाही.

कंगनाने हसत-खेळत आपल्या आईवडिलांना हा टोमणा का मारला हे कळण्यासाठी कंगनाची कहाणी समजून घ्यावी लागते. एखाद्या भन्नाट चित्रपटासारखीच तिची कहाणी आहे. वयाच्या केवळ १६ व्या वर्षी आईवडिलांशी भांडण करून घर सोडणारी कंगना…त्यानंतर वेगवेगळी व्यसनं, प्रेमप्रकरण, भानगडी करून आज एका चित्रपटासाठी पाच कोटींची रक्कम घेणारी सुपरस्टार कंगना हा प्रवास अद्भुत असाच आहे. ‘तनू वेडस् मनू’च्या दोन्ही भागात कंगनाची व्यक्तिरेखा ज्या पद्धतीची दाखविण्यात आली आहे अगदी तसंच आयुष्य ती आता-आतापर्यंत जगत आली आहे. कंगना सिनेमातल्याप्रमाणेच रागीट, हट्टी, अहंकारी आणि संवेदनशील आहे. मनात येईल ते करायचं. हे करताना दुनिया गयी भाड मे… हा तिचा दृष्टिकोन. हिमाचल प्रदेशातील मनाली या जगप्रसिद्ध हिलस्टेशनजवळच सूरजपूर हे तिचं गाव. उच्च मध्यमवर्गीय राणावत कुटुंबात तिचा जन्म झाला. आजोबा सरजूसिंग राणावत आयएएस अधिकारी आणि नंतर मंत्री होते. वडील बांधकाम व्यवसायात तर आई शिक्षिका. राणावत कुटुंब हिमाचल प्रदेशातील तालेवार कुटुंब. त्यांच्या प्रतिष्ठेच्या कल्पनाही तशाच. घरी संपन्नता असली तरी कर्मठपणाही तेवढाच. घरात पुरुषप्रधान वातावरण. कंगनाला लहान असतानापासूनच घरातील स्त्री-पुरुष भेद लक्षात आला होता. त्यामुळे तिचा संतापही व्हायचा. अशा वातावरणात कंगनानं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर वडिलांनी आता तू डॉक्टर व्हायचंय अशी ऑर्डर दिली. कंगनाला हे मनापासून रुचल् नाही, पण यानिमित्ताने घरातून बाहेर पडण्याची संधी आहे हे हेरून तिने चंदीगडमध्ये सायन्सला प्रवेश घेतला. तिथे ती होस्टेलमध्ये राहू लागली. लवकरच तिच्या लक्षात आलं की आपल्याला सायन्स अजिबात कळत नाही. यापेक्षा ऑर्ट शाखेचे विषय आणि नाच-गाणे आपल्याला अधिक आवडते. लवकरच चंदीगडात ती मुक्तपणे जगायला लागली. मित्र-मैत्रिणींसोबत पाटर्य़ा, दारू, सिगारेट आणि इतरही बरंच काही… तोंडाने ती आधीपासूनच फाटकी होती. नशा केल्यानंतर तर ती अधिक मोकाट सुटायची. वाटेल तशी शिवीगाळ करायची. वाटेल त्याच्यासोबत निघून जायची. सुसंस्कार, नीतिमूल्यं, चारित्र्य या तिच्यासाठी फालतू गोष्टी होत्या. काही महिने असे बेफामपणे घालविल्यानंतर आपल्याला शिकायचं नाही. मॉडेलिंग-अँक्टिंग करायची, हे तिने ठरवून टाकलं.

ती शांतपणे घरी गेली. वडिलांना आपला निर्णय सांगितला. कुटुंबासाठी हा शॉक होता. वडील प्रचंड चिडले. वादावादी सुरू झाली. शिक्षण सोडते इथपर्यंत ठीक होतं, पण राणावत घराण्यातील पोरगी अंग उघडं टाकणारा मॉडेलिंग-अँक्टिंगचा व्यवसाय करू इच्छिते हे राणावतांसाठी धक्कादायक होतं. त्यांनी चिडून जाऊन तिच्यावर हात उगारला. १६ वर्षांच्या कंगनाने तो हात पकडला. ‘माझ्यावर हात उगारला तर मीसुद्धा तेच करेल,’ अशी धमकी तिने वडिलांना दिली. त्यानंतर कुठलाही विचार न करता तडकाफडकी तिने घर सोडलं. मैत्रिणींकडून उसने पैसे घेऊन पुन्हा एकदा ती चंदीगडला आली. तिथे जसप्रित नावाच्या मैत्रिणीसोबत तिच्या रूमवर ती राहायला लागली. तिथे मॉडेलिंगचे काम मिळविण्याचा प्रयत्न करायला लागली. हडकुळा चेहरा, मॉडेलिंगसाठी आवश्यक ती शरीरयष्टी नाही, अँक्टिंग कशासोबत खातात हे माहीत नाही. असे असताना प्रचंड बेफिकिरी आणि बिनधास्त अँटिट्यूडच्या जोरावर ती अँड एजन्सीजच्या चकरा मारत होती. ती कोणत्याच अँगलने मॉडेल वाटत नसल्याने तिला काम काही मिळत नव्हते. शेवटी काहीजणांनी तिला दिल्लीत जाण्याचा सल्ला दिला. तिथे नाटकात काम मिळू शकतात, असे तिला सुचविले. पुन्हा उसनवारी करून ती दिल्लीत आली. तिथे ‘अस्मिता’ थिएटर या नाट्यसंस्थेच्या अरविंद गौड यांना ती भेटली. इतरांनी ज्या पद्धतीने उडवून लावले तसे काही न करता गौड यांनी ‘तुम अँक्टिंग कर सकती हो…,’ असे सांगून तिला आत्मविश्‍वास दिला. त्यांनी तिला एक प्रॅक्टिकल सल्लाही दिला. ‘आयुष्यभर नाटक करत बसशील, तर आजारी पडल्यावर स्वत:चा इलाज करता येईल एवढेही पैसे मिळणार नाही. शहाणी असशील तर मुंबईत फिल्म इंडस्ट्रीत ट्राय कर.’ कंगनाने त्यांच्या सल्ल्यानुसार मुंबईला वेगवेगळ्या अँड एजन्सीज व प्रॉडक्शन हाऊसेसला आपले फोटो पाठविले.

एक दिवस अचानक मुंबईच्या भट्ट प्रॉडक्शन हाऊसेसकडून भेटायला या, असा निरोप आला. ते ‘गँगस्टर’ सिनेमा बनविणार होते. त्यातील बारगर्लच्या भूमिकेसाठी त्यांना बारगर्ल वाटेल असा चेहरा हवा होता. कंगनाने ऑडिशन दिली. मात्र वयाने ती फार लहान आहे, असे सांगून महेश भट्टने नापसंती दर्शविली. यामुळे काहीशा निराश झालेल्या कंगनाने आशाचंद्रा अँक्टिंग स्कूलमध्ये अँडमिशन घेतली. हे सर्व प्रयोग मित्र-मैत्रिणींनी केलेल्या आर्थिक मदतीच्या जोरावर सुरू होते. दरम्यान, भट्ट प्रॉडक्शनला हवा तसा चेहरा न मिळाल्याने त्यांनी पुन्हा कंगनाला निरोप पाठविला. कंगनाला त्यांनी साईन केले. ही बातमी घरी सांगण्यासाठी कंगनाने आईवडिलांना फोन केला. सिनेमाचा तपशील देताना महेश भट्ट, इमरान हाशमी, अनुराग बसूू ही नावे घेताच ते प्रचंड चिडलेत. वडिलांनी तर भरपूर शिव्या दिल्या. ते लोक तुझी ‘ब्ल्यू फिल्म’ काढतील, असा इशाराही दिला. कंगनाने पुन्हा घरच्यांना फाट्यावर मारले. मला माझं हित कळते, असे तिने त्यांना सुनावले. शूटिंगला सुरुवात झाली. टिपिकल फिल्मी मसाला ठासून भरलेला ‘गँगस्टर’ लवकरच तयार झाला आणि यशस्वीही झाला. कंगना खूश झाली. तिकडे हिमाचलमध्ये तिच्या घरच्यांनी सिनेमा पाहताच त्यांच्या तळपायाची आग मात्र मस्तकात गेली. कंगनाला यापुढे राणावत आडनाव लावायचं नाही, असा इशाराच तिच्या आजोबांनी दिला. सोबतच यापलीकडे घरात पाय टाकायचा नाही, अशी तंबीही दिली. घरच्यांनी संपूर्णपणे नाते तोडले तरी ‘गँगस्टर’ हिट झाल्यामुळे आपल्याला करिअरला चालना मिळेल, असे कंगनाला वाटत होते. मात्र तिला उलटेच अनुभव यायला लागलेत. जे सिनेनिर्माते तिच्याकडे स्टोरी सांगण्यासाठी येत होते ते वेगळ्याच अपेक्षा घेऊन येत होते. सरळ सरळ तिने शरीर द्यावे अशी त्यांची अपेक्षा होती. याला थोडीफार कंगनाही कारणीभूत होती. फिल्मी पाटर्य़ांमध्ये ती बिनधास्तपणे छाती व मांड्या उघड्या टाकून वावरत असे. हातात दारूचा ग्लासही असायचा. स्वाभाविकच तिच्याकडून निर्माते, दिग्दर्शक, अभिनेत्यांना तशी आशा होती. याचदरम्यान तिच्या आयुष्यात आदित्य पांचोली आला. अनेक मुलींसोबत लफडे असणारा भानगडबाज पांचोलीने तिला स्टार करण्याचं आमिष दाखविलं. कंगनाही त्याला भुलली. विवाहित पांचोलीसोबत ती त्याच्या एका फ्लॅटवर राहायला लागली. अनेकांनी तिला सावध केले, पण ती कोणाचं ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती. आपल्या बिनधास्त अँटिट्यूडमध्ये मला शहाणपणा शिकवायचा नाही, असे ती सांगत असे. दरम्यानच्या काळात पांचोली तिचा खूप मानसिक व शारीरिक छळ करतो आहे, अशा बातम्या आल्या. तिला दारूचं आणि ड्रग्जच व्यसन लागल्याचेही सिनेइंडस्ट्रीत बोललं जात होतं. त्याचदरम्यान मधुर भांडारकरचा ‘फॅशन’ सिनेमा आला. त्यातील ड्रगच्या अधीन झालेल्या तिच्या भूमिकेचं कौतुक झालं. मात्र तिला वेगळा अभिनय करावाच लागला नाही. प्रत्यक्ष आयुष्यातीलच भूमिका तिने केली, अशी टीकाही तिच्यावर झाली. मात्र सर्वसाधारपणे ‘फॅशन’मधील भूमिकेचं भरपूर कौतुक झालं. तिला साहाय्यक भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.

हे यश उमेद वाढविणार होतं. मात्र त्यामुळेही तिच्या करिअरला त्याचा काही फायदा झाला नाही. दरम्यान, तिचे व्यसनं, बेफिकीरपणा, उद्दामपणा, प्रेम प्रकरणं सुरूच होती. मधल्या काळात आदित्य पांचोलीचा पिच्छा सोडविल्यानंतर ती अध्ययन सुमन या नटाच्या प्रेमात पडली. त्यानंतर एका ब्रिटिश तरुणाच्याही प्रेमात पडल्याचं तिने एका टीव्ही शोमध्ये जाहीर केलं. मधल्या काळात ‘तनू वेड्स मनू’चा पहिला भाग आला. या सिनेमाचं भरपूर कौतुक झालं. खर्‍या अर्थाने पहिलं मोठं व्यावसायिक यश या सिनेमामुळे तिला मिळालं. तरी कंगनाला गंभीरपणे घ्यायची कोणाची तयारी नव्हती. गेल्या वर्षी मात्र हे चित्र बदललं. ‘क्वीन’ आणि ‘रिव्हॉल्व्हर राणी’ हे सिनेमे येताच कंगनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. हे सिनेमे जणू तिच्याचसाठी लिहिले होते. या दोन्ही चित्रपटांत तिच्या ताकदीच्या अभिनय क्षमतेचं दर्शन घडलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या यशानंतर तिचं कुटुंब मागचा सारा इतिहास विसरून तिच्याजवळ आलं. ‘क्वीन’च्या यशानंतर पहिल्यांदा अमिताभने तिला पत्र लिहून पुष्पगुच्छ पाठविला होता. ‘क्वीन’नंतर तिचं विश्‍वच बदलल.ं इंडस्ट्रीतील जी माणसं ही पोरगी आयुष्यात कधीच हिरॉईन बनू शकत नाही, तिच्याजवळ ना चेहरा, ना सेक्स अपील… हिरॉईनसाठी आवश्यक काहीच नाही, असे सांगत होते, तेच आता कंगना किती ग्रेट आर्टिस्ट आहे, असे गोडवे गायला लागले. ‘क्वीन’मधील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तर इंडस्ट्री तिला डोक्यावर घेऊन नाचायला लागली. दरम्यानच्या काळात तिच्यातल्या अनेक क्षमतांचा शोधही लागला. ‘क्वीन’मधील राणीचे डॉयलॉग स्वत: कंगनानेच लिहिले होते, ही माहिती बाहेर पडताच सारेच चकित झाले. मधल्या काळात स्क्रिप्ट रायटिंगचा कोर्स करण्यासाठी ती न्यूयॉर्कलाही जाऊन आली आणि आता तर काय ‘तनू वेड्स मनू रिटर्न्‍स’ सुपरहिट झाल्यानंतर तर कंगना आता जवळपास नंबर वनच्या स्थानावर पोहोचली आहे. तिचा शब्द झेलायला आता निर्माते, दिग्दर्शकांची रांग तिच्यामागे लागली आहेत. जे निर्माते-दिग्दर्शक तिची टर उडवीत होते ते आता कंगनाने आपल्यासोबत एक तरी सिनेमा करावा म्हणून नोटांच्या चळती घेऊन उभे आहेत. खास तिच्यासाठी रोल लिहिले जाताहेत. शेवटी यशासारखं दुसरं काही महत्त्वाचं नसतं, असं जे म्हणतात ते काही खोटं नाही.

अविनाश दुधे
(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)

भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६

Previous articleमोदींना आणखी वेळ दिला पाहिजे!
Next articleमिसळमहात्म्य
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here